व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्मितीकृत्ये देवाचा महिमा वर्णितात!

निर्मितीकृत्ये देवाचा महिमा वर्णितात!

निर्मितीकृत्ये देवाचा महिमा वर्णितात!

“आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.”स्तोत्र १९:१.

१, २. (अ) मानव देवाचे तेज प्रत्यक्ष का पाहू शकत नाहीत? (ब) चोवीस वडील देवाला कशाप्रकारे गौरव देतात?

यहोवाने मोशेला बजावून सांगितले, की “तुला माझे मुख पाहवणार नाही; कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्गम ३३:२०) मानवांचे शरीर दुर्बल आहे, त्यामुळे ते देवाचे तेज प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत. प्रेषित योहानाला मात्र, एका दृष्टान्तात गौरवी सिंहासनावर विराजमान असलेल्या यहोवाचे दैदिप्यमान दर्शन देण्यात आले.—प्रकटीकरण ४:१-३.

दुसरीकडे पाहता, एकनिष्ठ आत्मिक प्राणी मात्र यहोवाचे मुख पाहू शकतात. या आत्मिक प्राण्यांत योहानाला स्वर्गीय दृष्टान्तात दिसलेले “चोवीस वडील” आहेत, जे १,४४,००० जनांचे प्रतिनिधीत्व करतात. (प्रकटीकरण ४:४; १४:१-३) देवाचे तेज पाहिल्यावर ते काय करण्यास प्रवृत्त होतात? प्रकटीकरण ४:११ या वचनानुसार ते असे घोषित करतात: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”

“सबब” का नाही?

३, ४. (अ) देवावरील विश्‍वास अशास्त्रीय का नाही? (ब) काहीजण देवावर विश्‍वास ठेवत नाहीत यामागचे मूळ कारण काय असते?

तुम्ही देखील देवाला गौरव देण्यास प्रवृत्त होता का? आज जगातल्या बहुतेक जणांना, देवाचे गौरव करण्याची प्रेरणा होत नाही आणि काहीजण तर चक्क देवाचे अस्तित्वच नाकारतात. उदाहरणार्थ एका खगोलवेत्त्याने असे लिहिले: “देवाने पुढे होऊन आपल्या हिताकरता या विश्‍वाची मोठ्या काळजीपूर्वक रचना केली असे म्हणावे का? . . . अतिशय रोमांचक कल्पना आहे. पण दुर्दैवाने मला मात्र ही कल्पना अतिशय भ्रामक वाटते. . . . याला समाधानकारक स्पष्टीकरण म्हणता येणार नाही.”

वैज्ञानिक संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. मानवाला जे काही पाहणे व अभ्यासणे शक्य आहे तेथपर्यंतच विज्ञानाचा अवाका आहे. यापलीकडे जे काही आहे ते सर्व सैद्धान्तिक किंवा अनुमानावर आधारित आहे. ज्याअर्थी “देव आत्मा आहे,” त्याअर्थी मानवाला त्याचे प्रत्यक्ष वैज्ञानिक परीक्षण करता येणे शक्यच नाही. (योहान ४:२४) पण म्हणून देवावरील विश्‍वास अशास्त्रीय आहे असे म्हणणे अहंकारीपणाचे लक्षण ठरेल. केंब्रिज विद्यापीठाचे वैज्ञानिक व्हिन्संट विगल्सवर्थ यांनी तर वैज्ञानिक तंत्रज्ञान हे मुळात “धार्मिक मूलतत्त्वावर आधारित” आहे असे म्हटले. ते कसे? “सर्व नैसर्गिक घडामोडी ‘निसर्गाच्या नियमांना’ अनुसरून होत असतात या तत्त्वावर वैज्ञानिकांना असलेल्या पूर्ण विश्‍वासावरच वैज्ञानिक तंत्रज्ञान आधारित आहे.” तेव्हा देवावर विश्‍वास नाही असे म्हणणारा देखील कशा न कशावर तरी विश्‍वास ठेवतोच, नाही का? काहीजण देवावर विश्‍वास ठेवत नाहीत, याचे एक संभाव्य कारण म्हणजे, ते मुद्दामहून सत्याकडे डोळेझाक करत असतात. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “दुष्ट इतके गर्विष्ठ व उन्मत्त आहेत की ते देवाला मानीतच नाहीत; देवाला शोधावे असा विचारही त्यांच्या मनात येत नाही.” (तिरपे वळण आमचे.)—स्तोत्र १०:४, सुबोध भाषांतर.

५. देवावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांजवळ कोणतीही सबब का नाही?

पण देवावर विश्‍वास ठेवणे म्हणजे अंधविश्‍वास नव्हे कारण देवाच्या अस्तित्वाला पुष्टी देणारे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. (इब्री लोकांस ११:१) खगोलवेत्ते ॲलन सन्डेज यांनी म्हटले: “[विश्‍वातली] ही सुसूत्रता ब्रह्‍मघोटाळ्यातून उत्पन्‍न झाली हे मला तरी खरे वाटत नाही. व्यवस्थित रचना घडवून आणणारे कोणते न कोणते तत्त्व असायलाच पाहिजे. देव हा विषय अद्याप माझ्याकरता एक गूढ आहे, पण अस्तित्वाच्या अद्‌भुत चमत्काराचे, म्हणजेच, जे नव्हते ते कसे आले यामागचे ते एकच स्पष्टीकरण असू शकते.” प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना सांगितले, “सृष्टीच्या निर्मितीपासून [देवाच्या] अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, [विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांना] कसलीहि सबब राहू नये.” (रोमकर १:२०) “सृष्टीच्या निर्मितीपासून,” विशेषतः देवाच्या अस्तित्वाचे आकलन होण्याची कुवत असलेल्या बुद्धिवंत मानव प्राण्यांची सृष्टी झाल्यापासून एक गोष्ट अगदी उघड आहे; ती म्हणजे, अमर्याद शक्‍ती बाळगणारा एक निर्माणकर्ता व भक्‍तीला योग्य असणारा एक देव नक्कीच अस्तित्वात आहे. जे देवाचे गौरव कबूल करण्यास नकार देतात त्यांच्याजवळ कसलीही सबब नाही. पण निर्मितीकृत्यांवरून कोणते पुरावे आपल्याला मिळतात?

विश्‍व देवाचे गौरव वर्णिते

६, ७. (अ) आकाश देवाचा महिमा कसे वर्णिते? (ब) आकाशाने ‘मापनसूत्र’ कशासाठी ताणले आहे?

स्तोत्र १९:१ या वचनात आपल्याला त्या प्रश्‍नाचे उत्तर सापडते: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.” ‘अंतरिक्षात’ किंवा वातावरणात चमकणारे ग्रहतारे एका गौरवशाली देवाच्या अस्तित्वाचा निर्विवाद पुरावा देतात ही गोष्ट दाविदाने ओळखली होती. तो पुढे म्हणतो: “दिवस दिवसाशी संवाद करितो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते.” (स्तोत्र १९:२) दिवस व रात्रींचे अखंड चक्र देवाची बुद्धी व त्याचे निर्मिती सामर्थ्य प्रकट करते. जणू आकाशातून देवाची स्तुती खरोखरच कोणीतरी मुखाने ‘वर्णित’ असते.

पण ही स्तुतीची ग्वाही ऐकू येण्याकरता आकलनशक्‍तीची गरज आहे. “वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही.” तरीसुद्धा आकाशाची ही मूक ग्वाही अतिशय प्रभावशाली आहे. “त्यांचे मापनसूत्र सर्व पृथ्वीवर ताणले गेले आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या सीमांपर्यंत गेले आहेत.” (स्तोत्र १९:३; ४, पं.र.भा.) जणू आकाशाने क्षेत्र ‘मापून’ घेतले आहे जेणेकरून त्यांची मूक ग्वाही पृथ्वीच्या दिगंतरी पोचावी.

८, ९. सूर्याविषयी काही उल्लेखनीय वस्तुस्थिती कोणत्या आहेत?

