व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मेक्सिकोच्या इंग्रजी भाषा क्षेत्रात अनौपचारिक साक्षकार्य

मेक्सिकोच्या इंग्रजी भाषा क्षेत्रात अनौपचारिक साक्षकार्य

मेक्सिकोच्या इंग्रजी भाषा क्षेत्रात अनौपचारिक साक्षकार्य

अथेन्समध्ये आपल्या प्रवासी सोबत्यांची वाट पाहत थांबलेल्या प्रेषित पौलाने वेळेचा सदुपयोग केला; तो अनौपचारिक साक्षकार्य करू लागला. बायबलमध्ये सांगितले आहे: ‘त्याने बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर तर्कवितर्क करायला सुरू केले.’ (प्रेषितांची कृत्ये १७:१७) यहुदीयाहून गालीलपर्यंतच्या त्याच्या प्रवासात येशूने विहिरीजवळ एका शोमरोनी स्त्रीला अनौपचारिक साक्ष दिली. (योहान ४:३-२६) देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी बोलण्याच्या प्रत्येक संधीचा तुम्ही देखील फायदा घेता का?

मेक्सिकोतील इंग्रजी भाषा क्षेत्र अनौपचारिक साक्षकार्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. पर्यटक रिसॉट्‌र्सना भेटी देतात, विद्यापीठांत विद्यार्थी येतात आणि जातात आणि मेक्सिकोत निवृत्ती मिळालेले विदेशी लोक, उद्याने आणि रेस्टॉरंटमध्ये जातात. इंग्रजी बोलू शकणारे अनेक यहोवाचे साक्षीदार, अशा लोकांबरोबर संभाषण सुरू करण्यात पटाईत झाले आहेत. वास्तविक, कोणी विदेशी दिसला किंवा इंग्रजी बोलणारा दिसला की ते लगेच संधीचा फायदा घेऊन त्याला साक्ष देतात. हे कसे केले जाते ते आपण पाहू या.

पुष्कळदा, इंग्रजी भाषा क्षेत्रात कार्य करणारे परदेशी बंधूभगिनी, विदेशी वाटणाऱ्‍या लोकांशी परिचय करून घेतात आणि ते कोठून आहेत हे विचारतात. साहजिकच यामुळे साक्षीदार बंधू किंवा भगिनी मेक्सिकोत काय करत आहेत हा प्रश्‍न विचारला जातो आणि मग त्याला किंवा तिला आपल्या ख्रिस्ती विश्‍वासांविषयी सांगण्याची संधी मिळते. जसे की, ओक्साकामधील इंग्रजी भाषा क्षेत्रात गरज असलेल्या ठिकाणी कार्य करणाऱ्‍या ग्लोरियाला अशाप्रकारे संभाषण सुरू करायला सोपे वाटते. शहरातील बाजारात अनौपचारिक साक्षकार्य करून घरी जाणाऱ्‍या ग्लोरियाला एकदा इंग्लंडच्या एका जोडप्याने थांबवले. त्या स्त्रीने ग्लोरियाला म्हटले: “ओक्साकाच्या रस्त्यावर कृष्णवर्णीय स्त्री! मला विश्‍वास बसत नाहीये!” यावर नाराज होण्याऐवजी, ग्लोरिया नुसतीच हसली आणि ती इथे मेक्सिकोत कशी आली त्यावर त्यांचे बोलणे सुरू झाले. त्या स्त्रीने ग्लोरियाला कॉफीसाठी आपल्या घरी आमंत्रण दिले. एक दिवस ठरवल्यावर, ग्लोरियाने टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके सादर केली, पण त्या स्त्रीने ती घेण्यास नकार दिला कारण, आपण नास्तिक आहोत असे तिने सांगितले. ग्लोरिया तिला म्हणाली, की तिला नास्तिक लोकांबरोबर बोलायला आवडते व “उपासना स्थळे—आवश्‍यक आहेत का?” या लेखावर तिचे काय मत आहे हे तिला ऐकायला आवडेल. त्या स्त्रीने लेख वाचण्याची तयारी दाखवून म्हटले: “तुला जर माझं मन वळवता आलं, तर याचा अर्थ तू खरंच काहीतरी साध्य केलं असं होईल.” कॉफी घेत असताना अनेक रोचक विषयांवर त्यांचे बोलणे झाले. यानंतर हे जोडपे इंग्लंडला पुन्हा गेले परंतु इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे त्यांच्या चर्चा चालू राहिल्या.

