व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातून तुम्हाला शक्‍ती मिळते का?

देवाच्या वचनातून तुम्हाला शक्‍ती मिळते का?

देवाच्या वचनातून तुम्हाला शक्‍ती मिळते का?

तुमच्या समोर समस्या येतात तेव्हा तुम्ही त्यांचा सामना कसा करता? सैतानाने जेव्हा येशूसमोर परीक्षा आणली तेव्हा येशूला लगेच एक शास्त्रवचन आठवले ज्यामुळे त्याला या परीक्षेचा सामना करता आला. (मत्तय ४:१-११) तसेच, राजा दावीदासमोर जेव्हा परीक्षा आली तेव्हा देवाच्या वचनातून त्याला शक्‍ती मिळाली. तो म्हणाला: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.”—स्तोत्र ९४:१९.

अशाचप्रकारे आपल्याला देखील, आपले आवडते शास्त्रवचन आठवल्यामुळे सांत्वन मिळू शकेल किंवा समस्येचा सामना करण्याची शक्‍ती मिळेल. उदाहरणार्थ, रेक्स जे आता ८९ वर्षांचे आहेत ते १९३१ पासून पूर्ण वेळेचे सुवार्तिक आहेत. ते म्हणतात: “सेवेमध्ये मला नवीन नेमणूक मिळायची तेव्हा बहुतेकदा मला, मी हे काम पूर्ण करू शकणार नाही असं वाटायचं.” त्यांना या समस्येवर मात कशाप्रकारे करता आली? ते म्हणतात: “मला, नीतिसूत्रे ३:५ हे माझं आवडतं शास्त्रवचन आठवायचं, ज्यात म्हटलं आहे: ‘तू आपल्या अगदी मनापासून यहोवावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.’ हे वचन आठवून त्याचा अवलंब केल्यामुळे मला माझ्या नेमणुका यशस्वीरीत्या पार पाडता आल्या.”

तरुणांनाही आपल्या आवडत्या शास्त्रवचनाचा फायदा होतो. सहा वर्षांचा जॅक म्हणतो, की मत्तय २४:१४ हे त्याचे आवडते वचन आहे. हे वचन त्याला आपल्या आईबाबांबरोबर प्रचार कार्यात जायची प्रेरणा देते. तो म्हणतो: “मला आई, बाबा आणि माझ्या ताईबरोबर दर शनिवारी साक्षीकार्यासाठी जायला आवडतं.”

येशूप्रमाणे तुमच्याही विश्‍वासाची थेट परीक्षा होत असते का? मग फिलिप्पैकर ४:१३ हे वचन तुमचे आवडते वचन होऊ शकते. राजा दाविदाप्रमाणे तुमच्याही मनात ‘अनेक चिंतांचे’ काहूर माजते का? मग फिलिप्पैकर ४:६, ७ वचन तुम्हाला मदत करू शकेल. आपण करत असलेली देवाची सेवा निरर्थक आहे, असा विचार कधीकधी तुमच्या मनात येतो का? मग, १ करिंथकर १५:५८ हे वचन तुम्हाला बळकट करील.

योग्य शास्त्रवचने तोंडपाठ करण्याद्वारे आपण देवाच्या वचनाला आपल्या जीवनावर कार्य करू देतो. (इब्री लोकांस ४:१२) अशा आवडत्या शास्त्रवचनांमुळे आपल्याला शक्‍ती आणि सांत्वन दोन्ही मिळू शकतील.—रोमकर १५:४.