यानंतर दावीद यहोवाच्या निर्मितीकृत्यांतील आणखी एका अद्‌भुताचे वर्णन करतो: “सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीरपुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही.”—स्तोत्र १९:४-६.

इतर ताऱ्‍यांच्या तुलनेत सूर्य हा केवळ एक मध्यम आकाराचा तारा आहे. पण तरीसुद्धा तो एक विलक्षण तारा आहे; त्याच्याभोवती फिरणारे ग्रह त्याच्या तुलनेत अगदी किरकोळ भासतात. एका संदर्भग्रंथात म्हटल्याप्रमाणे, सूर्याचे वस्तूमान “शंभर कोटींच्या शंभर कोटींचे दोनशे कोटी टन इतके आहे”—आपल्या सबंध ग्रहमालेपैकी ९९.९ टक्के! सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी त्याच्यापासून १५ कोटी किलोमीटरच्या अंतरावर, अधिक दूरवर न जाता आणि सूर्याच्या जास्त जवळही ओढली न जाता भ्रमण करू शकते. सूर्याच्या ऊर्जेतील दोनशे कोटींतून केवळ एक भाग आपल्या ग्रहापर्यंत पोचतो, पण हे सूक्ष्म प्रमाण पृथ्वी ग्रहावरील सजीवांकरता पुरेसे आहे.

१०. (अ) सूर्य आपल्या ‘मंडपात’ जातो व बाहेर येतो ते कोणत्या अर्थाने? (ब) तो ‘वीरपुरुषाप्रमाणे’ कसा धावतो?

१० स्तोत्रकर्त्याने आलंकारिक भाषेत सूर्याचे वर्णन केले आहे; तो सूर्याची तुलना एका ‘वीरपुरुषाशी’ करतो जो दिवसा जणू क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत धावतो आणि रात्री आपल्या ‘मंडपात’ जातो. क्षितिजरेषेवरून खाली जाणारा सूर्य, पृथ्वीवरून पाहिल्यास, जणू विश्राम करण्यासाठी ‘मंडपात’ जात असल्यासारखा दिसतो. पहाटे मात्र, तो अचानक बाहेर पडतो; तेव्हा त्याचे तेज ‘शय्यागृहातून बाहेर पडणाऱ्‍या वराप्रमाणे’ असते. दावीद स्वतः एक मेंढपाळ असल्यामुळे रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत बाहेर असण्याचा त्याला अनुभव होता. (उत्पत्ति ३१:४०) सूर्य वरती येताच, आपल्या शरीरावर व सबंध निसर्गावर पडणाऱ्‍या त्याच्या किरणांची ऊब किती हवीहवीशी वाटते याची त्याला आठवण होती. पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत “भ्रमण” करूनही सूर्य थकलेला नसतो; उलट ‘वीरपुरुषाप्रमाणे’ पुन्हा एकदा प्रयाण करण्यास तो सज्ज असतो.

अद्‌भुत तारे व आकाशगंगा

११, १२. (अ) बायबलमध्ये ताऱ्‍यांची तुलना समुद्रतीरीच्या वाळुशी केली आहे हे उल्लेखनीय का म्हणता येईल? (ब) विश्‍व किती अफाट असण्याची शक्यता आहे?

११ दुर्बिणीच्या अभावी, दाविदाला केवळ काही हजार तारे पाहणे शक्य होते. पण अलीकडील एका अभ्यासानुसार आधुनिक दुर्बिणींच्या साहाय्याने ज्यांना पाहणे शक्य आहे, अशा विश्‍वातील एकूण ताऱ्‍यांची संख्या ७०,००,००,००,००,००,००,००,००,००,०००—सातावर २२ शून्ये इतकी आहे! ताऱ्‍यांच्या संख्येचा ‘समुद्रतीरीच्या वाळूच्या’ संदर्भात उल्लेख करून ती संख्या किती प्रचंड आहे हे यहोवाने सुचवले होते.—उत्पत्ति २२:१७.

