व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वयोवृद्धांची काळजी वाहणे —ख्रिस्ती जबाबदारी

वयोवृद्धांची काळजी वाहणे —ख्रिस्ती जबाबदारी

वयोवृद्धांची काळजी वाहणे —ख्रिस्ती जबाबदारी

“तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन.”—यशया ४६:४.

१, २. आपला स्वर्गीय पिता ज्याप्रकारे आपली काळजी घेतो ती मानवी आईवडिलांनी घेतलेल्या काळजीपेक्षा कशाप्रकारे वेगळी आहे?

आईवडील आपल्या मुलांची अगदी तान्हेपणापासून, त्यांच्या बालपणात आणि किशोरवयातही प्रेमाने काळजी घेतात. मुले प्रौढ होऊन आपापला संसार मांडतात तेव्हा देखील त्यांचे आईवडील त्यांच्याकडे प्रेमाने लक्ष देण्याचे व त्यांना आधार देण्याचे थांबवत नाहीत.

मानव या नात्याने आपण आपल्या मुलांकरता जे काही करू शकतो त्याला मर्यादा आहेत; पण आपला स्वर्गीय पिता मात्र त्याच्या विश्‍वासू सेवकांकडे सदैव लक्ष देऊन त्यांना आधार देतो. प्राचीन काळातील आपल्या निवडलेल्या लोकांना उद्देशून यहोवाने असे म्हटले: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन.” (यशया ४६:४) वयोवृद्ध ख्रिश्‍चनांकरता हे शब्द किती दिलासा देणारे आहेत! यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍यांना तो कधीही सोडत नाही. उलट तो त्यांना त्यांच्या आयुष्यभर, वृद्धावस्थेतही सांभाळण्याचे, आधार देण्याचे व मार्गदर्शन देण्याचे अभिवचन देतो.—स्तोत्र ४८:१४.

३. या लेखात कशाविषयी चर्चा केली आहे?

वृद्धांबद्दल यहोवाला असलेल्या प्रेमळ काळजीचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो? (इफिसकर ५:१, २) मुले, मंडळीतील पर्यवेक्षक, आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती आपल्या जागतिक बंधुसमाजातील वरिष्ठ सदस्यांची कशाप्रकारे काळजी वाहू शकतात हे पाहू या.

मुले या नात्याने आपली जबाबदारी

४. ख्रिस्ती मुलांना त्यांच्या आईवडिलांप्रती कोणती जबाबदारी आहे?

“आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख.” (इफिसकर ६:२; निर्गम २०:१२) इब्री शास्त्रवचनांतून हे साधेसेच पण अर्थपूर्ण विधान करून प्रेषित पौलाने मुलांना आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या जबाबदारीची आठवण करून दिली. पण वयोवृद्ध जनांची काळजी वाहण्याच्या संदर्भात हे शब्द कशाप्रकारे समर्पक आहेत? ख्रिस्त पूर्व काळातील एका हृदयस्पर्शी उदाहरणावरून या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास आपल्याला मदत मिळेल.

५. (अ) योसेफ आपल्या पित्याप्रती असलेल्या जबाबदाऱ्‍या विसरला नव्हता हे कशावरून दिसून येते? (ब) आपल्या पालकांचा मान राखण्याचा काय अर्थ होतो आणि याबाबतीत योसेफाने कशाप्रकारे उत्तम उदाहरण पुरवले?

