व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तटस्थता ख्रिस्ती प्रीतीच्या आड येते का?

तटस्थता ख्रिस्ती प्रीतीच्या आड येते का?

तटस्थता ख्रिस्ती प्रीतीच्या आड येते का?

बायबल वाचणे, प्रार्थना करणे आणि रविवारच्या दिवशी धार्मिक गाणी म्हणणे केवळ एवढेच ख्रिस्ती होण्यात सामील नाही. त्यासाठी देवाकरता आणि लोकांकरता काही करणे आवश्‍यक आहे. बायबल म्हणते: “आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.” (१ योहान ३:१८) येशूला इतरांबद्दल खरोखरची चिंता होती व ख्रिश्‍चनांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. प्रेषित पौलाने सह-उपासकांना “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करत राहण्याचे उत्तेजन दिले. (१ करिंथकर १५:५८) प्रभूचे काम म्हणजे काय? गरिबांच्या व पीडित लोकांच्या लाभाकरता सरकारी धोरणे बदलण्याचा प्रयत्न करणे हे आहे का? येशूने हेच केले का?

येशूला पुष्कळांनी राजकारणात भाग घ्यायला किंवा एखाद्या पक्षाची बाजू घ्यायला गळ घातली परंतु त्याने तसे करण्यास नकार दिला. त्याने सैतानाने दिलेल्या जगातल्या सर्व राज्यांचा अधिकार नाकारला, कर देण्याविषयीच्या वादात सामील झाला नाही आणि काहींनी मिळून त्याला राजा बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तेथून निघून गेला. (मत्तय ४:८-१०; २२:१७-२१; योहान ६:१५) अशी तटस्थ भूमिका घेऊनही इतरांचे भले होईल अशी कृत्ये करण्यात तो मागे पडला नाही.

लोकांचे कायमचे भले ज्यामुळे होईल अशा गोष्टींवर त्याने लक्ष केंद्रीत केले. त्याने पाच हजार लोकांना जेवू घातल्यामुळे आणि आजाऱ्‍यांना बरे केल्यामुळे काही लोकांना तात्पुरता फायदा झाला परंतु त्याच्या शिकवणीमुळे सर्व मानवजातीला सर्वकाळचा आशीर्वाद प्राप्त झाला. येशूला मदत कार्यांचा आयोजक म्हणून नव्हे तर केवळ “गुरुजी” म्हणून ओळखले जात होते. (मत्तय २६:१८; मार्क ५:३५; योहान ११:२८) तो म्हणाला: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.”—योहान १८:३७.

राजकारणापेक्षा उत्तम गोष्टीचा प्रचार

येशूने शिकवलेले सत्य कोणताही राजनैतिक सिद्धान्त नव्हता. तर, ते देवाच्या राज्यासंबंधी होते व तो स्वतःच त्या राज्याचा राजा होणार होता. (लूक ४:४३) देवाचे राज्य हे एक स्वर्गीय सरकार आहे आणि ते सर्व मानवी व्यवस्थापनांच्या जागी स्थापन होऊन मानवजातीकरता कायमची शांती आणेल. (यशया ९:६, ७; ११:९; दानीएल २:४४) त्यामुळे, तेच मानवजातीकरता एकमेव आशा आहे. लोकांना सुरक्षित भविष्याकरता मानवांवर भरवसा ठेवण्याचे उत्तेजन देण्याऐवजी भविष्याविषयीच्या अशा भक्कम आशेबद्दल लोकांना सांगणे अधिक प्रेमळपणाचे नाही का? बायबल म्हणते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या साहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्‍वर ह्‍यावर आहे, तो धन्य.” (स्तोत्र १४६:३-५) आपल्या शिष्यांना सरकारांचे उत्तम व्यवस्थापन कसे असू शकते याविषयी प्रचार करायला पाठवण्याऐवजी येशूने ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करायला त्यांना शिकवले.—मत्तय १०:६, ७; २४:१४.

याचा अर्थ हे ‘प्रभूचे काम’ आहे जे पूर्ण करण्याची कामगिरी ख्रिस्ती प्रचारकांवर सोपवण्यात आली आहे. देवाच्या राज्याच्या प्रजेला एकमेकांवर प्रेम करणे आवश्‍यक असल्यामुळे मानवजातीच्या साधनांचे समान वाटप करून ते राज्य गरिबी दूर करण्यात यशस्वी होईल. (स्तोत्र ७२:८, १२, १३) ही खरी सुवार्ता आहे आणि ती खरोखर प्रचार करण्यालायक आहे.

आज, २३५ देशांमध्ये यहोवाचे साक्षीदार ‘प्रभूचे [हे] काम’ करण्यासाठी सुसंघटित आहेत. येशूच्या आज्ञेप्रमाणे, ते सर्व सरकारांचा आदर करतात. (मत्तय २२:२१) त्याचप्रमाणे येशूने आपल्या अनुयायांना सांगितलेल्या पुढील शब्दांचे पालनही करतात: “तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे.”—योहान १५:१९.

