व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्राचीन क्रीडासामने आणि विजय प्राप्त करण्याचे महत्त्व

प्राचीन क्रीडासामने आणि विजय प्राप्त करण्याचे महत्त्व

प्राचीन क्रीडासामने आणि विजय प्राप्त करण्याचे महत्त्व

“स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो.” “जर कोणी मल्लयुद्ध करितो, तर ते नियमाप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालीत नाहीत.”—१ करिंथकर ९:२५; २ तीमथ्य २:५.

प्रेषित पौल ज्या क्रीडासामन्यांविषयी बोलत होता ते प्राचीन ग्रीक संस्कृतीचा अविभाज्य भाग होते. अशा सामन्यांविषयी आणि त्यांमुळे निर्माण होणाऱ्‍या वातावरणाविषयी इतिहास आपल्याला काय सांगतो?

अलीकडे, रोमच्या कोलोसम येथे ग्रीक सामन्यांवर, नीके—ईल जोको ए ला विटोरया (“नायकी—खेळ आणि विजय”) एक प्रदर्शन आयोजण्यात आले होते. * या प्रदर्शनातील काही गोष्टींमुळे वरील प्रश्‍नांचे उत्तर मिळते शिवाय, क्रीडासामन्यांविषयी ख्रिश्‍चनांनी कोणता दृष्टिकोन बाळगावा यावर मनन करण्यासाठी चालना मिळते.

प्राचीन प्रथा

ग्रीस, ही क्रीडासामन्यांत भाग घेणारी पहिली संस्कृती नव्हती. सा.यु.पू. आठव्या शतकाच्या सुमारास, ग्रीक कवी होमर याने अशा एका समाजाचे वर्णन केले ज्यात विजयी वीर होते, लोकांमध्ये स्पर्धात्मक भावना होती; या समाजात, लष्करी क्षमतेला आणि खेळांना बरेच महत्त्व दिले जात होते. सर्वात पहिले ग्रीक उत्सव, वीरांच्या अंत्यविधीच्या वेळी देवदेवतांच्या आदराप्रीत्यर्थ धार्मिक विधी म्हणून सुरू झाले, असे या प्रदर्शनात म्हटले होते. जसे की, होमरच्या इलियड या सर्वात जुन्या व आतापर्यंत टिकलेल्या ग्रीक अभिजात महाकाव्यात, आकिलीझचे सोबती असलेल्या शूर योद्ध्‌यांनी पट्रोक्लसच्या अंत्यविधीच्या वेळी युद्ध करण्याचे थांबवले आणि आपले शौर्य शाबीत करण्यासाठी मुष्टीयुद्ध, कुस्ती, थाळीफेक, भालाफेक आणि रथांच्या शर्यतीत भाग घेतला, यांविषयीचे वर्णन दिले आहे.

अशाच प्रकारचे अनेक उत्सव संपूर्ण ग्रीसमध्ये साजरे केले जात. प्रदर्शनातील एका पुस्तकात म्हटले होते: “या उत्सवांमुळे ग्रीकांना, आपल्या देवदेवतांच्या आदराप्रीत्यर्थ, आपले अंतहीन व सततचे हिंसक वाद बाजूला सारून, आपला विशिष्ट स्पर्धात्मक स्वभाव, क्रीडासामन्यांद्वारे शांतीपूर्ण परंतु अगदी प्रामाणिकपणे व्यक्‍त करण्याची संधी मिळत असे.”

नगरराज्यांतील गटांनी, आपल्या देवदेवतांच्या सन्मानाप्रीत्यर्थ सार्वजनिक उपासनास्थळी नियमितरीत्या सामन्यांचे आयोजन करण्याची प्रथा अंगीकारली. कालांतराने, झ्यूस प्रीत्यर्थ साजरे केले जाणारे ऑलिंपीक आणि नेमियन तसेच अपोलो व पोसायडोनच्या प्रीत्यर्थ साजरे केले जाणारे पायथियन व इस्थमियन या चारही उत्सवांना पॅनहेल्लेनिक उत्सव अर्थात ग्रीकांचे उत्सव म्हणून महत्त्व प्राप्त झाले. याचा अर्थ, ग्रीसच्या सर्व ठिकाणाचे स्पर्धक यांत भाग घेऊ शकत होते. या उत्सवांमध्ये बली चढवले जात व पूजा होत असे तसेच उत्तम खेळांद्वारे किंवा कलात्मक प्रदर्शनांद्वारेही देवदेवतांचा सन्मान केला जात असे.