वीस वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत योसेफाचा आपला वयोवृद्ध पिता याकोब याच्यासोबत कसलाही संपर्क नव्हता. पण योसेफाच्या मनातले पितृप्रेम आटले नव्हते. किंबहुना, योसेफाने त्याच्या भावांना आपली खरी ओळख करून दिली तेव्हा त्याने विचारले: “माझा बाप अजून जिवंत आहे काय?” (उत्पत्ति ४३:७, २७; ४५:३) त्या वेळी कनान देश दुष्काळाच्या विळख्यात होता. म्हणून योसेफाने आपल्या पित्याला हा निरोप पाठवला: “मजकडे निघून या, विलंब करू नका; तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही . . . माझ्यासमीप राहावे. . . . येथे मी तुमचे संगोपन करीन.” (उत्पत्ति ४५:९-११; ४७:१२) होय, वयोवृद्ध आईवडिलांचा मान राखण्याचा अर्थ आहे की आपण त्यांचे संरक्षण करावे आणि आर्थिकदृष्ट्या ते स्वतःची काळजी घेण्याच्या स्थितीत नसतात तेव्हा त्यांना सांभाळावे. (१ शमुवेल २२:१-४; योहान १९:२५-२७) योसेफाने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

६. योसेफाने आपल्या पित्याबद्दलचे मनःपूर्वक प्रेम कशाप्रकारे व्यक्‍त केले आणि आपण त्याच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

यहोवाच्या आशीर्वादाने योसेफ ईजिप्तमध्ये सर्वात श्रीमंत व प्रभावशाली व्यक्‍तींपैकी एक बनला होता. (उत्पत्ति ४१:४०) पण आपल्या १३० वर्षांच्या पित्याचा सन्मान केल्याने आपला रुबाब कमी होईल, किंवा त्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही असा योसेफने विचार केला नाही. याकोब (किंवा इस्राएल) येत आहे हे ऐकताच “योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल यास भेटावयास गोशेन प्रांती गेला; त्यास भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारिली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.” (उत्पत्ति ४६:२८, २९) हे केवळ एक रीतसर औपचारिक स्वागत किंवा आदराचे प्रदर्शन नव्हते. योसेफाचे आपल्या वृद्ध बापावर मनापासून प्रेम होते आणि ते त्याने निःसंकोच व्यक्‍त केले. आपल्याला वृद्ध पालक असल्यास आपणही अशाचप्रकारे त्यांच्याबद्दल भरभरून प्रेम व्यक्‍त करतो का?

७. आपल्याला कनान देशात पुरावे अशी इच्छा याकोबाने का व्यक्‍त केली?

याकोब आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत यहोवाला एकनिष्ठपणे भक्‍ती करत राहिला. (इब्री लोकांस ११:२१) देवाच्या प्रतिज्ञांवर त्याचा विश्‍वास असल्यामुळे त्याने मृत्योपरांत आपले अवशेष कनान देशात नेऊन पुरण्याची विनंती केली. योसेफाने आपल्या पित्याच्या विनंतीला मान दिला; यासाठी बराच खर्च व खटाटोप करावा लागला तरीसुद्धा असे करण्याद्वारे त्याने आपल्या पित्याचा मान राखला.—उत्पत्ति ४७:२९-३१; ५०:७-१४.

८. (अ) वयोवृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यामागची आपली मुख्य प्रेरणा काय आहे? (ब) एका पूर्ण वेळेच्या सेवकाने आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्याकरता काय केले? (पृष्ठ १७ वरील चौकट पाहा.)

योसेफाला आपल्या पित्याची काळजी घेण्यास कशामुळे प्रेरणा मिळाली असावी? निश्‍चितच ज्याने आपल्याला जन्माला घातले आणि पालनपोषण केले त्या जीवनदात्याबद्दल स्वाभाविक प्रेम आणि ऋणानुबंध ही त्यामागची कारणे होतीच पण त्यासोबतच योसेफाला यहोवाला संतुष्ट करण्याची देखील तीव्र इच्छा होती यात शंका नाही. आपल्यालाही हीच इच्छा असली पाहिजे. पौलाने लिहिले: “कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्‍या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.” (१ तीमथ्य ५:४) खरोखर, यहोवाबद्दल प्रेम आणि आदरयुक्‍त भय असल्यास आपण आपोआपच वयोवृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यास प्रवृत्त होऊ; आणि यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आपण असे करू. *

वडील आपली काळजी कशी व्यक्‍त करतात

९. वृद्ध ख्रिश्‍चनांचाही समावेश असणाऱ्‍या कळपाचे पालन करण्याकरता, यहोवाने कोणाला नियुक्‍त केले आहे?

