व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गिलियड पदवीधर कापणीचे आवेशी कामगार म्हणून सज्ज!

गिलियड पदवीधर कापणीचे आवेशी कामगार म्हणून सज्ज!

गिलियड पदवीधर कापणीचे आवेशी कामगार म्हणून सज्ज!

“पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३७, ३८) आपल्या मिशनरी नेमणुकीला जाण्याची तयारी करणाऱ्‍या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ११६ व्या वर्गाच्या पदवीधारकांसाठी हे शब्द अर्थपूर्ण होते.

शनिवारी, मार्च १३, २००४ रोजी पदवीदानाच्या कार्यक्रमासाठी न्यूयॉर्क, पॅटरसन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रात व ज्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला होता त्या सर्व ठिकाणी जमलेल्या एकूण ६,६८४ बंधूभगिनींना शेवटचा सल्ला आणि उत्तेजन ऐकायला मिळाले. आध्यात्मिक कापणीच्या कामात आवेशाने भाग घेत असताना आपल्या सर्वांना या सल्ल्याचा लाभ होऊ शकतो.

नियमन मंडळाचे सदस्य आणि गिलियडच्या सातव्या वर्गातून पदवीधर झालेले बंधू थिओडोर जॅरस यांनी सुरवातीला, “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” या येशूच्या शब्दांवर जोर दिला. (मत्तय २८:१९, २०) हे अगदी उचित होते, कारण पदवीधारकांना २० वेगवेगळ्या राष्ट्रांत सेवा करण्यासाठी पाठवण्यात येणार होते! त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली, की देवाच्या वचनातून मिळालेल्या बोधाने त्यांना सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या आध्यात्मिक कापणीच्या कामासाठी आवेशी कामकरी म्हणून सज्ज केले आहे.—मत्तय ५:१६.

कापणीचे कार्यक्षम कामकरी कसे व्हावे

कार्यक्रमातील पहिले वक्‍ते, बंधू रॉबर्ट वॉलन होते; अनेक वर्षांपासून त्यांनी गिलियड प्रशालेशी जवळून कार्य केले आहे. “कनवाळूपणाचे सौंदर्य” या विषयावर भाषण देताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, की “कनवाळूपणा ही अशी एक भाषा आहे जी बहिरे देखील ऐकू शकतात आणि अंध देखील पाहू शकतात.” येशूला इतरांच्या दुःखाची जाणीव होती आणि त्याने ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. (मत्तय ९:३६) विद्यार्थ्यांसमोर, प्रचार कार्यात, मंडळीत, मिशनरी गृहात आणि आपल्या स्वतःच्या वैवाहिक जीवनात येशूप्रमाणे करण्याच्या अनेक संधी येतील. वक्‍त्‌याने विद्यार्थ्यांना आर्जवले: “इतरांची सेवा करताना तुमच्या जीवनातून कनवाळूपणाला आपले सौंदर्य दाखवू द्या. मिशनरी गृहात राहत असताना तुमचे उत्तम वर्तन दररोजच्या जीवनासाठी पुरेसे आहे. यास्तव, कनवाळूपणा धारण करण्याचा दृढनिश्‍चय करा.”—कलस्सैकर ३:१२.

नंतर, नियमन मंडळाचे सदस्य असलेले आणि गिलियडच्या ४१ व्या वर्गातून पदवीधर झालेले बंधू गेरट लॉश यांनी, “तारण जाहीर करणारे” या विषयावर भाषण दिले. (यशया ५२:७) सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या नाशातून आपला जीव वाचवण्याकरता लोकांनी देवाच्या वचनातून अचूक ज्ञान घेतले पाहिजे, आपल्या विश्‍वासाचे जाहीर प्रकटन केले पाहिजे आणि बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (रोमकर १०:१०; २ तीमथ्य ३:१५; १ पेत्र ३:२१) परंतु, तारण जाहीर करण्यामागचा मुख्य हेतू मनुष्यांचे तारण नव्हे तर देवाची स्तुती करणे हा आहे. यास्तव, बंधू लॉश यांनी भावी मिशनऱ्‍यांना असा सल्ला दिला: “यहोवाच्या स्तुतीसाठी दिगंतरापर्यंत राज्याचा संदेश न्या आणि आवेशाने तारण जाहीर करा.”—रोमकर १०:१८.

