व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री

रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री

रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री

समजा तुम्हाला तुमच्या मुलासाठी बायको शोधायची आहे. कोणत्या प्रकारची व्यक्‍ती तुम्ही निवडाल? तिच्यात कोणते गुण असावयास हवेत? देखणी, हुशार, दयाळू, कष्टाळू अशी सून तुम्ही निवडाल? की, तुम्ही तिच्यात दुसरे काहीतरी पाहाल?

अब्राहामासमोर अशी एक समस्या आली होती. यहोवाने त्याला अभिवचन दिले होते, की त्याचा पुत्र इसहाक याच्याद्वारे त्याच्या संततीला आशीर्वाद मिळणार होते. अब्राहाम म्हातारा झाला आहे पण त्याचा मुलगा अजूनही अविवाहितच आहे एथपासून आपण हा अहवाल पाहणार आहोत. (उत्पत्ति १२:१-३, ७; १७:१९; २२:१७, १८; २४:१) इसहाकाला आणि त्याच्या भावी पत्नीला तसेच त्यांच्या संतानाला आशीर्वाद मिळणार असल्यामुळे अब्राहाम इसहाकाला शोभेल अशी एक पत्नी शोधण्याची व्यवस्था करतो. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे ती यहोवाची उपासक असावयास हवी. अब्राहाम राहत असलेल्या ठिकाणी म्हणजे कनानमध्ये यहोवाची सेवा करणारी एकही स्त्री मिळणे शक्य नसल्यामुळे त्याला दुसरीकडे स्थळ पाहावे लागणार होते. सरतेशेवटी ते रिबकाला निवडतात. पण ती त्यांना कशी भेटली? रिबका आध्यात्मिक मनोवृत्तीची स्त्री होती का? तिच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

शोभेल अशा स्त्रीचा शोध

अब्राहाम आपला सर्वात जुना सेवक कदाचित एलियाजर याला, यहोवाचे उपासक असलेल्या आपल्या नातेवाईकांमधून इसहाकासाठी मुलगी पाहण्याकरता दूरवरील मेसोपोटेमियाला पाठवतो. ही गोष्ट इतकी गंभीर होती, की एलियाजरला, कनान्यांमधून इसहाकासाठी पत्नी घेणार नाही अशी शपथ घ्यायला सांगितली जाते. अब्राहामचा याबाबतीतला आग्रह उल्लेखनीय आहे.—उत्पत्ति २४:२-१०.

अब्राहामाच्या नातेवाईकांच्या शहरात गेल्यावर, एलियाजर एका विहिरीपाशी आपल्या दहा उंटांना आणतो. हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा. संध्याकाळची वेळ आहे आणि एलियाजर प्रार्थना करतो: “पाहा, मी या पाण्याच्या विहीरीपाशी उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासहि मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो.”—उत्पत्ति २४:११-१४.

तिथल्या प्रत्येक स्त्रीला हे माहीत असेल, की दमलेला उंट भरपूर (जवळजवळ १०० लीटर) पाणी पिऊ शकतो. तेव्हा, दहा उंटांना पाणी पाजायला तयार असलेली स्त्री बरेच कष्ट करण्यास तयार असावयास हवी. दुसऱ्‍या स्त्रिया केवळ तिला पाहत उभ्या असताना, रिबकाच एकटी उंटांना पाणी पाजत आहे यावरून तिच्या शक्‍तीचा, सहनशीलतेचा, नम्रतेचा व मनुष्य आणि प्राणी यांच्याप्रती प्रेमाचा पुरावा दिसून येणार होता.

काय घडते? “त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधु नाहोर याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसावयास फार सुंदर होती; ती कुमारी होती; . . . ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या, बाबा; आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले.”—उत्पत्ति २४:१५-१८.

रिबका पसंतीस उतरते का?

रिबका ही अब्राहामाची नातपुतणी होती; ती केवळ देखणीच नव्हे तर सद्‌गुणी देखील होती. एका अनोळख्याबरोबर बोलायला ती लाजली नाही; परंतु ती फाजीलपणे पुढेपुढेही करत नव्हती. एलियाजरने प्यायला पाणी मागितले तेव्हा तिने लगेच त्याला पाणी दिले. यात नवल करण्यासारखे काही नाही कारण हे आदरातिथ्य आहे. रिबका परीक्षेच्या दुसऱ्‍या भागात उत्तीर्ण झाली का?

