संकटकाळी सर्वांचे बरे करणे
संकटकाळी सर्वांचे बरे करणे
प्रेषित पौलाने असे आर्जवले: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार हे तत्त्व आपल्या जीवनात लागू करण्याचा मनापासून प्रयत्न करतात, सर्वांचे व विशेषतः आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींचे बरे करण्यासाठी कार्य करतात. संकटकाळात हे वारंवार दिसून येते. तीन राष्ट्रांतील अलीकडील उदाहरणांतून आपण हे पाहू या.
डिसेंबर २००२ मध्ये, प्रति तासाला ३०० किलोमीटर इतक्या वेगाने आलेल्या एका जोरदार वादळाचा ग्वामला फटका बसला. अनेक घरे कोसळली आणि काही तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. स्थानीय मंडळीने, सर्वात जास्त नुकसान झालेल्या साक्षीदार कुटुंबांना मदत करण्यासाठी, स्वच्छता करणाऱ्या पथकांची व्यवस्था केली. ग्वाम शाखेने, नुकसान झालेल्या घरांची डागडुजी करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि कर्मचारी पाठवले आणि हवाई शाखेने देखील मदत केली. काही आठवड्यांतच, पुनःबांधणीसाठी हवाईहून सुतारांचा एका गट आला व त्यांना मदत करण्यासाठी काही स्थानीय बांधवांनी रजा घेतल्या. या सर्वांचे आनंदी सहकार्य, तिथल्या लोकांसाठी एक साक्ष ठरले.
म्यानमारमध्ये मंडल्ये शहराच्या उपनगरात, राज्य सभागृहापासून काही अंतरावर आग लागली होती. जवळपासच, सत्यात सक्रिय नसलेल्या एका बहिणीचे व तिच्या परिवाराचे घर होते. वारा तिच्या घराच्या दिशेने वाहत असल्यामुळे ती राज्य सभागृहात मदतीसाठी धावत गेली. त्यावेळेला, राज्य सभागृहाचे नूतनीकरण चालले असल्यामुळे पुष्कळ बांधव तिथे कामाला आले होते. या भगिनीला पाहून त्यांना आश्चर्य वाटले, कारण ती याच भागात राहते हे त्यांना माहीत नव्हते. लगेच, बांधवांनी या कुटुंबाला आपल्या घरातील सामानसुमान सुरक्षित ठिकाण हलवण्यास मदत केली. या भगिनीचा पती जो साक्षीदार नाही त्याने आगीविषयी ऐकले तेव्हा तो पळत घरी आला आणि पाहतो तो काय, बांधव त्याच्या कुटुंबाची काळजी घेत होते. हे सर्व पाहून तो प्रभावित झाला व त्याने त्यांचे आभार मानले कारण सहसा लूटमार करणारे अशा परिस्थितीचा फायदा घेऊन वस्तू पळवून नेतात. बांधवांच्या या दयाळू कृत्यामुळे ही भगिनी आणि तिचा मुलगा पुन्हा ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागले आणि आता ते सर्व सभांना उपस्थित राहतात.
गेल्या सेवा वर्षात, मोझांबिकमधील पुष्कळ लोकांना, दुष्काळ व पिकांची नासाडी झाल्यामुळे अन्नटंचाईचा सामना करावा लागला. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय शाखा दफ्तराने त्वरीत कार्य करून संकटात असलेल्यांना
अन्नवाटप केले. अन्नवाटप राज्य सभागृहात कधीकधी मंडळीच्या सभांनंतर केले जात असे. एकटी पालक असलेल्या एका भगिनीने म्हटले: “मी सभेला आले तेव्हा चिंतेत होते, घरी गेल्यावर मी माझ्या मुलांना काय खाऊ घालेन हे मला माहीत नव्हतं.” पण बांधवांनी दिलेल्या प्रेमळ मदतीमुळे तिच्या मनाला लगेच उभारी आली. “हे जणू पुनरुत्थानासारखं होतं!” असे ती म्हणाली.साक्षीदार बायबलमधील सांत्वन व आशेचा संदेश सांगण्याद्वारे लोकांचे आध्यात्मिकरीत्या “बरे” करतात. प्राचीन काळच्या एका सुज्ञ व्यक्तीप्रमाणे त्यांचाही हा विश्वास आहे, की: “जो [देवाच्या बुद्धीचे] ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.”—नीतिसूत्रे १:३३.
[३१ पानांवरील चित्रे]
१, २. मोझांबिकमध्ये संकटात असलेल्यांना अन्नवाटप
३, ४. ग्वाममधील वादळाने पुष्कळ घरांची नासधूस केली
[चित्राचे श्रेय]
डावीकडे, मूल: Andrea Booher/FEMA News Photo; वर, स्त्री: AP Photo/Pacific Daily News, Masako Watanabe