व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यिर्मयासारखे निर्भय असा

यिर्मयासारखे निर्भय असा

यिर्मयासारखे निर्भय असा

“परमेश्‍वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्‍वराचीच प्रतीक्षा कर.”—स्तोत्र २७:१४.

१. यहोवाचे साक्षीदार कोणत्या समृद्ध आशीर्वादांचा आनंद लुटत आहेत?

यहोवाचे साक्षीदार आध्यात्मिक परादीसात राहतात. (यशया ११:६-९) आजच्या जगाच्या अत्यंत क्लेशमय परिस्थितीत राहात असतानाही ते आपल्या सह ख्रिस्ती बांधवांसोबत एका अतुलनीय आध्यात्मिक वातावरणाचा आनंद लुटतात; कारण त्या सर्वांचा यहोवा देवासोबत आणि एकमेकांसोबत शांतीपूर्ण संबंध आहे. (स्तोत्र २९:११; यशया ५४:१३) आणि त्यांचे हे आध्यात्मिक परादीस दिवसेंदिवस विस्तार पावत आहे. ‘देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणारे’ सर्वजण त्याचा विस्तार करण्यास आपले योगदान देतात. (इफिसकर ६:६) कशाप्रकारे? एकतर बायबलच्या तत्त्वांनुरूप स्वतः जीवन व्यतीत करण्याद्वारे व इतरांनाही असेच करण्यास शिकवून, त्यांना या आध्यात्मिक परादीसात विपुल आशीर्वादांचा लाभ घेण्यास निमंत्रित करण्याद्वारे ते असे करत आहेत.—मत्तय २८:१९, २०; योहान १५:८.

२, ३. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कोणत्या परिस्थितीत टिकून राहावे लागते?

पण आपण आध्यात्मिक परादीसात राहात आहोत याचा अर्थ आपल्याला परीक्षांना तोंड द्यावे लागत नाही, असा नाही. अजूनही आपण अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे आजारपण, म्हातारपण, आणि शेवटी मरण आपल्यालाही सोसावे लागतेच. शिवाय, ‘शेवटल्या काळाविषयीच्या’ भविष्यवाण्यांची पूर्णता आपण प्रत्यक्ष पाहात आहोत. (२ तीमथ्य ३:१) युद्धे, गुन्हेगारी, आजारपण, दुष्काळ आणि इतर घोर विपत्ती सर्व मानवजातीला पीडित करत आहेत; यहोवाचे साक्षीदारही यातून सुटलेले नाहीत.—मार्क १३:३-१०; लूक २१:१०, ११.

हे सर्वकाही तर आहेच. शिवाय, आपल्याला माहीत आहे, की आध्यात्मिक परादीसात सुरक्षित वातावरण असले तरीसुद्धा जे याचे भाग नाहीत अशा लोकांकडून आपल्याला कडा विरोध सहन करावा लागतो. येशूने आपल्या अनुयायांना बजावले होते: “तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते. दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहान १५:१८-२१) आजही परिस्थिती काही वेगळी नाही. बहुतेक लोक अजूनही आपल्या उपासनेच्या पद्धतीला नीट समजून घेत नाहीत आणि त्याविषयी त्यांना कदर नाही. काहीजण आपली टीका करतात, थट्टा करतात किंवा येशूने बजावल्याप्रमाणे—आपला द्वेषही करतात. (मत्तय १०:२२) बरेचदा प्रसारमाध्यमांतून आपल्याविषयी खोटी माहिती प्रसारित केली जाते व मुद्दामहून आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातो. (स्तोत्र १०९:१-३) होय, आपल्या सर्वांनाच आव्हानात्मक परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे आपल्यापैकी काहीजण हवालदिल होऊ लागण्याची शक्यता आहे. तर मग आपण कशाप्रकारे टिकून राहू शकतो?

४. टिकून राहण्याचे साहाय्य मिळण्याकरता आपण कोणाची आस धरतो?