अशा उत्सवांमधील सर्वात जुना व प्रमुख उत्सव, ज्याची सुरवात सा.यु.पू. ७७६ साली झाली तो ऑलिंपिया येथे झ्यूसप्रीत्यर्थ दर चार वर्षांनी होत असे. या खालोखाल पायथियन उत्सवाला महत्त्व होते. हा उत्सव प्राचीन जगतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणी, डेल्फीच्या जवळपास साजरा केला जात आणि या उत्सवातही सामने होत असत. परंतु कवितेचा व संगीताचा दैवत अपोलो याच्या सन्मानाप्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्‍या उत्सवात गीत व नृत्य यांवर अधिक भर दिला जात असे.

सामने

आधुनिक सामन्यांच्या तुलनेत, पूर्वीच्या सामन्यांची संख्या मर्यादित होती आणि यांत केवळ पुरुष भाग घेत असत. प्राचीन ऑलिंपिक खेळांत दहापेक्षा अधिक सामने नसायचे. कोलोसम येथील प्रदर्शनात मांडलेले पुतळे, उठावांची खोदीव कामे, कुट्टिमचित्रे आणि टेरा-कोटाच्या फुलदाणींवरील चित्रकलांमधून या सामन्यांचे छायाचित्र पाहायला मिळते.

तीन अंतराच्या धावण्याच्या शर्यती असायच्या—एक स्टेड अंतराची अर्थात सुमारे २०० मीटरची; दुसरी, दोन फेऱ्‍यांची, जी आजच्या ४०० मीटरच्या शर्यतीच्या बरोबरीची आहे; आणि तिसरी, सुमारे ४,५०० मीटर लांब पल्ल्याची दौड. खेळाडू पूर्णपणे उघड्या शरीराने धावत व कसरत करत असत. पेंटॅथ्लॉनमधील खेळाडू पाच शर्यतीत भाग घेत: धावणे, लांब उडी, थाळीफेक, भालाफेक आणि कुस्ती. इतर सामन्यांत, मुष्टीयुद्ध आणि पॅनक्रॅटियम यांचा समावेश होता; पॅनक्रॅटियम असा एक “क्रूर खेळ होता ज्यात हातांच्या ढोपरांनी ठोसे मारले जात तसेच कुस्ती देखील खेळली जात असे.” शिवाय, आठ स्टेड अंतराच्या रथांच्या शर्यती देखील असायच्या; यातील रथ लहान आकाराचे व मागून खुले असायचे, त्यांना लहान चाके असायची व या रथांना दोन किंवा चार शिंगरू किंवा तरणेबांड घोडे ओढत.

मुष्टीयुद्ध अतिशय हिंसक व कधीकधी तर जीवघेणे असायचे. मुष्टीयुद्ध करणारे आपल्या मुठींभोवती चामड्याच्या पट्या बांधत ज्यावर इजा होईल असे धातूंचे तुकडे लावलेले असायचे. आता तुम्ही कल्पना करू शकता, की स्ट्रॅटोफॉन्टे नावाचा एक खेळाडू चार तासांच्या मुष्टीयुद्धानंतर स्वतःला आरशात पाहताना का ओळखू शकला नव्हता. मुष्टीयुद्धाचे खेळाडू, किती भयानकरीत्या विद्रुप व्हायचे याची ग्वाही प्राचीन पुतळे आणि कुट्टिमचित्रे देतात.

कुस्तीत, शरीराचा केवळ वरचा भाग धरण्याच्या संबंधाने नियम असायचे व जो स्पर्धक आपल्या प्रतिस्पर्ध्याला तीनवेळा चीत करेल तोच विजयी ठरायचा. परंतु पॅनक्रॅटियममध्ये शरीराचा विशिष्ट भाग न धरण्याविषयी नियम नव्हते. हा खेळ खेळणारे खेळाडू लाथा मारू शकत होते, ठोसे मारू शकत होते, सांधे पिरगळू शकत होते. फक्‍त डोळ्यांवर ठोसा मारणे, ओरबडणे व चावणे हे चालत नव्हते. समोरच्या व्यक्‍तीला जमिनीवर निकामी करून त्याच्यावर कब्जा मिळवणे, हा उद्देश असायचा. काही लोक, या खेळाला, “सर्व ओलिंपियन खेळातला सर्वात बघण्यालायक खेळ” समजत.

