व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वृद्धजन—आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाचे मौल्यवान सदस्य

वृद्धजन—आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाचे मौल्यवान सदस्य

वृद्धजन—आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाचे मौल्यवान सदस्य

“जे परमेश्‍वराच्या घरात रोवलेले आहेत. ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातहि ते फळ देत राहतील.”—स्तोत्र ९२:१३, १४.

१. बऱ्‍याच लोकांचा वृद्धांविषयी कसा दृष्टिकोन आहे?

यहोवा आपल्या सर्व विश्‍वासू सेवकांवर प्रेम करतो. वृद्ध झालेले बांधव अर्थातच, याला अपवाद नाहीत. पण एका राष्ट्रीय आकडेवारीनुसार, दरवर्षी अमेरिकेतील वृद्धांपैकी जवळजवळ पाच लाख वृद्ध जनांशी दुर्व्यवहार केला जातो किंवा त्यांना दुर्लक्षित केले जाते. सबंध जगातील अशाचप्रकारची वृत्ते दाखवतात की वृद्धांशी केला जाणारा दुर्व्यवहार एक जागतिक समस्या बनली आहे. एका संघटनेनुसार वृद्धांप्रती बहुतेक लोकांची वृत्ती या समस्येला कारणीभूत आहे, कारण “बहुतेक लोकांना असे वाटते की वृद्ध लोक कोणाच्याही उपयोगी पडू शकत नाहीत, ते काहीही साध्य करू शकत नाहीत, उलट ते इतरांवर ओझे बनतात.”

२. (अ) यहोवा आपल्या विश्‍वासू वृद्ध सेवकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? (ब) स्तोत्र ९२:१२-१५ यात आपल्याला कोणते आनंददायक आश्‍वासन देण्यात आले आहे?

यहोवा देव आपल्या एकनिष्ठ वृद्ध सेवकांना अत्यंत प्रिय समजतो. तो आपल्या शारीरिक दुर्बलतेकडे नव्हे, तर आपल्या ‘आतील माणसाकडे,’ अर्थात आपल्या आध्यात्मिक स्थितीकडे लक्ष देतो. (२ करिंथकर ४:१६, पं.र.भा.) त्याचे वचन बायबल यात तो उल्लसित करणारे हे आश्‍वासन देतो: “नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्‍वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातहि ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील; ह्‍यावरून दिसेल की परमेश्‍वर सरळ आहे.” (स्तोत्र ९२:१२-१५) ही वचने विचारात घेतल्यावर तुम्हा वृद्ध जनांना अशी अनेक क्षेत्रे दिसून येतील ज्यांत तुम्ही ख्रिस्ती बंधुसमाजाप्रती मोलाचे योगदान देऊ शकता.

‘वृद्धपणातहि फळ देणे’

३. (अ) नीतिमानांची तुलना खजुरीच्या वृक्षांशी का करण्यात आली आहे? (ब) वृद्धजन कशाप्रकारे ‘वृद्धपणातहि फळ देऊ शकतात?’

स्तोत्रकर्ता नीतिमान व्यक्‍तीची तुलना, ‘आपल्या देवाच्या अंगणात रोवलेल्या’ खजुरीच्या झाडांशी करतो. तो म्हणतो, “वृद्धपणातहि ते फळ देत राहतील.” हा खरोखर उत्तेजन देणारा विचार नाही का? बायबल काळांत पौर्वात्य घरांच्या अंगणात उंच, दिमाखदार खजुरीची वृक्षे अगदी सर्वसामान्य होती. ती केवळ दिसायलाच शोभिवंत नव्हती, तर ती अतिशय फलदायी असल्यामुळे अत्यंत मोलवान समजली जात होती; काही वृक्षे तर शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत फळ देत असत. * खऱ्‍या उपासनेत दृढ राहून तुम्ही देखील सातत्याने ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ देत राहू शकाल.’—कलस्सैकर १:१०.

४, ५. (अ) ख्रिश्‍चनांनी कोणते महत्त्वाचे फळ उत्पन्‍न करणे गरजेचे आहे? (ब) ज्यांनी “ओठांचे फळ” उत्पन्‍न केले अशा वयोवृद्ध व्यक्‍तींची बायबलमधील उदाहरणे द्या.