यहोवा आपल्याला साहाय्य करील. देवाच्या प्रेरणेने स्तोत्रकर्त्याने लिहिले: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्‍वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” (स्तोत्र ३४:१९; १ करिंथकर १०:१३) आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतो तेव्हा तो कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यास आपल्याला सक्षम करतो हे आपल्यापैकी बरेचजण अनुभवानिशी सांगू शकतात. यहोवाबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम आणि आपल्यापुढे असलेला आनंद हा आपल्याला निराशा व भीतीवर मात करण्यास साहाय्य करतो. (इब्री लोकांस १२:२) अशाप्रकारे, कठीण परिस्थितीला तोंड देत असतानाही आपण खंभीर राहू शकतो.

देवाच्या वचनाने यिर्मयाला बळ दिले

५, ६. (अ) टिकून राहिलेल्या खऱ्‍या उपासकांची कोणती उदाहरणे आपल्यासमोर आहेत? (ब) यिर्मयाला संदेष्टा होण्याचे आवाहन करण्यात आले तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती?

सबंध इतिहासात, यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनी कठीण परिस्थितीतही त्याची आनंदाने सेवा केली. त्यांच्यापैकी काहीजण अशा काळांत जगत होते जेव्हा यहोवाने अविश्‍वासू लोकांवर क्रोधिष्ट होऊन न्यायदंड बजावला. अशा विश्‍वासू उपासकांमध्ये यिर्मया व त्याच्या समकालीन लोकांपैकी काहीजण तसेच पहिल्या शतकातील ख्रिस्ती होते. ही ऐतिहासिक उदाहरणे बायबलमध्ये आपल्या प्रोत्साहनाकरता लिहून ठेवलेली आहेत आणि त्यांचे परीक्षण करून आपण बरेच काही शिकू शकतो. (रोमकर १५:४) उदाहरणार्थ, यिर्मयाविषयी विचार करा.

तरुण वयातच यिर्मयाला यहुदात एक संदेष्टा या नात्याने सेवा करण्यास आवाहन करण्यात आले. हे काम काही साधेसुधे नव्हते. बरेचजण खोट्या देवतांची उपासना करीत होते. यिर्मयाने आपले सेवाकार्य सुरू केले तेव्हा राज्य करत असलेला राजा योशिया हा विश्‍वासू होता; पण त्यानंतर गादीवर आलेले सर्व राजे अविश्‍वासू होते आणि लोकांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते सर्वजण, म्हणजे संदेष्टे व याजक सत्याचे समर्थक नव्हते. (यिर्मया १:१, २; ६:१३; २३:११) या परिस्थितीत, यहोवाने यिर्मयाला संदेष्टा होण्याकरता आवाहन केले तेव्हा त्याला कसे वाटले? तो भयभीत झाला! (यिर्मया १:८, १७) आपली सुरवातीची प्रतिक्रिया आठवून यिर्मयाने नंतर असे म्हटले: “मी म्हणालो, अहो, प्रभु परमेश्‍वर, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”—यिर्मया १:६.

७. यिर्मयाला त्याच्या क्षेत्रात कशाप्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि यावर त्याची काय प्रतिक्रिया होती?

यिर्मया ज्या क्षेत्रात कार्य करत होता, तेथे बहुतेक लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि बऱ्‍याचदा त्याचा कडा विरोध करण्यात आला. एकदा पशहूर नावाच्या याजकाने त्याला फटके मारून खोड्यांत अडकवून ठेवले. त्या वेळी आपल्याला कसे वाटले हे सांगताना यिर्मयाने असे म्हटले: “मी म्हणालो, मी त्याचे [यहोवाचे] नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” कदाचित तुम्हालाही काही वेळा यिर्मयासारखेच, यहोवाची सेवा करण्याचे सोडून द्यावेसे वाटत असेल. पण यिर्मयाला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे असे [देवाचे वचन, किंवा त्याचे संदेश] माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:९) देवाच्या वचनांचा तुमच्याही हृदयावर असाच परिणाम होतो का?