आपल्या दीर्घायुष्याच्या शेवटास, याकोबाने यहोवाला “माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले” असे म्हणून संबोधले. (उत्पत्ति ४८:१५) आज यहोवा, “मुख्य मेंढपाळ” असणारा आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्‍या ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या किंवा वडिलांच्या माध्यमाने आपल्या पृथ्वीवरील सेवकांचे पालन करतो. (१ पेत्र ५:२-४) कळपातील वृद्ध जनांची काळजी घेताना पर्यवेक्षक यहोवाचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतात?

१०. वृद्ध ख्रिश्‍चनांना भौतिक मदत देण्याकरता काही मंडळ्यांमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? (पृष्ठ १९ वरील चौकट पाहा.)

१० ख्रिस्ती मंडळीची नुकतीच स्थापना झाल्यानंतर प्रेषितांनी गरजू ख्रिस्ती विधवांना अन्‍नसामुग्रीची ‘दररोज वाटणी’ करण्याच्या कार्याची देखरेख करण्याकरता “पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष” नेमले. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६) नंतर, पौलाने पर्यवेक्षक असणाऱ्‍या तीमथ्याला अशी सूचना दिली की आर्थिक मदत मिळण्यास योग्य असलेल्या विधवांच्या यादीत त्याने चांगल्या कृत्यांकरता नावाजलेल्या वृद्ध विधवांची नावे लिहावीत. (१ तीमथ्य ५:३, ९, १०) त्याचप्रकारे, आजही मंडळीतील पर्यवेक्षक आवश्‍यक असते तेव्हा वृद्ध ख्रिश्‍चनांना व्याव्हारिक दृष्टीने मदत करण्याकरता आनंदाने पुढे येतात व आवश्‍यक उपाययोजना करतात. पण विश्‍वासू वृद्ध जनांची काळजी घेणे एवढ्यावर संपत नाही.

११. अगदी लहानशी देणगी देणाऱ्‍या गरजू विधवेबद्दल येशूने काय म्हटले?

११ पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्याच्या शेवटल्या टप्प्यात आल्यावर, येशू एकदा मंदिरात बसून “लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता.” तेव्हा अचानक एका विशिष्ट व्यक्‍तीकडे त्याचे लक्ष गेले. अहवालात असे सांगितले आहे: “एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली.” तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हटले: “मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे; कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.” (मार्क १२:४१-४४) रक्कम पाहिल्यास त्या विधवेचे दान अगदी क्षुल्लक होते पण भक्‍तिभावाने व मनःपूर्वक केलेल्या अशा लहान कृत्यांचीही आपला स्वर्गीय पिता किती कदर करतो हे येशूला माहीत होते. ती विधवा वृद्ध असली तरीही तिने जे केले त्याकडे येशूने दुर्लक्ष केले नाही.

१२. वृद्ध ख्रिश्‍चनांनी दिलेल्या योगदानाची आपण कदर बाळगतो हे वडील कशाप्रकारे दाखवू शकतात?

१२ येशूप्रमाणेच, आज ख्रिस्ती पर्यवेक्षक, खऱ्‍या उपासनेकरता वृद्धजन जे काही करतात त्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. सेवाकार्यातील त्यांचा सहभाग, सभांमध्ये त्यांचा सहभाग, मंडळीत त्यांच्यामुळे होणारा रचनात्मक परिणाम आणि त्यांनी अनेक वर्षांपासून धीराने केलेली सेवा या सर्व गोष्टींकरता वडील वृद्धजनांची प्रशंसा करू शकतात. मनःपूर्वक प्रोत्साहनाचे दोन शब्द वृद्धजनांना त्यांच्या पवित्र सेवेत “हर्षित होण्याचे कारण” देतील; अशारितीने ते आपल्या कार्याची तुलना इतर ख्रिश्‍चनांशी किंवा गतकाळात ते जे कार्य करत होते त्याच्याशी करून विनाकारण निराश होणार नाहीत.—गलतीकर ६:४, NW.