१२ “निश्‍चित आकार नसलेले, धुकट तुकड्यासारखे दिसणारे लहान प्रकाशखंड” कित्येक वर्षांपासून खलोगशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय होते. शास्त्रज्ञांचे मत होते की या “सर्पिल अभ्रिका” आपल्या आकाशगंगेतच सामावलेल्या आहेत. पण १९२४ साली त्यांना समजले की आपल्या सर्वात जवळ असणारी अशी एक अभ्रिका, ॲन्ड्रोमीडा म्हणजे स्वतःच एक आकाशगंगा आहे; आणि आपल्यापासून तिचे अंतर किती? तर २० लाख प्रकाश वर्षे! आता शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की विश्‍वात १०,००० कोटींपेक्षा जास्त अशा आकाशगंगा आहेत आणि या प्रत्येक आकाशगंगेत हजारो—काहींमध्ये तर कोट्यवधी तारे आहेत. यहोवा मात्र “ताऱ्‍यांची गणती करितो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.”—स्तोत्र १४७:४.

१३. (अ) तारकापुंजांचे कोणते वैशिष्ट्य आहे? (ब) वैज्ञानिकांना “आकाशमंडळाचे नियम” माहीत नाहीत हे कशावरून दिसून येते?

१३ यहोवाने ईयोबाला विचारले: “कृत्तिकाचा गुच्छ तुला गुंफिता येईल काय? मृगशीर्षाचे बंध तुला सोडिता येतील काय?” (ईयोब ३८:३१) येथे दिलेली नावे वेगवेगळ्या तारकापुंजाची असून, ही तारकापुंजे एका विशिष्ट आकृतीत असणाऱ्‍या तारकासमूहांना सूचित करतात. हे तारे एकमेकांपासून हजारो कोस दूर असण्याची शक्यता असली तरीही पृथ्वीच्या संबंधाने त्यांची निश्‍चित स्थाने बदलत नाहीत. या ताऱ्‍यांची स्थाने इतकी स्थिर असल्यामुळेच ते “नाविकांना दिशा दाखवतात; खगोलशास्त्रज्ञांना अंतराळगमन करताना स्थाननिर्णय करण्याकरता व विशिष्ट तारे ओळखण्याकरता मदत करतात.” (दि एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना) तरीपण या तारकापुंजांना गुंफणारे “बंध” नेमके काय आहेत हे अजूनही कोणाला पूर्णपणे समजलेले नाही. ईयोब ३८:३३ येथे यहोवाने ईयोबाला विचारले, “आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय?” वैज्ञानिक अजूनही या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकत नाहीत.

१४. प्रकाशाची वाटणी कशी झाली हे एक गूढ आहे असे का म्हणता येईल?

१४ ईयोबाला विचारलेल्या आणखी एका प्रश्‍नाचे उत्तर वैज्ञानिकांजवळ नाही: “प्रकाशाची वाटणी कशी झाली आहे?” (ईयोब ३८:२४) एका लेखकाने म्हटले की प्रकाशाविषयी विचारलेला हा प्रश्‍न एक “अत्यंत आधुनिक शास्त्रोक्‍त प्रश्‍न आहे.” याउलट, काही ग्रीक तत्त्वज्ञान्यांची अशी धारणा होती की प्रकाश हा मानवी नेत्रांतून उत्पन्‍न होतो. आधुनिक काळात काही वैज्ञानिकांचे मानणे होते, की प्रकाश हा सूक्ष्म कणांपासून बनला आहे. इतरांचा समज होता की तो लहरींच्या माध्यमाने गमन करतो. पण आता वैज्ञानिकांना खात्री पटली आहे की प्रकाशात लहरी व कण या दोन्ही गोष्टींची गुणलक्षणे आहेत. आणि तरीसुद्धा, प्रकाशाचे खरे स्वरूप, त्याची “वाटणी” कशी झाली आहे याचे आकलन अजूनही त्यांना झालेले नाही.

१५. आकाशाविषयी विचार करताना दाविदाप्रमाणेच आपल्यालाही कसे वाटले पाहिजे?

१५ या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आपल्यालाही आपोआपच स्तोत्रकर्त्या दावीदासारखेच वाटू लागते, ज्याने असे म्हटले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?”—स्तोत्र ८:३, ४.