यिर्मयाचे सोबती

८, ९. (अ) संदेष्टा उरीयाचा कमकुवतपणा कशाप्रकारे दिसून आला आणि याचा काय परिणाम झाला? (ब) बारूख का निराश झाला आणि त्याला कशाप्रकारे मदत करण्यात आली?

यिर्मया हा एकटाच संदेष्ट्याचे काम करीत नव्हता. त्याचे सोबती देखील होते आणि यामुळे त्याला बरेच प्रोत्साहन मिळाले असावे. पण कधीकधी त्याचे सोबती अविचारीपणे वागत. उदाहरणार्थ, उरीया नावाचा यिर्मयाचा एक सोबती संदेष्टा “यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच” जेरूसलेम व यहुदाविरुद्ध देवाचे संदेश घोषित करण्यात व्यस्त होता. पण राजा यहोयाकीम याने उरीयाला ठार मारण्याचा हुकूम केला तेव्हा हा संदेष्टा घाबरला व त्याने ईजिप्तला पलायन केले. पण असे केल्याने त्याचा जीव वाचला नाही. राजाच्या माणसांनी त्याचा पाठलाग करून त्याला धरले आणि पुन्हा जेरूसलेमला आणून ठार मारले. या घटनेने यिर्मयाला केवढा धक्का बसला असेल!—यिर्मया २६:२०-२३.

यिर्मयाचा आणखी एक सोबती म्हणजे त्याचा चिटणीस बारूख. बारूख हा यिर्मयाचा उत्तम मदतनीस होता पण एके प्रसंगी तो देखील आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करण्यात कमी पडला. तो कुरकूर करू लागला: “हाय हाय! परमेश्‍वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.” बारूख निराश झाला व आध्यात्मिक गोष्टींचे त्याला महत्त्व राहिले नाही. तरीसुद्धा, यहोवाने बारूखला उत्तम मार्गदर्शन केले आणि योग्यप्रकारे विचार करण्यास त्याला मदत केली. यानंतर त्याला आश्‍वासन देण्यात आले की जेरुसलेमच्या नाशातून त्याचा बचाव करण्यात येईल. (यिर्मया ४५:१-५) बारूख आध्यात्मिकरित्या सावरला तेव्हा यिर्मयाला किती प्रोत्साहन मिळाले असावे!

यहोवाने आपल्या संदेष्ट्याला साहाय्य केले

१०. यहोवाने यिर्मयाला साहाय्य करण्याविषयी कोणते वचन दिले?

१० सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाने यिर्मयाला कधीही एकटे सोडले नाही. त्याने यिर्मयाच्या भावना समजून घेतल्या आणि त्याला लागणारे बळ व साहाय्य पुरवले. उदाहरणार्थ, यिर्मयाच्या सेवाकार्याच्या सुरवातीला जेव्हा त्याने आपल्या योग्यतेसंबंधी शंका व्यक्‍त केली तेव्हा यहोवाने त्याला सांगितले: “त्यांस तू भिऊ नको; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्‍वर म्हणतो.” मग यिर्मयाला त्याच्यावर सोपवण्यात येत असलेल्या कार्याविषयी समजावल्यानंतर यहोवाने म्हटले: “ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्‍वर म्हणतो.” (यिर्मया १:८, १९) यिर्मयाला हे शब्द ऐकून किती सांत्वन मिळाले असेल! आणि खरोखरच यहोवाने आपण दिलेले वचन पूर्ण केले.

११. यहोवाने यिर्मयाला साहाय्य करण्याचे वचन पूर्ण केले हे आपण कशावरून म्हणू शकतो?

