व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘ते तारवातून कुप्रास गेले’

‘ते तारवातून कुप्रास गेले’

‘ते तारवातून कुप्रास गेले’

अशाप्रकारे, प्रेषितांची कृत्ये पुस्तक, ख्रिस्ती मिशनरी पौल, बर्णबा आणि योहान मार्क यांनी सा.यु. ४७ सालच्या सुमारास कुप्रला (सायप्रस) भेट दिल्याच्या अहवालाची सुरवात करते. (प्रेषितांची कृत्ये १३:४) आजच्या सारखे तेव्हाही पूर्व भूमध्यात कुप्र हे एक महत्त्वाचे स्थान होते.

रोमनांनी हे द्वीप कसेही करून मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सा.यु.पू. ५८ मध्ये त्यांनी तो मिळवला सुद्धा. त्याआधी कुप्रचा इतिहास लक्षणीय घटनांनी भरला होता. त्यांवर फिनिशियन, ग्रीक, असेरियन, पर्शियन मग इजिप्शियन लोकांनी राज्य केले. मध्ययुगात क्रुसेडर्स, फ्रॅन्क्स, विनिशियन्स आणि त्यानंतर ऑटोमन्सने त्यावर राज्य केले. १९१४ साली ब्रिटिशांनी या द्वीपावर कब्जा केला आणि १९६० मध्ये त्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यावर राज्य केले.

आता, पर्यटन व्यवसाय हा तिथल्या लोकांचा पैसा कमवण्याचा मुख्य मार्ग आहे; परंतु पौलाच्या दिवसात कुप्रात नैसर्गिक संपत्ती भरपूर होती. यामुळे रोमचे खजिने भरून काढण्यासाठी रोमनांनी त्याचा पूर्ण वापर केला. द्वीपाच्या इतिहासाच्या सुरवातीला तांब्याचा शोध लागला आणि असा अंदाज लावला जातो, की रोमी शासनाच्या शेवटापर्यंत, २,५०,००० टन तांबे येथून काढण्यात आले होते. परंतु शुद्धीकरणासाठी असलेल्या तांब्याच्या कारखान्यांमुळे, दाट जंगलाचा बहुतेक भाग तोडण्यात आला. पौलाने या द्वीपाला भेट देईपर्यंत तेथील बहुतेक जंगले नाहीशी झाली होती.

कुप्रावर रोमनांचे राज्य

एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिकानुसार, पहिल्यांदा जुलियस सिझरने आणि नंतर मार्क अँटनीने इजिप्तला कुप्र दिले. परंतु, ऑगस्टसच्या शासनात ते पुन्हा रोमकडे गेले आणि प्रेषितांची कृत्ये पुस्तकाचा लेखक लूक याने अचूकपणे नोंद केल्याप्रमाणे थेट रोमला जबाबदार असलेल्या एका सुभेदाराने त्यावर राज्य केले. पौल तेथे प्रचार करत असताना, सिर्ग्य पौल हा सुभेदार होता.—प्रेषितांची कृत्ये १३:७.

पाक्स रोमाना, रोमने प्रस्तुत केलेल्या आंतरराष्ट्रीय शांतीच्या संकल्पनेमुळे, कुप्रमध्ये खाणींचा व कारखान्यांचा विस्तार वाढला ज्यामुळे आर्थिक व्यवस्थेत भरभराट झाली. रोमी सैन्यामुळे व द्वीपाची कुलदैवता ॲफ्रोडाईट हिच्या मंदिरात येणाऱ्‍या तीर्थयात्रकरूंमुळे जादा मिळकत मिळू लागली. यामुळे नवीन रस्ते, नवीन बंदरे, बादशाही सार्वजनिक इमारती बांधण्यात आल्या. अधिकृत भाषा ग्रीकच राहिली आणि रोमी सम्राटासोबत ॲफ्रोडाईट, अपोलो, झ्यूस यांची उपासना केली जायची. लोकांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन भरभराटीचे, समृद्धतेचे होते.