१३. वृद्ध जनांच्या कौशल्यांचा व अनुभवाचा वडील इतरांच्या उपयोगाकरता कशाप्रकारे उपयोग करू शकतात?

१३ वृद्ध ख्रिश्‍चनांच्या मोलवान योगदानाची आपण कदर बाळगतो हे दाखवण्याकरता वडील त्यांच्या अनुभवांचा व कौशल्यांचा इतरांच्या फायद्याकरता उपयोग करू शकतात. वेळोवेळी चांगल्या कार्यांकरता नावाजलेल्या वृद्धजनांना प्रात्यक्षिकांकरता किंवा मुलाखतींकरता वापरले जाऊ शकते. एक वडील म्हणतात, “ज्यांनी सत्यात आपल्या मुलांचे संगोपन केले आहे अशा एखाद्या वृद्ध बंधू अथवा बहिणीची मुलाखत मी घेतो तेव्हा मंडळीतले सर्वजण अक्षरशः कान टवकारून ऐकत असतात.” दुसऱ्‍या एका मंडळीतील वडिलांनी एका ७१ वर्षीय पायनियर बहिणीचे उदाहरण दिले जिने राज्य प्रचारकांना क्षेत्र सेवेत नियमित होण्याकरता यशस्वीरीत्या मदत केली आहे. ती त्यांना “मूलभूत” गोष्टी करण्याचे प्रोत्साहन देते जसे की, बायबल व दैनंदिन वचन वाचणे आणि मग वाचलेल्या गोष्टींवर मनन करणे.

१४. एका वडील वर्गाने त्यांच्या वृद्ध सह पर्यवेक्षकाबद्दल आपली कदर कशाप्रकारे व्यक्‍त केली?

१४ वृद्ध सह पर्यवेक्षकांच्या योगदानाचीही वडील कदर करतात. सत्तरीत असलेले झोझे कित्येक दशकांपासून वडील या नात्याने सेवा करत आहेत. अलीकडेच त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती सावरण्यास बराच काळ लागणार असल्यामुळे त्यांनी मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा करण्याचा आपला विशेषाधिकार त्यागण्याचा विचार केला. झोझे सांगतात, “इतर वडिलांची प्रतिक्रिया पाहून मला आश्‍चर्य वाटले. कारण मी जे सुचवले ते स्वीकारण्याऐवजी त्यांनी मला विचारले की माझ्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याकरता मला कोणती व्यावहारिक मदत लागेल?” एका तरुण वडिलाच्या मदतीने झोझे यांना अध्यक्षीय पर्यवेक्षकाच्या भूमिकेत आनंदाने सेवा करत राहणे शक्य झाले आहे आणि मंडळीकरता हा एक आशीर्वाद ठरला आहे. एक सहवडील म्हणतात: “वडील या नात्याने झोझे यांच्या कार्याची बांधवांना खूप कदर वाटते. त्यांच्यापदरी असलेला अनुभव आणि त्यांचा विश्‍वासू आदर्श यांमुळे ते सर्वांचे प्रिय आहेत आणि सर्व बांधव त्यांचा मनापासून आदर करतात. ते आमच्या मंडळीचे भूषण आहेत.”

एकमेकांची काळजी घेणे

१५. आपल्यामध्ये असलेल्या वृद्धांच्या कल्याणाची काळजी सर्व ख्रिश्‍चनांना का असली पाहिजे?

१५ वडीलधारी माणसांची काळजी ही केवळ वृद्ध मातापिता असलेल्या मुलांनी आणि नियुक्‍त सेवकांनीच घ्यावी असे नाही. ख्रिस्ती मंडळीची तुलना मानवी शरीराशी करताना पौलाने लिहिले: “जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.” (१ करिंथकर १२:२४, २५) दुसऱ्‍या एका भाषांतराप्रमाणे: “[शरीराच्या] सर्व अंगांनी एकमेकांच्या कल्याणाची काळजी घेण्याचा एकजूटपणे प्रयत्न करावा.” (नॉक्स) ख्रिस्ती मंडळीचे कार्य सुरळीत चालण्याकरता प्रत्येक सदस्याला आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या, अर्थात वृद्ध जनांच्याही कल्याणाची काळजी असली पाहिजे.—गलतीकर ६:२.

