व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या परिस्थितींचे तुमच्या जीवनावर वर्चस्व आहे का?

तुमच्या परिस्थितींचे तुमच्या जीवनावर वर्चस्व आहे का?

तुमच्या परिस्थितींचे तुमच्या जीवनावर वर्चस्व आहे का?

आजच्या ‘कठीण दिवसांत’ परिस्थितीमुळे आणि समस्यांमुळे जेरीस येणे सामान्य बनले आहे. (२ तीमथ्य ३:१) काही समस्या तात्पुरत्या काळासाठी असतील आणि त्या कालांतराने नाहीशा होतील. काही समस्यांचा कित्येक महिन्यांपर्यंत किंवा वर्षांपर्यंत सामना करावा लागतो. परिणामस्वरूप, अनेकांना स्तोत्रकर्त्या दावीदाप्रमाणे वाटते ज्याने यहोवाला अशी विनवणी केली: “माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटांतून मला सोडीव.”—स्तोत्र २५:१७.

समस्यांच्या भाराखाली तुम्ही दबले गेला आहात का? असे असल्यास, बायबलमधून तुम्हाला मदत आणि उत्तेजन मिळू शकेल. आपण यहोवाच्या दोन विश्‍वासू सेवकांची उदाहरणे पाहू या ज्यांनी यशस्वीरित्या समस्यांचा सामना केला. त्यांची नावे आहेत योसेफ आणि दावीद. त्यांनी संकटाला कसे तोंड दिले याचे परीक्षण केल्याने आपल्यालाही आज अशाच संकटांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक धडे शिकायला मिळू शकतात.

मोठ्या समस्या

योसेफ केवळ १७ वर्षांचा असताना त्याच्या स्वतःच्या कुटुंबातच समस्या निर्माण झाल्या. त्याच्या थोरल्या भावांनी पाहिले की, “आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा [योसेफावर] अधिक प्रीति करितो.” तेव्हा “ते त्याचा द्वेष करू लागले, व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले.” (उत्पत्ति ३७:४) या परिस्थितीमुळे योसेफाला किती मनःस्ताप व तणाव झाला असेल हे आपण समजू शकतो. शेवटी, योसेफाचे भाऊ त्याचा इतका द्वेष करू लागले की, त्यांनी त्याला दास म्हणून विकून टाकले.—उत्पत्ति ३७:२६-३३.

ईजिप्तमध्ये गुलामगिरीत असताना योसेफाला आपल्या धन्याच्या पत्नीच्या अनैतिक वर्तनाचा प्रतिकार करावा लागला. नकार दिल्यामुळे तिला राग आला आणि तिने योसेफावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा आरोप केला. मग त्याला “बंदिशाळेत” टाकण्यात आले जेथे “त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले.” (उत्पत्ति ३९:७-२०; स्तोत्र १०५:१७, १८) हे किती मोठे संकट असावे! इतरांनी आणि त्याच्या स्वतःच्याच कुटुंबाने केलेल्या अन्यायामुळे १३ वर्षांपर्यंत योसेफ दास्यत्वात आणि बंदिशाळेत होता.—उत्पत्ति ३७:२; ४१:४६.

प्राचीन इस्राएलातील दावीदालाही तरुण असताना समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याला कित्येक वर्षे नाईलाजास्तव निराश्रित राहावे लागले कारण राजा शौल त्याच्या मागावर होता. त्याच्या डोक्यावर सतत टांगती तलवार होती. एकदा, दावीद अहीमलेख याजकाकडे भाकरी मागायला गेला. (१ शमुवेल २१:१-७) अहीमलेखने दावीदाला मदत केली हे शौलाला कळले तेव्हा त्याने केवळ अहीमलेखलाच नव्हे तर सर्व याजकांना आणि त्यांच्या कुटुंबांना ठार केले. (१ शमुवेल २२:१२-१९) आपण या दुर्घटनेला जबाबदार आहोत या भावनेने दावीदाला किती वेदना झाली असेल याची तुम्हाला कल्पना करवते का?