पृथ्वी व त्यातील प्राणी यहोवाचा महिमा वर्णितात

१६, १७. ‘जलाशयांतील’ प्राणी कशाप्रकारे यहोवाची स्तुती करतात?

१६ स्तोत्र १४८ यात पुढे आणखी काही मार्गांचा उल्लेख केला आहे ज्यांद्वारे निर्मितीकृत्ये देवाचा महिमा वर्णितात. ७ व्या वचनात म्हटले आहे: ‘मोठेमोठे जलचर व सर्व जलाशय, पृथ्वीवरून परमेश्‍वराचे स्तवन करा.’ होय, “जलाशय” देवाच्या बुद्धीची व सामर्थ्याची प्रचिती करून देणाऱ्‍या विस्मयकारी गोष्टींनी भरले आहेत. निळ्या देवमाशाचे (ब्लू व्हेल) सरासरी वजन १२० टन असते—एकूण ३० हत्तींच्या वजनाइतके! त्याच्या हृदयाचेच वजन पाहिल्यास, ते तब्बल ४५० किलोंपेक्षा जास्त असून, त्याच्या सबंध शरीरात ते जवळजवळ ६,४०० किलोग्राम रक्‍त पम्प करते! अशा अवाढव्य आकारामुळे हे जलचर, पाण्यात सुस्तपणे व अवघडल्यासारखे विहार करतात का? मुळीच नाही. युरोपियन सिटेशन बायकॅच कॅम्पेनच्या एक रिपोर्टनुसार हे ब्लू व्हेल थक्क करून सोडणाऱ्‍या वेगाने, “अतिशय चपळाईने समुद्रात विहार” करतात. उपग्रहातून निरिक्षण केले असता, “एका [ब्लू व्हेलने] स्थलांतर करताना १० महिन्यांच्या अवधीत १६,००० पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास केल्याचे” आढळले.

१७ बॉटलनोझ्ड डॉल्फिन सहसा ४५ मीटर खोल सूर मारतात, पण आजपर्यंत नोंदलेली डॉल्फिनची सर्वात खोल बुडी ५४७ मीटरची आहे! हा सस्तन जलचर इतकी खोल बुडी कशी काय मारू शकतो? तर पाण्यात बुडी मारताना त्याची हृदयगती धीमी होते आणि रक्‍ताचा प्रवाह हृदय, फुफ्फुसे व मेंदूकडे वळवला जातो. तसेच त्याच्या स्नायुंमध्ये एक खासप्रकारे रसायन असते व या रसायनात प्राणवायू साठवून ठेवण्याची क्षमता असते. एलिफंट सील व स्पर्म व्हेल तर याहून खोल बुडी मारतात. डिस्कव्हर नियतकालिकानुसार, “दबावाचा प्रतिकार करण्याऐवजी ते आपल्या फुफ्फुसांना पूर्णपणे शिथिल करतात.” त्यांना लागणारा प्राणवायू बहुतेककरून ते आपल्या स्नायुंतच साठवतात. स्पष्टपणे हे प्राणी एका सर्वसमर्थ देवाच्या अफाट बुद्धीची ग्वाही देणारी जिवंत उदाहरणे आहेत!

१८. समुद्रातील पाणी यहोवाची बुद्धी कशाप्रकारे प्रदर्शित करते?

१८ समुद्रातील पाणी देखील यहोवाच्या बुद्धीचाच एक पुरावा आहे. साइंटिफिक अमेरिकन यात म्हटल्यानुसार: “समुद्राच्या वरील १०० मीटरच्या पातळीपर्यंत पाण्याच्या प्रत्येक थेंबात फायटोप्लॅन्कटन म्हटलेल्या हजारो तरंगणाऱ्‍या सूक्ष्म वनस्पती असतात.” हे “अदृश्‍य अरण्य” कोट्यवधी टन कार्बन डायॉक्साइडची विल्हेवाट लावून हवा शुद्ध राखण्याचे काम करते. आपण श्‍वासावाटे घेतो त्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्राणवायू फायटोप्लॅन्कटनकडून निर्माण झालेला असतो.

