व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणता धर्म निवडावा?

कोणता धर्म निवडावा?

कोणता धर्म निवडावा?

‘वेगवेगळे धर्म हे केवळ एकाच ठिकाणी जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत. शेवटी, देव एकच नाही का?’ पुष्कळांचे असे मत आहे. त्यांना वाटते की, धार्मिक गटाचे सदस्य असणे एवढेच महत्त्वाचे आहे; धार्मिक गट कुठलाही असला तरी चालतो.

वरवर पाहिल्यास, हे अगदी बरोबर आहे असे आपल्याला वाटेल कारण सर्वशक्‍तिमान असा एकच देव आहे यात शंका नाही. (यशया ४४:६; योहान १७:३; १ करिंथकर ८:५, ६) परंतु, खऱ्‍या देवाची सेवा करण्याचा दावा करत असलेल्या अनेक धार्मिक गटांमधील स्पष्ट मतभेद—इतकेच नव्हे तर विसंगतता दिसल्याशिवाय राहत नाही. या वेगवेगळ्या धार्मिक गटांच्या चालीरीती, विश्‍वास, शिकवणुकी, अपेक्षा यांच्यात कितीतरी फरक असतो. हा फरक इतका जास्त आहे की, एका धर्मातील किंवा धार्मिक गटातील लोकांना इतरांच्या शिकवणुकी किंवा विश्‍वास समजत नाहीत किंवा मानायला कठीण वाटतात.

परंतु येशूने म्हटले होते: “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) खरेपणाने देवाची उपासना करायचे झाले तर, देव कोण आहे, त्याचे उद्देश काय आहेत, त्याची उपासना करण्याविषयी त्याचे मत यांबद्दल परस्परविरोधी मते असू शकतात का? आपण कशीही उपासना केली तरी सर्वशक्‍तिमान देवाला काही फरक पडत नाही असा विचार तर्काला पटण्यासारखा आहे का?

तेव्हाचे आणि आताचे खरे ख्रिस्ती

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांमध्ये काही वेळा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल भिन्‍न मते होती. आता करिंथ मधल्या लोकांचेच उदाहरण घ्या; त्यांच्याविषयी बोलताना प्रेषित पौल म्हणाला: “माझ्या बंधूनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसाकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे, असे म्हणतो.”—१ करिंथकर १:११, १२.

हे मतभेद क्षुल्लक होते असे पौलाने समजले का? प्रत्येक व्यक्‍ती स्वतःचा मार्ग अवलंबून तारणाकडे जात होती का? मुळीच नाही. पौलाने अशाप्रकारे ताडन केले: “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.”—१ करिंथकर १:१०.

अर्थात, विश्‍वासात एकमत हे जबरदस्तीने घडवून आणता येत नाही. जेव्हा सगळ्या व्यक्‍ती तपास करून एकाच निष्कर्षावर येतात आणि ते मत स्वीकारतात तेव्हाच हे साध्य होते. त्यामुळे, पौल ज्या एकचित्ताविषयी बोलत होता ते अनुभवण्यासाठी देवाच्या वचनाचा स्वतःहून अभ्यास करणे व शिकलेल्या गोष्टी आत्मसात करण्याची मनापासून इच्छा असणे महत्त्वाचे आहे. पण असे हे एकमत पाहायला मिळते का? आपण आधी पाहिल्याप्रमाणे, देवाने पहिल्यापासून संघटित समूहाच्या रूपात आपल्या लोकांशी व्यवहार केला आहे. मग, या संघटित समूहाची आज ओळख पटणे शक्य आहे का?

योग्य लोकांशी संगती करण्याचे फायदे

स्तोत्रकर्त्या दावीदाने एकदा असे विचारले: “हे परमेश्‍वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरांवर कोण राहील?” हा एक विचार-प्रवर्तक प्रश्‍न आहे. याचे उत्तर दावीदानेच देऊन म्हटले: “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो.” (स्तोत्र १५:१, २) बायबलची अचूक समज प्राप्त केल्याने देवाच्या या अपेक्षा पूर्ण करणारा धर्म ओळखता येऊ शकेल. मग, त्या गटासोबत संबंध ठेवल्याने देवाची एकचित्ताने आणि “आत्म्याने व खरेपणाने” उपासना करणाऱ्‍या लोकांसोबत उभारणीकारक सहवास ठेवायला मिळेल.

यहोवाच्या साक्षीदारांनी हे दर्शवले आहे की, आजच्या विभक्‍त जगातही एकच विश्‍वास असणे आणि सारखी कार्ये असणे शक्य आहे. त्यांच्यामध्ये, अनेक विविध धर्मांचे व जातीय गटांचे एकेकाळी सदस्य असलेले लोक आहेत. इतर साक्षीदार पूर्वी अज्ञेयवादी किंवा नास्तिक होते. आणखी काही असे आहेत ज्यांनी धर्माबद्दल आधी फारसा विचार केला नव्हता. विविध धर्मांवर व तत्त्वज्ञानांवर विश्‍वास बाळगणाऱ्‍या व विविध संस्कृतींतून येणाऱ्‍या काही व्यक्‍ती आता धार्मिक एकतेत बांधल्या आहेत जी आज जगामध्ये इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही.

