व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लेवीयच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

लेवीयच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

लेवीयच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

इस्राएली लोकांना ईजिप्तच्या दास्यातून मुक्‍त होऊन अद्याप एक वर्ष पूर्ण झाले नव्हते. नवीन राष्ट्र यानात्याने त्यांना संघटित करण्यात आले आहे व ते कनान देशात चालले आहेत. तेथे एका पवित्र राष्ट्राने वास्तव्य करावे असा यहोवाचा उद्देश आहे. परंतु, कनानी लोकांची जीवनशैली आणि त्यांच्या धार्मिक प्रथा अगदीच खालावलेल्या आहेत. म्हणून, खरा देव इस्राएलच्या मंडळीला नीतिनियम देतो जेणेकरून ते त्याच्या सेवेसाठी वेगळे असे ठरतील. हे नीतिनियम बायबलमधील लेवीय नावाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यात आले आहेत. सीनाय रानात, सा.यु.पू. १५१२ मध्ये मोशे संदेष्ट्याने हे पुस्तक लिहिले; यांत इस्राएलांच्या इतिहासाचा केवळ एक चांद्रमासाचा समावेश आहे. (निर्गम ४०:१७; गणना १:१-३) यहोवा सतत आपल्या उपासकांना पवित्र असण्यास आर्जवतो.—लेवीय ११:४४; १९:२; २०:७, २६.

आज यहोवाचे साक्षीदार, देवाने मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे हा नियम रद्द करण्यात आला. (रोमकर ६:१४; इफिसकर २:११-१६) परंतु, लेवीय पुस्तकातील नीतिनियमांचा आपल्यालाही फायदा होऊ शकतो आणि हे नियम आपल्याला, यहोवा देवाच्या उपासनेच्या संबंधाने पुष्कळ गोष्टी शिकवू शकतात.

पवित्र अर्पणे—ऐच्छिक आणि बंधनकारक

(लेवीय १:१–७:३८)

नियमशास्त्रातील काही अर्पणे आणि बलिदाने ऐच्छिक होती तर काही बंधनकारक होती. उदाहरणार्थ, होमार्पण ऐच्छिक होते. जसे की येशू ख्रिस्ताने स्वेच्छेने व संपूर्णपणे स्वतःचे जीवन खंडणी बलिदान म्हणून ज्याप्रमाणे अर्पण केले त्याप्रमाणे होमार्पणात देवाला अर्पण केल्या जाणाऱ्‍या पशूला पूर्णपणे सादर केले जाई. ऐच्छिक शांत्यर्पणात अर्पण केला जाणारा पशू इतरांना वाटला जाई. त्या पशूचा एक भाग वेदीवर देवाला सादर केला जात असे, दुसरा भाग याजक खात असे आणि तिसरा भाग अर्पण सादर करणारा खात असे. अशाचप्रकारे, ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी शांत्यर्पण भोजन आहे.—१ करिंथकर १०:१६-२२.

पापार्पणे व दोषार्पणे बंधनकारक होती. पापार्पणे, चुकीने किंवा अजाणतेत केलेल्या पापांच्या प्रायश्‍चित्तासाठी होती. आणि दोषार्पणे, एखाद्याने दुसऱ्‍याच्या अधिकाराचे उल्लंघन केले असेल तर देवाला खूष करण्यासाठी किंवा पश्‍चात्तापी अपराध्याचे हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी—किंवा या दोन्ही कारणांसाठी केली जात. यहोवा करत असलेल्या विपुल तरतुदींची जाणीव दाखवण्यासाठी अन्‍नार्पणे केली जात असत. या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण, नियमशास्त्राच्या करारात, अर्पणांच्या संबंधाने दिलेल्या आज्ञा, येशू ख्रिस्ताला व त्याच्या बलिदानाला किंवा त्यामुळे येणाऱ्‍या फायद्यांना दर्शवतात.—इब्री लोकांस ८:३-६; ९:९-१४; १०:५-१०.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:११, १२—मध हे “हव्य” म्हणून यहोवाला स्वीकारयोग्य का नव्हते? येथे ज्याला मध म्हटले आहे ते मधमाशांनी गोळा केलेले मध असू शकत नाही. मध हे होमाग्नीमध्ये हव्य म्हणून सादर करण्याची परवानगी नसली, तरी ‘भूमीच्या प्रथम उपजात’ त्याचा समावेश होता. (२ इतिहास ३१:५) स्पष्टपणे, हे मध, फळांच्या रसाला सूचित करत होते. फळांचा रस आंबण्याची शक्यता असल्यामुळे वेदीवर ते अर्पण म्हणून अस्वीकारयोग्य होते.