रिबका म्हणाली: “प्या, बाबा.” पण ती एवढ्यावरच थांबली नाही. ती पुढे म्हणाली: “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांस पोटभर पाजते.” जे सर्वसामान्यपणे अपेक्षिले जाऊ शकते त्याच्यापेक्षा ती अधिक करण्याची तयारी दाखवते. ती आनंदाने ‘त्वरा करून घागर डोणीत रिचविते व पुनः पाणी आणावयास विहिरीकडे धावत जाते; असे ती त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढते.’ अगदी उत्साहाने ती हे काम करते. अहवाल म्हणतो, की “तो मनुष्य अचंबा करून तिजकडे पाहत राहिला.”—उत्पत्ति २४:१९-२१.

ही कुमारिका अब्राहामच्या नात्यातली आहे हे समजल्यावर एलियाजर यहोवाचे धन्यवाद करण्याकरता खाली वाकतो. आपल्या वडिलांच्या घरी माझ्यासाठी आणि माझ्यासोबत आलेल्यांच्यासाठी उतरायला जागा आहे का, असे तो तिला विचारतो. ती त्याला होकार देते आणि आलेल्या पाहुण्यांविषयी सांगायला पळत घरी जाते.—उत्पत्ति २४:२२-२८.

एलियाजरची हकीकत ऐकल्यावर, रिबकेचा भाऊ लाबान आणि बाप बथुवेल, ही यहोवाचीच योजना असल्याचे समजतात. रिबका ही इसहाकासाठीच नेमलेली असते. ते म्हणतात: “तिला घेऊन जा; परमेश्‍वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.” रिबकेला काय वाटले? उद्या लगेचच जाणार काय, असे तिला विचारले असता ती “जाते” असा अर्थ असलेला इब्री भाषेतला केवळ एकच शब्द उच्चारते. तिला हे स्थळ स्वीकारण्यास बळजबरी करण्यात आली नव्हती. एलियाजरला शपथ देताना त्याने ही गोष्ट साफ केली होती, की “ती नवरी तुजबरोबर येण्यास कबूल झाली नाही” तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. पण रिबकेलाही ही यहोवाची योजना असल्याचे दिसून येते. त्यामुळे ती विनाविलंब आपल्या कुटुंबाला सोडून, ती ज्याला पूर्वी कधी भेटली देखील नव्हती त्याच्याशी विवाह करायला जाते. हा धाडसी निर्णय विश्‍वासाचे उल्लेखनीय उदाहरण आहे. ही खरोखरच एक उत्तम निवड होती!—उत्पत्ति २४:२९-५९.

इसहाकाला भेटल्यावर रिबका, आज्ञाधारकता दाखवण्यासाठी डोक्यावर पदर ओढते. इसहाक रिबकेला पत्नी म्हणून स्वीकारतो; यात काही शंका नाही, की तिच्या उत्तम गुणांमुळे तो तिच्या प्रेमात पडतो!—उत्पत्ति २४:६२-६७.

जुळी मुले

जवळजवळ १९ वर्षांपर्यंत रिबकेला मूल नव्हते. सरतेशेवटी, तिला दिवस जातात; पण तिचे गर्भारपण कष्टप्रद होते कारण तिच्या पोटात जुळी असतात जी पोटात झगडत असतात व यामुळे ती देवाकडे आक्रोश करते. आपणही आपल्या जीवनात खडतर काळ येतो तेव्हा कदाचित देवाकडे आक्रोश करू. यहोवा रिबकेचा आकांत ऐकतो आणि तिला हमी देतो. तो तिला म्हणतो, की ती दोन राष्ट्रांची माता होणार आहे व “वडील धाकट्याची सेवा करील.”—उत्पत्ति २५:२०-२६.

केवळ वरील शब्दांमुळेच रिबकेला तिचा धाकटा मुलगा याकोब याच्याबद्दल जास्त प्रेम होते, असे नाही. तर दोन्ही मुलांमध्ये फरक होता. याकोब “साधा” होता, परंतु एसावाची आध्यात्मिक गोष्टींबद्दल इतकी बेपर्वा मनोवृत्ती होती की त्याने केवळ एका भोजनासाठी, आपला जन्महक्क अर्थात देवाची अभिवचने वारशाने प्राप्त करण्याचा हक्क याकोबाला विकला. त्याने दोन हित्ती स्त्रियांबरोबर विवाह करून आध्यात्मिक मूल्यांचा अनादर केला, किंबहुना त्यांना तुच्छ लेखले आणि आपल्या पालकांना मानसिक यातना दिल्या.—उत्पत्ति २५:२७-३४; २६:३४, ३५.

