व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अब्राहाम व सारा - तुम्ही त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकता!

अब्राहाम व सारा - तुम्ही त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकता!

अब्राहाम व सारा - तुम्ही त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकता!

त्याला, ‘जे विश्‍वास ठेवतात, त्या सर्वांचा बाप’ म्हटले आहे. (रोमकर ४:११) त्याच्या प्रिय पत्नीने देखील हा गुण दाखवला. (इब्री लोकांस ११:११) हे आहेत, देवाला भिऊन वागणारा कुलपिता अब्राहाम आणि त्याची भक्‍तिमान पत्नी सारा. ते दोघेही विश्‍वासाचे असे सर्वोत्कृष्ट उदाहरण का आहेत? त्यांना कोणत्या काही परीक्षांचा सामना करावा लागला होता? त्यांच्या जीवन कथेतून आपण काय शिकू शकतो?

देवाने जेव्हा अब्राहामाला आपले घर सोडण्यास सांगितले तेव्हा अब्राहामाने देवावर विश्‍वास ठेवला. यहोवाने त्याला सांगितले: “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.” (उत्पत्ति १२:१) विश्‍वासू कुलपित्या अब्राहामाने देवाची ही आज्ञा मानली कारण आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्‍वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताहि तो निघून गेला.” (इब्री लोकांस ११:८) या स्थलांतराचा काय अर्थ होतो त्याचा विचार करा.

अब्राहाम, सध्या ज्याला दक्षिण इराक म्हटले जाते तेथे म्हणजे ऊर देशात राहत होता. मेसोपोटेमियातील ऊर भरभराटीचे केंद्र स्थान होते; पर्शियन आखात आणि कदाचित खैबर खिंडीच्या देशांबरोबर ऊरचे व्यापारसंबंध होते. ऊरचे पद्धतशीर उत्खनन करणारे सर लिओनार्ड वुली यांचे असे म्हणणे आहे, की अब्राहामाच्या काळांतील बहुतेक घरे विटांची, गिलावा केलेली व चुना मारलेली होती. उदाहरणार्थ, एका धनाढ्य नागरिकाची दुमजली इमारत होती ज्याला मध्यभागी फरसबंद अंगण होते. तळमजल्यावर, घरातील नोकरचाकरांसाठी व पाहुण्यांसाठी खोल्या होत्या. पहिल्या मजल्यावर लाकडी सज्जा किंवा बाल्कनी होती, ज्यामुळे केवळ कुटुंबाच्या वापरासाठी असलेल्या खोल्यांमध्ये जाता येऊ शकत होते. १० ते २० खोल्या असल्यामुळे, अशी घरे, “तुलनात्मकरीत्या ऐसपैस होती, त्यात आरामशीर, व पूर्वेकडील दर्जांनुसार ऐषारामात जगता येत होते” असे वुली म्हणतात. अशा, “सुसंस्कृत लोकांच्या सर्वोत्कृष्ट घरांमध्ये, उच्च प्रगत शहरी जीवन जगण्यासाठी सर्व सुखसोयी होत्या.” जर अब्राहाम व सारा असे घर सोडून तंबूत राहायला गेले याचा अर्थ यहोवाची आज्ञा पाळण्याकरता त्यांनी बरेच मोठे त्याग केले.

अब्राहाम पहिल्यांदा आपल्या परिवाराला घेऊन उत्तर सिरियातील मेसोपोटेमिया शहरात म्हणजे हारानात राहिला आणि त्यानंतर कनानमध्ये गेला. हा जवळजवळ १,६०० किलोमीटरचा प्रवास होता—एका वृद्ध जोडप्यासाठी ही तोंडची गोष्ट नव्हती! अब्राहामने हारान सोडले तेव्हा तो ७५ वर्षांचा होता आणि सारा ६५ वर्षांची होती.—उत्पत्ति १२:४.

आपण ऊर सोडून जाणार आहोत हे अब्राहामने साराला सांगितले तेव्हा तिला कसे वाटले असावे? चांगले सुखाचे घर सोडून अनोळख्या, कदाचित क्रूर देशांत जाऊन गरिबीत राहायचे म्हणजे तिला निश्‍चितच चिंता वाटली असावी. तरीपण, ती आज्ञाधारक होती; तिने अब्राहामला आपला “धनी” समजले होते. (१ पेत्र ३:५, ६) काही विद्वानांच्या मते, साराची ही मनोवृत्ती, “अब्राहामाप्रती तिच्या मनात नेहमी असलेली आदरणीय मनोवृत्ती व वागणूक” दर्शवते व “तिच्या विचारांच्या व तिच्या भावनांच्या खऱ्‍या सवयीचा” पुरावा देते. परंतु या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे तिचा यहोवावर भरवसा होता. तिची आज्ञाधारक मनोवृत्ती आणि विश्‍वास ख्रिस्ती पत्नींसाठी एक उत्तम उदाहरण आहे.