पौल जेव्हा कुप्रमध्ये प्रवास करत होता व लोकांना ख्रिस्ताविषयी शिकवत होता तेव्हा अशीच परिस्थिती होती. परंतु, पौलाच्या आधीच ख्रिस्ती धर्माचा कुप्रमध्ये प्रसार झाला होता. प्रेषितांची कृत्ये यांतील अहवालानुसार, पहिला ख्रिस्ती हुतात्मा स्तेफन याच्या मृत्यूनंतर आरंभीचे काही ख्रिस्ती कुप्रला पळून गेले होते. (प्रेषितांची कृत्ये ११:१९) पौलाचा सोबती बर्णबा मूळचा कुप्र येथील होता. तिथल्या गल्ली-बोळांशी परिचित असल्यामुळे तो पौलासाठी त्याच्या प्रचारदौऱ्‍याच्या वेळी उत्तम मार्गदर्शक ठरला.—प्रेषितांची कृत्ये ४:३६; १३:२.

कुप्रमधील पौलाच्या दौऱ्‍यांची उजळणी

कुप्रमधील पौलाच्या दौऱ्‍यांची तपशीलवार माहिती देणे शक्य नाही. परंतु, पुरातत्त्वतज्ज्ञांना रोमन काळातील उत्तम रस्त्यांविषयी बरीच स्पष्ट माहिती आहे. द्वीपाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे, प्राचीन मिशनऱ्‍यांनी कदाचित जे मार्ग घेतले असतील त्याच मार्गांचा नमुना आजच्या आधुनिक महामार्गांना अनुसरावा लागतो.

पौल, बर्णबा आणि योहान मार्क यांनी सलुकीया ते सलमीना येथपर्यंतचा समुद्रप्रवास केला. पण राजधानी व मुख्य बंदर पफेस असताना ते सलमीनाला का गेले? एक कारण, सलमीना, सलुकीया मेनलँडपासून केवळ २०० किलोमीटर दूर असलेल्या पूर्व किनाऱ्‍यावर होते. रोमनांनी काबीज केलेल्या सलमीनाऐवजी पफेस राजधानीचे ठिकाण झालेले असले तरी, सलमीनाच द्वीपाचे सांस्कृतिक, शैक्षणिक व व्यावसायिक केंद्र राहिले. सलमीनात बरेच यहुदी होते आणि या मिशनऱ्‍यांनी “यहूद्यांच्या सभास्थानांमध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली.”—प्रेषितांची कृत्ये १३:५.

आज, सलमीनाचे केवळ अवशेष उरले आहेत. तरीही, पुरातत्त्वीय संशोधनावरून सलमीनाच्या वैभवाचा व संपत्तीचा पुरावा मिळतो. राजनैतिक व धार्मिक कार्यहालचालींचे केंद्र असलेली बाजारपेठ, भूमध्य प्रदेशात उत्खनन केलेल्या रोमी बाजारपेठांपैकी कदाचित सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. ऑगस्टस सिझरच्या काळच्या अवशेषांत, नाजूक कुट्टिमचित्रे असलेल्या फरशा, व्यायामशाळा, प्रशस्त स्नानगृहे, एक स्टेडियम व खुले प्रेक्षागृह, बादशाही कबरा आणि १५,००० लोक बसू शकतील इतके मोठे नाट्यमंदिर आढळले आहे. जवळपास, झ्यूसच्या भव्य मंदिराचे देखील अवशेष आहेत.

परंतु झ्यूस, नासधूस करणाऱ्‍या भूकंपांपासून शहराला वाचवू शकला नाही. सा.यु.पू. १५ मध्ये एका मोठ्या भूकंपाने सलमीनाच्या बहुतेक इमारती जमीनदोस्त केल्या; ऑगस्टसने नंतर त्या पुन्हा बांधून काढल्या. सा.यु. ७७ मध्ये पुन्हा आलेल्या एका भूकंपात पुष्कळ हानी झाली तरी, त्यांची पुनःबांधणी करण्यात आली. चवथ्या शतकात, सलमीना एकापाठोपाठ आलेल्या भूकंपात नष्ट झाले; त्यानंतर या शहराचे पूर्वीचे वैभव त्याला पुन्हा कधीच प्राप्त झाले नाही. मध्ययुगापर्यंत, शहराचे बंदर गाळाने तुंबले गेले व त्याचा वापर बंद झाला.