२:१३—प्रत्येक अन्‍नार्पणासोबत ‘मीठ’ अर्पण करणे का आवश्‍यक होते? मीठाचे अर्पण, अर्पणांची चव वाढवण्याकरता केले जात नव्हते. संपूर्ण जगभरात, अन्‍न टिकवून ठेवण्यासाठी मीठाचा उपयोग केला जातो. अर्पणांसोबत कदाचित मीठ अर्पण केले जात होते कारण मीठामुळे एखादी वस्तू खराब होत नाही किंवा कुजत नाही.

आपल्याकरता धडे:

३:१७. चरबी ही सर्वात उत्तम किंवा सर्वात खास समजली जात असल्यामुळे, ती न खाण्याच्या निषेधामुळे इस्राएलांच्या मनावर अशी छाप पडत असे की जे सर्वात उत्कृष्ट आहे ते यहोवाचे आहे. (उत्पत्ति ४५:१८) यावरून आपल्याला ही आठवण करून दिली जाते, की आपणही आपले सर्वात उत्तम ते यहोवाला दिले पाहिजे.—नीतिसूत्रे ३:९, १०; कलस्सैकर ३:२३, २४.

७:२६, २७. इस्राएली लोकांना रक्‍त खाण्याची मनाई होती. देवाच्या नजरेत, रक्‍त जीवनाचे प्रतिनिधीत्व करते. लेवीय १७:११ म्हणते: “शरीराचे जीवन तर रक्‍तात असते.” आजही, रक्‍त वर्ज्य केले पाहिजे हा खऱ्‍या उपासकांसाठी एक मानदंड राहिला आहे.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

पवित्र याजकगण स्थापण्यात येतो

(लेवीय ८:१–१०:२०)

बलिदाने व अर्पणे यांच्यासंबंधाने असलेल्या जबाबदाऱ्‍या कोणाला देण्यात आल्या होत्या? त्या याजकांना देण्यात आल्या होत्या. देवाने मार्गदर्शन दिल्याप्रमाणे, अहरोनाला महायाजक म्हणून आणि त्याच्या चार मुलांना सहयाजक म्हणून निवडण्यासाठी मोशेने समर्पणाचा विधी पार पाडला. हा विधी सात दिवसांचा होता आणि दुसऱ्‍या दिवसापासून मग याजकगण कार्य करू लागले.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

९:९—वेदीच्या पायथ्याशी रक्‍त ओतण्याचे व विविध वस्तूंवर ते लावण्याचे महत्त्व काय होते? यावरून हे सूचित झाले, की प्रायश्‍चित्तासाठी यहोवाने रक्‍ताचा स्वीकार केला. प्रायश्‍चित्ताची सबंध तरतूद रक्‍तावर आधारित होती. प्रेषित पौलाने लिहिले: “नियमशास्त्राप्रमाणे रक्‍ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, आणि रक्‍त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.”—इब्री लोकांस ९:२२.

