व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

देवाचा पवित्र आत्मा एक व्यक्‍ती नाही, मग आपण त्याला खिन्‍न कसे करतो?

“देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका,” असे लिहिणारा प्रेषित पौल होता. (इफिसकर ४:३०) हे वचन, पवित्र आत्मा एक व्यक्‍ती आहे असे सूचित करते, असे काहीजण म्हणतात. परंतु, ‘विश्‍वासू कारभाऱ्‍यांच्या’ प्रकाशनांत वारंवार शास्त्रवचनीय व ऐतिहासिक पुरावे देण्यात आले आहेत, की आरंभीचे ख्रिस्ती पवित्र आत्म्याला एक व्यक्‍ती किंवा त्रैक्यानुसार * सर्वोच्च देवाच्या बरोबरीचा देव असल्याचे मानत नव्हते. (लूक १२:४२) तेव्हा पौल देवाचा पवित्र आत्मा एक व्यक्‍ती आहे असे मुळीच सुचवत नव्हता.

देवाचा पवित्र आत्मा, त्याची अदृश्‍य कार्यकारी शक्‍ती आहे. (उत्पत्ति १:२) योहान जसे पाण्याने बाप्तिस्मा देत होता तसे येशू “पवित्र आत्म्याने” बाप्तिस्मा देणार होता असे भाकीत करण्यात आले होते. (लूक ३:१६) सा.यु. ३३ च्या पेटेंकॉस्टच्या दिवशी, सुमारे १२० शिष्य “पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले;”—अर्थातच ही एक व्यक्‍ती असू शकत नाही. (प्रेषितांची कृत्ये १:५, ८; २:४, ३३) या अभिषिक्‍तांना स्वर्गीय आशा मिळाली आणि देवाच्या आत्म्याने त्यांना विश्‍वासू मार्गाक्रमण करण्यास मदत झाली. (रोमकर ८:१४-१७; २ करिंथकर १:२२) पवित्र आत्म्याने त्यांच्यात देवासारखे गुण उत्पन्‍न केले आणि ते देवाची स्वीकृती गमावून बसतील अशी पापी “देहाची कर्मे” टाळण्यास त्यांना मदत केली.—गलतीकर ५:१९-२५.

आपण, पृथ्वीवर जगण्याची आशा असलेले देवाचे सेवक असू तर त्याचा अर्थ आहे की पवित्र आत्म्याने आपला अभिषेक झालेला नाही. तरीपण, ज्यांना स्वर्गीय आशा आहे त्यांच्याइतकाच आपल्याला देखील पवित्र आत्मा मिळू शकतो. त्यामुळे आपणही पवित्र आत्म्याला खिन्‍न करू शकतो. ते कसे?

पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या शास्त्रवचनीय सल्ल्याकडे आपण दुर्लक्ष केले तर, आपल्यात अशी काही लक्षणे उत्पन्‍न होऊ लागतील ज्यामुळे आपण मुद्दामहून पवित्र आत्म्याच्या विरुद्ध कार्य करू लागू, यहोवाची कृपापसंती गमावून बसू आणि कालांतराने नष्ट होऊ. (मत्तय १२:३१, ३२) आपण कदाचित अद्याप गंभीर पाप केले नसेल, पण कदाचित चुकीच्या मार्गावर अर्थात पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या विपरित जाणाऱ्‍या मार्गावर चालायला सुरवात केली असेल. आपण असे करत असल्यास, आपण पवित्र आत्म्याला खिन्‍न करत असू.

देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करण्याचे आपण कसे टाळू शकतो? आपल्याला आपले विचार आणि आपली कार्ये यांवर ताबा ठेवला पाहिजे. इफिसकरांना लिहिलेल्या पत्राच्या चवथ्या अध्यायात प्रेषित पौल, खोटे बोलण्याची, मनात राग बाळगण्याची, आळशीपणाची व न शोभणारे भाषण करण्याची प्रवृत्ती टाळण्याविषयी लिहितो. आपण ‘नवे मनुष्यत्व’ धारण करतो आणि तरीसुद्धा वर सांगितलेल्या वाईट गोष्टी पुन्हा करू लागतो तेव्हा आपण काय करत असतो? आपण देवाच्या आत्म्याने प्रेरित सल्ल्याच्या अर्थात बायबलच्या विरोधात जात असतो. असे करण्याद्वारे आपण पवित्र आत्म्याला खिन्‍न करतो.

