व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंधाऱ्‍या कोठडीतून देखण्या स्वीस ॲल्प्सपर्यंत

अंधाऱ्‍या कोठडीतून देखण्या स्वीस ॲल्प्सपर्यंत

जीवन कथा

अंधाऱ्‍या कोठडीतून देखण्या स्वीस ॲल्प्सपर्यंत

लोटर वॉल्टर यांच्याद्वारे कथित

पूर्व जर्मनीच्या कम्युनिस्ट तुरुंगात युगांप्रमाणे वाटणारी तीन वर्षं घालवल्यानंतर, केव्हा एकदाचा मला स्वातंत्र्याचा सुखद अनुभव आणि माझ्या कुटुंबाचा प्रेमळ सहवास लाभतो असं झालं होतं.

पण माझा सहा वर्षीय मुलगा, योहान्स याच्या चेहऱ्‍यावरील गोंधळून गेलेला भाव मात्र मी अपेक्षिला नव्हता. तीन वर्षांपर्यंत त्यानं आपल्या बापाला पाहिलं नव्हतं. त्याच्यासाठी मी पूर्णपणे अनोळखी होतो.

माझ्या मुलाला जसा अनुभव आला होता, तसा अनुभव मला नव्हता आला; मी माझ्या आईवडिलांच्या प्रेमळ छायेखालीच लहानाचा मोठा झालो. १९२८ साली, जर्मनीतील केमनीट्‌समध्ये माझा जन्म झाला; आमच्या घरात उबदार वातावरण होतं. माझे वडील, धर्माच्या बाबतीत आपली नाराजी खुल्या मनाने व्यक्‍त करायचे. ते आठवून सांगायचे, की पहिल्या महायुद्धाच्या वेळी, दोन्ही बाजूच्या “ख्रिस्ती” सैनिकांनी डिसेंबर २५ रोजी, एकमेकांना “नाताळाच्या शुभेच्छा” दिल्या आणि दुसऱ्‍या दिवशी पुन्हा एकमेकांची कत्तल करायला सुरवात केली. वडिलांच्या मते, धर्म दांभिकपणाचे सर्वात भयंकर रूप होतं.

विश्‍वासामुळे माझी निराशा होत नाही

मला अशा निराशेचा अनुभव आला नाही म्हणून आनंद वाटतो. मी १७ वर्षांचा होतो तेव्हा दुसरे महायुद्ध संपले आणि मी सैन्यात भरती होता होता वाचलो. पण, माझ्या मनात सतत असे भेडसावणारे प्रश्‍न यायचे, जसे की ‘ही सर्व कत्तल का चालली आहे? मी कोणावर भरवसा ठेवू शकतो? मला खरी सुरक्षा कोठे मिळू शकेल?’ मी जिथं राहत होतो तो पूर्व जर्मनीचा भाग सोव्हियतच्या ताब्यात आला. न्याय, समानता, एकी, शांतीपूर्ण नातेसंबंध याबाबतीत कम्युनिस्ट लोकांची मते, युद्धाची झळ लागलेल्या लोकांना पटायची. पण लवकरच या प्रामाणिक लोकांची घोर निराशा होणार होती—या वेळेला, धर्मामुळं नव्हे तर राजनीतीमुळं.

अर्थपूर्ण उत्तरे मिळण्याची माझी धडपड चालू असताना, यहोवाची साक्षीदार असलेल्या माझ्या एका मावशीनं मला तिच्या विश्‍वासांबद्दल सांगितलं. तिनं मला एक बायबल आधारित प्रकाशन दिलं ज्यामुळे मी, माझ्या जीवनात पहिल्यांदा मत्तयाचा संपूर्ण २४ वा अध्याय वाचायला प्रेरित झालो. आपला काळ ‘युगाच्या समाप्तीचा’ काळ आहे व मानवजातीच्या समस्यांचे मूळ कारण काय आहे या सर्वांबद्दलची पुस्तकात दिलेली तर्कशुद्ध व खात्री पटवणारी माहिती वाचून मी थक्क झालो.—मत्तय २४:३; प्रकटीकरण १२:९.