ही एकता देवाच्या वचनामुळे अर्थात बायबलमुळे शक्य झाली आहे. अर्थात, यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव आहे की, ते इतरांना काय करावे आणि काय करू नये हे सांगू शकत नाहीत. परंतु, इतरांना बायबलमधून शिकण्याचे उत्तेजन देण्याची सुसंधी मिळाल्याची ते कदर बाळगतात म्हणजे लोकांना उपासनेच्या बाबतीत निर्णय घेताना भक्कम आधार असेल. अशातऱ्‍हेने, “आत्म्याने व खरेपणाने” देवाची उपासना करून आणखी पुष्कळ लोकांना फायदा मिळेल.

आज, हानीकारक प्रभाव आणि मोहपाशांना बळी पडण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे उचित लोकांशी संगती करणे फार महत्त्वाचे आहे. बायबल म्हणते की, “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील” व “कुसंगतीने नीति बिघडते.” (नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३) देवाच्या खऱ्‍या उपासकांसोबत संगती करणे हे एक संरक्षण आहे. त्यामुळे, बायबल आपल्याला अशी आठवण करून देते: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) खरे मित्र अर्थात आध्यात्मिक बंधू-बहिणी देवाप्रती असलेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यास एकमेकांना प्रेमाने मदत करतात हा एक आशीर्वाद नव्हे का?

ओटमॉरच्या बाबतीत असेच घडले. जर्मनीत एका कॅथलिक कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला; पण त्याने चर्चला जाण्याचे सोडून दिले होते. तो म्हणतो: “चर्चला जाऊन आल्यावरही माझ्या मनातली पोकळी जशीच्या तशी राहायची.” पण, देवावरून त्याचा विश्‍वास मात्र उडाला नव्हता. मग, यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात तो आला आणि त्याला खात्री पटली की हेच देवाचे खरे सेवक आहेत. त्यांच्यासोबत संगती करणे जरूरीचे आहे असे त्याला वाटू लागले. तो आता म्हणतो: “मी एका जागतिक संघटनेचा सक्रिय सदस्य आहे आणि मला पुष्कळ मनःशांती लाभली आहे. बायबलचे आणखी अचूक ज्ञान प्राप्त करायला मला सातत्याने मदत मिळत राहते. मला व्यक्‍तिशः हे फार मोलाचे वाटते.”

शोध करणाऱ्‍यांसाठी आमंत्रण

एकाच विचाराच्या व्यक्‍तींचा समूह स्वतंत्रपणे काम करणाऱ्‍या व्यक्‍तींपेक्षा अधिक चांगल्यारितीने एखादे काम पूर्ण करू शकतो. उदाहरणार्थ, येशूने जाण्याआधी आपल्या अनुयायांना अशी सूचना दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) कोणत्याही मार्गदर्शनाविना किंवा संघटित असल्याविना हे काम समाधानकारकपणे पूर्ण होणे कसे शक्य आहे? एखाद्याने स्वतंत्र होऊन देवाची सेवा करण्याचा प्रयत्न केला तर तो शास्त्रवचनातील या हुकूमाचे पालन कसे करू शकेल?

गेल्या वर्षादरम्यान, जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांनी ९,१९,३३,२८० बायबल आधारित पुस्तकांचे, पुस्तिकांचे आणि माहितीपत्रकांचे त्याचप्रमाणे ६९,७६,०३,२४७ मासिकांचे वितरण करून २३५ देशांमध्ये हजारो लोकांपर्यंत देवाच्या वचनातील संदेश पोहंचवला. कोणाच्याही साहाय्याविना केलेल्या व्यक्‍तिगत प्रयत्नांपेक्षा एकजूट, सुसंघटित गटाद्वारे अधिक साध्य होते याचा हा किती उल्लेखनीय पुरावा आहे!

बायबल साहित्याचे वितरण करण्याव्यतिरिक्‍त, यहोवाचे साक्षीदार, देवाच्या अपेक्षांबद्दल तपशीलवार माहिती मिळावी म्हणून मोफत बायबल अभ्यास संचालित करून लोकांना मदत करतात. गेल्या वर्षी, प्रत्येक आठवडी एक किंवा अनेक व्यक्‍तींसोबत सरासरी असे ५७,२६,५०९ बायबल अभ्यास संचालित करण्यात आले. बायबलच्या या शिक्षणामुळे उपासनेच्या बाबतीत निर्णय घेण्यास लाखो लोकांना भक्कम आधार पुरवला आहे. तुम्ही देखील बायबलमधील देवाच्या अपेक्षांविषयी शिकून घेऊ शकता. आणि मग निर्णय घेऊ शकता.—इफिसकर ४:१३; फिलिप्पैकर १:९; १ तीमथ्य ६:२०; २ पेत्र ३:१८.

तुम्हाला देवाला प्रसन्‍न करायचे असेल तर धार्मिक गटाचे सदस्य असणे महत्त्वाचे आहे—पण कोणत्याही धार्मिक गटाचे किंवा पंथाचे सदस्य होऊन चालणार नाही. तुम्हाला धर्माविषयी योग्य निर्णय घ्यायचा असेल तर तो बायबलच्या अचूक ज्ञानावर आधारित असला पाहिजे, बिनबुडाच्या धारणांवर किंवा केवळ ऐकलेल्या गोष्टींवर नव्हे. (नीतिसूत्रे १६:२५) खऱ्‍या धर्माच्या अपेक्षा जाणून घ्या. त्यानंतर त्यांची तुलना तुमच्या विश्‍वासांशी करा. आणि मगच काय तो निर्णय घ्या.—अनुवाद ३०:१९.

[७ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार विभक्‍त जगात एकत्र बांधलेले आहेत