व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अपरिमित दुःख असूनही माझं जीवन समाधानी होतं

अपरिमित दुःख असूनही माझं जीवन समाधानी होतं

जीवन कथा

अपरिमित दुःख असूनही माझं जीवन समाधानी होतं

ऑड्री हाईड यांच्याद्वारे कथित

पूर्ण वेळेच्या ६३ वर्षांकडे—पैकी यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयातील ५९ वर्षांकडे—मागे वळून पाहिल्यावर मी म्हणू शकते, की मी खरोखरच एक समाधानी जीवन जगले आहे. हे खरं आहे, की माझ्या पहिल्या पतीला, कॅन्सरमुळे हळूहळू मरताना आणि दुसऱ्‍या पतीला अलझायमर्सच्या आजाराचे भयानक परिणाम सहन करताना पाहणे अतिशय क्लेशदायक होते. तरीपण, या बेसुमार दुःखातही मी माझा आनंद कसा टिकवून ठेवू शकले ते मी तुम्हाला सांगू इच्छिते.

नेब्रास्का सीमेजवळील ईशान्येकडील कोलोराडोच्या पठारावरील हॅक्स्टनच्या लहानशा गावाशेजारी असलेल्या एका मळ्यावर माझं बालपण गेलं. ऑरील आणि नीना मोकच्या सहा मुलांपैकी मी पाचवी. रसल, वेन, क्लेरा, आर्डिस यांचा जन्म १९१३ व १९२० सालांच्या दरम्यान झाला व पुढील वर्षी माझा जन्म झाला. १९२५ साली कर्टिसचा जन्म झाला.

एकोणीसशे तेरा साली आई, एक बायबल विद्यार्थिनी अर्थात यहोवाची साक्षीदार बनली. हळूहळू कुटुंबातील आम्ही सर्वही साक्षीदार बनलो.

पठारांवरील सुखद जीवन

बाबा, पुरोगामी विचारांचे होते. मळ्यावरील आमच्या सर्व इमारतींमध्ये विजेचे दिवे होते; त्या दिवसांतील ही जरा असामान्य गोष्ट होती. आमच्या घरी, घरच्याच कोंबड्यांची अंडी, घरच्याच गाईंचं दूध, दुधापासून काढलेली साय, लोणी असायचं. नांगरणी करण्यासाठी आम्ही घोड्यांचा उपयोग करायचो; स्ट्रॉबेरी, बटाटे, गहू, मका ही पिके काढायचो.

सर्व मुलांनी काम करायला शिकलं पाहिजे, असं बाबांचं मत होतं. मी शाळेला जायच्या आधीपासूनच मला शेतात काम करायला शिकवण्यात आलं. मला आठवतं, उन्हाळ्याच्या दिवसात तळपत्या उन्हात आम्ही प्रत्येक रांगेची खुरपणी करायचो. ‘रांगेच्या शेवटाला मी पोहंचेन का?’ असं मला वाटायचं. मी घामेघूम व्हायचे, मला मधमाशा चावायच्या. कधीकधी, मला स्वतःची कीव यायची कारण दुसऱ्‍या मुलांना माझ्यासारखं कष्टाचं काम नसायचं. पण आता मला कळतं, की लहानपणी आम्हाला कष्टाचं काम करायला शिकवल्यामुळे पुढे मला त्याचा फायदा झाला.

आम्हा सर्व मुलांना कामं वाटून दिली होती. माझ्यापेक्षा आर्डीसला उत्तमप्रकारे धार काढता यायची त्यामुळे मग, घोड्यांसाठी जिथं कडबा साठवून ठेवला जायचा ती जागा स्वच्छ करणं, लिद काढणं ही कामं माझ्याकडं आली. पण आम्ही खूप मजा देखील करायचो, खेळ खेळायचो. एका स्थानीय संघाबरोबर आर्डीस व मी सॉफ्टबॉल खेळायला जायचो. मी तिसऱ्‍या बेसला आणि आर्डीस पहिल्या बेसला उभी राहून खेळायची.