मला लगेच यहोवाच्या साक्षीदारांची आणखी प्रकाशनं मिळाली; मला जशी ती मिळत राहिली तशी मी अधाशासारखी ती वाचून काढू लागलो आणि माझी खात्री पटत गेली की मी ज्याचा कसून शोध घेत होतो ते सत्य मला सापडलं होतं. येशू ख्रिस्त १९१४ मध्ये स्वर्गात राजा झाला व तो लवकरच आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वाद देण्याकरता सर्व अभक्‍त गोष्टींचा नायनाट करणार आहे हे शिकून मला खूप आनंद झाला. मला आणखी एका मोठ्या गोष्टीचा शोध लागला होता; ती गोष्ट म्हणजे मला खंडणीची स्पष्ट समज मिळाली होती. यामुळे मला, यहोवा देवाकडं कळकळीच्या प्रार्थनेद्वारे क्षमा मागण्यासाठी मदत मिळाली. “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल” हे याकोब ४:८ मधील प्रेमळ आमंत्रण वाचून मी भारावून गेलो.

मला नव्यानं सापडलेल्या विश्‍वासाबद्दल जसा ज्वलंत आवेश होता तसा सुरवातीला माझ्या आईवडिलांना व बहिणीला नव्हता; मी त्यांना जे काही सांगत होतो ते त्यांनी लगेच स्वीकारलं नाही. पण यामुळे, केमनीट्‌सजवळ साक्षीदारांचा एक लहानसा गट भरवत असलेल्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा कमी झाली नाही. आश्‍चर्य म्हणजे, माझे आईवडील आणि बहीण माझ्याबरोबर माझ्या पहिले सभेला आले! ही १९४५/४६ सालच्या हिवाळ्यातली गोष्ट आहे. नंतर, आम्ही जिथं राहत होतो त्या हारटाऊमध्ये एक बायबल अभ्यास गट तयार झाला तेव्हा माझे कौटुंबिक सदस्यही उपस्थित राहू लागले.

“मी केवळ बाळ आहे”

महत्त्वपूर्ण बायबल सत्यं शिकल्यामुळं व यहोवाच्या लोकांबरोबर नियमित सहवास राखल्यामुळं मी यहोवाला माझं जीवन समर्पित करू शकलो आणि १९४६ सालच्या मे २५ तारखेला माझा बाप्तिस्मा झाला. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी देखील आध्यात्मिक प्रगती केल्याचं व तिघेही विश्‍वासू साक्षीदार बनल्याचं पाहून मला खूप समाधान वाटतं. माझी बहीण आजही केमनीट्‌स येथील एका मंडळीत सक्रिय सदस्या आहे. आणि, आईचा १९६५ साली व बाबांचा १९८६ साली मृत्यू होईपर्यंत त्यांनी विश्‍वासूपणे सेवा केली.

बाप्तिस्मा घेऊन सहा महिने झाल्यावर मी खास पायनियर म्हणून सेवा करू लागलो. या वेळेला मी जीवनभर, ‘सुवेळी अवेळी’ करावयाच्या सेवेला सुरवात केली. (२ तीमथ्य ४:२) लवकरच, सेवेच्या नवीन संधी उपलब्ध होऊ लागल्या. पूर्व जर्मनीतील एका दूरवरच्या क्षेत्रात पूर्ण वेळेच्या सुवार्तिकांची आवश्‍यकता होती. एका बांधवानं व मी या नेमणुकीसाठी अर्ज भरले; पण मला सारखं असं वाटत होतं, की अशा जबाबदार कामासाठी माझ्याकडे अनुभव नव्हता किंवा प्रौढताही नव्हती. मी तेव्हा फक्‍त १८ वर्षांचा होतो, त्यामुळे मलाही यिर्मयासारखंच वाटत होतं ज्यानं म्हटलं होतं: “अहो, प्रभु परमेश्‍वर, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” (यिर्मया १:६) माझ्या मनात शंका असतानाही, जबाबदार बांधवांनी दयाळुपणे आम्हाला संधी देण्याचं ठरवलं. त्यामुळं आम्हाला ब्रॅडनबर्ग राज्यातील बेल्टसीक नावाच्या एका लहानशा गावात नेमण्यात आलं.

