व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांना शिस्त लावण्यास बायबल मदत करू शकते?

मुलांना शिस्त लावण्यास बायबल मदत करू शकते?

मुलांना शिस्त लावण्यास बायबल मदत करू शकते?

ऑर्किड हे अत्यंत आकर्षक फूल असते; पण त्याला वाढवणे फार कठीण असते. त्याची वाढ यशस्वीपणे करायची झाल्यास, तापमान, प्रकाश, कुंडीचा आकार या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवाव्या लागतात. ऑर्किड अत्यंत नाजूक असते व अनुचित माती आणि खत यांचा त्यावर लगेच परिणाम होतो. रोगामुळे व कीटकांमुळे ते सहजपणे नष्ट होऊ शकते. म्हणून पहिल्याच वेळी, ऑर्किड वाढवण्याचा प्रयत्न सहसा फसत असतो.

मुलांचे संगोपन हे त्याहून कठीण आणि जटिल आहे व त्याकरता काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळे, आपण मुलांचे संगोपन करण्यात अपुरे पडत आहोत असे पालकांना वाटणे साहजिक आहे. पुष्कळांना, ऑर्किड वाढवणाऱ्‍या व्यक्‍तीप्रमाणे तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा लागतो. शिवाय आपल्याला सर्वात उत्तम सल्ला मिळावा असे प्रत्येक पालकाला वाटणे योग्यच आहे. पण असे मार्गदर्शन मिळणार कोठून?

बायबल हे बाल संगोपनाच्या विषयावरील पुस्तक नसले तरी, या संबंधी बराच व्यावहारिक सल्ला त्यात लिहून ठेवण्याची प्रेरणा निर्माणकर्त्याने बायबलच्या लेखकांना दिली. मुलांमध्ये इष्ट गुण विकसित करणे यावर बायबल जोर देते. अनेकांच्या मते सहसा याकडेच दुर्लक्ष केले जाते. (इफिसकर ४:२२-२४) उचित शिक्षणासाठी, शास्त्रवचनीय सल्ला महत्त्वाचा ठरतो. विविध काळातील व सांस्कृतिक पार्श्‍वभूमीतील हजारो लोकांनी या सल्ल्याचे पालन केले व त्यांना याचा फायदा झाला. यास्तव, शास्त्रवचनीय सल्ला तुम्हाला बाल संगोपन यशस्वीपणे करण्यास मदत करू शकते.

पालकांचे उदाहरण—शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत

“तर मग दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करितोस काय?”—रोमकर २:२१, २२.

सेऊल शिक्षण बोर्डाच्या एका अध्याक्षांनी म्हटले: “आदर्श बोली व कृती हे मुलासाठी सर्वात उत्तम शिक्षण आहे.” पालकांनी स्वतः बोली व वर्तनाच्या बाबतीत उदाहरण मांडले नाही आणि मुलांना मात्र शिकवण्याचा प्रयत्न केला तर आपले आईवडील दांभिक आहेत असा मुलांचा पटकन समज होईल. पालकांच्या शब्दांचा मुलांवर काहीच परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, पालकांना आपल्या मुलांना इमानदारपणा शिकवायचा असेल तर त्यांनी स्वतः आधी इमानदार असावे. काही पालकांना फोनवर अमुक कोणाशी बोलायचे नसेल तर “बाबा (किंवा आई) घरी नाहीत” असे ते आपल्या मुलांना सांगायला लावतात. मुलाला ते कठीण वाटेल आणि त्याला गोंधळल्यासारखे होईल. कालांतराने, एखाद्या कठीण परिस्थितीत मूल बिनधास्त खोटे बोलू लागेल आणि त्याला त्यात काहीच गैर वाटणार नाही. आपल्या मुलांनी इमानदार असावे असे पालकांना खरेच वाटत असल्यास, त्यांनी स्वतः खरे बोलावे आणि त्याप्रमाणे कार्य करावे.