१९. अग्नी व हिम कशाप्रकारे यहोवाची इच्छा पूर्ण करतात?

१९ स्तोत्र १४८:८ म्हणते: “अग्नि, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ.” होय, आपली इच्छा सिद्धीस नेण्याकरता यहोवा अचेतन सृष्टीचाही उपयोग करतो. अग्नीचे उदाहरण घ्या. मागील कित्येक दशकांत वणव्यांना नाशकारक म्हटले जात होते. आता मात्र संशोधक असे मानतात की परिस्थितीकीच्या संवर्धनाकरता वणव्यांची मुख्य भूमिका आहे; कारण त्यांमुळे जुन्या व सुकत चाललेल्या वृक्षांची विल्हेवाट लावली जाते, अनेक बियांना अंकुरण्यास वाव मिळतो, पोषक तत्त्वांचे नविनीकरण घडते आणि अनियंत्रित वणवे पेटण्याचा धोका खरे पाहता कमी होतो. हिम देखील जीवनरक्षक आहे कारण त्यामुळे जमिनीला पाणीपुरवठा होतो, तिची सुपीकता वाढते, नद्यांचा परिपोष होतो आणि वनस्पती व प्राण्यांचे अत्यंत थंड तापमानांपासून रक्षण होते.

२०. पर्वत व वृक्षे मानवाकरता कशाप्रकारे उपयोगी ठरतात?

२० स्तोत्र १४८:९ आणखी काही गोष्टींचा उल्लेख करते: “पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू.” रूबाबदार पर्वते यहोवाच्या महान सामर्थ्याची ग्वाही देतात. (स्तोत्र ६५:६) पण त्यांच्याद्वारे एक उपयोगी उद्देश साध्य होतो. स्वित्झर्लंडमधील बर्न येथील इंस्टिट्यूट ऑफ जियोग्राफीच्या एका रिपोर्टनुसार: “जगातल्या सर्व प्रमुख नद्यांचे उगम पर्वतांतून होते. मानवी लोकसंख्येतील निम्म्यापेक्षा अधिक लोक पर्वतांत साठणाऱ्‍या गोड्या पाण्यावर अवलंबून आहेत. . . . या ‘पाण्याच्या टाक्या’ मानवजातीच्या कल्याणाकरता अत्यावश्‍यक आहेत.” साधारण वृक्षे देखील आपल्या निर्माणकर्त्याचे गुणगान करतात. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅमच्या एका रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार झाडे “सर्व देशांतील लोकांच्या कल्याणाकरता महत्त्वाची भूमिका निभावतात . . . लाकूड, फळे, कवचफले, राळ व डिंक यांसारखी उत्पादने झाडांपासूनच मिळत असल्यामुळे बऱ्‍याच जातींची वृक्षे आर्थिकदृष्ट्या अतिशय उपयोगी आहेत. जगभरात २०० कोटी लोक चुलीकरता व इतर उद्देशांकरता इंधन म्हणून लाकूडच वापरतात.”

२१. साधेसे पान देखील अद्‌भुत रचनेचे उदाहरण का म्हणता येईल?

२१ एका बुद्धिवंत निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा वृक्षाच्या रचनेतूनच दिसून येतो. साध्या पानाचा विचार करा. पानाच्या पृष्ठावर मेणासारखा लेप असतो ज्यामुळे त्याचा ओलावा टिकून राहतो. या लेपाच्या खालोखाल सर्वात वरती हरितलवक म्हटलेला पदार्थ असलेल्या पेशींची रांग असते. या पेशींत प्रकाशातील ऊर्जा शोषून घेणारे हरितद्रव्य असते. प्रकाशसंश्‍लेषण म्हटलेली प्रक्रिया पानांत घडत असल्यामुळे ते जणू “अन्‍न निर्माण करणारे कारखानेच आहेत.” झाडाच्या मुळांवाटे जमिनीतून पाणी शोषले जाते आणि अतिशय गुंतागुंतीच्या अशा “नलिका संस्थेद्वारे” ते पानांपर्यंत पोचवले जाते.” पानांच्या खालच्या पृष्ठभागावर हजारो “छिद्रे” (प्ररंध्र) असतात ज्यांची उघडझाप होताना कार्बनडायॉक्साईड शोषून घेतले जाते. प्रकाशामुळे मिळणाऱ्‍या ऊर्जेच्या साहाय्याने पाणी व कार्बनडायॉक्साईड मिळून कर्बुदे तयार होतात. अशाप्रकारे झाडाने स्वतःच तयार केलेल्या अन्‍नाद्वारे त्याचे पोषण होते. पण हा “कारखाना” अगदी शांत व सुंदर असतो. प्रदूषण वाढवण्याऐवजी, तो चक्क वातावरणात प्राणवायू सोडतो!

