व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ॲनाबॅप्टिस्ट कोण होते?

ॲनाबॅप्टिस्ट कोण होते?

ॲनाबॅप्टिस्ट कोण होते?

जर्मनीतल्या वेस्टफेलियाच्या म्युन्स्टर शहराच्या केंद्रस्थानी पहिल्यांदा भेट देणारे लोक, तेथील एका चर्चच्या बुरूजावर अडकवलेल्या तीन लोखंडी पिंजऱ्‍याकडे हमखास थांबून पाहतात. ते पिंजरे गेल्या ५०० वर्षांपासून तेथे अडकवलेले आहेत; फक्‍त अधेमधे काही काळ ते जागेवर नव्हते. सुरवातीला, त्या पिंजऱ्‍यांमध्ये तीन पुरुषांचे देह होते ज्यांचा सार्वजनिकपणे छळ करून वध करण्यात आला होता. हे पुरुष ॲनाबॅप्टिस्ट होते आणि ते पिंजरे त्यांच्या साम्राज्याची आठवण करून देतात.

ॲनाबॅप्टिस्ट कोण होते? त्यांची चळवळ कशी सुरू झाली? त्या चळवळीच्या काही मुख्य शिकवणी कोणत्या होत्या? त्या पुरुषांचा वध का करण्यात आला? आणि त्या तीन पिंजऱ्‍यांचा साम्राज्याशी काय संबंध?

चर्चमध्ये सुधार करायचा—पण कसा?

पंधराव्या शतकाच्या शेवटी आणि १६ शतकाच्या सुरवातीला, रोमन कॅथलिक चर्च व त्याच्या धर्मगुरूंची टीका अधिकाधिक वाढू लागली. भ्रष्टाचार आणि अनैतिकता चर्चमध्ये बोकाळली होती; त्यामुळे पुष्कळांना वाटले की संपूर्ण परिवर्तन होण्याची आवश्‍यकता आहे. १५१७ मध्ये, मार्टिन ल्यूथरने सुधारणेची जाहीर मागणी केली. इतरजण या वादविवादात सामील झाले तेव्हा प्रोटेस्टंट धर्मसुधारणेने वेग घेतला होता.

परंतु नेमके काय करावे आणि कितपत बदल करावेत याविषयी कसलीही ठराविक योजना धर्मसुधारकांजवळ नव्हती. उपासनेच्या बाबतीत बायबलच्या एकमतात असण्याची गरज आहे हे पुष्कळांना जाणवत होते. तरीपण, बायबलच्या शिकवणुकींच्या कोणत्याही एका समान विवरणावर धर्मसुधारकांचे एकमत होऊ शकले नाही. काहींना वाटत होते की, धर्मसुधारणा फार मंद गतीने होत होती. याच वेळेतील धर्मसुधारकांमधून ॲनाबॅप्टिस्ट चळवळीचा उदय झाला.

“खरे पाहिले तर, एकच बॅप्टिस्ट चळवळ नव्हती तर अशा अनेक [चळवळी] होत्या,” असे हान्स-युअरगन गोएट्‌र्स यांनी डी टॉईफ-गेशिक्ट उंट डॉयटुंग या आपल्या पुस्तकात लिहिले. उदाहरणार्थ, १५२१ मध्ये, विटनबर्गमध्ये झ्वीकाऊ संदेष्टे असे नाव धारण केलेल्या चार पुरुषांनी ॲनाबॅप्टिस्ट शिकवणुकींचा प्रचार करून बरीच खळबळ माजवली. आणि १५२५ मध्ये, झुरिक, स्वीत्झर्लंडमध्ये ॲनाबॅप्टिस्ट यांचा एक स्वतंत्र गट स्थापण्यात आला. मोरेव्हिया—सध्याचे चेक प्रजासत्ताक—आणि नेदरलंड येथेही बॅप्टिस्ट समाज उगवला.

बाप्तिस्मा—मुलांकरता की प्रौढांकरता?

