व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंध असूनही मी पाहू शकत होतो!

अंध असूनही मी पाहू शकत होतो!

जीवन कथा

अंध असूनही मी पाहू शकत होतो!

एगॉन हाऊसर यांच्याद्वारे कथित

माझी दृष्टी जाऊन दोन महिने झाले पण, माझ्या जीवनभर मी ज्याकडे दुर्लक्ष करत होतो ते बायबल सत्य पाहायला माझे मनचक्षु उघडले.

सत्तरपेक्षा अधिक वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा मी आता विचार करतो तेव्हा, माझ्या जीवनातील अनेक पैलूंमुळे मला समाधान मिळते. मी माझ्या जीवनातील एक पैलू जरी बदलला असता तर मी लहानपणीच यहोवा देवाविषयी शिकण्याची निवड केली असती.

अर्जेंटिना व ब्राझीलच्या मधोमध असलेल्या अटलांटिक किनाऱ्‍यालगत अनेक किलोमीटरपर्यंत सृष्टीसौंदर्य लाभलेल्या नासपतीच्या आकाराच्या, उरुग्वे देशात १९२७ साली माझा जन्म झाला. येथील रहिवाशी प्रामुख्याने, इटली व स्पेनहून आलेले लोक आहेत. पण माझे आईवडील हंगेरीहून येथे राहायला आले होते आणि मी लहान होतो तेव्हा आम्ही गरीब होतो खरं परंतु आम्ही अशा वस्तीत राहत होतो जेथे सर्वजण एकमेकांशी प्रेमानं राहत होते. आम्ही दारांना कधी कुलपं लावत नव्हतो, आमच्या घराच्या खिडक्यांना गज नव्हते. आमच्यामध्ये जातीभाव मुळीच नव्हता. विदेशी, स्थानीय, काळे, गोरे—आम्ही सर्व एकमेकांचे मित्र होतो.

माझे आईवडील रोमन कॅथलिक चर्चचे सक्रिय सदस्य होते आणि मी वयाच्या दहाव्या वर्षी ऑल्टर बॉय झालो. प्रौढ झाल्यावर मी एका स्थानीय पाळकाबरोबर काम करू लागलो आणि बिशपांच्या देखरेखीखाली असलेल्या त्यांच्या सल्लागारांच्या गटातला एक सदस्य बनलो. मी वैद्यकीय पेशा निवडल्यामुळे मला, वेनेझुएलात कॅथलिक चर्चने आयोजित केलेल्या एका परिषदेत भाग घेण्याचं आमंत्रण मिळालं. स्त्री अवयवांची विकृती व त्यावर उपचार यांचा अभ्यास करणाऱ्‍या आमच्या गटाला, त्या काळी बाजारात विकण्याकरता आणल्या जाणाऱ्‍या संततिप्रतिबंधक गोळ्यांचा अभ्यास करण्यास नेमण्यात आलं.

वैद्यकीय विद्यार्थी या नात्याने माझ्यावर पडलेली पहिली छाप

वैद्यकीय विद्यार्थी असताना मी मानवी शरीराचा जितका अभ्यास करू लागलो तितका माझ्यावर त्याच्या रचनेतील सुजाणतेचा प्रभाव पडू लागला. जसे की, शरीराची आपोआप बरं होण्याची, एखाद्या आघातातून वर येण्याची क्षमता, उदाहरणार्थ, यकृताचा किंवा काही बरगड्यांचा थोडासा भाग कापला जातो तेव्हा तो पुन्हा पूर्ववत होतो हे पाहून मी विस्मित झालो.

त्याचबरोबर, मी अनेक रुग्णांनाही पाहिलं ज्यांचा अतिशय गंभीर अपघात झाला होता; त्यांना रक्‍तसंक्रमण दिल्यावर ते मरायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. मला अजूनही आठवतं, की रक्‍त दिल्यावर वाढलेल्या गुंत्यामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर बोलणं किती कठीण असायचं. पुष्कळदा, नातेवाईकांना हे सांगितलं जात नसे, की त्यांच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू रक्‍त संक्रमण दिल्यामुळे झाला होता. त्याऐवजी त्यांना दुसरी कारणं सांगितली जात असे. इतकी वर्षे उलटली आहेत तरी आजही मला, रक्‍तसंक्रमणाविषयी माझ्या मनात अस्वस्थ करणाऱ्‍या भावना कशा निर्माण व्हायच्या हे अजूनही आठवतं; त्यामुळे मी हा निष्कर्ष काढला, की रक्‍तसंक्रमणात काहीतरी चूक निश्‍चित आहे. तेव्हा मला रक्‍ताच्या पावित्र्याविषयी यहोवाचा नियम माहीत असता तर किती बरं झालं असतं! मी रक्‍तसंक्रमणाविषयी इतका अस्वस्थ का होतो त्याचं निदान कारण तरी मला कळालं असतं!—प्रेषितांची कृत्ये १५:१९, २०.