१०:१, २—अहरोनाचे पुत्र नादाब आणि अबीहू यांच्या पापात काय समाविष्ट असावे? नादाब आणि अबीहू आपल्या याजकीय जबाबदाऱ्‍यांच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवू लागल्यावर लगेच यहोवाने याजकांना, निवासमंडपात सेवा करताना द्राक्षारस अथवा मद्य घेऊ नये, अशी मनाई केली. (लेवीय १०:९) यावरून हे सूचित होते, की अहरोनाच्या दोन्ही पुत्रांनी, येथे सांगण्यात आलेल्या प्रसंगी कदाचित मद्यपान केले असावे. परंतु, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण म्हणजे, त्यांनी “अशास्त्र अग्नि परमेश्‍वरासमोर नेला. असा अग्नि नेण्याची परमेश्‍वराची आज्ञा नव्हती.”

आपल्याकरता धडे:

१०:१, २यहोवाच्या जबाबदार सेवकांनी आज त्याच्याकडून येणाऱ्‍या नियमांचे पालन केले पाहिजे. शिवाय, आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडत असताना त्यांनी गर्विष्ठ होता कामा नये.

१०:९. मद्यप्राशन करून आपण देवाने दिलेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करू नयेत.

पवित्र उपासनेत, स्वच्छता अनिवार्य

(लेवीय ११:१–१५:३३)

शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांचे मांस खाण्याविषयी असलेल्या नियमांचा इस्राएली लोकांना दोन प्रकारे फायदा झाला. या नियमांमुळे, त्यांचे हानीकारक जीवाणुंपासून संरक्षण झाले तसेच इस्राएली लोक आजूबाजूच्या राष्ट्रांतील लोकांपासून वेगळे राहिले. इतर नियमांमध्ये, शवांमुळे होणाऱ्‍या अशुद्धतेविषयी, प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी, महारोगाच्या संबंधाने असलेले रितीरिवाज आणि पुरूष व स्त्रीच्या शरीरांतून वाहणाऱ्‍या स्रावामुळे होणाऱ्‍या अशुद्धतेविषयी असलेल्या नियमांचा समावेश होता. अशुद्ध झालेल्यांना शुद्ध करण्याची जबाबदारी याजकांची होती.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१२:२, —प्रसूतीनंतर स्त्रीला “अशुद्ध” का समजले जात होते? जननेंद्रियांची निर्मिती परिपूर्ण मानवी जीवनाच्या पुनरुत्पत्तीकरता करण्यात आली होती. परंतु, वारशाने मिळालेल्या पापाच्या परिणामामुळे, मुलांना अपरिपूर्ण व पापी जीवन मिळू लागले. प्रसूतीच्या संबंधाने तसेच मासिकस्राव व वीर्यपात यांसारख्या इतर गोष्टींच्या संबंधाने पाळावा लागणारा ‘अशुद्धतेचा’ तात्पुरता काळ, इस्राएलांना वारशाने मिळालेल्या पापी अवस्थेची आठवण करून देत होता. (लेवीय १५:१६-२४; स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२) शुद्धतेच्या संबंधाने असलेल्या नियमांमुळे, इस्राएलांना हे समजणार होते, की मानवजातीचे पाप झाकण्यासाठी व मानवांना पुन्हा परिपूर्णता मिळवून देण्यासाठी खंडणी बलिदानाची आवश्‍यकता आहे. म्हणूनच नियमशास्त्र “ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.”—गलतीकर ३:२४.

१५:१६-१८—या वचनात ज्या ‘वीर्यपाताविषयी’ सांगितले आहे ते काय आहे? हे स्पष्टतः, रात्री झोपेत झालेल्या वीर्यपाताला तसेच वैवाहिक संबंधात लैंगिक संबंधांच्या वेळी झालेल्या वीर्यपाताला सूचित करते.

आपल्याकरता धडे:

११:४५. यहोवा देव पवित्र देव आहे आणि जे त्याची पवित्र सेवा करतात त्यांनी देखील पवित्र असले पाहिजे अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. त्यांनी शारीरिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या सदोदित पवित्र राहण्यासाठी झटले पाहिजे.—२ करिंथकर ७:१; १ पेत्र १:१५, १६.