आपल्या मुलाने चांगली भाषा वापरावी असे तुम्हाला वाटते का? मग स्वतः उत्तम उदाहरण मांडा. मूल लागलीच तुमचे अनुकरण करेल. साँग-सिक यांना चार मुले आहेत; ते म्हणतात: “माझ्या पत्नीने व मी ठरवले की, अपमानास्पद भाषा वापरायची नाही. आम्ही एकमेकांना आदर दाखवायचो आणि आम्ही चिडलेलो असलो किंवा रागावलेलो असलो तरी आवाज चढवून बोलत नव्हतो. आमचे चांगले उदाहरण तोंडी सूचनांपेक्षा परिणामकारक ठरले. आमची मुले इतरांशी अदबीने आणि विनयशीलतेने बोलत असलेली पाहून आम्हाला आनंद वाटतो.” गलतीकर ६:७ येथे बायबल म्हणते: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” आपल्या मुलांचे नैतिक वर्तन चांगले असावे अशी अपेक्षा करणाऱ्‍या पालकांनी प्रथम या मूल्यांचे ते स्वतः पालन करत असल्याचे दाखवले पाहिजे.

मनमोकळेपणाने सुसंवाद होऊ द्या

[देवाच्या आज्ञा] तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:७.

आजकाल ओव्हरटाईम करण्याची एक नवीन पद्धत वाढू लागली आहे. पती आणि पत्नी दोघेही काम करतात तेव्हा मुलांवर अधिक परिणाम होतो. पुष्कळ पालकांना आपल्या मुलांबरोबर दिवसेंदिवस कमी वेळ घालवायला मिळत आहे. घरी असताना, घरातली कामे किंवा इतर कामे उरकायची असतात त्यामुळे ते थकून भागून जातात. अशा परिस्थितीत, मुलांबरोबर सुसंवाद साधणे कसे शक्य आहे? तुम्ही मुलांसोबत मिळून घरातली कामे उरकायचा प्रयत्न केला तर एकमेकांशी बोलण्याची संधी मिळेल. एका कुटुंब प्रमुखाने तर आपल्या मुलांसोबत बोलायला अधिक वेळ मिळावा म्हणून घरातला टीव्ही काढून टाकला. त्यांनी म्हटले: “सुरवातीला मुलांना कंटाळा यायचा, पण मी त्यांच्याबरोबर पझल गेम्स खेळू लागलो आणि छानछान पुस्तकांविषयी चर्चा करू लागलो तशी त्यांना सवय झाली.”

अगदी लहानपणापासूनच मुलांना पालकांशी बोलण्याची सवय लागणे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर, मुले तरुण झाल्यावर त्यांना समस्या आल्या तर ते आपल्या पालकांना मित्र समजून त्यांच्याशी बोलणार नाहीत. मुलांनी तुम्हाला त्यांच्या मनातले सर्वकाही सांगण्यासाठी तुम्ही काय करू शकता? नीतिसूत्रे २०:५ म्हणते: “मनुष्याच्या मनांतील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढितो.” “तुला काय वाटतं?” असे दृष्टिकोनात्मक प्रश्‍न विचारून पालक आपल्या मुलांना त्यांचे विचार आणि भावना व्यक्‍त करण्यास उत्तेजन देऊ शकतात.

तुमच्या मुलाने गंभीर चूक केल्यास तुम्ही काय कराल? अशा वेळी त्याला प्रेमळपणे समजून घेण्याची आवश्‍यकता असते. आपल्या मुलाचे ऐकून घेताना स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवा. अशा परिस्थितीत आपण काय करतो याविषयी एका पित्याने म्हटले: “मुले चुका करतात तेव्हा मी एकदम भडकू नये म्हणून प्रयत्न करतो. मी खाली बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला राग अनावर होतो तेव्हा मी थोडा वेळ थांबतो आणि स्वतःला शांत करतो.” आपल्या भावनांवर ताबा ठेवून तुम्ही त्यांचे ऐकून घेतले तर तुमचा सल्ला ते लगेच स्वीकारतील.