राजकारणाचे काही समर्थक बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर बदलले आहेत. कॅथलिक ॲक्शन नावाच्या चर्चद्वारे चालवल्या जाणाऱ्‍या एका चळवळीचा सदस्य असलेल्या एका इटालियन मुत्सद्द्‌याने म्हटले: “मी राजकारणात गेलो कारण मला वाटत होते की, आपण समाजाच्या राजनैतिक व सामाजिक विकासाला सक्रियपणे हातभार लावला पाहिजे.” यहोवाचे साक्षीदार म्हणून देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी नगराध्यक्षाचे पद त्यागले. राजकारणात सद्‌हेतूच्या लोकांचे प्रयत्न का फसतात याविषयी ते म्हणाले, “आज जगाची ही स्थिती, सभ्य लोकांनी सामाजिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून नव्हे तर बहुतेकांच्या दुष्टाईने मोजक्या लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर प्रभुत्व केल्यामुळे झाली आहे.”

मानवजातीकरता असलेल्या एकमेव आशेचा प्रचार करण्यासाठी राजकारणापासून दूर राहिल्याने खऱ्‍या ख्रिश्‍चनांना इतरांची व्यावहारिक मार्गाने मदत करण्यासाठी अडथळा निर्माण होत नाही. देवाच्या राज्याची प्रजा बनण्यास ते ज्यांना मदत करतात ते आपल्या विनाशकारी मनोवृत्तीत बदल करायला, अधिकाराप्रती आदर दाखवायला, आपले कौटुंबिक जीवन सुधारायला आणि भौतिक संपत्तीविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगायला शिकतात. याहून महत्त्वाचे म्हणजे, देवासोबत जवळचा नातेसंबंध ठेवायला यहोवाचे साक्षीदार लोकांना मदत करतात.

देवाच्या राज्याचे प्रचारक ज्या समाजात राहतात त्या समाजाला त्यांचा फायदा होतो. पण ते लोकांना एका खऱ्‍याखुऱ्‍या सरकारावर विश्‍वास ठेवायला सांगतात जे देवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांकरता कायमची शांती आणेल. हे ख्रिस्ती आपल्या तटस्थ भूमिकेमुळे आज सर्वात दीर्घस्वरूपी व व्यावहारिक मदत देण्यास मोकळे आहेत.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

राजकारणातून देवाच्या राज्याच्या प्रचारात

लहान असताना, आटीला यास, ब्राझीलच्या बलेम येथील त्याच्या चर्चच्या पाळकांकडून स्वातंत्र्य सिद्धान्ताविषयी शिकायला मिळाले. मानवजात जुलूमातून एके दिवशी मुक्‍त होईल याविषयी त्याला ऐकायला फार आवडे म्हणून तो एका चळवळीत सामील झाला जेथे विद्रोहाचे मोर्चे आणि कायदेभंगाच्या मोहिमा आयोजित करण्याबद्दल शिकवले जात होते.

त्याला कोणीतरी थोर शिक्षकाचे ऐका * हे पुस्तक दिले होते; त्या पुस्तकातून आपल्या चळवळीतल्या मुलांना शिकवायलाही त्याला खूप आवडे. त्या पुस्तकात उत्तम आचरण ठेवायला आणि अधिकाऱ्‍यांना अधीनता दाखवायला शिकवले होते. यामुळे आटीला विचार करू लागला की, स्वातंत्र्य सिद्धान्ताचे समर्थक येशूच्या उच्च नैतिक दर्जांचे पालन का करत नाहीत आणि काहीजण सत्तेत आल्यावर पीडितांना का विसरून जातात. त्याने ती चळवळ सोडून दिली. नंतर, यहोवाचे साक्षीदार त्याच्या दारावर आले आणि त्यांनी त्याला देवाच्या राज्याविषयी सांगितले. हळूहळू तो बायबलचा अभ्यास करू लागला आणि मानवजातीला सहन कराव्या लागणाऱ्‍या जुलूमशाहीवरील खऱ्‍या उपायाविषयी शिकू लागला.

त्याच दरम्यान आटीला, विश्‍वास आणि राजकारण या विषयावरील एका कॅथलिक चर्चासत्राला उपस्थित राहिला. तेथील शिक्षक म्हणाले, “या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” मग तो राज्य सभागृहात सभेला देखील आला. त्याला मोठा फरक दिसला. तेथे कोणी धूम्रपान करत नव्हते, दारू पीत नव्हते किंवा अचरट विनोद करत नव्हते. त्याने त्यांच्यासोबत प्रचारकार्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्याचा बाप्तिस्मा झाला. स्वातंत्र्य सिद्धान्त हा गरिबांच्या समस्येवरील खरा उपाय का नाही हे त्याला आता स्पष्ट कळते.

[तळटीप]

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[६ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती सेवकांची तटस्थ भूमिका त्यांना इतरांची मदत करण्यापासून रोखत नाही