१६. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहताना आपण वृद्ध जनांबद्दल काळजी कशी दाखवू शकतो?

१६ वृद्धजनांबद्दल आपुलकी दाखवण्याची उत्तम संधी ख्रिस्ती सभांतून मिळते. (फिलिप्पैकर २:४; इब्री लोकांस १०:२४, २५) आपण त्यांच्याशी बोलण्याच्या संधीचा फायदा घेतो का? त्यांच्या शारीरिक प्रकृतीविषयी विचारपूस करणे योग्य असले तरीसुद्धा, त्यांच्याशी बोलताना एखादा प्रोत्साहनदायक अनुभव किंवा एखादा शास्त्रवचनीय विचार त्यांना सांगण्याद्वारे आपल्याला त्यांना “आध्यात्मिक कृपादान” देता येईल का? काही वृद्धांना चालणे फिरणे कठीण असल्यामुळे त्यांनी आपल्याजवळ यावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपणच त्यांच्याजवळ जाणे अधिक समजूतदारपणाचे ठरेल. जर त्यांना कमी ऐकू येत असेल तर आपण थोडे सावकाश व सुस्पष्टपणे बोलले पाहिजे. आणि ‘परस्परांचे उत्तेजन’ व्हायचे असेल तर ते बोलतात तेव्हा आपण लक्ष देऊन ऐकलेही पाहिजे.—रोमकर १:११, १२.

१७. जे घराबाहेर पडू शकत नाहीत अशा वृद्ध ख्रिस्ती बंधूभगिनींबद्दल आपण काळजी कशी व्यक्‍त करू शकतो?

१७ विशिष्ट वृद्धजन ख्रिस्ती सभांना येऊ शकत नसल्यास काय करता येईल? याकोब १:२७ दाखवते त्याप्रमाणे “अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे,” हे आपले कर्तव्य आहे. येथे “समाचार घेणे” असा अनुवाद केलेल्या ग्रीक क्रियापदाचा एक अर्थ “भेट देणे” असाही होतो. (प्रेषितांची कृत्ये १५:३६) आपण वृद्ध बांधवांना भेट देतो तेव्हा त्यांना किती आनंद होतो! सा.यु. ६५ सालाच्या सुमारास रोममध्ये कैदेत असताना “वृद्ध झालेला पौल” अगदी एकाकी होता. आपला सहकारी तीमथ्य याला पाहण्याची त्याला उत्कंठा लागल्यामुळे त्याने त्यास असे लिहिले: “तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये.” (फिलेमोन ९; २ तीमथ्य १:३, ४; ४:९) वृद्धजन अक्षरशः कैदेत नसले तरीसुद्धा त्यांच्यापैकी काहीजणांना आजारपणामुळे घरातच कोंडून राहावे लागते. एका अर्थाने जणू ते आपल्या सर्वांना असे म्हणत असतात, ‘होईल तितके करून, मला लवकर भेटायला या.’ त्यांच्या या याचनेला आपण प्रतिसाद देत आहोत का?

१८. वृद्ध बंधूभगिनींना भेट दिल्याने कोणते उत्तम परिणाम होतात?