जनसेवेमुळे मिळणारे समाधान

मी सर्जन झालो आणि सांता लुसियातील एका वैद्यकीय साहाय्य केंद्राचा व्यवस्थापकही झालो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल सायन्स येथेही मी काम करायचो. यामुळे मला खूप समाधान मिळायचं. मी लोकांना त्यांच्या आजारपणात साहाय्य केलं, त्यांच्या यातना कमी केल्या, पुष्कळदा त्यांचे जीवही वाचवले आणि गरोदर स्त्रियांचं बाळंतपण करून नवीन जिवांना या जगात यायलाही मदत केली. रक्‍तसंक्रमणाच्या माझ्या पूर्वीच्या अनुभवामुळे मी ते देण्याचे टाळू लागलो आणि हजारो शस्त्रक्रिया रक्‍ताविना केल्या. माझं असं मत होतं, की रक्‍तस्राव म्हणजे एखाद्या पिंपातून होणारी पाण्याची गळती. ही गळती खरोखरच थांबवायची असेल तर, पिपांत आणखी पाणी ओतण्याची नव्हे तर छिद्र बुजवण्याची गरज आहे.

साक्षीदार असलेल्या रुग्णांवर उपचार करणे

रक्‍ताविना शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी जेव्हा यहोवाचे साक्षीदार आमच्या दवाखान्यात येऊ लागले तेव्हा म्हणजे १९६० च्या दशकात माझी त्यांच्याबरोबर ओळख होऊ लागली. मी एका रुग्णाची केस केव्हाही विसरणार नाही; या भगिनीचे नाव होते मर्सिथीस गोन्झालीझ; ती पायनियर (पूर्ण वेळेची सेविका) होती. तिच्यात इतके कमी रक्‍त होते, की डॉक्टर तिच्यावर शस्त्रक्रिया करायला काही केल्या तयार होईनात; शस्त्रक्रिया केल्यास ती हमखास मरेल असा त्यांचा पक्का विश्‍वास होता. तिला रक्‍तस्राव होत होता तरीपण आम्ही तिच्यावर आमच्या दवाखान्यात शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि पुढील ३० वर्षांपर्यंत म्हणजे अलीकडेच वयाच्या ८६ व्या वर्षी तिचा मृत्यू होईपर्यंत तिने पायनियरींग केली.

इस्पितळात असलेल्या आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींची साक्षीदार किती प्रेमाने व आवडीने काळजी घेतात हे पाहून मी नेहमी प्रभावीत होत असे. मी राऊण्डला जायचो तेव्हा, ते माझ्याशी आपल्या विश्‍वासांविषयी बोलायचे तेव्हा मला आवडायचं आणि ते देत असलेली प्रकाशनं मी घेत असे. पण माझ्या मनात ही कल्पनाच शिरली नाही, की लवकरच मी केवळ त्यांचा डॉक्टरच नव्हे तर त्यांचा आध्यात्मिक भाऊ होईन.

साक्षीदारांशी माझा आणखी जवळचा संपर्क तेव्हा आला जेव्हा मी एका रुग्णाच्या मुलीशी म्हणजे बट्रीझशी, लग्न केलं. तिच्या कुटुंबातील बहुतेक जण साक्षीदारांबरोबर सहवास राखू लागले होते आणि आमचं लग्न झाल्यावर ती देखील सक्रिय साक्षीदार बनली. पण मी, माझ्या कामात व्यस्त होतो आणि वैद्यकीय क्षेत्रात मला मिळालेल्या नावलौकिकामुळे आनंदी होतो. माझं जीवन यशस्वी आहे, असं मला वाटत होतं. पण माझी ही दुनिया लवकरच कोलमडून पडणार आहे, याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती.