या क्षेत्रात प्रचार करणं खूप कठीण होतं पण यामुळं मला मौल्यवान प्रशिक्षण मिळालं. कालांतरानं, व्यापार करणाऱ्‍या अनेक विख्यात स्त्रियांनी राज्य संदेश स्वीकारला आणि त्या यहोवाच्या साक्षीदार बनल्या. परंतु त्यांनी घेतलेली भूमिका, त्या लहानशा ग्रामीण समाजातील खोलवर रुजलेल्या परंपरा आणि काहीतरी वेगळं असलेल्या गोष्टींबद्दलची भीती यांच्या अगदी उलट होती. त्यामुळे दोन्ही कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पाळकांनी आमचा कडाडून विरोध केला आणि आमच्या प्रचार कार्याविषयी आमच्याविरुद्ध खोटे आरोप केले. पण मार्गदर्शनासाठी व संरक्षणासाठी आमचा यहोवावर भरवसा असल्यामुळं आम्ही पुष्कळ लोकांना सत्य स्वीकारण्यास मदत करू शकलो.

असहिष्णुतेचे सावट पसरू लागते

एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मी आशीर्वाद आणि अनपेक्षित संकटे दोन्ही अनुभवली. पहिल्यांदा, मला थुरिंगियातील रुडॉल्शटाट येथे पायनियर म्हणून नेमणूक मिळाली. तेथे माझी ओळख अनेक विश्‍वासू बंधूभगिनींबरोबर झाली, मी त्यांच्या सहवासाचा आनंद लुटला. आणखी एक महत्त्वाचा आशीर्वाद त्याच वर्षाच्या जुलै महिन्यात मिळाला. एरिका उलमन नावाच्या एका विश्‍वासू व सक्रिय ख्रिस्ती तरुणीशी माझं लग्न झालं; एरिकाला मी, केमनीट्‌स मंडळीत सभांना जाऊ लागलो होतो तेव्हापासून ओळखत होतो. आम्ही दोघांनी, माझं गाव असलेल्या हारटाऊमध्ये पायनियर सेवा सुरू केली. पण काही काळानंतर एरिकाला, तिच्या तब्येतीमुळे व इतर कारणांमुळे पूर्णवेळेची सेवा सोडावी लागली.

यहोवाच्या लोकांसाठी तो काळ कठीण होता. केमनीट्‌समधील मजूर विभागानं, मी प्रचार कार्य सोडून पूर्ण वेळेची नोकरी करावी म्हणून बळजबरी करण्याच्या प्रयत्नात माझं रेशन कार्ड रद्द केलं. जबाबदार बांधवांनी माझ्या या प्रकरणाद्वारे राज्याकडून कायदेशीर मान्यता मिळवण्याची विनंती केली. ही विनंती फेटाळण्यात आली आणि जून २३, १९५० रोजी मला, दंड किंवा ३० दिवसांचा तुरुंगवास ही शिक्षा ठोठावण्यात आली. आम्ही यावर सर्वोच्च न्यायालयात अपील केलं पण तेथेही आमचं अपील फेटाळलं आणि मला तुरुंगात टाकण्यात आलं.

ही घटना, विरोधाच्या व संकटाच्या वादळाची चाहूल होती. एक महिना पूर्ण व्हायच्या आतच, म्हणजे १९५० सालच्या सप्टेंबर महिन्यात प्रसारमाध्यमातून आमची बदनामी करण्याची मोहीम सुरू झाल्यावर कम्युनिस्ट शासनानं आमच्या कार्यांवर बंदी घातली. साक्षीदारांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्यामुळं व आमच्या तटस्थ भूमिकेमुळं, आम्हाला, धर्माच्या नावाखाली “शंकास्पद कार्ये” करणारी पाश्‍चिमात्य हेरगिरीची खतरनाक एजेन्सी असं नाव देण्यात आलं. मी तुरुंगात असताना, आमच्यावर बंदी जाहीर करण्यात आली आणि अगदी त्याच दिवशी एरिकानं आमच्या मुलाला, योहान्सला, आमच्या घरीच जन्म दिला. घरात असलेल्या सुईणीनं विरोध करून देखील, राज्य सुरक्षा अधिकारी आमच्या घरात घुसले आणि त्यांच्या आरोपांना पुरावा मिळण्यासाठी घराची झडती घेतली. अर्थात त्यांना काहीच सापडले नाही. पण, त्यांनी आमच्या मंडळीत एका खबऱ्‍याला पाठवले. त्यामुळे, १९५३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात माझ्यासोबत इतर सर्व जबाबदार बांधवांना अटक झाली.