१२:८. जे गरीब आहेत त्यांची अर्पणे देण्यासाठी मेंढा देण्याची ऐपत नसेल तर ते पक्ष्यांचे अर्पण करू शकत होते, असे यहोवाने म्हटले. तो गरीबांची परिस्थिती लक्षात घेतो.

पवित्रता टिकवून ठेवण्याची गरज आहे

(लेवीय १६:१–२७:३४)

पापासाठी सर्वात महत्त्वाची अर्पणे, दर वर्षी येणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी अर्पिली जात असे. याजक आणि लेवीयांच्या वंशासाठी एक गोऱ्‍हा अर्पिला जात. इस्राएलच्या याजक नसलेल्या वंशांसाठी एक बकरा अर्पिला जायचा. आणि एका जिवंत बकऱ्‍याच्या डोक्यावर हात ठेवून लोकांच्या पापांचा अंगीकार केल्यानंतर तो बकरा रानात सोडला जात असे. या दोन्ही बकऱ्‍यांना एकच पापार्पण म्हणून समजले जात असे. हे सर्व, येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला आणि तो कशाप्रकारे सर्वांची पापे वाहून नेईल याला दर्शवत होते.

मांसाहार करण्याविषयीचे आणि इतर बाबतीतले नियम आपल्याला, यहोवाची उपासना करताना आपण पवित्र असले पाहिजे याचे महत्त्व पटवून देतात. याजकांनी स्वतःला शुद्ध ठेवायची गरज होती, हे उचित होते. तीन वार्षिक सण, आनंद करण्याचे आणि निर्माणकर्त्याला आभार व्यक्‍त करण्याचे प्रसंग होते. यहोवाच्या पवित्र नामाचा गैरवापर, शब्बाथ आणि योबेल पाळण्याविषयी, गरिबांबरोबर कसा व्यवहार करायचा आणि दासांना कसे वागवायचे यांविषयी देखील यहोवाने आपल्या लोकांना नियम दिले होते. देवाने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास आशीर्वाद मिळणार होते आणि नियमांचे उल्लंघन केल्यास आशीर्वादांच्या उलट अर्थात शाप मिळणार होते. शपथा आणि मानवाचे मोल ठरवण्याच्या संबंधाने, पशूंपैकी प्रथमवत्साच्या संबंधाने आणि “परमेश्‍वराप्रीत्यर्थ पवित्र” म्हणून दशमांश देण्याच्या संबंधाने देखील नियम आहेत.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१६:२९—इस्राएली लोकांनी कशाप्रकारे “आपल्या जिवांस दंडन” करावयाचे होते? प्रायश्‍चित्ताच्या दिवशी करण्याच्या या रितीरिवाजाचा संबंध, पापांची क्षमा मागण्याशी होता. त्या काळादरम्यान उपवास करण्याचा संबंध, आपण पापी आहोत हे कबूल करण्याशी होता. तेव्हा, “आपल्या जिवांस दंडन” करणे, उपवासाशी संबंधित होते.

१९:२७—आपल्या “डोक्याला घेरा राखू नको,” किंवा दाढीचे ‘कोपरे छाटू’ नको या आज्ञेचा काय अर्थ होतो? विशिष्ट खोट्या धार्मिक प्रथांचे अनुकरण करणाऱ्‍या पद्धतीने आपली दाढी किंवा आपले केस न कापण्याविषयी यहुद्यांना हा नियम देण्यात आला होता. (यिर्मया ९:२५, २६; २५:२३; ४९:३२) परंतु, देवाने दिलेल्या या आज्ञेचा अर्थ यहुद्यांनी आपली दाढी करू नये किंवा चेहऱ्‍यावरचे केस कापू नयेत असा नव्हता.—२ शमुवेल १९:२४.

२५:३५-३७—इस्राएलांनी व्याज घेणे नेहमीच चूक होते का? कामधंद्यासाठी उसने पैसे दिले असतील तर पैसे देणारा व्याज घेऊ शकत होता. परंतु, जमीन सोडवण्यासाठी कोणी पैसे उधार घेतले असतील तर त्यावर व्याज घेण्यास नियमशास्त्रात मनाई होती. एखाद्या गरीब व्यक्‍तीच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेणे चुकीचे होते.—निर्गम २२:२५.