ख्रिश्‍चनांनी “ओठांचे फळ” उत्पन्‍न करावे म्हणजेच यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल स्तुतीचे उद्‌गार काढावेत अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. (इब्री लोकांस १३:१५) तुम्ही एक वृद्ध व्यक्‍ती असल्यास, यहोवा तुमच्याकडूनही हीच अपेक्षा करतो का? होय, निश्‍चितच.

ज्यांनी यहोवाच्या नावाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल निर्भयपणे साक्ष दिली अशा अनेक वृद्ध व्यक्‍तींची बायबलमध्ये उदाहरणे आहेत. मोशेला यहोवाने आपला संदेष्टा व प्रतिनिधी होण्याकरता नियुक्‍त केले तेव्हा त्याने आयुष्याची “सत्तर वर्षे” ओलांडली होती. (स्तोत्र ९०:१०; निर्गम ४:१०-१७) दानिएलालाही त्याच्या वृद्धावस्थेने यहोवाच्या सार्वभौमत्वाविषयी निर्भयपणे साक्ष देण्यापासून परावृत्त केले नाही. बेलशस्सराने दानिएलाला भिंतीवरील रहस्यमय लिखाणाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता बोलावणे पाठवले तेव्हा दानिएलाने कदाचित नव्वदी पार केली असावी. (दानीएल, ५ वा अध्याय) तसेच वयोवृद्ध प्रेषित योहानाचेही उदाहरण आहे. त्याच्या दीर्घ सेवाकाळाच्या शेवटी शेवटी, त्याला “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर” पात्म बेटावर कैद करून ठेवण्यात आले. (प्रकटीकरण १:९) तुम्हालाही बायबलमधील अशा अनेक व्यक्‍तींची उदाहरणे आठवणीत असतील ज्यांनी जीवनाच्या संधिकालातही “ओठांचे फळ” उत्पन्‍न केले.—१ शमुवेल ८:१, १०; १२:२; १ राजे १४:४, ५; लूक १:७, ६७-७९; २:२२-३२.

६. यहोवाने या शेवटल्या काळात संदेश देण्याकरता ‘वृद्धांचा’ कशाप्रकारे उपयोग केला आहे?

प्रेषित पेत्राने इब्री संदेष्टा योएल याचे शब्द उद्धृत केले व म्हटले: “देव म्हणतो, ‘शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर [ज्यांत ‘वृद्धही’ सामील आहेत] आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा . . . ते संदेश देतील.’” (प्रेषितांची कृत्ये २:१७, १८; योएल २:२८) या भविष्यवाणीनुसार, या शेवटल्या काळात यहोवाने अभिषिक्‍त वर्गापैकी व ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ अनेक वृद्ध जनांचा आपल्या उद्देशांची घोषणा करण्याकरता उपयोग केला आहे. (योहान १०:१६) यांपैकी काहीजण तर कित्येक दशकांपासून विश्‍वासूपणे राज्याचे फळ उत्पन्‍न करत आहेत.

७. शारीरिक दुर्बलता असूनही वृद्धजन कशाप्रकारे राज्याचे फळ उत्पन्‍न करत राहतात याचे उदाहरण द्या.

सोनिया यांचे उदाहरण घ्या. त्यांनी १९४१ साली पूर्ण-वेळ राज्य प्रचारक म्हणून कार्य करण्यास सुरवात केली होती. जुन्या आजारपणामुळे कित्येक वर्षांपासून बेजार असूनही त्या घरातच नियमितरित्या बायबल अभ्यास चालवत होत्या. त्या म्हणायच्या, “सुवार्तेचा प्रचार हे माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. नव्हे हेच माझे जीवन आहे. या कार्यातून मी कधीही निवृत्त होऊ इच्छित नाही.” अलीकडेच सोनिया व त्यांची बहीण ऑलिव्ह यांनी हॉस्पिटलच्या प्रतीक्षालयात भेटलेल्या एका स्त्रीला बायबलमधील आशेचा संदेश सांगितला होता. या मुलीचे नाव जॅनेट असून तिला असाध्य रोग झाला आहे. जॅनेटची आई एक धार्मिक मनोवृत्तीची कॅथलिक स्त्री आहे व तिच्या मुलीबद्दल दाखवण्यात आलेल्या आपुलकीने ती इतकी प्रभावित झाली की तिने बायबल अभ्यास स्वीकारला आणि सध्या ती उत्तम प्रगती करत आहे. तुम्ही देखील राज्याचे फळ उत्पन्‍न करण्याकरता अशाचप्रकारे संधीचा फायदा करून घेऊ शकता का?