देवाची आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला आपले घर सोडण्यास सांगितले जात नसले तरी, काही पूर्ण वेळेच्या सुवार्तिकांनी, दुसऱ्‍या राष्ट्रांत सुवार्तेचा प्रचार करण्याकरता आपला मायदेश सोडला आहे. आपण कोठूनही देवाची सेवा करत असलो तरी, जोपर्यंत आपण आध्यात्मिक गोष्टींना आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊ तोपर्यंत देव आपल्या सर्व गरजा पुरवत राहील.—मत्तय ६:२५-३३.

सारा किंवा अब्राहाम या दोघांनाही, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पस्तावा झाला नाही. प्रेषित पौलाने त्यांच्याविषयी म्हटले: “ज्या देशातून ते निघाले त्यावर त्यांनी चित्त ठेवले असते तर त्यांना माघारी जाण्याचा प्रसंग मिळाला असता.” पण ते परत गेले नाहीत. अब्राहाम व साराने, “जे [यहोवाला] झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” असा भरवसा बाळगून त्याच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवला. यहोवाची पूर्ण मनाने भक्‍ती करायची असेल तर आपणही असेच केले पाहिजे.—इब्री लोकांस ११:६, १५, १६, पं.र.भा.

आध्यात्मिक व भौतिक धन

कनानमध्ये पोहंचल्यावर यहोवाने अब्राहामाला सांगितले: “हा देश मी तुझ्या संतानाला देणार” आहे. अब्राहामने यहोवासाठी एक वेदी बांधून व “परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना” करून त्याचे उपकार मानले. (उत्पत्ति १२:७, ८) यहोवाने अब्राहामाला धनी बनवले; त्याच्या छावणीतील लोकांची मोठी संख्या होती. एकेकाळी त्याच्याकडे, त्याच्या घरात जन्मलेले व कामात कसलेले ३१८ दास असल्यामुळे, “त्याच्या डेऱ्‍यात एकूण एक हजारावर लोक” असण्याची शक्यता आहे असे सुचवले जाते. काहीही असो, लोक मात्र त्याला “देवाचे सरदार” समजायचे.—उत्पत्ति १३:२; १४:१४; २३:६.

अब्राहामाने उपासनेच्या बाबतीत पुढाकार घेतला, आपल्या घराण्याला ‘न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्‍वराचा मार्ग आचरण्यास’ शिकवले. (उत्पत्ति १८:१९) आधुनिक दिवसांतील ख्रिस्ती कुटुंबप्रमुख, अब्राहामाच्या उदाहरणातून उत्तेजन प्राप्त करू शकतात, अब्राहाम आपल्या घराण्यातील सर्व सदस्यांना यहोवावर भरवसा ठेवण्याचे व त्यांना धार्मिक मार्गाने वागण्याचे शिक्षण देण्यात यशस्वी झाला होता. म्हणूनच, साराची ईजिप्शियन दासी हागार, कुलपिता अब्राहाम याचा थोरला सेवक आणि अब्राहामचा मुलगा इसहाक यांनी यहोवावर भरवसा ठेवला, यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही.—उत्पत्ति १६:५, १३; २४:१०-१४; २५:२१.

सलोखा करणारा अब्राहाम

अब्राहामाच्या जीवनातील घटनांवरून हे प्रकट होते, की त्याचे व्यक्‍तिमत्त्व देवासारखे होते. आपल्या गुराख्यांमध्ये व पुतण्या लोट याच्या गुराख्यांमध्ये चाललेल्या भांडणाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी अब्राहामाने, त्यांना वेगळ्या छावणीत राहायला जाण्यास सुचवले आणि त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोटला त्याच्या पसंतीची जमीन निवडू दिली. अब्राहाम सलोखा करणारा होता.—उत्पत्ति १३:५-१३.