पठारांवर, रात्रीच्या वेळी निरभ्र आकाश किती देखणं दिसायचं! आकाशांतील हजारो तारे पाहून मी आपला निर्माणकर्ता यहोवा देव याची आठवण करायचे. आमचा कुत्रा जज माझ्याबरोबर असायचा; माझ्या मांडीवर आपलं डोकं टेकवून माझ्या शेजारी बसायचा. लहान असूनही मी स्तोत्र १४७:४ चा विचार करायचे, ज्यात म्हटलं आहे: “तो [यहोवा] ताऱ्‍यांची गणती करितो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.” दुपारच्या वेळी मी आमच्या देवडीवर बसून गव्हाची हिरवी शेतं, वाऱ्‍याच्या तालावर झुलताना पाहायचे; त्यांच्यावर सूर्यकिरणे पडायची तेव्हा ती रुप्यासारखी चमकायची.

आईचं उत्तम उदाहरण

माझी आई अतिशय प्रेमळ व एकनिष्ठ पत्नी होती. बाबा घरात पुढाकार घेणारे होते, आईनं आम्हाला त्यांचा आदर करायला शिकवलं. १९३९ साली तेही यहोवाचे साक्षीदार बनले. आम्हाला माहीत होतं, की बाबा आम्हाला कष्टाचं काम करायला लावत असले तरी व ते आमचे फाजील लाड पुरवत नसले तरीसुद्धा त्यांचं आमच्यावर अपार प्रेम आहे. कधीकधी हिवाळ्याच्या दिवसांत ते, घसरगाडीला घोडे जुंपून बर्फावरून आम्हाला एक फेरी द्यायचे. चकाकणारा बर्फ खरोखरच नेत्रसुखद होता!

पण देवावर प्रेम करायला, बायबलचा आदर करायला खरं तर आईनं आम्हाला शिकवलं. देवाचं नाव यहोवा आहे व तो जीवनाचा उगम आहे हे आम्ही शिकलो. (स्तोत्र ३६:९; ८३:१८) आम्ही हेही शिकलो, की त्यानं आपल्याला मार्गदर्शन, आपल्याकडून मौजमजा हिरावून घेण्यासाठी नव्हे तर आपला लाभ व्हावा म्हणून दिलं आहे. (यशया ४८:१७) आपल्याला एक खास काम करायचं आहे, यावर आई सतत जोर द्यायची. येशूनं आपल्या शिष्यांना काय सांगितलं होतं तेही आम्ही शिकलो; तो त्यांना म्हणाला होता: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

लहान असताना, शाळेतून घरी आल्यावर मी आईला घरात पाहिलं नाही की लगेच तिला शोधायला लागायचे. एकदा, मी सहा की सात वर्षांची होते, आणि मी आईला अशीच शोधत निघाले, ती कडब्याच्या पडळीत होती. जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही पडळीतील दुसऱ्‍या मजल्यावर होतो व मी आईला विचारलं, की देव दुसरा जलप्रलय आणतोय का गं? तिनं मला खात्रीनं सांगितलं, की देव पुन्हा जलप्रलयानं पृथ्वीचा नाश करणार नाही, असं त्याने वचन दिलं आहे. आम्ही जिथं राहत होतो तिथं सर्रासपणे झंझावती वारं सुटायचं; अशा वेळी आम्ही आमच्या घराजवळच्या तळघरात पळत जायचो, हेही मला आठवतं.

माझा जन्म व्हायच्या आधीपासूनच आई प्रचार कार्यात भाग घेऊ लागली होती. आमच्या घरी एक गट जमा व्हायचा; त्या सर्वांना स्वर्गामध्ये ख्रिस्ताबरोबर राज्य करण्याची आशा होती. आईला घरोघरी जाऊन प्रचार करायला भीती वाटायची, पण देवाबद्दलच्या प्रीतीनं तिच्या या भयावर मात केली. नोव्हेंबर २४, १९६९ म्हणजे तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत ती विश्‍वासू राहिली; ती ८४ वर्षांची होती. मी हळूच तिच्या कानात म्हणाले: “आई, तू स्वर्गात चाललीस, तुझ्या ओळखीच्या लोकांबरोबर तू असशील.” तिच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत मी तिच्याबरोबर होते याचा आणि मी तिच्या आशेवरील माझा भरवसा व्यक्‍त केल्याचा मला खूप आनंद होतो! ती मला मंद आवाजात म्हणाली: “किती जपतेस गं मला.”