ग्लोरियाने वॉशिंगटन डी.सी.हून आलेल्या सरॉन नावाच्या एका विद्यार्थीनीबरोबरही चर्चा करायला सुरवात केली होती जी आपली मास्टर्स डिग्री पूर्ण करण्याकरता आदिवासी स्त्रियांबरोबर स्वयंसेवा करण्यासाठी ओक्साकात आली होती. सरॉनच्या कामाची प्रशंसा केल्यानंतर ग्लोरियाने तिला आपण मेक्सिकोत का आलो आहोत ते सांगितले. यामुळे त्यांच्यामध्ये बायबलविषयी आणि देव केवळ गरिबांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी काय करणार आहे याविषयी खूप छान चर्चा झाली. सरॉन म्हणाली, की हे किती विचित्र आहे, की अमेरिकेत असताना ती साक्षीदारांबरोबर कधी बोलली नव्हती परंतु मेक्सिकोत ती प्रथम भेटली ते एका यहोवाच्या साक्षीदाराला! सरॉनने बायबलचा अभ्यास सुरू केला व लगेच ख्रिस्ती सभांना हजर राहू लागली.

पुष्कळ परदेशी शांत, रम्य वातावरणाच्या शोधात मेक्सिकोतील समुद्रकिनाऱ्‍यावरील रिसॉट्‌र्समध्ये राहायला आले आहेत. अकापुल्कोत राहणाऱ्‍या लोकांशी संभाषण सुरू करायला लॉरल याच विषयाचा उपयोग करून त्यांना विचारते, की ते जेथून येतात त्या ठिकाणापेक्षा अकापुल्को रम्य ठिकाण आहे का आणि या परिसराविषयी त्यांना काय वाटते. मग ती त्यांना समजावून सांगते, की संपूर्ण पृथ्वी लवकरच एका नेत्रसुखद बागेसारखी प्रत्यक्षात होणार आहे. अशाप्रकारच्या संभाषणामुळे, प्राण्यांच्या दवाखान्यात भेटलेल्या एका कॅनेडियन स्त्रीसोबत तिला बायबलचा अभ्यास सुरू करता आला. तुम्ही जिथे राहता तिथे अशाप्रकारे संभाषण सुरू करू शकता का?

‘रस्त्यांवर आणि सार्वजनिक चौकांत’

“तुम्हाला इंग्रजी बोलता येते का?” असा प्रश्‍न विचारून पुष्कळदा रस्त्यांवर आणि सार्वजनिक चौकांत संभाषणास सुरवात केली जाते. पुष्कळ मेक्सिकन लोकांना आपल्या पेशामुळे किंवा ते अमेरिकेत राहिले असल्यामुळे इंग्रजी बोलायला येते.

एकदा व्हीलचेअरवर एक नर्स एका वृद्ध स्त्रीला घेऊन जात होती तेव्हा एका साक्षीदार दांपत्याने तिच्याशी बोलायला सुरवात केली. आपल्याला इंग्रजी बोलायला येते का, असे त्यांनी या स्त्रीला विचारले. ती त्यांना म्हणाली, की तिला इंग्रजी बोलायला येते कारण ती अनेक वर्षे अमेरिकेत होती. तिने टेहळणी बुरूज सावध राहा! ही नियतकालिके स्वीकारली; तिने पूर्वी ही नियतकालिके कधी वाचली नव्हती. मग तिने आपले नाव आणि पत्ता त्यांना दिला. तिचे नाव होते, कोन्स्वेलो. चार दिवसांनंतर, या दांपत्याने तिचा पत्ता शोधला तेव्हा त्यांना कळाले की ती एका नर्सिंग होममध्ये राहात होती आणि ते कॅथलिक नन्सद्वारे चालवले जात होते. सुरवातीला कोन्स्वेलोला भेटणे मुश्‍किल झाले कारण नन्सना या दांपत्याविषयी शंका येत होती आणि त्यांना सांगण्यात आले, की कोन्स्वेलोचे कोणी पाहुणे येऊ शकत नाहीत. पण, आपण आलो आहोत आणि तिला भेटायची आपली इच्छा आहे एवढे कोन्स्वेलोला नन्सनी सांगावे अशी विनंती या दांपत्याने केली. सरतेशेवटी कोन्स्वेलोशी त्यांची भेट झाली, तर तिने थेट त्यांना आत बोलावले. तेव्हापासून ही ८६ वर्षीय वृद्ध स्त्री, नन्स तिला उलटसुलट बोलत असूनही अगदी आनंदाने नियमितपणे बायबलचा अभ्यास करत आहे. शिवाय ती काही ख्रिस्ती सभांना देखील उपस्थित राहिली आहे.