माझ्यावर संकट कोसळतं

एका सर्जनला होणारी सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्याची दृष्टी जाणं. माझ्याबाबतीत हेच झालं. अचानक माझ्या दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीपटलाचे विदारण होऊ लागलं आणि मी अंधळा झालो! माझी दृष्टी पुन्हा येईल की नाही हे मला माहीत नव्हतं. माझ्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यावर मी बिछान्यावर पडून होतो, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती; मी पूर्णतः निराश झालो होतो. मी काही कामाचा नाही, माझं जीवन व्यर्थ आहे ही भावना तेव्हा माझ्या मनात इतकी बळावली, की मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. मी चवथ्या माळ्यावर होतो. मी बिछान्यातून उठलो, चाचपडत चाचपडत भिंतीपर्यंत गेलो आणि खिडकी शोधू लागलो. खिडकीतून खाली उडी टाकून मला माझं जीवन संपवायचं होतं. पण खिडकीत जाण्याऐवजी मी चुकून कॉरिडोरमध्ये गेलो आणि एका नर्सनं मला पुन्हा माझ्या बिछान्याजवळ आणून सोडलं.

त्यानंतर मी पुन्हा जीव द्यायचा प्रयत्न केला नाही. पण माझ्या अंधाऱ्‍या जगात मी निराश, चिडचिडा होत गेलो. याच दरम्यान मी देवाला असं वचन दिलं, की त्यानं जर मला माझी दृष्टी पुन्हा दिली तर मी बायबलचं पान न्‌ पान वाचून काढेन. हळूहळू माझी दृष्टी पुन्हा येऊ लागली आणि मला वाचता येऊ लागलं. पण आता मी सर्जन नव्हतो. उरुग्वेत एक म्हण आहे, “नो हाय मॉल के पोर ब्येन नो वेंगा,” ज्याचा असा अर्थ होतो, की नकारात्मक गोष्टींतून काहीतरी सकारात्मक घडू शकते. या म्हणीच्या सत्यतेचा मला अनुभव येणार होता.

चुकीची सुरवात

मला द जेरुसलेम बायबलच्या मोठ्या अक्षरांची आवृत्ती विकत घ्यायची होती पण मला समजलं, की यहोवाच्या साक्षीदारांकडे कमी किंमतीचे बायबल मिळते; आणि एक तरुण साक्षीदार ते मला माझ्या घरी आणून देण्यास तयारही झाला. दुसऱ्‍या दिवशी सकाळी, तो दारात बायबल घेऊन उभा होता. माझ्या पत्नीनं दार उघडलं आणि ती त्याच्याशी बोलली. पण मी आतून जोरात खेकसलो, की त्यानं जर त्या बायबलचे पैसे घेतले असतील तर त्याला माझ्या घरात कसलाही थारा नाही व त्यानं लगेच इथून निघून जावं; आणि तो खरंच लगेच निघून गेला. पण हीच व्यक्‍ती माझ्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची मला तेव्हा जराही जाणीव नव्हती.

एकदा, मी माझ्या बायकोला एक वचन दिलं होतं पण मी ते पाळू शकलो नव्हतो. त्यामुळे तिला खूष करण्यासाठी मी तिला म्हणालो, की मी तुझ्याबरोबर ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहीन. आणि तो दिवस आला तेव्हा तिला दिलेलं वचन मला आठवलं आणि मी तिच्याबरोबर त्या विधीसाठी गेलो. तिथलं मैत्रीपूर्ण वातावरण आणि त्यांनी प्रेमळपणे माझं स्वागत केल्याचं पाहून तर मी खूप प्रभावित झालो. वक्‍त्‌याने भाषण द्यायला सुरवात केली तेव्हा मला खूप आश्‍चर्य वाटलं, कारण मी ज्याला माझ्या घरातून हाकलून लावलं होतं तोच तरुण मनुष्य भाषण देत होता; त्याचं बोलणं माझ्या अंतःकरणापर्यंत पोहंचलं आणि मी त्याला किती वाईटपणे वागवलं होतं याची मला स्वतःलाच लाज वाटू लागली. पण आता सलोखा करायचा कसा?

मी माझ्या बायकोला त्याला आपल्या घरी जेवायला येण्याचे आमंत्रण द्यायला सांगितले; पण ती म्हणाली: “तुम्हीच त्याला बोलावलं तर आणखी बरं होईल, नाही का? थांबा, तो आपल्याला येऊन भेटेल.” ती बरोबर बोलली होती. तो आमच्याजवळ आला, त्यानं आम्हाला नमस्ते म्हटलं आणि आमंत्रणही स्वीकारलं.