आम्ही प्रचार करू लागतो

त्या काळी यहोवाच्या साक्षीदारांमधील पायनियरांना, पूर्ण वेळेचे सुवार्तिक असं म्हणायचे; तर १९३९ साली, रसल पूर्ण वेळेचा सुवार्तिक झाला. १९४४ पर्यंत त्याने ओक्लाहोमा आणि नेब्रास्कात पायनियरींग केली; त्यानंतर त्याला न्यूयॉर्क ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात म्हणजे बेथेलला बोलावण्यात आलं. सप्टेंबर २०, १९४१ रोजी मी पायनियरींग सुरू केली आणि कोलोराडो, कॅन्सास, नेब्रास्काच्या विविध ठिकाणी सेवा केली. मी लोकांना यहोवाविषयी शिकायला मदत करत होते केवळ यामुळेच नव्हे तर मी स्वतः त्याच्यावर विसंबून राहण्यास शिकले होते यामुळे पायनियरींगची ती वर्षं आनंदाची होती.

रसलनं पायनियरींग सुरू केली तेव्हा वेन, काही काळ नोकरी केल्यानंतर संयुक्‍त संस्थानाच्या ईशान्येकडील एका कॉलेजला जाऊ लागला होता. नंतर त्यालाही बेथेलला बोलावण्यात आलं. न्यूयॉर्कमधील इथाका येथील किंगडम फार्मवर त्यानं काही वर्षं सेवा केली. इथं राहणाऱ्‍या लहानशा बेथेल परिवारासाठी तसेच ब्रुकलिन बेथेलच्या सुमारे २०० कामगारांसाठी फार्मचं म्हणजे शेतातलं धान्यधुन्य यायचं. वेननं, १९८८ मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत आपल्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा यहोवाच्या सेवेत उपयोग केला.

माझी बहीण आर्डिस हिनं, जेम्स कर्न यांच्याबरोबर लग्न केलं आणि त्यांना पाच मुलं झाली. १९९७ साली ती वारली. माझी थोरली बहीण क्लेरा अजूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहे; मी आताही सुटीसाठी म्हणून कोलोराडोतील तिच्या घरी जाते. आमचा धाकटा भाऊ कर्टीस १९४० च्या दशकात ब्रुकलिन बेथेलमध्ये गेला. तो, ट्रक चालवायचा; ब्रुकलिन ते किंगडम फार्म अशा त्याच्या फेऱ्‍या असायच्या; ट्रकमधून सामानसुमान, शेतातलं उत्पन्‍न वगैरेंची तो नेआण करायचा. त्यानं लग्न केलं नाही. १९७१ साली तो वारला.

माझी इच्छा—बेथेल सेवा

माझे थोरले भाऊ बेथेलला गेले होते त्यामुळे मलाही तेथे जाऊन सेवा करायची इच्छा होती. त्यांच्या उत्तम उदाहरणामुळेच मला बेथेलला येण्याचं आमंत्रण मिळालं. देवाच्या संघटनेच्या इतिहासाविषयी आई मला जे सांगायची आणि शेवटल्या दिवसांविषयी बायबलमधील भविष्यवाणींची पूर्णता मी पाहिल्यामुळे माझ्यात बेथेलमध्ये सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली होती. मी प्रार्थनेद्वारे यहोवाला वचन दिलं, की त्यानं मला बेथेलमध्ये सेवा करू दिली तर मी, माझ्यावर कोणतीही ख्रिस्ती जबाबदारी नाही तोपर्यंत कधीच बेथेल सेवा सोडणार नाही.

जून २०, १९४५ रोजी मी बेथेलला आले; मला निवासी खोल्यांची स्वच्छता करण्याचे काम नेमण्यात आलं. एकूण १३ खोल्या साफ कराव्या लागायच्या आणि दररोज २६ बिछाने तयार करावे लागायचे; याशिवाय, गॅलरी, पायऱ्‍या आणि खिडक्या साफ कराव्या लागायच्या. हे कष्टाचं काम होतं. काम करत असताना दररोज मी स्वतःला सांगायचे, ‘आपण थकलोय खरं, पण आपण बेथेलमध्ये देवाच्या घरात आहोत!’