आपल्या हक्कांचा आग्रह करणे किंवा शांती टिकवून ठेवण्यासाठी सूट देणे यांत आपल्याला निवड करावी लागली तर, आपण एका गोष्टीची नोंद घेऊ शकतो; ती म्हणजे, अब्राहामाने लोटला चांगला वाटा निवडू दिल्याबद्दल यहोवाने अब्राहामाला काही कमी पडू दिले नाही. तर देवाने त्याला आणि त्याच्या संततीला, त्याच्या नजरेत चारही दिशेतील जितका प्रदेश मावत होता तो सर्व देण्याचे वचन दिले. (उत्पत्ति १३:१४-१७) येशूने म्हटले: “जे समेट करणारे ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाचे मुलगे म्हटले जातील.”—मत्तय ५:९, पं.र.भा.

अब्राहामाचे संतान कोण होणार होते?

संतानाविषयी अनेक अभिवचने देण्यात आलेली होती; परंतु सारा अजूनही निपुत्रिक होती. अब्राहामाने आपल्या मनातली शंका देवापुढे बोलून दाखवली. त्याचा सेवक अलियेजर त्याच्या घराचा मालक होणार होता का? नाही, कारण यहोवाने म्हटले: “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.”—उत्पत्ति १५:१-४.

तरीही, मूल होण्याचे चिन्ह दिसत नव्हते; ७५ वर्षांच्या साराची गर्भवती होण्याची सर्व आशा मावळली होती. ती अब्राहामाला म्हणाली: “परमेश्‍वराने माझी कूस बंद ठेविली आहे; तर माझ्या दासीपाशी जा; कदाचित तिजकडून माझे घर नांदते होईल.” अब्राहामने हागारला आपली दुसरी बायको म्हणून घेतले, तो तिच्यापाशी गेला आणि ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झाल्याचे पाहून हागार आपली धनीण सारा हिला तुच्छ लेखू लागली. साराने याबाबतीत अब्राहामाला मोठ्या दुःखाने तक्रार केली व हागारला इतके खडसावले की ती तिला सोडून पळून गेली.—उत्पत्ति १६:१-६.

अब्राहाम आणि साराने, त्यांना उचित वाटणाऱ्‍या पद्धतीने कार्य केले, त्यांच्या दिवसांत स्वीकारल्या जाणाऱ्‍या प्रथांच्या सामंजस्यात असलेला मार्ग अनुसरला. परंतु यहोवा अशापद्धतीने अब्राहामाचे संतान निर्माण करू इच्छित नव्हता. आपल्या संस्कृतीनुसार आपल्याला, विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कार्ये उचित वाटतील परंतु याचा नेहमीच असा अर्थ होत नाही की यहोवाला देखील ते मान्य आहे. आपल्या परिस्थितीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. म्हणूनच आपण नेहमी देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व आपण कोणत्याप्रकारे कार्य केले पाहिजे हे त्याने आपल्याला सूचवावे अशी प्रार्थना आपण केली पाहिजे.—स्तोत्र २५:४, ५; १४३:८, १०.

‘यहोवाला काही असाध्य’ नाही

पुढे हागारला अब्राहामकडून इश्‍माएल नावाचा मुलगा झाला. पण तो वचनयुक्‍त संतान नव्हता. साराचे वय वाढले होते तरीदेखील तिच्याच पोटून ते संतान येणार होते.—उत्पत्ति १७:१५, १६.

सारा आपल्या पतीसाठी एका पुत्राला जन्म देईल असे जेव्हा देवाने म्हटले तेव्हा “अब्राहामाने उपडे पडून व हसून मनांतल्या मनात म्हटले, शंभर वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? नव्वद वर्षाच्या सारेला मूल होईल काय?” (उत्पत्ति १७:१७) साराला ऐकू येईल अशाप्रकारे एका देवदूताने हाच संदेश तिला सांगितला तेव्हा ती देखील, ‘मनांतल्या मनात हसली.’ पण ‘यहोवाला काहीही असाध्य’ नाही. तो जे काही इच्छितो ते तो पूर्ण करू शकतो, हा भरवसा आपण बाळगू शकतो.—उत्पत्ति १८:१२-१४.

“वयोमर्यादेपलीकडे असताहि सारेला देखील विश्‍वासाने गर्भधारणेची शक्‍ति मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्‍यास विश्‍वसनीय मानले.” (इब्री लोकांस ११:११) कालांतराने, साराने इसहाकाला जन्म दिला; इसहाकाचा अर्थ होतो, “हसणे.”