प्राचीन काळांतील सर्वात लोकप्रिय पॅनक्रॅटियम सा.यु.पू. ५६४ मध्ये, ऑलिंपिकच्या अंतिम फेरीच्या वेळी खेळण्यात आला होता, असे म्हटले जाते. ज्या अराहियोनचा गळा आवळला जात होता त्याने आपल्या प्रतिस्पर्धीच्या पायांची बोटे मोडली. होणाऱ्‍या वेदनेने विव्हळत प्रतिस्पर्धीने, अराहियोनने आपला प्राण सोडायच्या काही क्षणांपूर्वी हार पत्करली. पंचांनी अराहियोनच्या मृतदेहाला विजयी घोषित केले!

रथांच्या शर्यती सर्व खेळांतील सर्वात प्रतिष्ठित खेळ होता व यांत खानदानी वर्गातील लोक भाग घेत; कारण, जो रथ चालवायचा तो नव्हे तर रथांचा आणि घोड्यांचा मालक विजयी ठरत असे. शर्यतीच्या सुरवातीला आणि प्रत्येक वळणावर वळताना, एका ओळीत राहणे रथ चालवणाऱ्‍यांसाठी कठीण असायचे. चुकांमुळे किंवा नियम मोडल्यामुळे अपघात व्हायचे ज्यामुळे हा लोकप्रिय खेळ आणखीनच प्रेक्षणीय बनायचा.

बक्षीस

प्रेषित पौलाने म्हटले: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षिस मिळते.” (१ करिंथकर ९:२४) विजय प्राप्त करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. त्याकाळी, रौप्य, ब्राँझ पदक दिले जात नसे, किंवा दुसरा किंवा तिसरा क्रमांक नसे. “खेळाचे अंतिम ध्येय विजय, अर्थात ‘नायकी’ प्राप्त करणे होते. इतके पुरेसे होते कारण यावरून त्याचे शारीरिक आणि नैतिक व्यक्‍तित्त्व दिसून येत व त्याच्या नगरबांधवांना त्याचा गर्व वाटायचा,” असे प्रदर्शनात म्हटले होते. होमरने आपल्या महाकाव्यात अशा मनोवृत्तीचा एका ओळीत सारांश दिला: “मी नेहमी श्रेष्ठ ठरण्यास शिकलो आहे.”

पॅनहेल्लेनीक खेळांत विजयी खेळाडूंना दिले जाणारे बक्षीस पूर्णपणे लाक्षणिक होते—पर्णांचा मुकुट. पौलाने अशा मुकुटाला “नाशवंत मुगूट” म्हटले. (१ करिंथकर ९:२५) तरीपण त्या बक्षीसाचा गहिरा अर्थ होता. हे बक्षीस, निसर्ग शक्‍तीने विजेत्याला आपली शक्‍ती बहाल केल्याचे प्रतिनिधीत्व करत होते. एकाग्र मनाने मिळवलेला विजय, ईश्‍वरी कृपेमुळे मिळाल्याचे समजले जाई. प्रदर्शनातील काही गोष्टींतून हे दाखवण्यात आले, की कसे प्राचीन मूर्तीकार व चित्रकार, विजयाची ग्रीक देवता नायकी ही विजयी खेळाडूला विजयाचा मुकुट देत आहे अशी कल्पना करत असत. ऑलिंपियात विजय प्राप्त करणे हे कोणत्याही खेळाडूच्या करिअरचे अंतिम लक्ष्य असायचे.

ऑलिंपिक मुकुट जंगली ऑलिव्ह पर्णांचा, इस्थमियन मुकुट पाईन पर्णांचा, पायथियन मुकुट लॉरल पर्णांचा व नेमियन मुकुट जंगली सेलरीच्या पर्णांचा बनवला जात असे. इतर ठिकाणी सामन्यांचे आयोजन करणारे, सर्वोत्तम खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी पैसे किंवा इतर बक्षीसे देऊ करायचे. प्रदर्शनात अनेक फुलदाण्या होत्या ज्या, अथीना दैवतेच्या प्रीत्यर्थ अथेन्समध्ये खेळण्यात आलेल्या पॅनाथेनेयक सामन्यात बक्षीसासाठी होत्या. पूर्वी या फुलदाण्यांमध्ये ॲटिक भागातील मौल्यवान ऑलिव्ह तेल असायचे. एका फुलदाणीवरील एका बाजूच्या चित्रात, अथीना दैवतेचे चित्र आहे व त्यावर “अथीनाच्या खेळांडूसाठी बक्षीस” असे लिहिले आहे. दुसऱ्‍या बाजूला एका विशिष्ट सामन्याचे चित्र आहे, कदाचित, त्याच सामन्याचे ज्यात खेळाडूने विजय मिळवून हे बक्षीस मिळवले आहे.