अंधाऱ्‍या कोठडीत

आम्हाला दोषी ठरवून तीन ते सहा वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर, आपल्या इतर अनेक बांधवांबरोबर मला झ्वीकाऊमधील ओस्टश्‍टीन कॅसलच्या गलिच्छ अंधाऱ्‍या कोठडीत टाकण्यात आलं. तिथल्या घाणेरड्या परिस्थितीतही, प्रौढ बांधवांबरोबर सहवास राखणं आनंददायक होतं. आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं याचा अर्थ आम्हाला आध्यात्मिक अन्‍नही मिळत नव्हतं असं नाही. सरकारनं तुच्छ लेखलेलं व बंदी आणलेलं टेहळणी बुरूज मासिक चोरट्या मार्गानं तुरुंगात आणि तेही थेट आमच्या कोठडीत यायचं! ते कसं शक्य होतं?

काही बांधवांना कोळशाच्या खाणीत काम करायला दिलं होतं; तिथं ते बाहेरच्या साक्षीदारांना भेटू शकत होते जे त्यांना मासिकं देत. हे बांधव मग चोरून ही मासिकं तुरुंगात आणत आणि अगदी चतुराईनं बाकीच्या सर्वांना आवश्‍यक असलेलं आध्यात्मिक अन्‍न पुरवत असत. अशाप्रकारे यहोवाच्या काळजीचा आणि मार्गदर्शनाचा अनुभव मला घ्यायला मिळाला म्हणून मला खूप आनंद झाला व मी प्रोत्साहित झालो!

एकोणीसशे चौपन्‍न सालच्या शेवटी, आम्हाला टोरगाऊतील कुविख्यात तुरुंगात हलवण्यात आलं. आम्हाला पाहून तिथल्या साक्षीदारांना खूप आनंद वाटला. तोपर्यंत हे बांधव, जुन्या टेहळणी बुरूज मासिकांतून त्यांना जे आठवत होतं त्याच्या आधारावर आध्यात्मिकरीत्या मजबूत राहिले होते. आध्यात्मिक अन्‍नाचा ताजा साठा मिळण्याची त्यांना आस लागली होती! आता झ्वीकाऊमध्ये आम्ही शिकलेल्या गोष्टी त्यांना सांगण्याचं आमचं कर्तव्य होतं. पण दररोज चालण्याच्या सरावाच्या वेळी एकमेकांशी बोलण्यावर कडक मनाई असताना आम्ही हे कसं करणार होतो? कसं बोलायचं याबाबतीत बांधवांनी आम्हाला मूल्यवान सूचना दिल्या आणि यहोवाचा शक्‍तिशाली संरक्षक हात आम्हाला मार्गदर्शन करत होता. यावरून आम्ही, स्वातंत्र्य व संधी असताना मनःपूर्वक बायबल अभ्यास व मनन करण्याचं महत्त्व शिकलो.

महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा समय

यहोवाच्या मदतीनं आम्ही दृढ राहिलो. १९५६ सालच्या शेवटी आमच्यातील बहुतेकांना माफी मंजूर करण्यात आली तेव्हा आम्हाला खूप आश्‍चर्य वाटलं. तुरुंगाची फाटके आमच्यासाठी खुली करण्यात आली तेव्हा आम्हाला किती आनंद झाला होता याचं वर्णन करणं कठीण आहे! माझा मुलगा तेव्हा सहा वर्षांचा होता; घरी बायकोकडे परतल्याचा, दोघं मिळून आमच्या मुलाचं संगोपन करू शकू याचा मला खूप आनंद झाला. योहान्स काही दिवस माझ्याबरोबर परक्यासारखं वागायचा पण नंतर मात्र आमच्या दोघांत प्रेमाचं अतूट नातं निर्माण झालं.

पूर्व जर्मनीतील यहोवाचे साक्षीदार मात्र अतिशय कठीण दिवसांचा सामना करत होते. आपल्या ख्रिस्ती सेवेबद्दल आणि आपल्या तटस्थ भूमिकेबद्दल वाढत चाललेल्या द्वेषामुळं आमच्या जीवाला सतत धोका होता—चिंता, निराशा यांमुळे आम्ही बेजार झालो होतो. त्यामुळं आम्ही दोघा पतीपत्नीनं आमच्या परिस्थितीचा काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करून ठरवलं, की अधिक अनुकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणी जाऊन राहू जेणेकरून आम्हाला अधिक चिंता करावी लागणार नाही. आम्हाला यहोवाची सेवा करण्यासाठी आणि आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी स्वातंत्र्य हवं होतं.