नेथन नॉर यांच्याशी विवाह

१९२० पासून, ज्या बेथल सदस्यांना लग्न करायचं होतं त्यांना बेथेल सोडावं लागायचं आणि दुसरीकडे सेवा करावी लागायची. पण, १९५० च्या दशकाच्या सुरवातीला, काही काळ बेथेलमध्ये सेवा केलेल्या काही जोडप्यांना लग्न केल्यानंतरही बेथेलमध्ये राहू दिलं होतं. त्यामुळे, जगव्याप्त प्रचार कार्यात त्या वेळी पुढाकार घेणाऱ्‍या नेथन एच. नॉर यांनी माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्‍त केली तेव्हा मी मनातल्या मनात म्हटलं, ‘यांना बेथेलमधून पाठवणार नाहीत!’

नेथन यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कार्याची देखरेख करण्याच्या कामात बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या होत्या. त्यामुळे, त्यांनी मला अगदी उघडपणे बोलून दाखवले, की त्यांच्या मागणीचा स्वीकार करण्याआधी मी काळजीपूर्वक विचार करावा. होकार देण्याआधी त्यांनी मला अनेक कारणांचा विचार करण्यास सांगितले. त्या दिवसांत, ते संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखांना भेटी द्यायला नेहमी दौऱ्‍यावर असायचे; कधीकधी तर कित्येक आठवडे त्यांना बाहेर राहावं लागायचं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की आपण सतत एकमेकांबरोबर राहू शकणार नाही.

लहान असताना मी स्वप्न पाहायचे, की माझं लग्न वसंतऋतुत होतं आणि आम्ही दोघं पतीपत्नी हवाईच्या प्रशांत द्वीपांवर मधुचंद्रासाठी जातो. पण झालं असं, की आमचं लग्न हिवाळ्यात जानेवारी ३१, १९५३ रोजी झालं आणि त्या शनिवारी व रविवारी आम्ही आमचा मधुचंद्र न्यू जर्शीतच केला. सोमवारी आम्ही लागलो आमच्या कामाला. पण एक आठवड्यानंतर आम्ही, आठवडाभर मधुचंद्रासाठी गेलो.

कष्टाळू सोबती

नेथन, १९२३ साली बेथेलला आले तेव्हा ते १८ वर्षांचे होते. त्यांना, साक्षीदारांच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्‍या जोसफ एफ. रदरफोर्ड, प्रिंटरी मॅनेजर, रॉबर्ट जे. मार्टिन यांसारख्या अनुभवी व्यक्‍तींकडून अमूल्य प्रशिक्षण मिळालं. बंधू मार्टिन १९३२ सालच्या सप्टेंबर महिन्यात वारले आणि नेथन प्रिंटरी मॅनेजर झाले. पुढील वर्षी, बंधू रदरफोर्ड यांनी नेथन यांना आपल्यासोबत युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखांना भेटी देण्यासाठी दौऱ्‍यावर नेलं. १९४२ सालच्या जानेवारीत बंधू रदरफोर्ड वारले तेव्हा नेथन यांच्यावर यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कार्यावर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

नेथन प्रगतीशील होते, ते नेहमी भावी वाढीची आगाऊ योजना करायचे. काहींना हे आवडायचं नाही, कारण तेव्हा, युगाची समाप्ती जवळ आली आहे असं समजलं जायचं. एकदा तर, नेथन यांनी केलेल्या योजना पाहून एका बांधवानं त्यांना असंही विचारलं: “हे काय आहे बंधू नॉर? तुम्हाला विश्‍वास नाही का?” नेथन यांनी त्यांना उत्तर दिलं: “मला विश्‍वास आहे, पण आपल्या अपेक्षेप्रमाणे अंत आला नाही तरी, आपण निदान तयार राहू शकतो, नाही का?”