ग्रीक शहरांना, आपल्या खेळाडूंच्या प्रसिद्धीत सहभाग घ्यायला आवडायचे; विजय मिळाल्यामुळे हे खेळाडू आपल्या समाजात नायक व्हायचे. विजेत्याला वाजतगाजत घरी आणले जात. या विजयी वीरांचे पुतळे दैवतांच्या आभार प्रदर्शनाप्रीत्यर्थ उभारले जात आणि कवी त्यांच्या यशाचे गुणगान करीत; साधारण लोकांसाठी सहसा हे केले जात नसे. विजेत्यांना सार्वजनिक सोहळ्यांमध्ये प्रथम स्थान दिले जाई आणि लोकनिधीतून त्यांना निवृत्तीवेतन दिले जात असे.

व्यायामशाळा आणि खेळाडू

नागरिक-सैनिकाच्या प्रगतीसाठी, क्रीडासामन्यात भाग घेणे महत्त्वाचे आहे, असे समजले जात. सर्व ग्रीक शहरांमध्ये व्यायामशाळा असायच्या; तेथे तरुणांना शारीरिक शिक्षणासोबत बौद्धिक आणि धार्मिक शिक्षणही दिले जात असे. व्यायामासाठी भरपूर खुली जागा असलेल्या जागेभोवती या व्यायामशाळा असत; यांच्या अवतीभोवती देवड्या असायच्या आणि काही खोल्या होत्या ज्या पुस्तकालय आणि वर्ग म्हणून वापरल्या जात असत. या व्यायामशाळेत सतत रहदारी असायची; येथे खासकरून असे श्रीमंत तरुण जास्त यायचे की ज्यांना काम करण्यात वेळ घालवण्याऐवजी शिक्षण घेण्यात वेळ घालवणे परवडत होते. येथे खेळाडूंना, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळांच्या तयारीसाठी दीर्घकाळ व कसून तयारी करावी लागत असे; हे प्रशिक्षक खेळाडूंचा आहार ठरवायचे आणि ते व्रतस्थ आहेत याची खात्री करायचे.

कोलोसम प्रदर्शन पाहायला आलेल्या लोकांना, मूळ ग्रीक मूर्तींच्या, रोमनांनी बनवलेल्या प्राचीन खेळाडूंच्या सर्वोत्तम प्रतिकृती पाहण्याची संधी मिळाली. अभिजात तत्त्वप्रणालीत, शारीरिक परिपूर्णता नैतिक परिपूर्णतेच्या समतुल्य होती आणि केवळ खानदानी लोकच ती प्राप्त करू शकत असल्यामुळे, विजयी वीरांची ही सुदृढ शरीरे, आदर्श व्यक्‍तीचे प्रतिनिधीत्व करत होती. रोमनांनी विजयी वीरांच्या पुतळ्यांना मौल्यवान कलाकृती समजले; या पुतळ्यांना स्टेडियम, स्नानगृहे, विश्रांतीचे बंगले आणि राजमहालात सजावटीच्या वस्तू म्हणून ठेवण्यात आले.

रोमन लोकांना हिंसक खेळ जास्त आवडायचे त्यामुळे रोममध्ये खेळल्या जाणाऱ्‍या सर्व ग्रीक सामन्यांपैकी मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि पॅनक्रॅटियमला लोकांकडून जास्त प्रतिसाद मिळत असे. रोमी लोक अशा खेळांना, आपले सद्‌गुण ठरवण्यासाठी दोन समान लोकांमध्ये होणारी स्पर्धा नव्हे तर निव्वळ मनोरंजन समजत असत. पूर्वी, खानदानी वर्गाच्या योद्ध्‌यांचे आणि खेळाडूंचे खेळांमध्ये भाग घेणे हे त्यांच्या शिक्षणाचा भाग समजले जात असे; परंतु नंतर हा विचार बदलला. याऐवजी, रोमनांनी ग्रीक खेळांचा दर्जा कमी केला; ते केवळ, अंघोळीआधी करावयाचे आरोग्यसंवर्धक व्यायाम आहेत किंवा ग्लाडिआटोरियल सामन्यांसारख्या, खालच्या दर्जातील पेशेवाईक खेळाडूंमधील पाहण्यालायक क्रीडा आहेत असे, या खेळांना समजू लागले.

ख्रिस्तीजन आणि सामने

या सामन्यांचे धार्मिक वैशिष्ट्य, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना या सामन्यांपासून दूर राहण्यासाठी एक कारण होते; कारण, “देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार?” (२ करिंथकर ६:१४, १६) आजच्या सामन्यांविषयी काय?