८. वयोवृद्ध कालेबने यहोवावर भरवसा असल्याचे कशाप्रकारे दाखवले आणि वृद्ध ख्रिस्ती त्याच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

वृद्धापकाळामुळे आलेल्या मर्यादा असूनही जे वृद्ध बांधव राज्य प्रचाराच्या कार्यात तत्पर राहतात ते कालेबच्या पदचिन्हांवर चालत आहेत. कालेब एक विश्‍वासू इस्राएली होता ज्याने मोशेसोबत अरण्यात चाळीस वर्षे घालवली होती. यार्देन नदी पार करून प्रतिज्ञात देशात प्रवेश करताना कालेब ७९ वर्षांचा होता. इस्राएलच्या विजयी सैन्यात सहा वर्षे सैनिकी सेवा केल्यानंतर तो आरामशीर आपले उर्वरीत आयुष्य घालवू शकत होता. पण नाही, त्याने असे केले नाही. उलट त्याने यहुदाच्या डोंगराळ प्रदेशात, जेथे अनाकी ही अवाढव्य पुरुषांची जमात राहात होती तेथील “मोठमोठी तटबंदी नगरे” काबीज करण्याची आव्हानात्मक जबाबदारी स्वतःहून मागून घेतली. यहोवाच्या मदतीने कालेबने खरोखरच ‘परमेश्‍वराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना हाकून दिले.’ (यहोशवा १४:९-१४; यहोशवा १५:१३, १४) कालेबाच्या पाठीशी यहोवा होता त्याचप्रमाणे, तुम्ही आपल्या वृद्धपणी राज्याचे फळ उत्पन्‍न करत राहाल तेव्हा तुमच्याही पाठीशी तो सदोदित राहील याची खात्री बाळगा. आणि जर तुम्ही विश्‍वासू राहिला तर तो आपल्या प्रतिज्ञात नव्या जगात तुमच्याकरता एक स्थान निश्‍चित करेल.—यशया ४०:२९-३१; २ पेत्र ३:१३.

“ते रसभरित व टवटवीत असतील”

९, १०. वृद्ध ख्रिस्ती विश्‍वासात सुदृढ राहून आपला आध्यात्मिक जोम कशाप्रकारे टिकवून ठेवतात? (पृष्ठ १३ वरील चौकट पाहा.)

यहोवाच्या वृद्ध सेवकांच्या फलदायी सेवेकडे लक्ष वेधून स्तोत्रकर्त्याने हे गीत गायिले: “नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. वृद्धपणातहि ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील.”—स्तोत्र ९२:१२, १४.

१० वय वाढत असतानाही तुम्ही आपला आध्यात्मिक जोम कशाप्रकारे कायम ठेवू शकता? खजुरीच्या वृक्षांना गोड पाण्याचा अखंड पुरवठा मिळाल्यास त्यांचे सौंदर्य सबंध वर्षभर अबाधित राहते. त्याचप्रकारे तुम्ही देखील देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे आणि त्याच्या संघटनेशी सहवास राखण्याद्वारे बायबल सत्याच्या गोड पाण्याने आपले पोषण करू शकता. (स्तोत्र १:१-३; यिर्मया १७:७, ८) तुमच्या आध्यात्मिक उत्साहामुळे सहविश्‍वासू बांधवांकरता तुम्ही मोलवान ठरता. वयोवृद्ध मुख्य याजक यहोयादा याच्याबाबतीत ही गोष्ट कशाप्रकारे खरी ठरली हे विचारात घ्या.

११, १२. (अ) यहोयादाने यहुदा राज्याच्या इतिहासात कोणती महत्त्वपूर्ण भूमिका निभावली? (ब) खऱ्‍या उपासनेचा प्रसार करण्याकरता यहोयादाने आपल्या प्रभावाचा कशाप्रकारे उपयोग केला?