नेथन यांच्या मनात, मिशनऱ्‍यांकरता एक प्रशाला स्थापण्याची ठाम कल्पना होती. त्यामुळे फेब्रुवारी १, १९४३ साली, माझा भाऊ वेन जिथं काम करायचा त्या किंगडम फार्मवर एका मिशनरी प्रशालेची सुरवात झाली. ही प्रशाला म्हणजे जवळजवळ पाच महिन्यांचा गहन बायबल अभ्यास कोर्स; पण प्रशालेतील विद्यार्थ्यांना काही विरंगुळाही मिळाला पाहिजे याची नेथन खात्री करायचे. प्रशालेच्या सुरवातीच्या काही वर्षांदरम्यान तेही सॉफ्टबॉल खेळायचे; पण नंतर त्यांनी खेळायचं सोडून दिलं; खेळता खेळता काही दुखापत झाल्यास, जवळ आलेल्या उन्हाळ्याच्या प्रांतीय अधिवेशनांना आपल्याला जाता येणार नाही असं त्यांना वाटलं. त्यांनी फक्‍त पंच व्हायचं ठरवलं. खेळांत भाग घेणाऱ्‍या विदेशी विद्यार्थ्यांसाठी ते जेव्हा नियम बदलायचे तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना खूप मजा यायची.

नेथन यांच्याबरोबर दौऱ्‍यावर

कालांतरानं मीही नेथन यांच्याबरोबर दौऱ्‍यावर जाऊ लागले. शाखेतील स्वयंसेवकांना व मिशनऱ्‍यांना अनुभव सांगायला मलाही आवडायचे. या पूर्णवेळेच्या सेवकांचं प्रेम, श्रद्धा मी पाहू शकले व त्यांना नेमलेल्या देशांत त्यांचा काय नित्यक्रम आहे, ते कोणत्या परिस्थितीत राहतात हे मी पाहू शकले. अशा भेटींसाठी आभार व्यक्‍त करणारी पत्रं मला आजही येतात.

आमच्या दौऱ्‍यांच्या वेळचे अनेक अनुभव मला आठवतात. एक अनुभव आम्ही पोलंडला गेलो होतो तेव्हाचा आहे; माझ्यासमोर दोन बहिणी एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या. मी त्यांना विचारलं: “तुम्ही असं का कुजबुजताय?” त्यांनी क्षमा मागितली आणि त्या म्हणाल्या, की पोलंडमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी होती तेव्हा साक्षीदार काय संभाषण करतात हे ऐकण्यासाठी अधिकारी साक्षीदारांच्या घरात मायक्रोफोन लपवून ठेवत असल्यामुळे त्यांना कुजबुजण्याची सवय लागली होती.

पोलंडमध्ये बंदी असताना सेवा केलेल्या अनेकांपैकी एक, भगिनी आडाह होती. तिचे कुरळे केस होते, आणि ते ती तिच्या कपाळापर्यंत घेत होती. एकदा तिनं मला कपाळावरील केस वर करून दाखवले; तिला छळणाऱ्‍या एकानं तिच्या कपाळावर इतक्या जोरानं मारलं होतं, की तिच्या कपाळावर ती खाच असूनही दिसत होती. आपल्या बंधूभगिनींना सहन कराव्या लागलेल्या क्रूर वागणुकीचे परिणाम मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा मला धक्का बसला.

बेथेलनंतर हवाई हे माझं आवडतं ठिकाण आहे. १९५७ साली हिलो शहरातील ते अधिवेशन मला आठवतं. हे अधिवेशन खास होतं आणि तिथं जमलेल्या लोकांची संख्या स्थानीय साक्षीदारांच्या संख्येपेक्षा अधिक होती. त्या शहराच्या महापौरांनी तर नेथन यांचे अधिकृत स्वागतही केलं होतं. पुष्कळ लोक आम्हाला भेटायला आले, त्यांनी आमच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या.

१९५५ साली जर्मनी, न्यूरेम्बर्ग येथे झालेले आणखी एक अधिवेशन, हिटलरचे कवाईत मैदान असलेल्या ठिकाणी झाले. जर्मनीतील यहोवाच्या लोकांचा नामोनिशाण मिटवण्याची हिटलरनं शपथ घेतली होती हे सर्वश्रुत होते, पण त्या दिवशी तेच स्टेडियम यहोवाच्या साक्षीदारांनी गच्च भरलं होतं! मला अश्रू आवरले नाहीत! स्टेज खूप प्रशस्त होतं आणि स्टेजच्या मागे १४४ भले मोठे खांब होते. मी स्टेजवर होते आणि १,०७,००० पेक्षा अधिक श्रोत्यांना पाहू शकत होते. किती तरी दूरपर्यंत लोक बसले होते, शेवटली रांग तर दिसतही नव्हती.