योसेफ आणि दावीदाला कित्येक वर्षे संकट व त्रास सहन करावा लागला ते पाहा. त्यांनी आपल्या कठीण परिस्थितीचा सामना कसा केला त्यावरून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. हे पुरुष कसे अनुकरणीय आहेत त्याचे तीन मार्ग आपण पाहू या.

राग आणि कटुता मनातून काढून टाका

पहिली गोष्ट म्हणजे या विश्‍वासू पुरुषांनी कटुता आणि राग मनात बाळगला नाही. योसेफ तुरुंगात होता तेव्हा आपल्या भावांनी आपला विश्‍वासघात कसा केला याचा विचार करून त्यांच्याशी पुन्हा भेट झाल्यावर त्यांचा सूड उगवण्याची योजना तो सहजपणे करू शकला असता. परंतु असा हानीकारक विचार त्याने केला नाही हे आपल्याला कसे ठाऊक होते? त्याचे भाऊ ईजिप्तला धान्य विकत घेण्यासाठी आले तेव्हा त्याला सूड उगवण्याची संधी असतानाही त्याने कशी प्रतिक्रिया दर्शवली ते पाहा. अहवाल सांगतो: “[योसेफ] त्यांच्यापासून एका बाजूस जाऊन रडला . . . मग योसेफाने [आपल्या सेवकांना] आज्ञा दिली की, [भावांच्या] गोण्यात धान्य भरा; प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणीत टाका, वाटेसाठी शिधासामग्री द्या.” नंतर, आपल्या वडिलांना ईजिप्तला आणण्यासाठी योसेफाने आपल्या भावांना पाठवले तेव्हा त्याने त्यांना असे उत्तेजन दिले: “सांभाळा, वाटेने भांडू नका.” आपल्या शब्दांनी आणि कृतीने, योसेफाने दाखवले की, त्याने मनात कटुता आणि राग बाळगला नव्हता.—उत्पत्ति ४२:२४, २५; ४५:२४.

त्याचप्रमाणे, दावीदानेही शौल राजाबद्दल मनात राग बाळगला नाही. शौलाला ठार मारण्यासाठी दावीदाला दोनदा संधी मिळाली होती. त्याला ठार मारण्यासाठी दावीदाच्या लोकांनी त्याला चेतवले तेव्हा तो म्हणाला: “मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्‍वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्‍वराचा अभिषिक्‍त आहे.” दावीदाने ही गोष्ट यहोवावर सोपवून आपल्या लोकांना म्हटले: “परमेश्‍वराच्या जीविताची शपथ, परमेश्‍वरच त्यास मारील अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल अथवा युद्धात त्याचा अंत होईल.” नंतर, दावीदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या मृत्यूसंबंधाने एक विलापगीत देखील रचले. योसेफाप्रमाणेच दावीदानेही मनात राग बाळगला नाही.—१ शमुवेल २४:३-६; २६:७-१३; २ शमुवेल १:१७-२७.

एखाद्या अन्यायामुळे आपल्याला दुःख पोहोचते तेव्हा आपण मनात राग आणि कटुता बाळगतो का? हे सहजपणे घडू शकते. आपण आपल्या भावनांवर ताबा ठेवला नाही तर याचा परिणाम घडलेल्या अन्यायापेक्षा अधिक हानीकारक ठरेल. (इफिसकर ४:२६, २७) इतरांवर आपला काहीच ताबा नसला तरी आपल्या भावनांवर आपण ताबा ठेवू शकतो. यहोवा आपल्या नियुक्‍त समयी सर्वकाही ठीक करेल असा विश्‍वास ठेवल्याने मनातून राग आणि कटुता काढून टाकणे सोपे जाते.—रोमकर १२:१७-१९.