नीतिसूत्रे १:२० मध्ये म्हटले आहे: “ज्ञान रस्त्यावर पुकारा करिते, चवाठ्यांवर [सार्वजनिक चौकांत] आपली वाणी उच्चारिते.” सॅन मिगेल डे आयेन्डेच्या चौकात काय घडले ते पाहा. एके दिवशी भल्या पहाटे राल्फ, बेंचवर बसलेल्या एका मध्यवयीन मनुष्याकडे बोलायला गेला. राल्फने त्याला टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिके दिली तेव्हा त्याला खूप आश्‍चर्य वाटले आणि त्याने राल्फला आपली कहाणी सांगितली.

तो एक व्हिएतनामी सैनिक होता आणि आपल्या सैनिकी सेवेदरम्यान त्याने अनेकांचा मृत्यू पाहिल्यामुळे त्याला नर्व्हस ब्रेकडाऊन झाला होता. त्याला युद्धाच्या आघाडीहून एका छावणीत पाठवण्यात आले होते. तेथे त्याला, सैनिकांचे मृतदेह अमेरिकेला पाठवण्याआधी धुण्याचे काम देण्यात आले होते. आता, तीस वर्षांनंतरही त्याला सतत भयानक स्वप्ने पडतात व त्याच्या मनात खूप भीती भरली आहे. त्या दिवशी सकाळी, चौकात बसलेला असताना तो मदतीसाठी मनातल्या मनात प्रार्थना करीत होता.

या माजी सैनिकाने प्रकाशने स्वीकारली तसेच राज्य सभागृहात येण्याचे आमंत्रणही स्वीकारले. सभेला उपस्थित राहिल्यावर तो म्हणाला की अख्ख्या तीस वर्षांत, त्याने केवळ याच दोन तासांत मानसिक शांती अनुभवली होती. हा मनुष्य सॅन मिगेल डे आयेन्डेत फार दिवस नव्हता, पण त्याच्याबरोबर पुष्कळदा बायबल अभ्यास करण्यात आला व तो आपल्या घरी जाईपर्यंत तो सर्व सभांना येत होता. त्याचा अभ्यास चालू राहावा म्हणून व्यवस्था करण्यात आली.

कामाच्या ठिकाणी व शाळेत साक्षीकार्य करणे

कामाच्या ठिकाणी, तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात अशी ओळख देता का? केप सॅन लुकसमध्ये व्हेकेशन अपार्टमेंट विकणारा (सुटीवर येणाऱ्‍यांना अर्पाटमेंट विकणारा) म्हणून काम करणारा एड्रिन असे करतो. यामुळे, त्याच्याबरोबर काम करणारी जूडी म्हणते: “तीन वर्षांपूर्वी जर कोणी मला यहोवाचा साक्षीदार होण्यास सांगितले असते तर त्यांना मी म्हटलं असतं, ‘हे मुळीच शक्य नाही.’ पण मी बायबल वाचायचं ठरवलं. मला वाटलं, ‘बायबल वाचणं काय इतकं कठीण नाही, कारण नाहीतरी मला वाचायला आवडतं!’ पण मी केवळ सहा पानंच वाचली आणि मला कळलं, की मला एकटीला हे जमणार नाही, मला बायबल समजायला मदतीची आवश्‍यकता आहे. तेव्हा मला माझ्याबरोबर काम करणाऱ्‍या एड्रिनची आठवण झाली. मला त्याच्याबरोबर बोलायला आवडायचं कारण आम्ही जिथं काम करतो तिथल्या सर्व लोकांमध्ये हा एकटाच सभ्य माणूस आहे.” एड्रिननं लगेच आपली भावी पत्नी केटी हिच्याबरोबर येऊन जूडीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्याची तयारी दाखवली. केटीनं जूडीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला आणि काही काळातच जूडी बाप्तिस्मा घेतलेली साक्षीदार बनली.