नात्सी शासनात छळाच्या वेळी या जर्मन बांधवांनी आपली एकनिष्ठता कशी टिकवून ठेवली होती, यहोवानं त्यांना कशी मजबूती दिली होती हे त्यांच्याबरोबर राहून आम्हाला जाणवत होतं. त्यामुळे, यहोवाशी एकनिष्ठ व विश्‍वासू राहण्याचा आमचा दृढनिश्‍चय आणखी पक्का झाला. नेथन यांनी शेवटचं भाषण दिलं आणि त्या भाषणाच्या शेवटी त्यांनी हात हलवून श्रोत्यांचा निरोप घेतला. श्रोत्यांनीसुद्धा लगेच आपापली रुमाले फडकवून प्रतिसाद दिला. ते दृश्‍य बहरलेल्या फुलांच्या मळ्यासारखे दिसत होते.

१९७४ साली डिसेंबर महिन्यात आम्ही पोर्तुगालला दिलेली भेटही अविस्मरणीय होती. आपल्या कार्याला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर लिसबन येथे भरवण्यात आलेल्या पहिल्या सभेला आम्ही उपस्थित राहिलो. इथं ५० वर्षं बंदी होती. त्या काळी देशात फक्‍त १४,००० राज्य प्रचारक होते तरी, तेथे झालेल्या दोन सभांची उपस्थिती ४६,००० पेक्षा अधिक होती. तिथल्या बांधवांनी जेव्हा असं म्हटलं, की “आता आम्हाला लपायची गरज नाही. आम्ही मुक्‍त आहोत,” तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं.

नेथन यांच्याबरोबर मी दौऱ्‍याला जात असलेल्या दिवसांपासून आजपर्यंत मला, विमानात, रेस्टॉरंटमध्ये असताना अनौपचारिक साक्षकार्य करायला आणि रस्त्यावर साक्षकार्य करायला आवडतं. मी नेहमी सोबत प्रकाशनं बाळगत असते, म्हणजे मी केव्हाही साक्ष देऊ शकते. एकदा, आम्ही उशीर झालेल्या एका विमानासाठी थांबलो होतो. तेव्हा एका बाईनं मला विचारलं, तुम्ही कुठं काम करता? यामुळे तिच्याबरोबर आणि आमचं बोलणं ऐकणाऱ्‍या आजुबाजूला बसलेल्या लोकांबरोबरही संभाषण सुरू झालं. अशाप्रकारे बेथेल सेवेनं व प्रचार कार्यानं मला नेहमी व्यस्त व आनंदी ठेवलं आहे.

आजारपण व शेवटलं उत्तेजन

१९७६ साली नेथन कॅन्सरमुळे आजारी पडले व बेथेल परिवारातील सदस्यांसह मी त्यांना त्यांचं आजारपण सहन करायला मदत केली. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती तरीपण आम्ही, ब्रुकलिनला प्रशिक्षणासाठी आलेल्या जगातील विविध राष्ट्रांच्या शाखा दफ्तरांतील सदस्यांना आमच्या घरी बोलवत असू. डॉन आणि अर्लीन स्टील, लॉईड आणि मेल्बा बॅरी, डगलस आणि मेरी गेस्ट, मार्टिन आणि गर्ट्रुट पोयटसिंगर, प्राईस ह्‍यूज आणि आणखी इतरांनी दिलेल्या भेटी मला अजूनही आठवतात. ते नेहमी आम्हाला त्यांच्या देशांतले अनुभव सांगायचे. बंदी असलेल्या देशांतील बांधवांच्या दृढतेशी संबंधित असलेले अनुभव ऐकून मी खासकरून प्रभावीत झाले.