११ अशाप्रकारे, खोड्यांत अडकवण्यात आल्यानंतर व सर्वांसमोर थट्टा करण्यात आल्यानंतर यिर्मयाने निर्भयपणे म्हटले: “परमेश्‍वर पराक्रमी वीराप्रमाणे मजबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; . . . ते अत्यंत फजीत होतील.” (यिर्मया २०:११) कालांतराने यिर्मयाला ठार मारण्याचे प्रयत्न करण्यात आले तेव्हाही यहोवा त्याच्या पाठीशी राहिला. जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा बारूखप्रमाणेच यिर्मया देखील शत्रूंच्या तावडीतून सुटला, पण त्याचा छळ करणाऱ्‍यांचा मात्र सर्वनाश झाला आणि जे बचावले त्यांना बॅबेलोनला बंदिवान म्हणून नेण्यात आले.

१२. निराश होण्यासारखी कारणे असतानाही आपण कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे?

१२ यिर्मयाप्रमाणेच, आज अनेक यहोवाचे साक्षीदार कष्ट सोसतात. काही समस्या त्यांच्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळे, काही या जगाच्या अस्थायी परिस्थितीमुळे तर काही समस्या आपल्या कार्याचा विरोध करणाऱ्‍यांमुळे येतात. या समस्यांमुळे आपण निराश होऊ शकतो. कधीकधी यिर्मयासारखेच आपणही अशा वळणावर येऊन पोचतो, जेव्हा आपल्याला वाटते की आता पुढे जाणे आपल्याला शक्य नाही. होय, वेळोवेळी अशाप्रकारे निराश होणे स्वाभाविक आहे. पण आपण निराश होतो तेव्हा यहोवावर आपल्याला कितपत प्रेम आहे याची परीक्षा होते. उरीयाने निराश झाल्यामुळे यहोवाची सेवा बंद करण्याची चूक केली; अशी चूक कधीही न करण्याचा आपण निश्‍चय करूया. त्याऐवजी यिर्मयाचे अनुकरण करून आपण यहोवाच्या साहाय्यावर भरवसा ठेवू या.

निराशेवर मात करा

१३. यिर्मया व दाविदाच्या उदाहरणांचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

१३ यिर्मयाने यहोवाशी नियमितपणे संवाद केला व आपल्या मनातल्या भावना त्याच्यासमोर व्यक्‍त करून त्याला साहाय्याची भीक मागितली. हे उदाहरण अनुकरणीय आहे. पुरातन काळात दाविदानेही साहाय्याकरता यहोवाचीच आस धरली व त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे.” (स्तोत्र ५:१, २) दाविदाच्या जीवनाच्या प्रेरित अहवालावरून दिसून येते की त्याने पुन्हा पुन्हा यहोवाची करुणा भाकली तेव्हा यहोवाने त्याच्या प्रार्थनांकडे दुर्लक्ष केले नाही. (स्तोत्र १८:१, २; २१:१-५) त्याचप्रकारे, आपल्यालाही जीवनातली ओझी वाहणे कठीण वाटू लागते, किंवा आपल्या समस्या कधी सुटणारच नाहीत असे वाटू लागते तेव्हा प्रार्थनेत यहोवाशी बोलल्याने व त्याच्याजवळ आपले मन मोकळे केल्याने आपल्याला खूप सांत्वन मिळू शकते. (फिलिप्पैकर ४:६, ७; १ थेस्सलनीकाकर ५:१६-१८) यहोवा कधीही आपल्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत नाही. उलट तो आपल्याला आश्‍वासन देतो की त्याला ‘आपली काळजी आहे.’ (१ पेत्र ५:६, ७) अर्थात, यहोवाला प्रार्थना करणे आणि मग त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे न वागणे हे योग्य ठरणार नाही.

१४. यहोवाच्या शब्दांचा यिर्मयावर कसा परिणाम झाला?

१४ यहोवा आपल्याशी कशाप्रकारे बोलतो? पुन्हा एकदा यिर्मयाचे उदाहरण लक्षात घ्या. यिर्मया एक संदेष्टा असल्यामुळे यहोवा थेटपणे त्याच्याशी बोलत असे. देवाच्या वचनाचा आपल्या हृदयावर कसा परिणाम झाला याविषयी यिर्मयाने असे वर्णन केले: “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्‍वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो.” (यिर्मया १५:१६) होय, देवाचे नाम धारण करणे हे यिर्मयाकरता संतोषाचे कारण होते आणि यहोवाची वचने त्याच्याकरता अत्यंत मोलवान होती. म्हणूनच प्रेषित पौलाप्रमाणेच यिर्मया आपल्यावर सोपवण्यात आलेला संदेश घोषित करण्यास उत्सुक होता.—रोमकर १:१५, १६.