सलमीनाच्या लोकांनी पौलाच्या प्रचारकार्याला कसा प्रतिसाद दिला हे सांगण्यात आलेले नाही. पण पौलाला इतर समाजाच्या लोकांनाही प्रचार करायचा होता. सलमीना सोडल्यानंतर या मिशनऱ्‍यांना तीन प्रमुख मार्गांपैकी एक मार्ग निवडावा लागणार होता: कायरिन्या डोंगर रांग पार करून उत्तर किनाऱ्‍याला जाणारा एक मार्ग; द्वीपाच्या मध्यभागातून पश्‍चिमेकडच्या मेसाओर्याच्या पठारातून जाणारा दुसरा मार्ग; आणि दक्षिण किनाऱ्‍यालगत जाणारा तिसरा मार्ग.

परंपरेनुसार, पौलाने तिसरा मार्ग निवडला. लाल मातीच्या सुपीक शेतांमधून हा मार्ग जातो. नैऋत्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, द्वीपाच्या आतल्या भागात जाताना उत्तरेकडे वळण्याआधी लारनाका नावाचे शहर लागते.

“सबंध बेटातून”

हा महामार्ग लिड्रा या प्राचीन शहरात पोहंचतो. आज येथे आधुनिक दिवसांतील राजधानी निकोसिया आहे. प्राचीन शहर राज्याचा कसलाही पुरावा मागे राहिलेला नाही. पण १६ व्या शतकात जुन्या निकोसिया शहराच्या भोवती बांधण्यात आलेल्या भिंतींच्या आत लेड्रा स्ट्रीट नावाचा लोकांची सतत रहदारी असलेला अरुंद रस्ता आहे. पौलाने लेड्रा मार्गावरून प्रवास केला की नाही हे आपल्याला माहीत नाही. बायबल केवळ इतकेच सांगते, की पौल आणि त्याचे सोबती “सबंध बेटातून” गेले. (तिरपे वळण आमचे.) (प्रेषितांची कृत्ये १३:६) द विक्लिफ हिस्टॉरिकल जियोग्राफी ऑफ बायबल लँण्ड्‌स नावाच्या पुस्तकात म्हटले आहे, की “‘सबंध बेटातून’ या वाक्यांशाचा अर्थ कदाचित असा असेल, की त्यांनी कुप्रमधील सर्व यहुदी वस्तींमधून प्रवास केला असेल.”

पौलाने नक्कीच कुप्रात होता होईल तितक्या लोकांपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न केला असावा. म्हणूनच त्याने कदाचित दक्षिणेकडील लिड्रा ॲमथस आणि कुरियन या शहरांतून जाणारा मार्ग निवडला असावा. ॲमथस आणि कुरियन ही वाढत चाललेल्या लोकसंख्येची दोन मोठमोठी सर्वदेशीय शहरे होती.

कुरियन शहर समुद्रापासून उंच डोंगरांवर वसलेले शहर होते; आणि थेट खाली किनारे होते. या भव्य ग्रेको-रोमन शहराला देखील, सा.यु. ७७ मध्ये सलमीनाचा नाश केलेल्या भूकंपाचा फटका बसला होता. सा.यु. १०० मधील अपोलोच्या एका मंदिराचे अवशेष येथे आहेत. इथल्या स्टेडियममध्ये ६,००० प्रेक्षक बसू शकत होते. कुरियनमधील बहुतेक लोकांची जीवनशैली ऐषोआरामाची होती, हे खासगी घरांतील रेखीव कुट्टिमचित्रांच्या फरशांवरून दिसून येते.

पफेसकडे

कुरियनहून पुढे गेल्यास डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे पाहायला मिळतात; याच रस्त्याला पुढे द्राक्षारसाच्या देशातून पश्‍चिमेकडे वर जात अचानक एक उतार लागतो जो नागमोडी वळण घेत खाली मोठमोठ्या गुळगुळीत दगडगोट्यांच्या किनाऱ्‍यापर्यंत येतो. ग्रीक दंतकथेनुसार, अगदी याच ठिकाणी समुद्राने ॲफ्रोडाईट देवतेला जन्म दिला होता.