११ महत्त्वाकांक्षी राणी अथल्या हिने स्वतःच्याच नातवांचा वध करून यहुदाचे राज्य बळकावले तेव्हा यहोयादाचे वय कदाचित शंभर वर्षांपेक्षा जास्त असावे. मग वयोवृद्ध यहोयादाने काय केले? त्याने व त्याच्या पत्नीने, राजवंशाच्या जिवंत बचावलेल्या एकुलत्या एक वारसदाराला म्हणजेच यहोआशला (किंवा, योवाश) सहा वर्षांपर्यंत मंदिरात लपवून ठेवले. यानंतर यहोयादाने विलक्षण साहस दाखवून सात वर्षांच्या यहोआशला राजा घोषित केले आणि अथल्येचा वध घडवून आणला.—२ इतिहास २२:१०-१२; २३:१-३, १५, २१.

१२ राजाचा पालनकर्ता या नात्याने त्याच्यावर यहोयादाला जो अधिकार होता त्याचा उपयोग यहोयादाने खऱ्‍या उपासनेला प्रोत्साहन देण्याकरता केला. “यहोयादा, राजा व प्रजा यांनी परमेश्‍वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांजकडून परमेश्‍वराशी करार करविला.” यहोयादाने दिलेल्या आज्ञेच्या बरहुकूम लोकांनी बआल या खोट्या दैवताची सर्व मंदिरे व त्यातील वेद्या, मूर्ती आणि याजकास काढून टाकले. यहोयादाच्याच मार्गदर्शनाने यहोआशने मंदिरातील उपासना पूर्ववत सुरू केली आणि बऱ्‍याच काळापासून आवश्‍यक असलेला जीर्णोद्धार करवून घेतला. “यहोआशाला यहोयादा याजकाची सल्लामसलत मिळत होती तोवर परमेश्‍वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत होता.” (२ इतिहास २३:११, १६-१९; २४:११-१४; २ राजे १२:२) १३० वर्षांच्या वयात जेव्हा यहोयादाचा मृत्यू झाला तेव्हा राजांमध्ये मूठमाती देऊन त्याचा अनन्यासाधारण सन्मान करण्यात आला, “कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर यांच्या संबंधाने चांगले काम केले होते.”—२ इतिहास २४:१५, १६.

१३. वृद्ध ख्रिस्ती कशाप्रकारे “देव व त्याचे मंदिर यांच्या संबंधाने चांगले काम” करू शकतात?

१३ कदाचित खालावलेली प्रकृती किंवा इतर अडचणींमुळे तुम्हाला खऱ्‍या उपासनेच्या प्रसाराकरता फारसे योगदान देता येत नसेल. असे असले तरीसुद्धा तुम्ही “देव व त्याचे मंदिर यांच्या संबंधाने चांगले काम” करू शकता. तुम्ही मंडळीच्या सभांना हजर राहून व त्यांत सहभाग घेऊन तसेच जेव्हाही शक्य होईल तेव्हा क्षेत्र सेवेत सहभागी होऊन यहोवाच्या आत्मिक मंदिराप्रती आपला आवेश प्रकट करू शकता. तुम्ही बायबलमधून दिलेला सल्ला स्वखुषीने स्वीकारता आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ तसेच तुमच्या मंडळीला एकनिष्ठपणे पाठिंबा देता तेव्हा एकंदरीत ख्रिस्ती बंधूसमाजाला यामुळे बळकटी मिळते. (मत्तय २४:४५-४७) तसेच, तुम्ही सहउपासकांना “प्रीति व सत्कर्मे करावयास” उत्तेजन देऊ शकता. (इब्री लोकांस १०:२४, २५; फिलेमोन ८, ९) शिवाय, प्रेषित पौलाने दिलेल्या पुढील सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही इतरांसाठी एक आशीर्वाद ठरू शकता: “वृद्ध पुरूषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्‍वास, प्रीति व सहनशीलता ह्‍यांमध्ये दृढ [“उत्साही,” ॲन अमेरिकन ट्रान्स्लेशन] राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्‍त नसाव्या; सुशिक्षण देणाऱ्‍या असाव्या.”—तीत २:२-४.

१४. खऱ्‍या उपासनेचा प्रसार होण्याकरता अनेक वर्षांपासून पर्यवेक्षक असणारे ख्रिस्ती बांधव कशाप्रकारे हातभार लावू शकतात?