१५. आपण यहोवाची वचने आपल्या मनात कशाप्रकारे बिंबवू शकतो आणि कशाविषयी विचार केल्याने आपल्याला शांत न राहण्याचा निर्धार करता येईल?

१५ आज यहोवा थेटपणे कोणाशीही संवाद करत नाही. पण बायबलमध्ये देवाची वचने आपल्याला सापडतात. तेव्हा, बायबलच्या अभ्यासाकडे आणि जे आपण शिकतो त्याविषयी सखोल मनन करण्याकडे आपण जर गांभीर्याने लक्ष दिले तर देवाची वचने आपल्या हृदयालाही ‘आनंद व उल्लास’ देतील. आणि ही वचने इतरांना सांगण्यास जाताना, यहोवाचे नाम धारण करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल आपण प्रफुल्लित होऊ. आज या जगात यहोवाचे नाव घोषित करणारा दुसरा कोणताही समूह नाही हे आपण कधीही विसरू नये. केवळ यहोवाचे साक्षीदारच देवाच्या स्थापित राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत व नम्र लोकांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास मदत करत आहेत. (मत्तय २८:१९, २०) आपण खरोखर किती आशीर्वादित आहोत! यहोवाने प्रेमळपणे आपल्याला हा बहुमान दिला असताना, आपल्याने शांत कसे राहवेल?

संगतीविषयी सावध राहा

१६, १७. संगतीविषयी यिर्मयाचा कसा दृष्टिकोन होता आणि आपण त्याचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो?

१६ यिर्मयाने आणखी एका गोष्टीविषयी सांगितले ज्यामुळे त्याला खंबीर राहण्यास मदत मिळाली. त्याने म्हटले: “विनोद करणाऱ्‍या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात मजवर पडल्यामुळे मी एकांती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहे.” (यिर्मया १५:१७) वाईट सोबत्यांचा अनिष्ट परिणाम स्वतःवर होऊ देण्याऐवजी यिर्मयाने एकटे राहणे पत्करले. आज आपणही हाच दृष्टिकोन बाळगतो. “कुसंगतीने नीति बिघडते” ही प्रेषित पौलाने दिलेली ताकीद आपण कधीही विसरत नाही कारण कुसंगतीमुळे आपण अनेक वर्षांपासून जोपासलेल्या चांगल्या सवयी देखील बिघडू शकतात.—१ करिंथकर १५:३३.

१७ कुसंगतीमुळे आपल्या विचारसरणीवर या जगाच्या दूषित आत्म्याचा कुप्रभाव होण्याची शक्यता आहे. (१ करिंथकर २:१२; इफिसकर २:२; याकोब ४:४) तेव्हा, कोणत्या प्रकारची सोबत अपायकारक आहे हे ओळखून ती पूर्णपणे टाळण्याकरता आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना प्रशिक्षित करू या. (इब्री लोकांस ५:१४) विचार करा, जर पौल आज जिवंत असता, तर अनैतिक व हिंसक चित्रपट किंवा हिंसक खेळ पाहणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीला त्याने काय म्हटले असते? इंटरनेटवर पूर्णपणे अनोळखी असलेल्या व्यक्‍तींशी मैत्री करू पाहणाऱ्‍या बांधवाला त्याने कोणता सल्ला दिला असता? नियमित व्यक्‍तिगत अभ्यास न करता, तासन्‌तास व्हिडिओ गेम खेळणाऱ्‍या किंवा टीव्ही पाहात बसणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीबद्दल त्याने काय विचार केला असता?—२ करिंथकर ६:१४ब; इफिसकर ५:३-५, १५, १६.