आपल्या परिस्थितीचा होता होईल तितका फायदा करून घ्या

दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या परिस्थितीमुळे आपण एकदम गोंधळून जाऊ नये. आपल्याला शक्य नसलेल्या गोष्टींचा आपण इतका विचार करत बसतो की, शक्य असलेल्या गोष्टींबद्दल आपण विसरून जातो. अशारितीने आपली परिस्थिती आपल्यावर ताबा ठेवू लागते. हेच योसेफाच्या बाबतीतही घडले. परंतु, आपल्या परिस्थितीचा फायदा होईल असे कार्य करण्यास त्याने निवडले. दास असताना योसेफावर “[त्याच्या धन्याची] कृपादृष्टि झाली; योसेफ त्याची सेवा करू लागला, आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले.” तुरुंगात असतानाही योसेफाने असेच कार्य केले. यहोवाचा आशीर्वाद आणि योसेफाचा मेहनतीपणा यामुळे “बंदिशाळेच्या अधिकाऱ्‍याने त्या बंदिखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले; आणि तेथे जे काही ते करीत, ते करून घेणारा तो असे.”—उत्पत्ति ३९:४, २१-२३.

दावीद कित्येक वर्षे फरारी म्हणून राहिला; पण त्यानेही आपल्या परिस्थितीचा होता होईल तितका फायदा करून घेतला. पारान नावाच्या अरण्यात राहताना दावीदाने व त्याच्या लोकांनी लूटमार करणाऱ्‍या टोळ्यांपासून नाबालाच्या कळपांचे संरक्षण केले होते. “ते रात्रंदिवस आम्हास तटबंदीसारखे होते,” असे नाबालच्या एका मेंढपाळाने म्हटले. (१ शमुवेल २५:१६) नंतर सिकलाग येथे राहत असताना दावीदाने इस्राएलच्या शत्रूंच्या ताब्यात असलेल्या दक्षिणेकडील प्रांतांवर स्वारी करून यहूदाच्या सीमांचे रक्षण केले.—१ शमुवेल २७:८; १ इतिहास १२:२०-२२.

आपल्या परिस्थितींचा होता होईल तितका फायदा करून घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागतो का? हे कठीण असले तरी जमण्यासारखे आहे. आपल्या जीवनाविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. . . . हरएक प्रसंगी अन्‍नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्‍न असणे व विपन्‍न असणे ह्‍यांचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे.” पौलाचा जीवनाविषयी हा दृष्टिकोन कसा झाला? यहोवावर सातत्याने विसंबून राहिल्यामुळे. त्याने कबूल केले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:११-१३.

यहोवावर भरवसा ठेवा

तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या परिस्थिती बदलण्यासाठी गैरशास्त्रीय मार्ग अवलंबण्याऐवजी आपण यहोवावर भरवसा ठेवावा. शिष्य याकोबाने लिहिले: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्‍यासाठी की, तुम्ही कशातहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:४) एखादे संकट उद्‌भवते तेव्हा गैरशास्त्रीय मार्गाने त्याचा अंत करण्याऐवजी त्या संकटात निभावण्याद्वारे धीराला “आपले कार्य पूर्ण करू” दिले पाहिजे. तेव्हा आपला विश्‍वास पारखला व शुद्ध केला जाईल आणि त्याची टिकून राहण्याची ताकद दिसून येईल. अशाप्रकारचा धीर योसेफ आणि दावीद या दोघांकडे होता. त्यांनी देवाला नाखूष करू शकणारा उपाय शोधून काढला नाही. उलट, त्यांनी आपल्या परिस्थितीचा होता होईल तितका फायदा करून घेतला. त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला आणि याचे किती आशीर्वाद त्यांना मिळाले! यहोवाने त्या दोघांनाही आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी व त्यांचे नेतृत्व करण्यासाठी वापरले.—उत्पत्ति ४१:३९-४१; ४५:५; २ शमुवेल ५:४, ५.