१४ तुम्ही अनेक वर्षांपासून मंडळीत वडील या नात्याने सेवा केली आहे का? अनेक वर्षांपासून वडील असणाऱ्‍या एका बांधवाने हा सल्ला दिला: “वाढत्या वयासोबत येणाऱ्‍या सुज्ञतेचा निःस्वार्थपणे वापर करा. इतरांवर जबाबदाऱ्‍या सोपवायला शिका आणि जे शिकण्यास उत्सुक आहेत अशांना आपल्या अनुभवापासून फायदा करून घेण्यास मदत करा. . . . इतरांमध्ये असलेल्या क्षमता ओळखा. त्यांचा विकास होण्याकरता त्यांना खतपाणी द्या. भविष्याला आकार द्या.” (अनुवाद ३:२७, २८) सतत विस्तारत असलेल्या राज्य प्रचार कार्यात तुम्ही मनःपूर्वक आस्था दाखवल्यास आपल्या ख्रिस्ती बंधूसमाजात इतरांना तुम्ही अनेक आशीर्वाद मिळवून द्याल.

‘यहोवा सरळ आहे हे प्रगट करा’

१५. “यहोवा सरळ आहे” हे वयस्क ख्रिस्ती कशाप्रकारे ‘प्रगट करतात’?

१५ यहोवाचे वयोवृद्ध सेवक, ‘तो सरळ आहे हे प्रगट करण्याची’ आपली जबाबदारी आनंदाने पार पाडतात. जर तुम्ही एक वयस्क ख्रिस्ती व्यक्‍ती असाल तर तुम्ही जे बोलता व जसे वागता त्यावरून इतरांना दिसून येऊ शकते की ‘यहोवा तुमचा खडक आहे आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.’ (स्तोत्र ९२:१५) खजुरीचे झाड आपल्या निर्माणकर्त्याच्या अद्वितीय गुणांची मूक प्रशंसा करतो. पण तुम्हाला मात्र यहोवाने एक विशेष सुसंधी दिली आहे आणि ती म्हणजे खऱ्‍या उपासनेकडे येणाऱ्‍या नवोदितांना त्याच्या सुरेख गुणांविषयी सांगण्याची. (अनुवाद ३२:७; स्तोत्र ७१:१७, १८; योएल १:२, ३) हे महत्त्वाचे का आहे?

१६. ‘यहोवा सरळ आहे हे प्रगट करण्याचे’ महत्त्व बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होते?

१६ इस्राएलचा नेता यहोशवा “वृद्ध व वयातीत” झाला तेव्हा त्याने “सर्व इस्राएलांना म्हणजे त्यांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अमलदार” यांना देवाच्या सरळ व्यवहारांची आठवण करून देण्याकरता एकत्रित केले. त्याने म्हटले: “आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही. तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहोशवा २३:१, २, १४) या शब्दांनी उभारी मिळाल्यावर काही काळापर्यंत इस्राएल लोकांनी देवाला विश्‍वासू राहण्याचा निर्धार केला. पण यहोशवाच्या मृत्यूनंतर “जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्‍वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्यांची ओळख राहिली नव्हती. इस्राएल लोक परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवाची सेवा करू लागले.”—शास्ते २:८-११.

१७. आधुनिक काळात यहोवाने त्याच्या लोकांसोबत कशाप्रकारे व्यवहार केला आहे?