१९५७ सालच्या वसंतऋतूत आमच्यासमोर, पश्‍चिम जर्मनीतील स्टुटगार्ट इथं राहायला जाण्याची संधी आली. तिथं सुवार्तिक कार्यावर बंदी नव्हती आणि आम्ही आपल्या बंधूभगिनींबरोबर मुक्‍तपणे सहवास करू शकत होतो. त्यांचा प्रेमळ आधार भारावून टाकणारा होता. हेडलफिंगनमधील मंडळीत आम्ही सात वर्षं होतो. या काळात आमचा मुलगा शाळेत जाऊ लागला होता व सत्यातही चांगली प्रगती करू लागला होता. १९६२ सालच्या सप्टेंबर महिन्यात मला विजबॅडन येथील राज्य सेवा प्रशालेत उपस्थित राहण्याची सुसंधी मिळाली. तिथं मला सहपरिवार, जर्मन बोलणाऱ्‍या बायबल शिक्षकांची गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचं उत्तेजन देण्यात आलं. यामध्ये जर्मनी व स्वीत्झर्लंडच्या काही क्षेत्रांचा समावेश होता.

स्वीस ॲल्प्समध्ये

त्यामुळे १९६३ साली आम्ही स्वित्झर्लंडला राहायला गेलो. आम्हाला, स्वीस ॲल्प्सच्या मध्यभागी असलेल्या निसर्गरम्य लुसर्न सरोवरावरील ब्रुनन शहरातील एका लहान मंडळीत सेवा करण्यास सांगण्यात आलं. आमच्यासाठी हे परादीससारखंच होतं. तिथं बोलल्या जाणाऱ्‍या जर्मन बोलीशी, तिथल्या जीवनशैलीशी आणि लोकांच्या मनोवृत्तीशी आम्हाला परिचित व्हावं लागलं. पण, या शांतीप्रिय लोकांबरोबर कार्य करायला व त्यांना प्रचार करायला आम्हाला आनंद वाटायचा. ब्रुननमध्ये आम्ही १४ वर्षं होतो. आमचा मुलगा तिथंच लहानाचा मोठा झाला.

१९७७ साली, जवळजवळ ५० वर्षांनंतर आम्हाला थुन येथील स्वीस बेथेलमध्ये सेवा करण्याचं आमंत्रण देण्यात आलं. आम्ही त्याला खास नेमणूक समजून कृतज्ञतेनं हे आमंत्रण स्वीकारलं. आम्ही दोघांनी बेथेलमध्ये नऊ वर्षं सेवा केली; आमच्या ख्रिस्ती जीवनातील व व्यक्‍तिगत आध्यात्मिक विकासातील ही महत्त्वाची वर्षं होती, असं आम्ही समजतो. थुन आणि जवळपासच्या क्षेत्रांतील स्थानीय प्रचारकांबरोबर प्रचार कार्यात भाग घ्यायला आम्हाला आनंद वाटायचा शिवाय, यहोवाच्या “अद्‌भुत कृतीचे” बर्नीज ॲल्प्सच्या दिमाखदार हिमशिखरांचे नेहमी दर्शन घडत असल्यामुळे आम्ही आनंदी होतो.—स्तोत्र ९:१.

आणखी एक बदल

१९८६ सालच्या सुरवातीला आमची दुसरी बदली आली. स्वीत्झर्लंडच्या पूर्वेकडील बुक्स मंडळीला नेमण्यात आलेल्या खूप मोठ्या क्षेत्रात खास पायनियर म्हणून सेवा करण्यास सांगण्यात आलं. पुन्हा आम्हाला एका वेगळ्या जीवनशैलीची सवय करून घ्यावी लागली. परंतु, कुठेही राहिलो तरी यहोवाची सेवा करण्याची आमची इच्छा असल्यामुळे ही नेमणूकही आम्ही यहोवाच्या आशीर्वादानं स्वीकारली. कधीकधी, मी पर्यायी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना मजबूत करण्याचं काम केलं. या भागात येऊन आम्हाला अठरा वर्षं पूर्ण झाली आहेत आणि आम्हाला प्रचार कार्यात अनेक आनंददायक अनुभव आले आहेत. बुक्स येथील मंडळी वाढली आहे व आम्ही एका सुंदरशा राज्य सभागृहात सभांसाठी जमतो; पाच वर्षांपूर्वी या सभागृहाचं समर्पण झालं.