“तुम्ही आध्यात्मिक प्रकाश कसा प्रज्वलित करता?” असा प्रश्‍न गिलियडचे प्रशिक्षक बंधू लॉरन्स बोवन यांनी विचारला. मत्तय ६:२२ मधील येशूच्या शब्दांचा त्यांनी उल्लेख केला आणि पदवीधर विद्यार्थ्यांना “यहोवाचे गौरव करणारा व सहमानवांना लाभ पोहंचवणारा आध्यात्मिक प्रकाश प्रज्वलित” करण्याकरता आपला डोळा “निर्दोष” ठेवण्याचे उत्तेजन दिले. आपल्या सेवेच्या अगदी सुरवातीपासूनच येशूने देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवण्याद्वारे या बाबतीत परिपूर्ण उदाहरण मांडले. स्वर्गात त्याच्या पित्याने त्याला शिकवलेल्या अद्‌भुत गोष्टींवर मनन केल्यामुळे येशूला रानात सैतानाने त्याच्यावर आणलेल्या परीक्षेचा सामना करता आला. (मत्तय ३:१६; ४:१-११) देवाने त्याला जे काही करण्यासाठी नेमले होते ते पूर्ण करण्यासाठी येशूने यहोवावर आपला संपूर्ण भरवसा आहे हे दाखवून दिले. तसेच, येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यासाठी मिशनऱ्‍यांना बायबलचा अभ्यास करण्याची चांगली सवय असली पाहिजे व त्यांनी यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिले पाहिजे.

गिलियडचे आणखी एक प्रशिक्षक आणि गिलियड प्रशालेच्या ७७ व्या वर्गातून पदवीधर झालेले बंधू न्यूमर यांनी भाषणांच्या या मालिकेतील शेवटले भाषण दिले; “पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. (यहोशवा ९:२५) प्राचीन गिबोनी लोकांसारखी मनोवृत्ती बाळगण्याचे उत्तेजन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. गिबोन “मोठे शहर [होते] . . . तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते” तरीपण गिबोनी लोकांनी प्रतिष्ठा मिळण्याची किंवा आपल्या मर्जीनुसार सर्व व्हावे अशी अपेक्षा बाळगली नाही. (यहोशवा १०:२) त्यांनी यहोवाच्या उपासनेतील लेवीयांच्या हाताखाली “लाकूडतोड्ये व पाणक्ये म्हणून” राजीखुषीने सेवा केली. (यहोशवा ९:२७) पदवीदान वर्गातील सदस्यांनी जणू काय महान यहोशवा येशू ख्रिस्त याला असे म्हटले आहे, की “पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत.” आता, आपल्या विदेशी नेमणुका सुरू करताना त्यांनी महान यहोशवा त्यांना जे काम देईल ते स्वीकारावे.

अनुभव व मुलाखती

गिलियडच्या ६१ व्या वर्गातून पदवीधर झालेले आणि प्रशिक्षकांपैकी एक, बंधू वॉलस लिव्हरन्स यांनी विद्यार्थ्यांच्या एका गटाबरोबर केलेल्या चर्चेचा विषय होता: “शास्त्रवचनांचा उलगडा करा.” विद्यार्थ्यांनी, कोर्सदरम्यानच्या काळात त्यांना क्षेत्र सेवेत आलेले अनुभव सांगितले आणि काहींचे अभिनयही करून दाखवले. त्यांच्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षणातील शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचला होता व ते जे शिकले होते ते इतरांना सांगण्यास प्रवृत्त झाले होते, हे स्पष्ट दिसत होते. (लूक २४:३२) या पाच महिन्यांच्या कोर्सदरम्यान एक विद्यार्थी, तो जे काही शिकत होता ते आपल्या सख्ख्या धाकट्या भावाला सांगू शकला. यामुळे त्याच्या भावाला स्थानीय मंडळी शोधून काढण्याची व बायबलचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. आता तो बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक झाला आहे.

या अनुभवांनंतर, रिचर्ड ॲश आणि जॉन गिबर्ड यांनी यहोवाच्या अनेक जुन्या सेवकांच्या आणि प्रवासी पर्यवेक्षकांच्या मुलाखती घेतल्या ज्यांना वॉचटावर शैक्षणिक केंद्रातून खास प्रशिक्षण मिळत होते. ते पूर्वीच्या गिलियड प्रशालेचे पदवीधर होते. बंधू नॉर यांनी कोर्सदरम्यानच्या एका वर्गात असे म्हटल्याचे एका बांधवाने आठवून सांगितले: “गिलियडमध्ये तुम्ही भरपूर अभ्यास कराल. पण यामुळे तुमच्या मनात गर्वाची भावना आली तर आमचा उद्देश फसल्यासारखा होईल. या प्रशिक्षणानंतर तुम्ही गर्विष्ठ नव्हे तर प्रेमळ व उदार व्हावे, हा आमचा उद्देश आहे.” प्रवासी बांधवांनी वर्गातल्या सर्वांना लोकांबद्दल आस्था बाळगण्याचा, ख्रिस्ताने जसे लोकांना वागवले तसे इतरांशी वागण्याचा व त्यांना दिली जाणारी कोणतीही नेमणूक नम्रतेने स्वीकारण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचे अनुकरण केल्यास या नवीन मिशनऱ्‍यांना निश्‍चितच आपल्या नेमणुकीत परिणामकारक होण्यास मदत मिळेल.