१७ आजच्या ख्रिस्ती मंडळीचा विश्‍वासूपणा देवाच्या वयस्क सेवकांच्या मौखिक साक्षीवर अवलंबून नाही. पण तरीसुद्धा, या शेवटल्या काळात यहोवाने आपल्या लोकांकरता ‘केलेल्या महान कार्यांविषयी’ आपण प्रत्यक्ष साक्षीदारांकडून ऐकतो तेव्हा यहोवावर व त्याच्या प्रतीज्ञांवर आपलाही विश्‍वास अधिक मजबूत झाल्याशिवाय राहात नाही. (शास्ते २:७; २ पेत्र १:१६-१९) जर तुम्ही अनेक वर्षांपासून यहोवाच्या संघटनेशी संलग्न असाल तर तुम्हाला कदाचित तो सुरवातीचा काळ आठवत असेल जेव्हा तुमच्या प्रांतात अथवा देशात अगदी तुरळक राज्य प्रचारक होते किंवा प्रचार कार्याला भयंकर विरोध केला जात होता. काळाच्या ओघात, यहोवाने कशाप्रकारे काही अडचणी दूर केल्या आणि कशाप्रकारे राज्याची वाढ ‘त्वरित घडवून आणली’ हे तुम्ही स्वतः पाहिले आहे. (यशया ५४:१७; ६०:२२) बायबल सत्ये कशाप्रकारे उत्तरोत्तर स्पष्ट होत गेली आणि देवाच्या संघटनेचा दृश्‍य भाग कशाप्रकारे अधिकाधिक शुद्ध करण्यात आला या सर्व गोष्टींचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात. (नीतिसूत्रे ४:१८; यशया ६०:१७) मग यहोवाच्या या सरळपणाच्या व्यवहारांविषयी आपले अनुभव इतरांना सांगण्याद्वारे त्यांना प्रोत्साहन देण्यास तुम्ही उत्सुक आहात का? यामुळे ख्रिस्ती बंधूसमाजावर खरोखर किती रचनात्मक आणि प्रभावशाली परिणाम होईल!

१८. (अ) ‘यहोवा सरळ आहे हे प्रगट केल्यामुळे’ दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात हे दाखवणारे उदाहरण सांगा. (ब) तुम्ही स्वतः यहोवाचा सरळपणा कशाप्रकारे अनुभवला आहे?

१८ तुमच्या वैयक्‍तिक जीवनात तुम्हाला असे प्रसंग आठवतात का, जेव्हा तुम्हाला यहोवाची माया व त्याचे मार्गदर्शन अनुभवायला मिळाले? (स्तोत्र ३७:२५; मत्तय ६:३३; १ पेत्र ५:७) मार्था नावाच्या एक वयस्क भगिनी असे म्हणून इतरांना प्रोत्साहन द्यायच्या: “जीवनात काहीही झाले तरी, यहोवाला कधी सोडू नका. तो तुम्हाला निभावून नेईल.” भगिनी मार्था यांच्या एक बायबल विद्यार्थिनी टोलमीना, ज्यांचा बाप्तिस्मा १९६० च्या दशकाच्या सुरवातीला झाला होता, त्यांच्यावर या सल्ल्याचा अतिशय गहिरा प्रभाव पडला. त्या सांगतात, “माझ्या पतीचा मृत्यू झाला, तेव्हा मी अगदी निराश झाले पण त्या शब्दांची मला आठवण झाली आणि मी ठरवले की एकही सभा चुकवायची नाही. आणि खरोखरच यहोवाने मला सावरले.” पुढील वर्षांत टोलमीना यांनी आपल्या कित्येक बायबल विद्यार्थ्यांनाही तोच सल्ला दिला आहे. खरोखर इतरांना प्रोत्साहन दिल्याने आणि यहोवाच्या सरळ व्यवहारांविषयी आपले अनुभव इतरांना सांगितल्याने सहविश्‍वासू बांधवांचा विश्‍वास बळकट करण्यास तुम्ही मोलाचा हातभार लावू शकता.

विश्‍वासू वृद्ध जनांना यहोवा मोलवान समजतो

१९, २०. (अ) आपल्या वयस्क सेवकांच्या कार्यांविषयी यहोवाचा कसा दृष्टिकोन आहे? (ब) पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१९ आजच्या जगात बहुतेक लोक कृतघ्न आहेत, वयस्क लोकांकरता त्यांच्याजवळ वेळ नाही. (२ तीमथ्य ३:१, २) वृद्ध लोकांची आठवण केली जाते, पण कशासाठी? तर सहसा त्यांच्या गतकाळातील यशस्वी कामगिरीसाठी. ते कोण आहेत यासाठी नव्हे, तर ते कोण होते यासाठी. याउलट बायबल म्हणते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) अर्थात, यहोवा देवाला तुमच्या गतकाळातील विश्‍वासू कामगिरीचीही आठवण आहे. पण तुम्ही त्याच्या सेवेत आजही जे करत आहात त्याकरता तो तुमची कदर बाळगतो. होय, विश्‍वासू वयस्क बांधव यहोवाच्या नजरेत फलदायी, आध्यात्मिकरित्या सुदृढ आणि जोमदार ख्रिस्ती आहेत, यहोवाच्या सामर्थ्याची ग्वाही देणारी जिवंत उदाहारणे.—फिलिप्पैकर ४:१३.