यहोवानं आमची भरपूर मार्गांनी काळजी घेतली आहे. आम्ही आमच्या जीवनातील बहुतेक वर्षं पूर्ण वेळेच्या सेवेत घालवली आहेत, आम्हाला कशाचीच कमी भासली नाही. आमचा मुलगा, त्याची बायको, त्यांची तीन मुलं आणि या मुलांच्या मुलांची कुटुबं यहोवाच्या मार्गात विश्‍वासूपणे चालत आहेत हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो व समाधान वाटतं.

मी मागे वळून पाहतो तेव्हा माझी पूर्ण खात्री पटते, की आम्ही “सुवेळी अवेळी” यहोवाची सेवा केली आहे. ख्रिस्ती सेवेचा पिच्छा केल्यामुळे मी कम्युनिस्ट तुरुंगाच्या अंधाऱ्‍या कोठडीपासून स्वीस ॲल्प्सच्या भव्य पर्वतांपर्यंत पोहंचलो. मला आणि माझ्या कुटुंबाला ख्रिस्ती सेवा स्वीकारल्याचा क्षणभरही पस्तावा होत नाही.

[२८ पानांवरील चौकट]

“डबल विक्टीम्स” छळातही दृढ राहतात

जर्मन लोकशाही प्रजासत्ताक शासनात (जीडीआर) म्हणजे ज्याला पूर्व जर्मनी असेही म्हणतात तेथे, यहोवाच्या साक्षीदारांना क्रूर छळासाठी लक्ष्य बनवलं जायचं. अहवाल दाखवतो, की ५,००० पेक्षा अधिक साक्षीदारांना त्यांची ख्रिस्ती सेवा व तटस्थता यांमुळे जबरदस्तीने मजूर छावणीत व स्थानबद्धता केंद्रात पाठवण्यात आले.—यशया २:४.

यांपैकी काहींचे वर्णन “डबल विक्टीम्स” अर्थात एका अपराधासाठी दोन वेळा शिक्षा ठोठावण्यात आलेले, असे करण्यात आले आहे. सुमारे ३२५ साक्षीदारांना तरी, नात्सी छळछावण्यात व तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर मग, १९५० च्या दशकात जीडीआरच्या श्‍टॉझी किंवा राष्ट्र संरक्षण सेवेच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना तुरुंगात डांबलं. काही तुरुंगे तर, नात्सी आणि श्‍टॉझी हे दोन्ही अधिकारी वापरत असत; पहिल्यांदा नात्सींनी वापरले आणि नंतर श्‍टॉझींनी.

तीव्र छळाच्या पहिल्या दहा वर्षांत म्हणजे १९५० ते १९६१ पर्यंतच्या काळात, एकूण ६० साक्षीदार—स्त्रिया आणि पुरुष—गैरवागणूक, कुपोषण, आजारपण, वृद्धापकाळ यांमुळे मरण पावले. १२ साक्षीदारांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली पण नंतर ती १५ वर्षांपर्यंत करण्यात आली.

आज, बर्लिन येथील पूर्वीच्या श्‍टॉझी मुख्यालयात, पूर्व जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांच्या ४० वर्षांच्या अधिकृत छळाची माहिती व चित्रे कायमचीच लावण्यात आली आहेत. तेथील चित्रे आणि व्यक्‍तिगत अहवाल, छळात विश्‍वासू राहिलेल्या या साक्षीदारांच्या धैर्याची व आध्यात्मिक शक्‍तीची मूक ग्वाही देतात.

[२४, २५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

पूर्व जर्मनी

रुडॉल्शटाट

बेल्टसीक

टोरगाऊ

केमनीट्‌स

झ्वीकाऊ

[२५ पानांवरील चित्र]

झ्वीकाऊमधील ओस्टश्‍टीन कॅसल

[चित्राचे श्रेय]

Fotosammlung des Stadtarchiv Zwickau, Deutschland

[२६ पानांवरील चित्र]

माझी पत्नी एरिका हिच्याबरोबर