इफिसकरांच्या पाचव्या अध्यायात प्रेषित पौल आपल्याला, व्यभिचाराबद्दल आवड दाखवण्याचे टाळले पाहिजे असा सल्ला देतो. तो सहविश्‍वासूंना लज्जास्पद वर्तन आणि असभ्य विनोद टाळण्यास देखील आर्जवतो. जर आपण देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू इच्छित नसू तर मनोरंजनाची निवड करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अशा गोष्टींविषयी बोलण्याद्वारे, त्यांच्याविषयी वाचण्याद्वारे, टीव्हीवर किंवा इतर ठिकाणी त्यांची चित्रे पाहण्याद्वारे आपण यांमध्ये आवड का म्हणून घ्यावी?

अर्थात, आपण इतरही मार्गांनी पवित्र आत्म्याला खिन्‍न करू शकतो. यहोवाचा आत्मा मंडळीमध्ये ऐक्याचा पुरस्कार करतो; पण समजा आपण मंडळीत इतरांबद्दल हानीकारक चुगली करतो किंवा आपल्याच मित्रांची चौकडी तयार करतो. अशा वेळी आपण, ऐक्य आणण्याकरता पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या विरोधात कार्य करत नाही का? सामान्यपणे आपण, करिंथ मंडळीत फूटी पाडणाऱ्‍यांप्रमाणे पवित्र आत्म्याला खिन्‍न करू. (१ करिंथकर १:१०; ३:१-४, १६, १७) मंडळीत आत्म्याने नियुक्‍त केलेल्या वडिलांबद्दल आपण मुद्दामहून आदर कमी केला तर तेव्हाही आपण पवित्र आत्म्याला खिन्‍न करतो.—प्रेषितांची कृत्ये २०:२८; यहूदा ८.

तेव्हा, बायबल आणि ख्रिस्ती मंडळीत आपल्याला दिसून येणाऱ्‍या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला लक्षात ठेवून आपण आपली मनोवृत्ती आणि आपली कार्ये यांचे परीक्षण करणे सुज्ञपणाचे ठरेल. शिवाय, आपण “पवित्र आत्म्याने प्रार्थना” करीत राहू या, त्याला आपल्या जीवनावर प्रभाव पाडू देऊ या आणि देवाच्या प्रेरित वचनात जे म्हटले आहे त्याच्या सुसंगतेत नेहमी कार्य करू या. (यहुदा २०) यास्तव, आपण पवित्र आत्म्याला खिन्‍न न करण्याचा दृढनिश्‍चय करू या आणि यहोवाच्या पवित्र नामाचा आदर होईल अशी कार्ये करण्यास त्याला आपल्याला मार्गदर्शित करू देऊ या.

एका श्रीमंत मनुष्याला देवाच्या राज्यात जाणे किती कठीण असू शकते याची तुलना येशूने सुईच्या नाकातून आत जाऊ पाहणाऱ्‍या उंटाशी केली. येशूच्या मनात एक खरा उंट आणि एक खरी सुई होती का?

या वाक्यांशाच्या तीन अवतरणांपैकी दोन अवतरणे जवळजवळ सारखीच आहेत. मत्तयाच्या अहवालानुसार, येशूने म्हटले: “देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्‍यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” (मत्तय १९:२४) आणि मार्क १०:२५ मध्ये म्हटले आहे: “धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्‍यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”

काही संदर्भ ग्रंथात, असे सूचवले आहे की ‘सुईचे नाक’ म्हणजे जेरूसलेमच्या एका मोठ्या फाटकात असलेले छोटे फाटक आहे. रात्री मोठे फाटक बंद असेल तर लहान फाटक उघडता येऊ शकत होते. या लहान फाटकातून एक उंट जाऊ शकत होता, असे मानले जाते. पण येशूला हे सांगायचे होते का?

नाही. येशू, शिवण कामासाठी वापरल्या जाणाऱ्‍या सुईविषयी बोलत होता. त्या भागात, हाडाच्या व धातूच्या बनवलेल्या प्राचीन सुया मिळाल्यामुळे, हे स्पष्ट होते, की त्या काळी घरांमध्ये सुयांचा नित्याने उपयोग केला जात असे. लूक १८:२५, NW मध्ये येशूच्या शब्दांविषयी कसलीही शंका राहत नाही कारण त्यात तो असे म्हणतो: “श्रीमंताने देवाच्या राज्यांत प्रवेश करणे ह्‍यापेक्षा उंटाने शिवण कामाच्या सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे.”