प्रेमाने शिस्त लावण्याची आवश्‍यकता

“बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.

चांगले परिणाम मिळवायचे असतील तर, प्रेमळ शिस्त लावण्याची पद्धत महत्त्वाची आहे. पालक “मुलांना चिरडीस” कसे आणू शकतात? जर चुकीच्या गंभीरतेनुसार शिस्त लावली नाही किंवा खूपच टीका करून शिस्त लावली तर मुले ती स्वीकारणार नाहीत. शिस्त ही नेहमी प्रेमाने लावली पाहिजे. (नीतिसूत्रे १३:२४) तुम्ही आपल्या मुलांसोबत तर्क केला तर तुमचे त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही शिस्त लावत आहात हे त्यांना समजेल.—नीतिसूत्रे २२:१५; २९:१९.

दुसरीकडे, मुलांना स्वतःच्या चुकीच्या वर्तनाचे वाईट परिणाम सोसावे लागणे योग्यच आहे. उदाहरणार्थ, मुलाने दुसऱ्‍या व्यक्‍तीविरुद्ध काही चूक केली तर तुम्ही त्याला क्षमा मागायला लावू शकता. कुटुंबातले नियम त्याने मोडले तर नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देण्याकरता तुम्ही त्याच्या हक्कांवर बंदी घालू शकता.

योग्य वेळी शिस्त लावणे चांगले आहे. उपदेशक ८:११ म्हणते: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत होते.” त्याचप्रमाणे, पुष्कळ मुले देखील परीक्षा घेऊन पाहतील की, चूक करून ते शिक्षा चुकवू शकतात की नाही. त्यामुळे, एखादी चूक केल्यावर शिक्षा मिळेल असे तुम्ही सांगितल्यास ती शिक्षा द्या.

हितकर मनोरंजन मोलाचे

“हसण्याचा समय . . . व नृत्य करण्याचा समय असतो.”—उपदेशक ३:१, .

फावला वेळ आणि हितकर, संतुलित मनोरंजन मुलाच्या मनाच्या व शरीराच्या विकासाकरता आवश्‍यक असते. पालकही मुलांसोबत मनोरंजन करतात तेव्हा कुटुंबाचे बंध मजबूत होतात आणि मुलांना सुरक्षितता जाणवते. कुटुंबाचे सदस्य एकत्र मिळून कोणते मनोरंजन करू शकतात? थोडी कल्पना लढवली तर पुष्कळशा आनंद देणाऱ्‍या गोष्टी आहेत. सायकल चालवणे आणि टेनिस, बॅडमिंटन तसेच वॉलीबॉलसारखे घराबाहरचे खेळ आहेत. शिवाय, कुटुंबातले सगळे मिळून संगीतवाद्ये वाजवतात; तोही खूप आनंदाचा समय असू शकतो. निसर्गाचा आनंद लुटायला जवळपास कोठेतरी गेल्यामुळे लहानमोठ्या आठवणी जपवता येतात.

अशा वेळी, पालक आपल्या मुलांमध्ये मनोरंजनाबद्दल संतुलित दृष्टिकोन निर्माण करू शकतात. तीन मुले असलेल्या एका ख्रिस्ती पित्याने म्हटले: “मी शक्य असेल तेव्हा माझ्या मुलांच्या मनोरंजनात सामील होत असतो. जसे की, ते कम्प्युटर गेम्स खेळतात तेव्हा मी त्याविषयी त्यांना प्रश्‍न विचारतो. ते उत्साहाने त्याविषयी मला सांगू लागतात तेव्हा हानीकारक मनोरंजनाच्या धोक्याबद्दल मी संधी साधून त्यांच्याशी बोलतो. यामुळे मी हे पाहिले आहे की, अनुचित मनोरंजन असेल तर ते त्यात भाग घेत नाहीत.” होय, कुटुंबासोबत मनोरंजन करण्यात आनंदी असलेली मुले सहसा असे टीव्हीचे कार्यक्रम, व्हिडिओ, चित्रपट पाहत नाहीत किंवा इंटरनेटवरील गेम्स खेळत नाहीत ज्यांमध्ये हिंसा, अनैतिकता आणि अंमली पदार्थ घेण्याविषयी दाखवले जाते.