शाळेत अनौपचारिक साक्ष देण्याबाबतीत काय? दोन साक्षीदार भगिनी विद्यापीठात स्पॅनिशच्या वर्गांना जात होत्या, पण ख्रिस्ती संमेलन आले म्हणून त्या एक दिवस वर्गाला गेल्या नाहीत. त्या पुन्हा गेल्या तेव्हा त्यांना, त्यांनी या दिवशी काय केले ते स्पॅनिशमध्ये सांगा, असे सांगण्यात आले. त्यांनी संधीचा फायदा घेतला आणि स्पॅनिशमध्ये त्यांच्या परीने होता होईल तितकी साक्ष देण्याचा प्रयत्न केला. सिल्व्हिया, या त्यांच्या शिक्षिकेला बायबल भविष्यवाणींमध्ये खूप आवड होती. तिने इंग्रजीत बायबल अभ्यास स्वीकारला आणि आता सुवार्तेची प्रचारक आहे. तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य देखील अभ्यास करत आहेत. सिल्व्हिया म्हणते: “मी आयुष्यभर जे शोधत होते ते मला मिळाले आहे.” होय, अनौपचारिक साक्षकार्यामुळे उत्तम प्रतिफळ मिळू शकते.

इतर संधींचा उपयोग करणे

आदरातिथ्य दाखवल्याने देखील साक्ष देता येऊ शकते. सॅन कार्लोस, सोनोरा येथे सेवा करणाऱ्‍या जिम आणि गेलला असा अनुभव आला. एकदा, सकाळी ६:०० वाजता, एक बाई आपल्या कुत्र्यांना बाहेर फिरायला नेत असताना जिम आणि गेलची बाग कौतुकाने पाहत होती. जिम आणि गेलने तिला कॉफीसाठी घरात बोलावले. ६० वर्षांत पहिल्यांदा तिने यहोवाविषयी आणि सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी ऐकले. तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला.

एड्रियन देखील अनोळखी लोकांबरोबर दयाळूपणे वागते. एकदा, कॅनकन येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना, एक मुलगा तिच्याकडे आला आणि त्याने तिला, आपण कॅनडाहून आला आहात का, असे विचारले. एड्रियनने हो असे म्हटल्यावर त्याने तिला सांगितले, की त्याच्या बहिणीला शाळेत कॅनेडियन लोकांवर एक अहवाल तयार करायचा होता आणि तो व त्याची आई तिला मदत करायचा प्रयत्न करत होते. या मुलाच्या आईला इंग्रजी बोलता येत होते, ती एड्रियनजवळ येऊन बसली. कॅनेडियन लोकांबद्दलच्या प्रश्‍नांची एक एक करून उत्तरे दिल्यावर एड्रियन तिला म्हणाली: “पण मी कॅनडाहून इथं एका खास कारणासाठी—लोकांना बायबलबद्दल आणखी शिकायला मदत करण्यासाठी आले आहे. तुम्हाला त्याविषयी शिकायला आवडेल का?” या स्त्रीने होकार दिला. तिने दहा वर्षांपूर्वी चर्चला जायचे सोडून दिले होते व आता स्वतःच बायबलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत होती. तिनं एड्रियनला आपला पत्ता व फोननंबर दिला आणि तिच्याबरोबर समाधानकारक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.