२६:१९—“आकाश लोखंडासारखे व भूमि पितळेसारखी” कशी होऊ शकते? पावसाअभावी, कनान देशावरील आकाश लोखंडासारखे कठीण व छिद्र नसल्याप्रमाणे असणार होते. पावसाविना, जमिनीला तांबूस छटा येणार होती व ती धातूप्रमाणे चकाकणार होती.

२६:२६—‘दहा स्त्रिया एकाच भट्टीत भाकर भाजतील’ याचा काय अर्थ होतो? सहसा, प्रत्येक स्त्री स्वतःच्या भट्टीत जे काही भाजायचे होते ते भाजत असे. परंतु हे शब्द, अन्‍नाच्या तुटवड्याला सूचित होत होते जेव्हा, एकच भट्टी, दहा स्त्रियांना त्यांची भाकर भाजायला पुरे होती. पावित्र्य राखण्यात उणे पडल्यामुळे हा एक परिणाम होईल असे भाकीत करण्यात आले होते.

आपल्याकरता धडे:

२०:९. एखाद्याविषयी द्वेषपूर्ण, हिंसक भावना बाळगणे हे यहोवाच्या नजरेत खून करण्यासारखेच होते. त्यामुळे, जो आपल्या आईबापांस शिव्याशाप देतो त्याला, खून करणाऱ्‍याला जी शिक्षा दिली जाते तीच शिक्षा देण्यास यहोवाने सांगितले. तेव्हा, आपण आपल्या सहविश्‍वासू बंधूभगिनींना प्रेम दाखवण्यास प्रवृत्त होऊ नये का?—१ योहान ३:१४, १५.

२२:३२; २४:१०-१६, २३. यहोवाच्या नावावर आपण कलंक आणू नये. या उलट आपण त्याच्या नावाची स्तुती केली पाहिजे आणि त्याच्या नावाच्या पवित्रीकरणासाठी प्रार्थना केली पाहिजे.—स्तोत्र ७:१७; मत्तय ६:९.

लेवीय पुस्तकाचा आपल्या उपासनेवर कसा परिणाम होतो

आज यहोवाचे साक्षीदार नियमशास्त्राधीन नाहीत. (गलतीकर ३:२३-२५) परंतु, लेवीयाच्या पुस्तकात जे काही सांगण्यात आले आहे त्याद्वारे आपल्याला विविध गोष्टींवर यहोवाचा दृष्टिकोन काय आहे त्याबाबतीत सूक्ष्मदृष्टी मिळू शकते ज्याचा परिणाम आपल्या उपासनेवर होऊ शकतो.

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची तयारी करताना, तुम्ही साप्ताहिक बायबल वाचन करत असता तेव्हा, आपला देव त्याच्या सेवकांकडून पवित्रतेची अपेक्षा करतो या वस्तुस्थितीची तुमच्यावर नक्कीच छाप पडेल. बायबलमधील हे पुस्तक तुम्हाला, सर्वोच्च देव यहोवा याला जे सर्वोत्कृष्ट आहे ते देण्यास आणि त्याची स्तुती होईल अशाप्रकारे सदोदित पवित्र राहण्यास प्रवृत्त करेल.

[२१ पानांवरील चित्र]

नियमशास्त्रानुसार अर्पिली जाणारी अर्पणे, येशू ख्रिस्त आणि त्याचे बलिदान यांना दर्शवत होती

[२२ पानांवरील चित्र]

बेखमीर भाकरीचा सण आनंद करण्याचा समय होता

[२३ पानांवरील चित्र]

वर्षाला येणारे सण, जसे की मांडवाचा सण, निर्माणकर्त्याला आभार व्यक्‍त करण्याचे प्रसंग होते