विविध शब्दकोशकार, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये “शिवण कामाची सुई” म्हणून जे भाषांतर करण्यात आले आहे ते बरोबर आहे असे म्हणतात. मत्तय १९:२४ आणि मार्क १०:२५ मधील ‘सुई’ (राफीस) या शब्दासाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द, “शिवणे” असा अर्थ असलेल्या क्रियापदातून घेण्यात आला आहे. आणि लूक १८:२५ येथे आढळणारा ग्रीक शब्द (वेलोनी) शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्‍या सुईला सूचित करण्यासाठी वापरला जातो. वाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्‌र्स यांत असे म्हटले आहे: “‘सुईच्या नाकाची’ तुलना लहान फाटकांशी करण्याची कल्पना आधुनिक वाटते; प्राचीन काळी या अर्थाने त्याचा वापर केला जात असल्याचा काही पुरावा नाही. या वाक्यामागील प्रभूचा उद्देश, मानवाची अशक्यता व्यक्‍त करणे आहे; नेहमीचे साधन असलेल्या सुईचा काहीतरी भलताच अर्थ देऊन, श्रीमंत मनुष्याला राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे याचे महत्त्व कमी करण्याची काही गरज नाही.”—१९८१, खंड ३, पृष्ठ १०६.

काही असे सुचवू पाहतात, की या वचनांतील ‘उंट’ याचे भाषांतर “दोरखंड” असे केले पाहिजे. दोरखंड (कॅमिलोस) आणि उंट (कॅमिलोस) यासाठी असलेले ग्रीक शब्द सारखेच आहेत. परंतु, मत्तय १९:२४ येथे, मत्तयच्या शुभवर्तमानाच्या (द सिनायटिक, द व्हॅटिकन नं. १२०९ आणि द अलेक्झॅन्ड्रीन) अस्तित्वात असलेल्या सर्वात जुन्या ग्रीक हस्तलिखितांमध्ये “दोरखंड” या अर्थाचा नव्हे तर “उंट” या अर्थाचा ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे. अहवालानुसार, मत्तयने आपले मूळ शुभवर्तमान हिब्रू भाषेत लिहिले आणि नंतर स्वतःच ग्रीकमध्ये त्याचे भाषांतर केले असावे. येशूने नक्की काय म्हटले होते ते त्याला माहीत होते व त्यामुळे त्याने उचित शब्द वापरला.

तेव्हा, येशू एका खऱ्‍या उंटाविषयी आणि एका खऱ्‍या सुईविषयी बोलत होता. एखाद्या गोष्टीच्या अशक्यतेवर जोर देण्यासाठी त्याने यांचा उपयोग केला. परंतु येशूचा असा अर्थ होता का, की कोणीही श्रीमंत मनुष्य देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही? नाही. येथे येशूच्या बोलण्याचा अक्षरशः अर्थ घ्यायचा नव्हता. जसा एक खरा उंट एका सुईच्या नाकातून जाऊ शकत नाही तसेच, श्रीमंत मनुष्य जर आपल्या धनाशी जडून राहिला व तो यहोवाला आपल्या जीवनात प्राधान्य देत नसला तर त्याला देवाच्या राज्यात जाणे अशक्य आहे, हे समजावून सांगण्यासाठी येशूने या अतिशयोक्‍तीचा उपयोग केला.—लूक १३:२४; १ तीमथ्य ६:१७-१९.

एका श्रीमंत शासकाने, येशूचा अनुयायी होण्याची संधी नाकारल्यानंतर लगेच येशूने हे उदाहरण दिले. (लूक १८:१८-२४) आध्यात्मिक गोष्टींपेक्षा आपल्या धनसंपत्तीवर अधिक प्रेम करणारी धनाढ्य व्यक्‍ती, देवाच्या राज्यात सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकत नाही. पण काही श्रीमंत लोक येशूचे शिष्य झाले. (मत्तय २७:५७; लूक १९:२, ९) त्याअर्थी, आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव राखणारा आणि देवाकडून मदत घेणारा श्रीमंत मनुष्य, देवाकडून मिळणारे तारण प्राप्त करू शकतो.—मत्तय ५:३; १९:१६-२६.

[तळटीप]

^ परि. 3 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक पाहा.