२२, २३. (अ) काही पक्षी व जमिनीवर राहणाऱ्‍या प्राण्यांजवळ कोणत्या विलक्षण क्षमता आहेत? (ब) आपण आणखी कोणते प्रश्‍न विचारात घेतले पाहिजेत?

२२ स्तोत्र १४८:१० म्हणते: “वनपशु व सर्व ग्रामपशु सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी.” जमिनीवर राहणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी थरारक क्षमता बाळगतात. लेसन ॲल्बट्रॉस नावाचा पक्षी विश्‍वास बसणार नाही इतक्या लांब अंतरांपर्यंत उडू शकतो (एका लेसन ॲब्लट्रॉसने तर ९० दिवसांत ४०,००० किलोमीटर पार केले). ब्लॅकपोल वॉर्ब्लर उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेचा प्रवास करताना सलग ८० तास उडत असतो. उंट आपल्या मदारीत पाणी साठवतो असा समज आहे पण खरे तर तो आपल्या पचन संस्थेत पाण्याचा साठा ठेवतो जेणेकरून त्याला बराच काळपर्यंत पाण्याशिवाय राहता येते. नव्या यंत्रांची रचना करताना व नव्या पदार्थांचा शोध लावताना तंत्रज्ञ सहसा प्राणीजगताचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात यात काही आश्‍चर्य नाही. लेखिका गेल क्लीर म्हणतात: “जर तुम्हाला भक्कम असे काहीतरी निर्माण करायचे असेल, जे सुरळीत चालेल . . . आणि वातावरणाशी समरूप होईल, तर संभवतः तुम्हाला निसर्गातच कोठेतरी अशा वस्तूचे एखादे चांगले उदाहरण सापडेल.”

२३ होय, निर्मितीकृत्ये खरोखरच देवाचे गौरव वर्णितात! आकाशातील चांदण्या असोत किंवा प्राणी अथवा वनस्पती असोत, त्यांपैकी प्रत्येक आपापल्या मार्गाने निर्माणकर्त्याला वाखाणतात. पण आपण मानवांविषयी काय? देवाचे गुणगान करण्यात आपण निसर्गाला कशाप्रकारे साथ देऊ शकतो?

तुम्हाला आठवते का?

• देवाचे अस्तित्व नाकारणाऱ्‍यांजवळ कोणतीही सबब का नाही?

• ग्रहतारे देवाचा महिमा कशाप्रकारे वर्णितात?

• समुद्र व जमिनीवर राहणारे प्राणी एका प्रेमळ निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची ग्वाही कशाप्रकारे देतात?

• निसर्गातील अचेतन शक्‍ती देखील यहोवाची इच्छा कशाप्रकारे पूर्ण करतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आपण ज्यांना पाहू शकतो अशा ताऱ्‍यांची संख्या आहे ७०,००,००,००,००,००,००,००,००,००,०००!

[चित्राचे श्रेय]

Frank Zullo

[१२ पानांवरील चित्र]

बॉटलनोझ्ड डॉल्फिन

[१३ पानांवरील चित्र]

हिमकण

[चित्राचे श्रेय]

snowcrystals.net

[१३ पानांवरील चित्र]

लेसन ॲल्बट्रॉसचे पिलू