१८ एखाद्या वृद्ध बांधवाला अथवा बहिणीला भेट देण्याच्या उत्तम परिणामांचे महत्त्व कधीही कमी लेखू नका. अनेसिफर नावाचा ख्रिस्ती रोममध्ये होता तेव्हा त्याने बराच खटाटोप करून पौलाचा शोध घेतला आणि तो सापडल्यावर “त्याने वारंवार [पौलाचे] समाधान केले.” (२ तीमथ्य १:१६, १७) एक वृद्ध बहीण म्हणते: “मला लहान मुलांसोबत राहायला खूप आवडतं. कारण मी त्यांच्या कुटुंबाचीच सदस्य असल्याप्रमाणे ते मला वागवतात. यामुळे मला खूप बरं वाटतं.” आणखी एका वृद्ध बहिणीने म्हटले: “कोणी मला लहानसं कार्ड पाठवतं, फोन करून दोनचार मिनीटे का होईना, माझ्याशी बोलतं किंवा भेट द्यायला येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. थंड हवेची झुळूक आली की मन कसं प्रसन्‍न होतं, तसंच मलाही वाटतं.”

काळजी व्यक्‍त करणाऱ्‍यांना यहोवा प्रतिफळ देतो

१९. वृद्धांची काळजी घेतल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?

१९ वृद्ध बांधवांची काळजी वाहिल्याने अनेक आशीर्वाद मिळतात. त्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा जो आपल्याला फायदा होतो तोच एक बहुमोल आशीर्वाद आहे. तसेच, काळजी वाहणाऱ्‍यांना घेण्यापेक्षा देण्यात जो अधिक आनंद आहे तो अनुभवायला मिळतो; शिवाय त्यांना चांगले कार्य साध्य केल्याचे समाधान व बायबलनुसार जी आपली जबाबदारी आहे ती पूर्ण केल्यामुळे आंतरिक शांती मिळते. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) तसेच जे वृद्धांची काळजी घेतात, त्यांना आपल्या म्हातारपणी आपल्याला वाऱ्‍यावर सोडून दिले जाईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही. देवाचे वचन आपल्याला आश्‍वासन देते: “उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.”—नीतिसूत्रे ११:२५.

२०, २१. जे वृद्धजनांची काळजी घेतात त्यांच्याबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे आणि आपण कोणता दृढनिश्‍चय करावा?

२० देवाला भिऊन वागणाऱ्‍या मुलांना, पर्यवेक्षकांना आणि वृद्ध बांधवांची निःस्वार्थ मनोवृत्तीने काळजी घेणाऱ्‍या इतर ख्रिस्तीजनांना यहोवा प्रतिफळ देतो. त्यांची ही वृत्ती पुढील नीतिसूत्राशी सुसंगत आहे: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” (नीतिसूत्रे १९:१७) जर आपण प्रेमाने प्रेरित होऊन दीन दुबळ्यांना दया दाखवतो तर देव अशा उपकारांना कर्जाप्रमाणे समजतो आणि विपुल आशीर्वाद देऊन ते कर्ज तो फेडतो. आपल्या वृद्ध बांधवांना आपण दया दाखवतो व त्यांची काळजी घेतो तेव्हा यहोवा आपल्याही चांगल्या कृत्यांची परतफेड करील कारण या वृद्ध जनांपैकी बरेचजण ‘लोकदृष्टीने दरिद्री आहेत’ पण ‘विश्‍वासासंबंधाने धनवान’ आहेत.—याकोब २:५.

२१ देव परतफेड करतो ती देखील किती उदारतेने! तो आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ करतो. यहोवाच्या सेवकांपैकी बहुतेकांना परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळेल जेथे उपजत पापाचे सर्व दुष्परिणाम काढून टाकले जातील आणि विश्‍वासू वृद्ध जनांना पुन्हा एकदा तारुण्याचा जोम अनुभवता येईल. (प्रकटीकरण २१:३-५) त्या सुवर्णकाळाची वाट पाहताना आपण वृद्ध जनांची काळजी घेण्याची आपली ख्रिस्ती जबाबदारी पूर्ण करत राहू या.

[तळटीप]

^ परि. 8 वृद्ध पालकांची काळजी कशी घेता येईल याविषयी काही व्यावहारिक सूचना फेब्रुवारी ८, १९९४ च्या सावध राहा! नियतकालिकात पृष्ठे ३-१० वर दिली आहेत.

तुमची उत्तरे काय आहेत?

