व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाळकांनी राजकारणाचा प्रचार करावा का?

पाळकांनी राजकारणाचा प्रचार करावा का?

पाळकांनी राजकारणाचा प्रचार करावा का?

“राजकारणात सहभाग घेतल्याने गरिबांची मदत होऊ शकते असे एका कनेडियन आर्चबिशपने तीर्थयात्रेकरूंना म्हटले . . . राजकीय व्यवस्था देवाच्या इच्छेप्रमाणे नसली तरी ‘आपण त्यात भाग घेतला पाहिजे म्हणजे गरिबांना न्याय देता येईल.’”—कॅथलिक न्यूझ.

चर्चमधील वरिष्ठ धर्मगुरू राजकारणात भाग घेण्याची गोष्ट करतात हे असामान्य नाही तसेच राजकीय पदावर असलेल्या धर्मगुरूंचीही संख्या कमी नाही. काहींनी राजकारणात सुधार आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी, जातीय समानता आणि गुलामगिरीच्या प्रथेचा नायनाट करण्यासाठी मोहिमा राबवल्यामुळे त्यांची कौतुकाने आठवण केली जाते.

परंतु, चर्चला जाणाऱ्‍या अनेकांना त्यांचे पाळक राजनैतिक विषयांमध्ये पक्ष घेत असल्याचे आवडत नाही. “चर्चला जाणारे प्रोटेस्टंट लोक, काही वेळा, राजकारणात भाग घेणाऱ्‍या त्यांच्या पाळकांबद्दल आक्षेप घेत असत,” असे राजनैतिक धर्मशास्त्रावरील ख्रिस्चन सेंच्यूरी या लेखात म्हटले होते. अनेक धार्मिक वृत्तीच्या लोकांना वाटते की चर्च एक पवित्र स्थळ असून त्यात राजकारणाला थारा दिला जाऊ नये.

यामुळे काही लक्षवेधक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. एका चांगल्या जगाची आशा करणाऱ्‍या लोकांना हे प्रश्‍न महत्त्वाचे वाटतात. ख्रिस्ती धर्मगुरू राजकारणात सुधार घडवून आणू शकतात का? * राजकारणाच्या प्रचाराकरवी देव उत्तम सरकार आणि उत्तम जग आणणार आहे का? राजकारण खेळण्याचा एक नवीन मार्ग म्हणून ख्रिस्ती धर्म सुरू झाला का?

ख्रिस्ताच्या नावाने राजकारणाची सुरवात कशी

दि अर्ली चर्च यात, इतिहासकार हेन्री चॅडविक म्हणतात की, प्रारंभिक ख्रिस्ती मंडळी “जगातील सत्ता प्राप्त करण्याविषयी बेपर्वा” होती हे सर्वांना ठाऊक होते. तो, “राजकारणाशी संबंध नसलेला, शांत व युद्धविरोधी समाज होता.” अ हिस्टरी ऑफ ख्रिस्च्यानिटी यात म्हटले आहे: “ख्रिश्‍चनांमध्ये असा एक ठाम विश्‍वास होता की, त्यांच्यापैकी कोणत्याही व्यक्‍तीने राजकीय पदावर असू नये. . . . तिसऱ्‍या शतकाच्या सुरवातीला, हिप्पोलायटसनुसार, चर्चचा सभासद झाल्यावर एका न्यायाधिकाऱ्‍याला ऐतिहासिक ख्रिस्ती परंपरेप्रमाणे आपले पद त्यागावे लागायचे.” परंतु, सत्तेसाठी हपापले लोक अनेक मंडळ्यांमध्ये पुढाकार घेऊ लागले आणि त्यांनी मोठमोठ्या पदव्या स्वीकारल्या. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) काहींना धार्मिक पुढारी तसेच राजकीय नेते देखील बनायचे होते. रोमी सरकारात अचानक बदल झाला तेव्हा या धर्मगुरूंना हवी असलेली संधी मिळाली.

सा.यु. ३१२ साली, मूर्तिपूजक रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने नाममात्र ख्रिस्ती धर्माकडे आपली मैत्रीपूर्ण नजर फिरवली. आश्‍चर्य म्हणजे, यानंतर या मूर्तिपूजक सम्राटाकडून मिळणाऱ्‍या विशेषाधिकारांसाठी चर्चचे बिशप त्याच्यासोबत हातमिळवणी करायला खुशीखुशी तयार झाले. हेन्री चॅडविक यांनी लिहिले की, “चर्च मोठमोठ्या राजनैतिक निर्णयांमध्ये गुंतत गेले.” राजकारणात सामील झाल्याने धर्मगुरूंवर काय परिणाम झाला?

राजकारणाचा धर्मप्रचारकांवर परिणाम

देव, धर्मगुरूंना राजकीय नेते म्हणून उपयोगात आणील या धारणेचा पुरस्कार पाचव्या शतकातला एक महत्त्वाचा कॅथलिक तत्त्ववेत्ता, ऑगस्टीन याने केला होता. राष्ट्रांवर चर्चचे शासन असेल आणि मानवजातीसाठी ते शांती आणील अशी त्याने कल्पना केली. पण इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी लिहिले: “पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंतचा युरोपियन इतिहास म्हणजे जागतिक दैवी शासनाची कल्पना वास्तविकतेत उतरवण्याच्या प्रयत्नाच्या अपयशाची गाथा आहे.” जगाची गोष्ट तर दूरच ख्रिस्ती धर्म जगताने युरोपमध्येही शांती आणली नाही. ख्रिस्ती धर्म म्हणून ज्याला ओळखले जात होते त्यावरून लोकांचा विश्‍वास उडाला. कशामुळे?

ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्याचा दावा करणारे अनेकजण राजकारणात गोवले गेले; त्यांचे हेतू सुरवातीला चांगले होते पण नंतर तेच लोक वाईट कृत्येही करू लागले. मार्टिन ल्यूथर हा बायबलचा प्रचारक आणि अनुवादक होता; कॅथलिक चर्चमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या त्याच्या प्रयत्नांसाठी तो फार प्रसिद्ध होता. चर्चच्या शिकवणुकींविरुद्ध त्याने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे राजनैतिक हेतूंसाठी बंड करणाऱ्‍यांमध्ये तो लोकप्रिय झाला. ल्यूथर देखील राजकीय विषयांबद्दल बोलू लागला तेव्हा अनेकांना त्याच्याबद्दल आदर राहिला नाही. सुरवातीला, जुलमी सरदारांविरुद्ध बंड करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना त्याने साथ दिली. मग, या बंडाळीने क्रूर रूप धारण केल्यावर त्याने सरदारांना ही बंडाळी चिरडून टाकायला चेतवले. आणि असेच झाले. परिणामस्वरूप हजारोंची त्यात कत्तल झाली. म्हणूनच, शेतकऱ्‍यांनी त्याला विश्‍वासघातकी ठरवले. शिवाय, हे सरदार देखील कॅथलिक सम्राटाविरुद्ध होते; त्यांच्याही बंडाळीला ल्यूथरने प्रोत्साहन दिले. किंबहुना, प्रोटेस्टंट लोकांची अर्थात ल्यूथरच्या अनुयायांची, अगदी सुरवातीपासूनच एक राजकीय चळवळ होती. ल्यूथरवर सत्तेचा काय परिणाम झाला? तो भ्रष्ट झाला. जसे की, सुरवातीला, त्याने धार्मिक विरोधकांवर बळजबरी करण्याचा विरोध केला परंतु नंतर त्याने आपल्या राजकीय मित्रांना बालकांच्या बाप्तिस्म्याचा विरोध करणाऱ्‍यांना जाळून ठार मारण्याची शिक्षा देण्यास उत्तेजन दिले.

जॉन कॅल्व्हिन हा जीनीव्हा येथील एक प्रसिद्ध धर्मगुरू होता; त्याचसोबत त्याच्याजवळ प्रचंड राजकीय शक्‍ती देखील होती. मायकल सर्व्हेटसने त्रैक्याच्या शिकवणुकीला शास्त्रात आधार नसल्याचे स्पष्ट केले तेव्हा कॅल्व्हिनने आपल्या राजकीय सत्तेचा वापर करून सर्व्हेटसच्या शिक्षेला पाठबळ दिले; परिणामस्वरूप, सर्व्हेटसला खांबावर जाळण्यात आले. येशूच्या शिकवणुकींचा केवढा भयंकर विपर्यास!

कदाचित या लोकांना बायबलमध्ये १ योहान ५:१९ मध्ये जे सांगितले आहे त्याचा विसर पडला असावा: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” त्या वेळेचे राजकारण सुधारणे ही त्यांची प्रांजळ इच्छा होती की, सत्ता मिळवण्याची अपेक्षा आणि बड्या व्यक्‍तींची मैत्री यामुळे ते त्याकडे आकर्षित झाले? कारण कोणतेही असो, त्यांनी येशूचा शिष्य याकोब याचे प्रेरित शब्द लक्षात ठेवायला हवे होते: “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) येशूने आपल्या अनुयायांविषयी पुढीलप्रमाणे म्हटले होते हे याकोबाला ठाऊक होते: “मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.”—योहान १७:१४.

ख्रिश्‍चनांनी जगाच्या दुष्टतेचा भाग असू नये हे माहीत असूनही अनेकजण राजकारणात तटस्थ भूमिका घेण्याला म्हणजेच खऱ्‍या अर्थाने ‘जगाचे भाग न होण्याला’ विरोध करतात. अशा तटस्थतेमुळे, ख्रिस्ती, इतरांबद्दल आपले प्रेम सक्रियपणे दाखवू शकत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. चर्चच्या धर्मगुरूंनी भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि कार्य करावे असे त्यांना वाटते. परंतु, येशूने शिकवलेल्या तटस्थपणामुळे इतरांबद्दल सक्रियपणे काळजी दाखवणे खरेच शक्य नाही का? एक ख्रिस्ती, फूट पाडणाऱ्‍या राजकीय वादविषयांपासून वेगळा राहून इतरांना व्यावहारिक मदत देखील देऊ शकतो का? पुढील लेखात या प्रश्‍नांची चर्चा करण्यात आली आहे.

[तळटीप]

^ परि. 5 राजकारणाची व्याख्या, “एका देशातील किंवा परिसरातील सरकारी कार्यहालचाली, विशेषतः, सत्तेत असलेल्या किंवा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्‍तींमधील किंवा पक्षांमधील वादांसंबंधीच्या किंवा मतभेदांसंबंधीच्या” कार्यहालचाली अशी करण्यात आली आहे.—द न्यू ऑक्सफोर्ड डिक्शनरी ऑफ इंग्लिश.

[४ पानांवरील चित्र]

राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी धर्मगुरूंनी, सम्राट कॉन्स्टंटाईनसारख्या शासकांशी हातमिळवणी केली

[चित्राचे श्रेय]

Musée du Louvre, Paris

[५ पानांवरील चित्रे]

सुप्रसिद्ध धर्मगुरू राजकारणाकडे का आकर्षित झाले?

ऑगस्टीन

ल्यूथर

कॅल्व्हिन

[चित्राचे श्रेय]

ऑगस्टीन: ICCD Photo; कॅल्व्हिन: Portrait by Holbein, from the book The History of Protestantism (Vol. II)