आध्यात्मिक परादीसात राहा

१८. कोणती गोष्ट आपल्याला आध्यात्मिकरित्या सुदृढ राहण्यास मदत करील?

१८ आपले आध्यात्मिक परादीस आपल्याला प्रिय आहे. या जगात त्याच्यासारखे काहीच नाही, काही असूच शकत नाही. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल, त्यांच्या विचारशीलतेबद्दल व सभ्यतेबद्दल विश्‍वासात नसणारेही बऱ्‍याचदा प्रशंसेचे उद्‌गार काढतात. (इफिसकर ४:३१, ३२) पण या परादीसात राहतानासुद्धा, आपण सतत निराशेवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगली सोबत, प्रार्थना, आणि नियमित अभ्यास करण्याच्या सवयीमुळे आपल्याला आध्यात्मिकरित्या सुदृढ राहण्यास मदत मिळेल. या गोष्टी आपल्याला यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून कोणत्याही परीक्षेला तोंड देण्यास मदत करतील.—२ करिंथकर ४:७, ८.

१९, २०. (अ) कशामुळे आपल्याला टिकून राहण्यास मदत मिळेल? (ब) पुढील लेख कोणाला संबोधून लिहिण्यात आला आहे आणि तो आणखी कोणाला उपयोगी ठरू शकेल?

१९ ज्यांना बायबलच्या संदेशाचा तिटकारा आहे त्यांना घाबरून आपण कधीही आपला विश्‍वास कमकुवत होऊ देऊ नये. यिर्मयाचा छळ करणाऱ्‍या शत्रूंप्रमाणे, जे आपल्याविरुद्ध लढत आहेत ते खरे तर देवाविरुद्ध लढत आहेत. त्यांचा विजय होणार नाही. आपला विरोध करणाऱ्‍यांपेक्षा कैक पटीने सामर्थ्यशाली असणारा यहोवा आपल्याला सांगतो: “परमेश्‍वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्‍वराचीच प्रतीक्षा कर.” (स्तोत्र २७:१४) यहोवाची मनःपूर्वक प्रतीक्षा करून चांगले ते करण्याचा आपला निर्धार आपण कधीही सोडू नये. यिर्मया व बारूख यांच्याप्रमाणे आपणही न थकता सातत्याने यहोवाचे कार्य करत राहिले तर योग्य वेळी आपल्याला त्याचे प्रतिफळ मिळेल.—गलतीकर ६:९.

२० अनेक ख्रिश्‍चनांना निराशेवर मात करण्याकरता सतत संघर्ष करत राहावा लागतो. पण तरुणांना काही खास आव्हानांना तोंड द्यावे लागते. असे असले तरीसुद्धा त्यांच्यासमोर अनेक सुवर्णसंधी आहेत. पुढील लेख खास आपल्या तरुणांना संबोधून लिहिण्यात आला आहे. शिवाय, मंडळीतल्या तरुणांना आपल्या शब्दांकरवी, आदर्शाकरवी व प्रत्यक्ष साहाय्याकरवी मदत करण्याच्या स्थितीत असणाऱ्‍या पालकांकरता आणि सर्व समर्पित प्रौढांकरता हा लेख उपयोगी ठरेल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण निराशाजनक प्रसंग येण्याची अपेक्षा का करू शकतो आणि मदतीकरता आपण कोणाची आस धरावी?

• यिर्मयाने कठीण नेमणूक असूनही निराशेवर कशाप्रकारे मात केली?

• कठीण परिस्थितींतही आपल्या हृदयाला ‘आनंद व उल्लास’ कसा मिळू शकेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

संदेष्टा होण्याकरता आपण खूप लहान आहोत व अननुभवी आहोत असे यिर्मयाला वाटले

[१० पानांवरील चित्र]

छळ होत असतानाही यिर्मयाला माहीत होते की यहोवा “पराक्रमी वीराप्रमाणे” त्याच्याबरोबर होता