तो ज्या संध्याकाळी आमच्या घरी आला होता त्या दिवशी आमच्यात झालेलं संभाषण, माझ्या जीवनात झालेल्या बदलांची सुरवात होती. त्यानं मला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरवते * हे पुस्तक दाखवलं; आणि मी त्याला माझ्याजवळ असलेल्या याच पुस्तकाच्या सहा प्रती दाखवल्या. साक्षीदार रुग्णांनी मला त्या प्रती दिल्या होत्या पण मी ते पुस्तक कधीच वाचलं नव्हतं. जेवण उरकल्यानंतर रात्री उशिरापर्यंत, मी त्याला प्रश्‍नावर प्रश्‍न विचारत राहिलो—आणि त्यानं मला माझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून दाखवली. आमची चर्चा दुसऱ्‍या दिवशी पहाटेपर्यंत चालली. निघण्याआधी त्यानं मला, सत्य पुस्तकाद्वारे बायबलचा अभ्यास करण्याविषयी विचारलं. आम्ही तीन महिन्यात या पुस्तकाचा अभ्यास संपवला आणि मग “मोठी बाबेल पडली!” देवाचे राज्य शासन करते! * (इंग्रजी) या पुस्तकाचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर मी यहोवा देवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला.

पुन्हा एकदा मी कामाचा आहे असे वाटू लागणे

माझ्या खरोखरच्या अंधत्वामुळे, मी आतापर्यंत ज्याच्याकडे दुर्लक्ष केले होते ते बायबलमधील सत्य पाहायला माझे “अंतःचक्षु” उघडले. (इफिसकर १:१८) यहोवा आणि त्याच्या प्रेमळ उद्देशांबद्दल माहीत झाल्यावर माझं जीवनच बदललं. पुन्हा एकदा मला, मी काही कामाचा आहे असं वाटू लागलं, आणि मला खूप आनंद झाला. मी लोकांना शारीरिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या मदत करत आहे आणि त्यांना, या व्यवस्थीकरणात आपले आयुष्य आणखी कसे वाढवायचे आणि नव्या युगात कायमचे कसे वाढवायचे हे दाखवत आहे.

मी, वैद्यकीय क्षेत्रात अद्ययावत माहिती घेत राहतो आणि रक्‍त घेतल्याचे धोके, पर्यायी उपचारपद्धती, रुग्णांचा हक्क आणि जैवनीती (बायोएथिक्स) यांवर संशोधन केले आहे. वैद्यकीय परिषदांमध्ये मला भाषण द्यायला बोलावलं जातं तेव्हा स्थानीय डॉक्टरांपुढे मला ही माहिती सादर करण्याच्या अनेक संधी मिळतात. १९९४ साली, मी ब्राझीलमधील रिओ द झानेऊरुत झालेल्या रक्‍ताविना उपचारावरील पहिल्या परिषदेत उपस्थित राहिलो आणि रक्‍तस्राव होतो तेव्हा काय करता येईल यावर भाषण दिले. त्यातील काही माहिती, हेमोटेरापिआ नावाच्या वैद्यकीय मासिकात मी लिहिलेल्या “उना प्रोप्वेसटा एस्राटेकयास पारा एल त्राताम्येनतो डे लास एमोराकयास,” (रक्‍तस्राव थांबवणाऱ्‍या उपचारासाठी एक योग्य प्रस्ताव) या लेखात छापून आली.

डॉक्टरांकडून आलेल्या दबावात एकनिष्ठ

सुरवातीला, रक्‍तसंक्रमणाविषयी माझ्या मनात असलेल्या शंका, बहुतेककरून मला असलेल्या विज्ञानाच्या माहितीच्या आधारे होत्या. परंतु, मी स्वतः जेव्हा इस्पितळात एक रुग्ण म्हणून राहिलो तेव्हा रक्‍तसंक्रमणाचा विरोध करणं आणि डॉक्टरांकडून येणाऱ्‍या दबावाचा सामना करणं सोपं नव्हतं. हृदयविकाराचा जोराचा झटका येऊन गेल्यानंतर, मला एका सर्जनला माझ्या भूमिकेविषयी समजावून सांगायला दोन तास लागले. हा सर्जन माझ्या एका चांगल्या मित्राचा मुलगा होता आणि तो मला म्हणाला, की रक्‍तसंक्रमणामुळे माझा जीव वाचणार असेल तर ते तो मला नक्की देईल. मी मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना केली, की या डॉक्टरला माझा निर्णय समजू दे व त्याला माझा निर्णय पटत नसेल तर त्याने माझ्या निर्णयाचा आदर करावा. सरतेशेवटी, त्यानं माझ्या निर्णयांचा आदर करण्याचं वचन दिलं.