कापणीचे आवेशी कामकरी व्हा!

श्रोत्यांना नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य बंधू स्टीव्हन लेट यांचे भाषण ऐकायची संधी मिळाली. त्यांनी, “कापणीचे आवेशी कामकरी व्हा!” हा विषय असलेले कार्यक्रमातील मुख्य भाषण दिले. (मत्तय ९:३८) खऱ्‍याखुऱ्‍या कापणीच्या वेळी, एखाद्या धान्याच्या कापणीचा हंगाम सीमित कालावधीचा असतो. यासाठी कामकऱ्‍यांना कष्ट करावे लागतात. तेव्हा या व्यवस्थीकरणाच्या अंताच्या वेळी आपण आणखी किती कष्ट केले पाहिजे बरे! महान आध्यात्मिक कापणीत, लोकांचे जीव धोक्यात आहेत. (मत्तय १३:३९) बंधू लेट यांनी पदवीधारकांना ‘मंद होऊ नका’ तर “आत्म्यात उत्सुक असा” आणि पुन्हा कधी न होणाऱ्‍या कापणीच्या कामात “प्रभुची सेवा करा” असे उत्तेजन दिले. (रोमकर १२:११) त्यांनी येशूचे हे शब्द उद्धृत केले: “आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.” (योहान ४:३५) त्यानंतर त्यांनी पदवीधारकांना, लोक असतील तेथे त्यांना भेटण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याद्वारे व अनौपचारिक साक्ष देण्यासाठी मिळणाऱ्‍या सर्व संधींचा फायदा घेण्याद्वारे कापणीच्या कामासाठी आपला आवेश दाखवण्यास आर्जवले. संधी तयार करण्याकरता जागृत राहिल्याने प्रभावी साक्ष द्यायला सोपे जाऊ शकते. यहोवा आवेशी देव आहे आणि आपण सर्वांनी त्याचे अनुकरण करावे व आध्यात्मिक कापणीच्या कामात कष्ट करावे अशी तो आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो.—२ राजे १९:३१; योहान ५:१७.

कार्यक्रमाच्या शेवटी, अध्यक्ष असलेल्या बंधू जॅरस यांनी विविध शाखा दफ्तरांतून आलेल्या शुभेच्छा वाचून दाखवल्या आणि विद्यार्थ्यांना त्यांचा डिप्लोमा दिला. एका पदवीधारक बांधवाने, प्रशिक्षणाबद्दल मनापासून आभार व्यक्‍त करणारे वर्गाच्या वतीने लिहिलेले पत्र वाचून दाखवले. खरेच, ११६ व्या वर्गाच्या पदवीदानाच्या कार्यक्रमामुळे उपस्थित असलेल्या सर्वांनी कापणीचे आवेशी कामगार होण्याचा दृढनिश्‍चय केला.

[२५ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ६

नेमलेले देश: २०

एकूण विद्यार्थी: ४६

सरासरी वय: ३४.२

सत्यात सरासरी वर्षे: १७.२

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.९

[२६ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा ११६ वा पदवीधर वर्ग

खालील यादीत ओळींना पुढून मागे अशा रितीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) सिऑनसु, आर.; स्पार्क्स, टी.; पिनयॉ, सी; टर्नर, पी.; शेने, एल. (२) स्वार्डी, एम.; शोक्वीस्ट, ए.; आमाडोरी, एल.; स्मीथ, एन.; जॉर्डन, ए.; ब्वॉसॉनो, एल. (३) मॅटलॉक, जे.; रुइथ, सी.; ड्यूलार, एल.; व्हिन्यरॉन, एम.; हेन्री, के. (४) शोक्वीस्ट, एच.; लॉक्स, जे.; रुझो, जे.; गुस्टाफसॉन, के.; ब्वॉसॉनो, आर.; जॉर्डन, एम. (५) हेन्री, डी.; टर्नर, डी.; कर्विन, एस.; फ्लॉरीट, के.; सिऑनसु, एस. (६) आमाडोरी, एस.; शेने, जे.; रॉस, आर.; नेल्सन, जे.; रुइथ, जे.; व्हिन्यरॉन, एम. (७) फ्लॉरीट, जे.; मॅटलॉक, डी.; रॉस, बी.; लॉक्स, सी.; रुझो, टी.; ड्यूलार, डी.; कर्विन, एन. (८) गुस्टाफसॉन, ए.; नेल्सन, डी.; स्वार्डी, डब्ल्यू.; पिनयॉ, एम.; स्मीथ, सी.; स्पार्क्स, टी.