ॲनाबॅप्टिस्ट समाज बहुतांशी लहान होते आणि त्यांचे सदस्य सहसा शांतीपूर्ण असत. त्यांच्या अनुयायींनी आपले विश्‍वास लपवून ठेवले नाहीत; उलट, ते त्यांचा प्रचार करत. मूलभूत ॲनाबॅप्टिस्ट विश्‍वासांचे विवरण श्‍लायटहाईम धर्मतत्त्व यात १५२७ मध्ये करण्यात आले होते. इतर गोष्टींव्यतिरिक्‍त त्यांनी लष्करी सेवा नाकारली, जगापासून वेगळे राहायचा निर्धार केला आणि अपराध्यांना बहिष्कृत केले. पण ॲनाबॅप्टिस्टांच्या विश्‍वासातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, बाप्तिस्मा केवळ प्रौढांकरता होता, लहान मुलांकरता नव्हता हा विश्‍वास; यामुळे ते इतर धर्मांपासून वेगळे दिसत. *

प्रौढांचा बाप्तिस्मा हा केवळ धार्मिक आदेश समजला जात नव्हता; तर तो सत्तेचा विषय बनला होता. बाप्तिस्मा घेण्याचे पाऊल प्रौढपणी घेण्याचे ठरवले—विश्‍वासाच्या आधारे एका व्यक्‍तीला निर्णय घेता यावा म्हणून—तर काहींचा बाप्तिस्माच न होण्याची शक्यता असे. आणि ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नव्हता अशा लोकांवर—निदान काही बाबतीत तरी—चर्चचे नियंत्रण नव्हते. म्हणून काही चर्चेसकरता, प्रौढपणी बाप्तिस्मा घेणे म्हणजे सत्ता गमावणे होते.

यास्तव, कॅथलिक आणि ल्यूथरन लोकांनी प्रौढपणी बाप्तिस्मा घेण्याच्या पद्धतीला उत्तेजन दिले नाही. १५२९ नंतर काही भागांमध्ये तरी असे घडू लागले की, प्रौढांचा बाप्तिस्मा करून देणाऱ्‍यांना किंवा प्रौढ झाल्यावर बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना मृत्यू दंड मिळण्यास पात्र ठरवले जात असे. पत्रकार टॉमस सेफर्ट म्हणतात की, “जर्मन राष्ट्राच्या संपूर्ण पवित्र रोमन साम्राज्यात [ॲनाबॅप्टिस्टांचा] क्रूरपणे छळ करण्यात आला.” म्युन्स्टर येथे हा छळ शिगेला पोहोचला.

मध्ययुगीन म्युन्स्टरमधील बदल

मध्ययुगीन म्युन्स्टरमध्ये जवळजवळ १०,००० रहिवाशी होते आणि ते सुमारे ३०० फूट रुंद व ५ किलोमीटरपर्यंत चहूकडेने अभेद्य अशा तटबंदीने घेरलेले होते. परंतु, शहराच्या आतील स्थिती मात्र तटबंदी इतकी स्थिर नव्हती. म्युन्स्टर शहराच्या संग्रहालयाने प्रकाशित केलेल्या द किंगडम ऑफ दि ॲनाबॅप्टिस्ट्‌स यात “शहरातील कायदेमंडळ आणि व्यापारी मंडळीमध्ये आंतरिक राजकीय मतभेद” यांचा उल्लेख केला आहे. शिवाय, तेथील रहिवाशी धर्मगुरूंच्या वर्तनामुळे संतापलेले होते. म्युन्स्टरने धर्मसुधारणेचा स्वीकार केला आणि १५३३ साली ते कॅथलिक शहरापासून ल्यूथरन शहर बनले.

म्युन्स्टरमध्ये धर्मसुधारणेचा प्रचार करणाऱ्‍यांपैकी अग्रेसर असलेला बर्नहार्ट रॉटमन नावाचा एक आततायी मनुष्य होता. लेखक फ्रेडरिक ओनिंगर म्हणतात की, रॉटमनची “मते निश्‍चितच ॲनाबॅप्टिस्ट होती; त्याने व त्याच्या सहकर्मींनी बालकांना बाप्तिस्मा देण्यास थेट नकार दिला.” म्युन्स्टरमध्ये त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला परंतु काही लोकांना त्याची मते टोकाची वाटत. “जुन्या धर्माचे पालन करणारे बहुतेक लोक शहर सोडून जाऊ लागले, त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला होता, काहीतरी अनिष्ट घडणार अशी भीती त्यांना वाटू लागली होती. वेगवेगळ्या भागांमधून ॲनाबॅप्टिस्ट मात्र आपल्या कल्पना पूर्ण व्हाव्यात या आशेने म्युन्स्टरमध्ये स्थलांतरित झाले.” सगळे ॲनाबॅप्टिस्ट लोक म्युन्स्टरमध्ये येऊन राहिल्यामुळे तेथे एक भयंकर घटना घडली.