आपल्यासमोर देखील अशा परिस्थिती येतील जेव्हा गैरशास्त्रीय उपाय काढण्याचा मोह आपल्याला होईल. उदाहरणार्थ, तुम्हाला अद्याप एखादा उचित विवाहसोबती मिळालेला नाही म्हणून तुम्ही खचला आहात का? तसे असल्यास, ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा’ या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा कोणताही मोह टाळायचा प्रयत्न करा. (१ करिंथकर ७:३९) तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत का? मग, जगाप्रमाणे विभक्‍त होण्याचा व घटस्फोट घेण्याचा विचार करण्याऐवजी दोघेही मिळून या समस्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करा. (मलाखी २:१६; इफिसकर ५:२१-३३) आर्थिक परिस्थितीमुळे तुम्हाला आपल्या कुटुंबाची काळजी घेणे जड जात आहे का? यहोवावर भरवसा ठेवणे म्हणजे पैसा मिळवण्याचे सर्व संशयास्पद व बेकायदेशीर मार्ग टाळणे. (स्तोत्र ३७:२५; इब्री लोकांस १३:१८) होय, आपण सर्वांनी आपल्या परिस्थितींचा होता होईल तितका फायदा करून घेतला पाहिजे आणि यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे करत असताना, आपण सर्वात उत्तम उपायासाठी यहोवावर भरवसा ठेवण्याचा दृढनिश्‍चय करू या.—मीखा ७:७.

यहोवा तुम्हाला निभावून नेईल

योसेफ आणि दावीदासारख्या बायबलमधील व्यक्‍तिरेखांनी निराशा आणि कठीण परिस्थितींना कसे यशस्वीपणे तोंड दिले त्यावर मनन केल्याने आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकेल. बायबलमधील मोजक्याच पानांवर त्यांची कहाणी नमूद केलेली असली तरी त्यांना अनेक वर्षांपर्यंत परीक्षेला तोंड द्यावे लागले. स्वतःला विचारा: ‘देवाच्या या सेवकांनी आपल्या परिस्थितीचा स्वीकार कसा केला? त्यांनी आपला आनंद टिकवून कसा ठेवला? त्यांना कोणते गुण विकसित करावे लागले?’

यहोवाच्या आधुनिक काळातील सेवकांच्या सहनशीलतेचा विचार करणे देखील बरे राहील. (१ पेत्र ५:९) टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये दरवर्षी अनेक जीवनकथा छापल्या जातात. या विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या उदाहरणांविषयी वाचून तुम्ही त्यावर मनन करता का? शिवाय, आपल्या मंडळ्यांमध्ये असे काही बंधूभगिनी आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीला विश्‍वासूपणे तोंड दिले आहे. अशांसोबत मंडळीतल्या सभांमध्ये तुम्ही नियमितपणे संगती करता का आणि त्यांच्याकडून शिकता का?—इब्री लोकांस १०:२४, २५.

तुम्हालाही कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागते तेव्हा यहोवा तुमची काळजी वाहतो आणि तो तुम्हाला निभावून नेईल ही शाश्‍वती बाळगा. (१ पेत्र ५:६-१०) परिस्थितीचा तुमच्यावर ताबा असू देऊ नका. मनातून राग काढून, आपल्या परिस्थितीचा होता होईल तितका फायदा करून आणि उत्तम उपायाकरता यहोवावर भरवसा ठेवून योसेफ, दावीद आणि इतरांच्या उदाहरणाचे अनुकरण करा. प्रार्थना आणि आध्यात्मिक कार्यहालचालींद्वारे यहोवाच्या समीप या. अशा तऱ्‍हेने, तुम्हालाही पाहायला मिळेल की, अडीअडचणींतसुद्धा हर्ष व आनंद आपल्याला मिळू शकतो.—स्तोत्र ३४:८.

[२०, २१ पानांवरील चित्र]

योसेफाने आपल्या परिस्थितींचा होता होईल तितका फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला

[२३ पानांवरील चित्र]

दावीदाने आपल्या समस्यांवर उपाय निघण्याकरता यहोवावर भरवसा ठेवला