दुसऱ्‍या एका प्रसंगी, मला माझ्या प्रोस्टेट ग्रंथीतून एक मोठी गाठ काढावी लागली. मला रक्‍तस्राव होत होता. पुन्हा एकदा मला, मी रक्‍तसंक्रमण का घेणार नाही त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले; माझे दोनतृतीयांश रक्‍त गेलं होतं तरीपण डॉक्टरांनी माझ्या निर्णयाचा आदर केला.

मनोवृत्तीत बदल

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्सचा एक सदस्य यानात्याने मला, रुग्णाच्या हक्कांच्या प्रती वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांच्या व कायदेशीर अधिकाऱ्‍यांच्या मनोवृत्तीत बदल होत असल्याचे पाहून समाधान वाटतं. पूर्वी डॉक्टरांची हक्क गाजवण्याची वृत्ती असायची परंतु आता ते माहितीपूर्वक संमतीचा आदर करू लागले आहेत. ते आता रुग्णांना त्यांच्या आवडीची उपचार पद्धती निवडू देतात. पूर्वीप्रमाणे आता यहोवाच्या साक्षीदारांना, कोणताही वैद्यकीय उपचार मिळण्यास पात्र नसलेले धर्मवेडे समजले जात नाही. उलट, त्यांना, जाणकार रुग्ण समजून त्यांच्या हक्कांचा आदर केला पाहिजे असं समजलं जातं. वैद्यकीय परिषदांमध्ये आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये, “यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रयत्नांमुळे, आम्ही आता समजू लागलो आहोत. . . ” “साक्षीदारांकडून आम्ही असे शिकलो. . . ” आणि “त्यांनी आम्हाला सुधारण्यास शिकवलं आहे” असे उद्‌गार सुविख्यात प्राध्यापकांनी काढले आहेत.

असं म्हटलं जातं, की जीवन सर्वात महत्त्वपूर्ण आहे कारण ते नसतं तर स्वातंत्र्य, मुक्‍ती, आदर निरर्थक असते. आता पुष्कळ लोक एक श्रेष्ठ कायदेशीर कल्पना स्वीकारू लागले आहेत; त्यांना ही जाणीव होऊ लागली आहे, की प्रत्येक व्यक्‍ती आपल्या व्यक्‍तिगत हक्कांचा मालक आहे आणि ठराविक परिस्थितीत कोणत्या हक्कांना प्राधान्य दिलं पाहिजे हे केवळ तीच ठरवू शकते. अशाप्रकारे, आदर, निवड करण्याचं स्वातंत्र्य आणि धार्मिक विश्‍वासांना प्राधान्य दिलं जातं. रूग्णाला आपल्या आरोग्याविषयी स्वतः निर्णय घेण्याचा हक्क आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी सुरू केलेल्या इस्पितळ माहिती सेवामुळे अनेक डॉक्टरांना या बाबतीत आणखी माहिती घेण्यास मदत मिळाली आहे.

माझं कुटुंब सतत माझ्या पाठीशी असल्यामुळे मी यहोवाच्या सेवेत उपयुक्‍त ठरू शकतो आणि ख्रिस्ती मंडळीत वडील यानात्याने सेवा करू शकतो. मी आधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, यहोवाविषयी मी जरा लवकर शिकून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं, याचा मला पस्तावा आता होत आहे. तरीपण, “मी रोगी आहे, असे एकहि रहिवासी म्हणणार नाही,” त्या देवाच्या राज्यात जगण्याची अद्‌भुत आशा पाहण्यास त्यानं माझे डोळे उघडल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे.—यशया ३३:२४. *

[तळटीपा]

^ परि. 24 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

^ परि. 24 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

^ परि. 34 हा लेख तयार होत असताना, बंधू एगॉन हाऊसर यांचा मृत्यू झाला. ते शेवटपर्यंत विश्‍वासू होते आणि त्यांना पक्की आशा होती, याचा आपल्याला आनंद वाटतो.

[२४ पानांवरील चित्र]

तिशीत असताना मी सांता लुसियातील एका इस्पितळात काम करत होतो

[२६ पानांवरील चित्र]

माझी पत्नी बट्रीझ हिच्याबरोबर १९९५ साली