नेथन यांना जेव्हा जाणवलं, की ते आता जास्त दिवस जगणार नाहीत तेव्हा त्यांनी मला, विधवा झाल्यानंतर मला मदत मिळावी म्हणून काही उपयुक्‍त सल्ला दिला. ते म्हणाले: “आपला सुखी संसार होता. पुष्कळ लोकांना हा अनुभव येत नाही.” आमच्या संसाराला सुखी बनवणारी एक गोष्ट म्हणजे, नेथन यांचा विचारीपणा. जसं की, प्रवास करताना आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटायचो तेव्हा ते मला म्हणायचे: “ऑड्री, कधीकधी मी तुझी ओळख त्यांच्याबरोबर करून देत नाही कारण मी त्यांचं नाव विसरून गेलेलो असतो.” त्यांनी मला हे आधीच सांगितलं असल्यामुळे मला कधी वाईट वाटलं नाही.

नेथन यांनी मला आठवण करून दिली: “मृत्यूनंतर आपली आशा पक्की होते आणि आपल्याला पुन्हा कधीही दुःख सहन करावं लागणार नाही.” मग मला आर्जवत ते म्हणाले: “भविष्याकडे पाहा. कारण तुझं प्रतिफळ तिथं आहे. तुला जुन्या आठवणी येत राहतील परंतु गत काळावर विचार करत बसू नकोस. वेळ तुझ्या जखमा भरायला मदत करेल. मनात राग बाळगू नकोस, स्वतःची दया करत बसू नकोस. तुला हा आनंद, हे आशीर्वाद अनुभवायला मिळाले म्हणून आनंद कर. काही काळानंतर तुला दिसून येईल, की आठवणींमुळे आनंद मिळतो. आठवणी, या देवाने आपल्याला दिलेल्या देणग्या आहेत. इतरांसाठी काही करत राहण्यासाठी आपल्या जीवनाचा उपयोग करत राहण्यात व्यस्त राहा. यामुळे तुला जगण्यातला आनंद मिळेल.” १९७७ सालच्या जून ८ तारखेला नेथन यांनी आपली पृथ्वीवरील सेवा संपवली.

ग्लेन हाईड यांच्याबरोबर लग्न

नेथन यांनी मला सांगितलं होतं, की मी एकतर जुन्या आठवणी उराशी बाळगून जगू शकत होते किंवा एका नव्या जीवनाची सुरवात करू शकत होते. त्यामुळे १९७८ साली, न्यूयॉर्क वॉलकील येथील वॉचटावर मळ्यात माझी बदली झाल्यानंतर मी, अतिशय देखण्या दिसणाऱ्‍या, शांत व मृदू स्वभावाच्या ग्लेन हाईड यांच्याशी लग्न केलं. साक्षीदार होण्याआधी ते, संयुक्‍त संस्थानाचे जपानबरोबर युद्ध चालले होते तेव्हा नौदलात होते.

ग्लेन गस्त घालणाऱ्‍या बोटीवर इंजिन रूममध्ये काम करायचे. इंजिनच्या आवाजामुळे त्यांची अर्धी श्रवणशक्‍ती नाहीशी झाली होती. युद्ध थांबल्यानंतर ते फायरमन झाले. कित्येक वर्षं त्यांना युद्धातील अनुभवांमुळे भयानक स्वप्नं पडायची. अनौपचारिक साक्ष देणाऱ्‍या त्यांच्या सेक्रेटरीकडून त्यांना बायबल सत्य मिळालं.

नंतर, १९६८ साली ग्लेन यांना बेथेलला ब्रुकलिनमध्ये फायरमन म्हणून काम करण्यासाठी बोलावण्यात आलं. मग, वॉचटावर फार्मनं जेव्हा आगीचा बंब आणला तेव्हा त्यांना तेथे १९७५ साली पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अलझायमर्सचा आजार जडला. आमचं लग्न होऊन दहा वर्षं उलटल्यावर ग्लेन वारले.

मी हे दुःख कसं झेललं? नेथन यांनी मला दिलेल्या उत्तेजनामुळे मला पुन्हा एकदा सांत्वन मिळालं. विधवा झाल्यावर मला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल याबद्दल त्यांनी माझ्यासाठी जे लिहून ठेवलं होतं ते मी वाचत राहिले. आजही ज्यांचे विवाह सोबती मरण पावतात त्यांना मी यांतील काही गोष्टी वाचून दाखवते आणि त्यांनाही नेथन यांच्या सल्ल्यातून सांत्वन मिळाले आहे. पण नेथननी मला उत्तेजन दिल्याप्रमाणे भविष्याकडे पाहणे फायदेकारक आहे.