नव्या येरुशलेमवर हल्ला

हार्लेमचा एक बेकरीवाला, यान माटीस आणि जॉन ऑफ लिडेन म्हणून ओळखला जाणारा यान बोकलसन या म्युन्स्टरमध्ये स्थलांतर केलेल्या दोन डच लोकांची तेथील घटनांमध्ये निर्णायक भूमिका होती. माटीस स्वतःला संदेष्टा म्हणवत होता आणि एप्रिल १५३४ मध्ये ख्रिस्ताचे दुसरे येणे होईल अशी त्याने घोषणा केली. ते शहर, बायबलमध्ये म्हटलेले नवे यरुशलेम आहे असे जाहीर करण्यात आले आणि तेथे जगाच्या अंताची अपेक्षा करणारे वातावरण निर्माण झाले. रॉटमन यांनी ठरवले की, जमीनजुमल्यावर समाजाचा मालकी हक्क असावा. प्रौढ रहिवाशांना निर्णय घ्यावा लागला: एकतर बाप्तिस्मा घ्यावा नाहीतर शहर सोडून जावे. सामूहिक बाप्तिस्मे करण्यात येऊ लागले ज्यामध्ये काहींनी केवळ घर आणि संपत्ती सोडून जावे लागू नये म्हणून पाण्यात बुडी घेतली.

ॲनाबॅप्टिस्ट लोकांचे धार्मिक आणि राजकीय वर्चस्व असलेले म्युन्स्टर हे पहिले शहर बनले तसे इतर समजांना दहशत बसली. डी टॉइफर त्सु मुन्स्टर या पुस्तकानुसार, यामुळे “जर्मन राष्ट्राच्या संपूर्ण पवित्र रोमन साम्राज्याचा रोष म्युन्स्टरवर ओढवला.” त्या ठिकाणातील एक प्रमुख व्यक्‍ती, राजकुमार-बिशप काऊंट फ्रॉन्स्ट्‌स फॉन वॉल्डेक, यांनी म्युन्स्टरवर कब्जा करण्यासाठी सैन्य जमवले. या सैन्यात ल्यूथरन आणि कॅथलिक या दोघांचा समावेश होता. हे दोन्ही गट जे आतापर्यंत धर्मसुधारणेच्या विरोधात होते आणि जे तीस वर्षांच्या युद्धात एकमेकांविरुद्ध लढणार होते ते ॲनाबॅप्टिस्ट लोकांविरुद्ध लढण्यास एक झाले.

ॲनाबॅप्टिस्ट साम्राज्याचा अंत

शहराच्या भितींमागे सुरक्षित असलेल्यांना चाल करून आलेल्या सैन्याची शक्‍ती पाहून भीती वाटली नाही. एप्रिल १५३४ मध्ये, ख्रिस्ताच्या दुसऱ्‍या येण्याची अपेक्षा होती तेव्हा माटीस पांढऱ्‍या घोड्यावर स्वार होऊन आपल्याला देवाचे संरक्षण मिळेल असा विचार करून शहराबाहेर गेला. माटीसचे समर्थक शहराच्या भिंतीवरून बाहेर पाहत होते; शहराभोवती घेरा करून असलेल्या सैन्याने माटीसच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्याचे डोके एका खांबावर लावून उंचावले तेव्हा त्या समर्थकांना किती धक्का बसला असेल याचा विचार करा.