• मुले वृद्ध आईवडिलांचा मान कसा राखू शकतात?

• वडील कळपातील वृद्ध सदस्यांबद्दल कदर कशी व्यक्‍त करतात?

• वैयक्‍तिक ख्रिस्ती वृद्ध जनांबद्दल मनःपूर्वक आस्था कशी व्यक्‍त करू शकतात?

• वृद्ध ख्रिस्ती बांधवांची काळजी घेतल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चौकट]

त्याच्या आईवडिलांना गरज पडली तेव्हा

फिलिप हे १९९९ साली लाईबेरिया येथील बांधकाम प्रकल्पात स्वयंसेवी कार्यकर्ता या नात्याने सेवा करत होते. तेथेच त्यांना आपले वडील गंभीररित्या आजारी असल्याची बातमी मिळाली. आपल्या आईला एकटीला बाबांची काळजी घेता येणार नाही हे पक्के ठाऊक असल्याने त्यांनी आपल्या वडिलांचा उपचार करण्यासाठी घरी परतण्याचा निर्णय घेतला.

फिलिप सांगतात, “घरी परतण्याचा निर्णय घेणे मला जड गेले, पण तरीही माझे पहिले कर्तव्य माझ्या आईवडिलांची काळजी घेण्याचे आहे असे मला वाटले.” पुढच्या तीन वर्षांदरम्यान त्यांनी आपल्या आईवडिलांना एका नवीन घरात हलवले आणि काही स्थानिक बांधवांच्या मदतीने, त्यांच्या वडिलांच्या खास गरजा लक्षात ठेवून घरात विशेष व्यवस्था व सुविधा करवून घेतल्या.

आता फिलिप यांच्या आई, वडिलांच्या गंभीर आजारपणाला तोंड देण्याकरता पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. अलीकडेच फिलिप यांनी, मॅसेडोनिया येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात एक स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे निमंत्रण स्वीकारले.

[१९ पानांवरील चौकट]

त्यांनी तिच्या गरजांकडे दुर्लक्ष केले नाही

ॲडा ही ऑस्ट्रेलियात राहणारी ८५ वर्षांची ख्रिस्ती स्त्री आहे. खालावलेल्या प्रकृतीमुळे त्यांना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले तेव्हा मंडळीच्या वडिलांनी त्यांना साहाय्य पुरवण्याकरता व्यवस्था केली. त्यांनी सहविश्‍वासू बांधवांच्या एका गटास संघटित केले जे बहीण ॲडा यांना मदत करू शकतील. या बंधूभगिनींच्या गटाने त्यांच्याकरता साफसफाई, धुणे, स्वयंपाक आणि बाजारहाट यांसारखी कामे करण्यास सुरवात केली.

ही साहाय्याची तरतूद करण्यात आली, त्या गोष्टीला आता जवळजवळ दहा वर्षे झाली आहेत. आतापर्यंत ३० पेक्षा जास्त यहोवाच्या साक्षीदारांनी ॲडा यांची काळजी घेण्यास हातभार लावला आहे. ते अजूनही त्यांना जाऊन भेटी देतात, त्यांना बायबल प्रकाशनांतून वाचून दाखवतात, मंडळीत आध्यात्मिकरित्या कोण कशी प्रगती करत आहे याविषयी वेळोवेळी माहिती देतात आणि नियमितरित्या त्यांच्यासोबत प्रार्थना करतात.

एका स्थानिक ख्रिस्ती वडिलांनी असे म्हटले: “ॲडा यांची काळजी घेणारे सर्वजण त्यांना मदत करण्यास एक बहुमान समजतात. बहीण ॲडा यांनी कित्येक दशके केलेल्या विश्‍वासू सेवेमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत.”

[१६ पानांवरील चित्र]

वृद्ध आईवडिलांबद्दल आपण भरभरून प्रेम व्यक्‍त करतो का?

[१८ पानांवरील चित्रे]

मंडळीतले सर्वजण वृद्ध बांधवांप्रती आपले प्रेम व्यक्‍त करू शकतात