आधुनिक सामने खोट्या दैवतांच्या आदराप्रीत्यर्थ नाहीत हे स्पष्ट आहे. तरीपण, आज काही सामन्यांचा, प्राचीन सामन्यांप्रमाणे धार्मिक हेतू नाही का? शिवाय, अलीकडील वर्षांतील अहवालांवरून हे दिसून आले आहे, की जिंकण्यासाठी काही खेळाडू, आपल्या आरोग्याला आणि आपल्या जीवाला धोकेदायक ठरू शकणारी औषधे घ्यायला तयार झाले जेणेकरून त्यांना अधिक चांगल्याप्रकारे खेळता येऊ शकेल.

ख्रिश्‍चनांना, शारीरिक साध्यता कमी मोलाच्या वाटतात. ‘अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाच्या’ आध्यात्मिक गुणांमुळे एक व्यक्‍ती देवाच्या नजरेत सुंदर ठरते. (१ पेत्र ३:३, ४) आज क्रीडा सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्‍या सर्वांमध्येच क्रूर स्पर्धात्मक भावना नसते, परंतु अधिकतर लोकांमध्ये असते, हे आपण जाणतो. अशांबरोबर संगती केल्याने आपल्याला, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका” या शास्त्रवचनीय आज्ञेचे पालन करता येईल का? किंवा, अशांबरोबर संगती केल्याने आपल्यामध्ये “वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी,” निर्माण होणार नाहीत का?—फिलिप्पैकर २:३; गलतीकर ५:१९-२१.

ज्या सामन्यांमध्ये खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क येतो अशा अनेक अर्वाचीन खेळांना हिंसक वळण लागण्याची शक्यता असते. अशा सामन्यांचे आकर्षण असणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीने स्तोत्र ११:५ (सुबोध भाषांतर) मधील शब्दांची आठवण ठेवावी जेथे असे म्हटले आहे: “नीतिमान आणि दुष्ट यांना तो कसोटीला लावतो; हिंसा ज्यांना प्रिय आहे, अशांचा तो द्वेष करतो.”

खेळांना उचित स्थानी ठेवल्यास त्यांद्वारे आपल्याला आनंद मिळू शकतो; शिवाय प्रेषित पौलानेही असे म्हटले, की “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे.” (१ तीमथ्य ४:७-१०) परंतु त्याने, ख्रिश्‍चनांमध्ये आत्म-संयम आणि धीर यांसारखे गुण असले पाहिजेत या गोष्टीचे उदाहरण देण्यासाठी ग्रीक सामन्यांचा उचितपणे उल्लेख केला. सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे पौल, देवाकडून मिळणारा सार्वकालिक जीवनाचा “मुगूट” प्राप्त करण्यासाठी झटत होता. (१ करिंथकर ९:२४-२७; १ तीमथ्य ६:१२) याबाबतीत त्याने आपल्यासाठी एक उदाहरण मांडले आहे.

[तळटीप]

^ परि. 4 नीके हा “विजय” यासाठी असलेला ग्रीक शब्द आहे.

[३१ पानांवरील चौकट/चित्रे]

मुष्टीयुद्धानंतरची अवस्था

सा.यु.पू. चवथ्या शतकातील या ब्राँझ पदकावरील चित्रात, प्राचीन काळच्या मुष्टीयुद्धाचे हानीकारक परिणाम दिसून येतात; रोमन प्रदर्शन यादीनुसार, “‘इजेबद्दल इजा’ केल्या जाणाऱ्‍या व क्षीण करून टाकणाऱ्‍या युद्धात भाग घेणाऱ्‍या मुष्टीयोद्ध्‌याच्या प्रतिकार शक्‍तीचे, एक उत्तम उदाहरण, म्हणून प्रशंसा करण्यात आली होती.” “आताच पार पडलेल्या मुष्टीयुद्धामुळे झालेल्या जखमा आधीच्या सामन्यामुळे झालेल्या जखमांत आणखी भर टाकतात,” असे वर्णनात पुढे म्हटले आहे.

[२९ पानांवरील चित्र]

प्राचीन सामन्यांमध्ये, रथांच्या शर्यती सर्वात प्रतिष्ठित सामने होते

[३० पानांवरील चित्र]

प्राचीन कलाकार, विजयाची देवता, नायकी ही विजयी खेळाडूला मुकुट देत आहे अशी कल्पना करत असत