देवाच्या अभिवचनांवर संपूर्ण भरवसा

ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती ते वचनयुक्‍त संतान इसहाकच आहे, हे यहोवाने स्पष्ट केले. (उत्पत्ति २१:१२) त्यामुळे यहोवाने जेव्हा अब्राहामाला इसहाकाचे अर्पण करण्यास सांगितले तेव्हा अब्राहाम गोंधळून गेला असावा. परंतु त्याच्याजवळ देवावर संपूर्ण भरवसा ठेवण्यासाठी ठोस कारणे होती. यहोवा इसहाकाला मृत्यूतून पुन्हा उठवू शकत नव्हता का? (इब्री लोकांस ११:१७-१९) इसहाकाचा जन्म होण्यासाठी यहोवाने अब्राहाम आणि साराच्या प्रजोत्पादन अंगांना चमत्कारिकरीत्या पुनरुज्जीवित केले नव्हते का? देव आपले वचन निश्‍चित पूर्ण करेल अशी अब्राहामाला खात्री असल्यामुळे तो देवाची आज्ञा मानावयास तयार झाला. हे खरे आहे, की त्याला त्याच्या पुत्राचा वध करण्यापासून रोखण्यात आले. (उत्पत्ति २२:१-१४) तरीपण, अब्राहामाच्या भूमिकेवरून आपण हे समजू शकतो, की यहोवा देवाला ‘आपला एकुलता एक पुत्र द्यायला’ किती कठीण गेले असावे; जेणेकरून या ‘पुत्रावर जो कोणी विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.’—योहान ३:१६; मत्तय २०:२८.

अब्राहामाचा देवावर विश्‍वास असल्यामुळे त्याला माहीत होते, की यहोवाने वचन दिलेल्या संतानाचे, कनान देशातील खोट्या उपासकाशी लग्न होऊ शकत नाही. देवाला भिऊन वागणारे पालक, यहोवाची सेवा न करणाऱ्‍या व्यक्‍तीशी आपल्या अपत्याच्या लग्नाला मान्यता कशी काय देऊ शकतात? त्यामुळे अब्राहामाने इसहाकासाठी, ८०० पेक्षा अधिक किलोमीटर दूर असलेल्या मेसोपोटेमियातील आपल्या नातेवाईकांतील एक मुलगी शोधण्याचा प्रयत्न केला. यहोवाने या प्रयत्नावर आशीर्वाद दिला; इसहाकाची पत्नी होण्यासाठी व मशीहाची वंशज होण्यासाठी रिबका हिची निवड करण्यात आली आहे हे त्याने सूचित केले. होय, यहोवाने “अब्राहामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते.”—उत्पत्ति २४:१-६७; मत्तय १:१, २.

सर्व राष्ट्रांसाठी आशीर्वाद

अब्राहाम व सारा, परीक्षांचा सामना करण्याच्याबाबतीत व देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवण्याच्याबाबतीत उदाहरणीय होते. या अभिवचनांच्या पूर्ततेचा, मानवजातीच्या चिरकालिक भविष्याशी संबंध आहे; कारण, यहोवाने अब्राहामाला अशी हमी दिली: “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति २२:१८.

अर्थात, अब्राहाम व सारा आपल्याप्रमाणेच अपरिपूर्ण होते. परंतु त्यांना देवाची इच्छा काय आहे हे स्पष्टपणे समजले तेव्हा त्यांना पुष्कळ त्याग करावे लागतील हे माहीत असूनही त्यांनी देवाची आज्ञा पाळली. म्हणूनच, अब्राहामाची, “देवाचा मित्र” म्हणून व साराची ‘देवावर आशा ठेवणारी पवित्र स्त्री’ म्हणून आठवण केली जाते. (याकोब २:२३; १ पेत्र ३:५) अब्राहाम व साराच्या विश्‍वासाचे अनुकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याद्वारे आपणही देवाबरोबरच्या मौल्यवान घनिष्ट नातेसंबंधाचा उपभोग घेऊ शकतो. अब्राहामाला देवाने दिलेल्या अमूल्य अभिवचनांचा आपल्यालाही फायदा होऊ शकतो.—उत्पत्ति १७:७.

[२६ पानांवरील चित्र]

यहोवाने अब्राहाम व साराला त्यांच्या विश्‍वासामुळेच, त्यांच्या म्हातारपणी एक पुत्र देऊन आशीर्वादित केले

[२८ पानांवरील चित्र]

आपल्या एकुलत्या एका पुत्राला मरू देताना यहोवाला कसे वाटले असावे हे आपल्याला अब्राहामाच्या उदाहरणावरून समजू शकते