ॲफ्रोडाईट ही कुप्रमधील ग्रीक दैवतांपैकी सर्वात लोकप्रिय देवता होती आणि सा.यु. दुसऱ्‍या शतकापर्यंत तिची भक्‍तिभावाने उपासना केली जाई. ॲफ्रोडाईटच्या उपासनेचे केंद्र पफेसमध्ये होते. प्रत्येक वसंतऋतूत या देवतेच्या प्रीत्यर्थ एक मोठा सण साजरा केला जाई. तीर्थयात्रेकरू या सणांसाठी, आशिया मायनर, इजिप्त, ग्रीस इतकेच नव्हे तर पर्शियाहूनही पफेसला यायचे. कुप्रावर जेव्हा टॉलमीचे राज्य होते तेव्हा कुप्रच्या रहिवाशांनी फारोंची उपासना करायला सुरवात केली.

पफेस कुप्रची रोमी राजधानी आणि सुभेदाराचे अधिष्ठान होते, शिवाय तांब्याची नाणी पाडण्याचा अधिकारही पफेसला मिळाला होता. सा.यु. १५ मध्ये पफेसही भूकंपात नष्ट झाले आणि सलमीनाप्रमाणे पफेसचीही पुनःबांधणी करण्यासाठी ऑगस्टसने निधी दिला. उत्खननात शहरातील रुंद रस्ते, सजवलेले आलिशान बंगले, संगीत शाळा, व्यायामशाळा आणि एक खुले प्रेक्षागृह सापडले; यावरून दिसून आले, की पहिल्या शतकातल्या पफेसच्या लोकांची विलासी जीवनशैली होती.

याच पफेसला पौल, बर्णबा आणि योहान मार्कने भेट दिली होती आणि येथेच एका “बुद्धिमान” मनुष्याने अर्थात सिर्ग्य पौल नावाच्या सुभेदाराने अलीम जादूगाराचा कट्टर विरोध असतानाही “देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली.” त्याने “प्रभूच्या शिक्षणावरून आश्‍चर्य करून विश्‍वास ठेवला.”—प्रेषितांची कृत्ये १३:६-१२.

कुप्रमध्ये यशस्वीपणे आपले प्रचारकार्य पार पाडल्यानंतर या तिघा मिशनऱ्‍यांनी आशिया मायनरमध्ये आपले काम चालू ठेवले. पौलाने केलेला तो पहिला मिशनरी दौरा, खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचा फैलाव होण्यात महत्त्वपूर्ण घटना होती. सेंट पॉल्स जर्नीस इन द ग्रीक ओरियंट नावाच्या पुस्तकात, या दौऱ्‍याला “ख्रिस्ती सुवार्तिक कार्याची आणि . . . पौलाच्या मिशनरी करियरची खरी सुरवात असे म्हटले.” या पुस्तकात पुढे म्हटले होते: “कुप्र हे सिरिया, आशिया मायनर, व ग्रीसला जाणारे समुद्र मार्ग एकमेकांना जिथे भेटतात तेथे असल्यामुळे, तेथूनच एखादा मिशनरी आपले कार्य करू शकत होता हे तर्कशुद्ध आहे.” पण ही केवळ सुरवात होती. वीस शतकांनंतरही, ख्रिस्ती मिशनरी कार्य चालू आहे व यहोवाच्या राज्याची सुवार्ता अक्षरशः “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पोहंचली आहे, असे म्हणता येईल.—प्रेषितांची कृत्ये १:८.

[२० पानांवरील नकाशे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

कुप्र

निकोसिया (लिड्रा)

सलमीना

पफेस

कुरियन

ॲमथस

लारनाका

कायरेनिया डोंगर

मेसाओर्या पठार

ट्रूडस डोंगर

[२१ पानांवरील चित्र]

पफेसमध्ये असताना, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन पौलाने अलीम जादूगाराला आंधळे केले