“आपले अन्‍न जलाशयावर सोड”

प्रत्येक प्रसंगी बायबल सत्याविषयी बोलल्याने, अशा लोकांना साक्ष दिली जाते की ज्यांना राज्य संदेश ऐकण्याची पुष्कळदा किंवा एकदाही संधी मिळाली नाही. सेवाटानेको या बंदर शहरातील एका कॅफेमध्ये फार गर्दी असल्यामुळे, एका साक्षीदार भगिनीने एका परदेशी जोडप्याला आपल्या टेबलावर बसण्यास बोलावले. हे जोडपे सात वर्षांपासून विविध ठिकाणी समुद्राने प्रवास करीत होते. त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल नकारात्मक भावना व्यक्‍त केल्या. कॅफेत भेट झाल्यानंतर, ही भगिनी या जोडप्याच्या बोटीवर त्यांना भेटायला गेली आणि तिने त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी तिच्याकडून २० पेक्षा अधिक नियतकालिके आणि ५ पुस्तके घेतली आणि पुढील बंदरावर साक्षीदारांशी संपर्क साधण्याचे वचन दिले.

जेफ आणि डेब यांनी कॅनकन येथील एका शॉपिंग सेंटरमधील भोजनगृहाच्या अंगणात एका कुटुंबाला आपल्या एका गोंडस मुलीबरोबर पाहिले. त्यांनी या बाळाचे कौतुक केले तेव्हा तिच्या आईवडिलांनी त्यांच्याबरोबर पिझ्झा खायला त्यांना बोलावले. हे कुटुंब भारताहून आले होते. त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांविषयी कधी ऐकले नव्हते किंवा त्यांची प्रकाशनेही कधी पाहिली नव्हती. शॉपिंग सेंटरमधून निघताना जेफ आणि डेबने त्यांना काही प्रकाशने दिली.

युकाटनच्या किनाऱ्‍यापासून दूर असलेल्या एका बेटावर जेफला काहीसा असाच अनुभव आला. एका नवविवाहित चिनी जोडप्याने जेफला त्यांचे फोटो घ्यायला सांगितले आणि जेफही तयार झाला. त्यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी त्याला सांगितले, की ते अमेरिकेत १२ वर्षांपासून राहत होते परंतु त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांविषयी कधीच काही ऐकले नव्हते किंवा त्यांना पाहिले नव्हते! त्यांच्याबरोबर एक मैत्रीपूर्ण चर्चा सुरू झाली. जेफने त्यांना, अमेरिकेला गेल्यावर साक्षीदारांना शोधण्याचे उत्तेजन दिले.

तुमच्या भागात एखादा खास प्रसंग असेल जेव्हा तुम्हाला अनौपचारिक साक्ष देण्याची संधी मिळू शकेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना, ग्वानाह्वाटोच्या जवळ असलेल्या त्यांच्या पशुसंगोपन मळ्यात भेटायला आले होते तेव्हा संपूर्ण जगभरातील पत्रकार तेथे जमले होते. एका साक्षीदार कुटुंबाने या संधीचा फायदा घेऊन इंग्रजीत प्रचार करायचे ठरवले. त्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्तम होता. उदाहरणार्थ, एका पत्रकाराने कॉसोवो, कुवेत सारख्या अनेक युद्धांवर बातमी दिली होती. लपून गोळीबार करणाऱ्‍या एका सैनिकाची गोळी लागल्यामुळे या पत्रकारासोबत काम करणाऱ्‍या त्याच्या मित्राने त्याच्याच हातात आपला प्राण सोडला होता. पुनरुत्थानाविषयी ऐकल्यावर या पत्रकाराच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने, जीवनात एक उद्देश आहे याची समज दिल्याबद्दल देवाचे आभार मानले. तो म्हणाला, की तो कदाचित या साक्षीदार दांपत्याला पुन्हा भेटू शकणार नाही, परंतु बायबलमधून त्यांनी सांगितलेली सुवार्ता तो नेहमी आठवणीत ठेवेल.

वरील अनुभवांवरून दिसून येते, की अशा प्रकारच्या साक्षीकार्याचे परिणाम बहुतेकदा काय होतील हे सांगता येत नाही. तरीपण, सुज्ञ राजा शलमोनाने असे म्हटले: “आपले अन्‍न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.” तो पुढे असेही म्हणाला: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” (उपदेशक ११:१,) होय, पौल, येशू आणि मेक्सिकोतील इंग्रजी भाषा क्षेत्रात कार्य करणाऱ्‍या आधुनिक दिवसांतील या साक्षीदारांप्रमाणे आवेशाने “आपले अन्‍न” जलाशयांवर सोडा आणि सढळ हाताने ‘आपले बी पेरा.’