याकोबाला आशीर्वाद मिळवून देण्याचा प्रयत्न

एसावाला याकोबाची सेवा करावी लागेल, हे इसहाकाला माहीत होते की नाही याविषयी बायबलमध्ये काही सांगण्यात आलेले नाही. परिस्थिती काहीही असो, रिबका आणि याकोब या दोघांना हे माहीत होते, की आशीर्वाद हे त्यालाच मिळणार होते. एसाव आपला पिता इसहाक याला, त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्याचे मांस शिजवून देईल तेव्हा इसहाक त्याला आशीर्वाद देणार आहे हे ऐकताच रिबका लगेच हालचाल करते. तिच्या तरुणपणात तिने दाखवलेला निर्णायकपणा व आवेश, तिच्या म्हातारपणीही कमी झालेला नसतो. ती याकोबाला ‘तिच्या सांगण्याप्रमाणे’ दोन चांगली करडे घेऊन येण्याची आज्ञा देते. ती याकोबाच्या आवडीचे पक्वान्‍न करणार होती. मग, याकोब आपण एसाव असल्याचे ढोंग करून आशीर्वाद मिळवेल. पण याकोब याला नकार देतो. त्याच्या बापाला, नक्कीच कळेल की तो त्याला ठकवीत आहे आणि तो त्याला शाप देईल! पण रिबका मात्र त्याला गळ घालत राहते. ती त्याला म्हणते: “माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो.” मग ती याकोबाच्या आवडीचे पक्वान्‍न बनवते, याकोबाला एसावाप्रमाणे वस्रे घालते आणि त्याला इसहाकाकडे पाठवते.—उत्पत्ति २७:१-१७.

रिबका अशी का वागली हे शास्त्रवचनांत सांगितलेले नाही. पुष्कळ जण तिची टीका करतात, परंतु बायबल तिची टीका करत नाही, आणि इसहाकाला जेव्हा कळते की याकोबाला आशीर्वाद मिळाला तेव्हा इसहाकही तिची टीका करत नाही. उलट, याकोब या आशीर्वादात आणखी भर घालतो. (उत्पत्ति २७:२९; २८:३, ४) यहोवाने आपल्या पुत्रांविषयी काय म्हटले होते, हे रिबकेला माहीत असते. त्यामुळे याकोबासाठी असलेले आशीर्वाद त्यालाच मिळतील याची खात्री करण्यासाठी ती पावले उचलते. हे अगदी यहोवाच्या इच्छेच्या सामंजस्यात असते.—रोमकर ९:६-१३.

याकोबाला हारानास पाठवले जाते

याकोबाचा भाऊ एसाव याचा राग थंड होत नाही तोपर्यंत याकोबाला पळून जाण्याची गळ घालून रिबका एसावाचा डाव हाणून पाडते. ती आपल्या योजनेसाठी इसहाकाची संमती मिळवते पण एसाव याकोबावर चिडला आहे याचा दयाळूपणे उल्लेख करत नाही. उलट, ती व्यवहारचातुर्याने आपल्या नवऱ्‍यासमोर, याकोबाने कोणा कनानी स्त्रीबरोबर विवाह करू नये अशी भीती व्यक्‍त करते. इसहाकाला हे लगेच पटते आणि तो याकोबाला, असा विवाह न करण्याची आज्ञा देतो व त्याला देव-भीरू पत्नी शोधण्यासाठी रिबकेच्या कुटुंबाकडे जाण्यास सांगतो. त्यानंतर रिबका पुन्हा याकोबाला भेटते असे कोणत्याही अहवालात म्हटलेले नाही; परंतु तिच्या कार्यांमुळे भावी इस्राएल राष्ट्राला मोठे प्रतिफळ मिळते.—उत्पत्ति २७:४३–२८:२.

रिबकेविषयी आपल्याला जे माहीत आहे त्यामुळे आपण तिची प्रशंसा करण्यास प्रवृत्त होतो. ती देखणी होती यात काही संशय नाही परंतु देवाबद्दल असलेली तिची श्रद्धा हे तिचे खरे सौंदर्य होते. आणि अब्राहामाला आपल्या सूनेत हेच हवे होते. अब्राहामाने जे अपेक्षिले होते त्याच्यापेक्षा कैक पटीने तिच्यात उत्तम गुण होते. देवाकडून आलेल्या मार्गदर्शनाचे अनुकरण करण्यातील तिचा विश्‍वास आणि धैर्य, तिचा आवेश, तिची शालीनता आणि तिचे उदार आदरातिथ्य, हे सर्व असे गुण आहेत ज्यांचे सर्व ख्रिस्ती स्त्रियांनी अनुकरण केले पाहिजे. खरोखरच आदर्श असलेल्या स्त्रीमध्ये यहोवा हेच गुण पाहतो.