आपल्या मुलांना चांगले मित्र बनवण्यास मदत करा

सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

आपल्या चारही मुलांचे यशस्वीपणे संगोपन केलेल्या एका ख्रिस्ती पित्याने म्हटले: “मुले कोणते मित्र निवडतात हे फार महत्त्वाचे आहे. एकाच वाईट मित्रामुळे तुमच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरू शकते.” आपल्या मुलांनी चांगले मित्र करावेत म्हणून ते फार कुशलतेने त्यांना असे प्रश्‍न विचारत: तुझा जिगरी दोस्त कोण आहे? तो तुला का आवडतो? त्याच्यातला कोणता गुण तुला अनुकरण करावासा वाटतो? दुसरे एक पालक आपल्या मुलांच्या जवळच्या मित्रांना घरी बोलवण्याची व्यवस्था करतात. अशाने ते त्यांचे निरीक्षण करू शकतात आणि आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतात.

मुले समवयीन मुलांसोबत वृद्ध लोकांसोबतही मैत्री करू शकतात हे त्यांना शिकवणे देखील महत्त्वाचे आहे. तीन मुलांचे पिता असलेले बमसन म्हणतात: “मी माझ्या मुलांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की मित्र नेहमीच समवयीन असण्याची गरज नाही. बायबलमधील दावीद आणि योनाथानाचे उदाहरण नाही का? मी सर्व वयोगटातील ख्रिश्‍चनांना माझ्या मुलांसोबत संगती करायला बोलवत असतो. यामुळे, माझी मुले समवयीन नसलेल्यांसोबतही सहवास ठेवतात.” उदाहरणीय असलेल्या वृद्ध लोकांसोबत संगती केल्याने मुलांना पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात.

मुलांना शिस्त लावण्यात यश मिळू शकते

अमेरिकेतल्या एका सर्वेक्षणानुसार, पुष्कळ पालकांनी आपल्या मुलांना आत्म-संयम, आत्म-शिस्त आणि इमानदारपणा शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना फारसे यश मिळाले नाही. हे इतके कठीण का आहे? या सर्वेक्षणातील एका मातेने म्हटले: ‘दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर एकच उपाय आहे: त्यांना एका खोलीत बंद करून ठेवायचे आणि बाहेर जायला देऊच नये.’ तिला असे म्हणायचे होते की, मुले आता ज्या वातावरणात वाढतात तेच पूर्वीपेक्षा खराब झाले आहे. पण अशा वातावरणातही आपल्या मुलांचे यशस्वीपणे संगोपन करणे शक्य आहे का?

एखादे ऑर्किड वाढवताना, ते मरून जाईल अशी चिंता केली तर तुम्ही निराश होऊ शकता. पण, ऑर्किड वाढवण्याची माहिती असलेल्या एका जाणकार व्यक्‍तीने तुम्हाला मदतीचे सल्ले दिले आणि आत्मविश्‍वासाने म्हटले, “असं केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल” तर तुम्हाला किती बरे वाटेल, नाही? मानवी स्वभावाविषयी एकूणएक माहिती असलेला यहोवा मुलांच्या संगोपनाच्या सर्वात उत्तम पद्धतीविषयी सल्ला देतो. तो म्हणतो: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे २२:६) बायबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही मुलांना शिक्षण दिले तर तुमची मुले मोठी होऊन जबाबदार, इतरांबद्दल विचारशील आणि नैतिकतेची जाणीव असलेल्या प्रौढ व्यक्‍ती बनलेल्याचे तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल. मग ते लोकांना आणि विशेष म्हणजे आपला स्वर्गीय पिता, यहोवा याला प्रिय होतील.