अमूल्य बंधूवर्ग

माझ्या आनंदी, समाधानी जीवनात भर घातली आहे, ती बेथेल कुटुंबातील माझ्या प्रिय मित्रांनी. यांपैकी एक आहे एस्तेर लोपेझ; १९४४ साली वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या तिसऱ्‍या वर्गातून ती पदवीधर झाली होती. १९५० सालच्या फेब्रुवारी महिन्यात ती ब्रुकलिनला स्पॅनिशमध्ये आपल्या बायबल साहित्याचं भाषांतर करण्यासाठी पुन्हा आली. नेथन जेव्हा दौऱ्‍यावर जायचे तेव्हा एस्तेर माझी जवळची मैत्रीण होती. ती देखील वॉचटावर फार्म्सवर आहे. आता तिनं नवदी पार केली आहे आणि तिची तब्येत ढासळत चालली आहे. बेथेलमधील इन्फमरीत तिची देखभाल केली जाते.

माझ्या कुटुंबातले आता फक्‍त रसल आणि क्लेराच हयात आहेत. रसलनं नवदी पार केली आहे व विश्‍वासूपणे ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करत आहे. लग्न केल्यानंतर राहू दिलेल्यांपैकी तो पहिला होता. १९५२ साली त्याचं बेथेलमधल्याच जीन लार्सन हिच्याशी लग्न झालं. जीनचा भाऊ मॅक्स १९३९ साली बेथेलला आला आणि १९४२ साली नेथननंतर तो प्रिंटरी पर्यवेक्षक झाला. मॅक्स यांच्यावर आजही बेथेलमध्ये जबाबदाऱ्‍या आहेत याशिवाय त्यांना मल्टीपल स्क्लेरोसीसचा आजार झालेल्या आपल्या पत्नीची अर्थात हेलनची देखील देखभाल करावी लागते.

यहोवाच्या पूर्ण वेळेच्या ६३ वर्षांच्या सेवेकडे मी मागे वळून पाहते तेव्हा मी म्हणू शकते, की होय, माझं खरोखरच समाधानी जीवन होतं. बेथेलंच माझं घर झालं आणि इथं मी आनंदानं सेवा करत आहे. कष्टाचं काम करण्याची सवय लावल्याचं आणि यहोवाची सेवा करण्याची मनात इच्छा निर्माण केल्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देते. पण, आपल्या अद्‌भुत बंधूसमाजामुळे, आपल्या बंधूभगिनींबरोबर परादीस पृथ्वीवर राहण्याच्या तसेच एकमेव खरा देव असलेल्या आपल्या महान निर्माणकर्त्याची अनंतकाळ सेवा करण्याच्या आशेमुळे जीवन समाधानकारक बनतं.

[२४ पानांवरील चित्र]

१९१२ सालच्या जून महिन्यात झालेल्या माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा फोटो

[२४ पानांवरील चित्र]

डावीकडून उजवीकडे: रसल, वेन, क्लेरा, आर्डिस, मी आणि कर्टीस, १९२७ साली

[२५ पानांवरील चित्र]

१९४४ साली पायनियरींग करताना, फ्रान्सीस व बार्बरा मॅक्नॉट या दोघींच्या मध्ये मी उभी आहे

[२५ पानांवरील चित्र]

१९५१ साली बेथेलमध्ये. डावीकडून उजवीकडे: मी, एस्तेर लोपेझ आणि माझी वहिणी, जीन

[२६ पानांवरील चित्र]

नेथन आणि त्यांचे आईवडील यांच्यासोबत

[२६ पानांवरील चित्र]

१९५५ साली नेथन यांच्याबरोबर

[२७ पानांवरील चित्र]

हवाई इथं नेथन यांच्याबरोबर

[२९ पानांवरील चित्र]

माझे दुसरे पती, ग्लेन यांच्याबरोबर