२० आपल्या ख्रिस्ती बंधूसमाजातील वयोवृद्ध सदस्यांबद्दल तुमचा दृष्टिकोन यहोवासारखा आहे का? जर असेल, तर तुम्ही आपोआपच त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यास प्रवृत्त व्हाल. (१ योहान ३:१८) आपल्या या वृद्ध बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करण्याद्वारे त्यांच्याविषयी आपले प्रेम आपण कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांनी व्यक्‍त करू शकतो याविषयी पुढील लेखात चर्चा केली आहे.

[तळटीप]

^ परि. 3 खजुरांच्या आठ किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या प्रत्येक गुच्छात जवळजवळ एक हजार खजूर असू शकतात. एका लेखकाच्या अंदाजानुसार “प्रत्येक फलदायी [खजूर] वृक्ष आपल्या सबंध जीवनकाळात आपल्या मालकाला दोन ते तीन टन खजुरांचे उत्पन्‍न देते.”

तुमचे उत्तर काय आहे?

• वृद्धजन कशाप्रकारे ‘फळ देतात?’

• वयस्क ख्रिस्ती बांधव त्यांच्या आध्यात्मिक उत्साहामुळे कशाप्रकारे मोलवान ठरतात?

• ‘यहोवा सरळ आहे’ हे वृद्धजन कशाप्रकारे ‘प्रगट करू शकतात?’

• अनेक दशकांपासून सेवा करणाऱ्‍या आपल्या सेवकांना यहोवा मोलवान का समजतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चौकट]

त्यांच्या आध्यात्मिक आरोग्याचे रहस्य

अनेक वर्षांपासून सेवा करत असलेल्या ख्रिस्ती वृद्धांना त्यांच्या विश्‍वासात मजबूत राहण्यास व आध्यात्मिक उत्साह टिकवून ठेवण्यास कशामुळे मदत मिळाली आहे? त्यांच्याच शब्दांत ऐका:

“यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणाऱ्‍या शास्त्रवचनांचे वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सहसा मी रात्री, स्तोत्र २३ व ९१ म्हणते.”—ऑलिव्ह ज्यांचा बाप्तिस्मा १९३० साली झाला.

“मी प्रत्येक बाप्तिस्म्याच्या भाषणाला आवर्जून हजर राहण्याचा व जणू माझाच बाप्तिस्मा असल्याप्रमाणे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करतो. आपले समर्पण सदैव नजरेपुढे ठेवल्यामुळे मला विश्‍वासू राहण्यास खूप मदत झाली आहे.”—हॅरी ज्यांचा बाप्तिस्मा १९४६ साली झाला.

“दररोज प्रार्थना करणे—सदोदित यहोवाची मदत, संरक्षण व आशीर्वादाकरता विनंती करणे आणि ‘आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर करणे’ अत्यंत महत्त्वाचे आहे.” (नीतिसूत्रे ३:५, ६)—आन्तोन्यू, ज्यांचा बाप्तिस्मा १९५१ साली झाला.

“अनेक वर्षांपासून आजवर यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत असलेल्या बांधवांचे अनुभव ऐकल्याने, मलाही यहोवाला एकनिष्ठ व विश्‍वासू राहण्याचे नव्याने प्रोत्साहन मिळते.”—जोन, ज्यांचा बाप्तिस्मा १९५४ साली झाला.

“स्वतःला फार काहीतरी न समजणे महत्त्वाचे आहे. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व देवाच्या अपात्री कृपेमुळेच आहे. ही मनोवृत्ती ठेवल्याने, शेवटपर्यंत टिकून राहण्याकरता आवश्‍यक असलेल्या आध्यात्मिक पोषणाकरता योग्य दिशेला शोध घेण्यास आपल्याला मदत मिळू शकते.”—आर्लीन, ज्यांचा बाप्तिस्मा १९५४ साली झाला.

[११ पानांवरील चित्र]

वयस्क बांधव राज्याचे मोलवान फळ उत्पन्‍न करतात

[१४ पानांवरील चित्र]

वृद्ध बांधवांचा आध्यात्मिक उत्साह ही आपली संपत्ती आहे