जॉन ऑफ लिडेन हा माटीसचा उत्तराधिकारी बनला आणि त्याला म्युन्स्टरमधील ॲनाबॅप्टिस्ट लोकांचा यान राजा असे नाव देण्यात आले. त्या शहरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची अधिक संख्या होती; हा असमतोल दूर करण्यासाठी त्याने पुरुषांना वाटेल तितक्या बायका करण्याचे उत्तेजन दिले. म्युन्स्टरमधील ॲनाबॅप्टिस्ट साम्राज्यात असा विरोधाभास होता की, एकीकडे जारकर्म आणि व्यभिचार यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती तर दुसरीकडे बहुविवाहाला केवळ संमतीच नव्हती तर त्यास उत्तेजन दिले जात असे. स्वतः यान राजानेच १६ बायका केल्या. त्यांच्यापैकी एक, एलीझाबेथ वॉन्टशेर हिने शहरातून बाहेर जाण्याची परवानगी मागितली तेव्हा तिचा सार्वजनिकरित्या शिरच्छेद करण्यात आला.

शहराभोवती १४ महिने सैन्यांनी वेढा घातला होता आणि शेवटी जून १५३५ मध्ये शहरावर कब्जा करण्यात आला. म्युन्स्टरमध्ये दिसलेले विनाशाचे दृश्‍य दुसऱ्‍या महायुद्धापर्यंत दिसले नाही. रॉटमन कसाबसा वाचला परंतु यान राजा व आणखी दोन प्रमुख ॲनाबॅप्टिस्ट व्यक्‍तींना धरून, छळ करून त्यांचा वध करण्यात आला. त्यांचे देह पिंजऱ्‍यांमध्ये घालून सेंट लॅम्बर्ट चर्चच्या बुरूजावर अडकवण्यात आले. सेफर्ट म्हणतात: हा “सर्व संभाव्य विद्रोहकांसाठी एक भयप्रद इशारा होता.” होय, राजकारणात लुडबुड केल्याचे हे भयंकर परिणाम होते.

पण इतर ॲनाबॅप्टिस्ट समाजांचे काय झाले? संपूर्ण युरोपात कित्येक वर्षे छळ होत राहिला. बहुतेक ॲनाबॅप्टिस्ट लोकांनी आपली युद्ध विरोधी मते शेवटपर्यंत सोडली नाहीत पण त्यांच्यापैकी अल्पसंख्यांक युद्धपिपासू होते. कालांतराने, पूर्वी पाळक असलेले मेन्‍नो सिमन्स हे ॲनाबॅप्टिस्ट लोकांचे पुढारी बनले आणि नंतर या गटाला मेननाईट्‌स किंवा इतर नावे पडली.

तीन पिंजरे

ॲनाबॅप्टिस्ट हे वास्तविक पाहता धार्मिक वृत्तीचे लोक होते ज्यांनी बायबलमधील तत्त्वांचे काटेकोर पालन करायचा प्रयत्न केला. परंतु म्युन्स्टरमधील सुधारणावादी विचाराच्या लोकांमुळे त्यांनी तो मार्ग सोडला आणि राजकारणात सामील झाले. हे घडल्यावर त्यांच्या चळवळीने क्रांतीकारी रूप धारण केले. ॲनाबॅप्टिस्ट चळवळीकरता आणि म्युन्स्टरच्या मध्ययुगीन शहराकरता हा बदल विनाशकारी ठरला.

शहराच्या केंद्रस्थानी भेट देणाऱ्‍या लोकांना सुमारे ५०० वर्षांआधी घडलेल्या या भयंकर घटनांची अजूनही आठवण करून दिली जाते. ती कशी? तेथील चर्चच्या बुरूजावर अडकवलेल्या तीन लोखंडी पिंजऱ्‍यांद्वारे.

[तळटीप]

^ परि. 9 या लेखात लहान मुलांचा बाप्तिस्मा योग्य आहे किंवा नाही याची कारणमीमांसा दिलेली नाही. या विषयावर आणखी जाणून घ्यायचे असल्यास, मार्च १५, १९८६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील “बालकांचा बाप्तिस्मा व्हावा का?” हा लेख पाहा.

[१३ पानांवरील चित्रे]

यान राजाचा छळ करून वध करण्यात आला आणि त्याला सेंट लॅम्बर्ट चर्चच्या बुरूजावर लटकवण्यात आले