व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा”

“मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा”

“मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा”

“तेव्हा तुम्ही जाऊन . . . शिष्य करा, . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

१. शिष्य फिलिप्प आणि कुशी षंढ यांच्यात कोणता संवाद झाला?

इथियोपियातील तो मनुष्य जेरूसलेमपर्यंत प्रवास करून आला होता. तेथे तो यहोवा देवाची उपासना करत असे कारण यहोवावर त्याचे प्रेम होते. स्पष्टतः, देवाच्या प्रेरित वचनावरही त्याचे प्रेम असावे. रथात बसून आपल्या घरी परतत असताना, तो यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता जेव्हा ख्रिस्ताचा एक शिष्य अर्थात फिलिप्प त्याला भेटला. फिलिप्पाने त्या कुशी षंढाला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?” शास्त्रवचनांचा प्रामाणिक विद्यार्थी असलेल्या या व्यक्‍तीला फिलिप्पाने ख्रिस्ताचा शिष्य होण्यास मदत केली.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९.

२. (अ) कुशी षंढाने दिलेल्या उत्तरात तथ्य होते असे का म्हणता येईल? (ब) शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ताच्या कामगिरीशी संबंधित असलेले कोणते प्रश्‍न आपण पाहणार आहोत?

कुशी षंढाचे उत्तर खास महत्त्वाचे आहे. त्याने म्हटले: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?” (तिरपे वळण आमचे.) होय, त्याला मार्ग दाखवणाऱ्‍याची अर्थात मार्गदर्शकाची गरज होती. या उत्तरावरूनच, येशूने शिष्य बनवण्याच्या कामगिरीत जी विशिष्ट सूचना सामील केली होती तिचे महत्त्व दिसून येते. ही सूचना कोणती आहे? ते पाहण्यासाठी, मत्तय अध्याय २८ मधील येशूच्या शब्दांवर आपण अधिक चर्चा करू या. आधीच्या लेखात का आणि कोठे या प्रश्‍नांचा विचार केला होता. तर आता आपण, शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ताच्या आज्ञेसोबत संबंधित असलेले आणखी दोन प्रश्‍न पाहू या—काय? आणि केव्हा?

“सर्व त्यांस पाळावयास शिकवा”

३. (अ) एक मनुष्य येशू ख्रिस्ताचा शिष्य कसा बनतो? (ब) शिष्य बनवण्यासाठी काय शिकवावे लागते?

इतरांनी ख्रिस्ताचे शिष्य बनावे म्हणून आपण त्यांना काय शिकवले पाहिजे? येशूने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) याचा अर्थ, ख्रिस्ताने आज्ञापिलेले सर्वकाही आपण शिकवले पाहिजे. * परंतु, ख्रिस्ताने आज्ञापिलेले सर्वकाही शिकवलेली व्यक्‍ती शिष्य बनेल व त्यानंतर शेवटपर्यंत विश्‍वासू राहील अशी खात्री आपण कशी करू शकतो? येशूने काळजीपूर्वक निवडलेल्या शब्दांमध्ये याचे प्रमुख उत्तर दिसून येते. लक्ष द्या की, त्याने केवळ असे म्हटले नाही: ‘मी तुम्हाला आज्ञापिलेले सर्व त्यांना शिकवा.’ तर त्याने म्हटले: “मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १९:१७) याचे तात्पर्य काय?

४. (अ) आज्ञा पाळण्याचा काय अर्थ होतो? (ब) ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला आपण कसे शिकवतो ते उदाहरणाने समजवा.

एखादी आज्ञा पाळण्याचा अर्थ त्या आज्ञेनुसार “कार्य करणे” अर्थात तिचे पालन करणे. तर मग, ख्रिस्ताने आज्ञापिलेल्या गोष्टींचे पालन करण्यास आपण एखाद्याला कसे शिकवू शकतो? वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणारा आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यास कसे शिकवतो त्याचा विचार करा. हा प्रशिक्षक कदाचित वर्गात बसलेले असताना आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शिकवतो. परंतु, या नियमांचे पालन कसे करायचे ते शिकवण्यासाठी विद्यार्थी प्रत्यक्षात गर्दीतून वाहन चालवतात तेव्हा त्याला त्यांचे मार्गदर्शन करावे लागते आणि विद्यार्थ्यांना शिकलेल्या गोष्टी अनुसरण्यासाठी मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे, आपणही लोकांसोबत बायबलचा अभ्यास करतो तेव्हा आपण त्यांना ख्रिस्ताच्या आज्ञा शिकवतो. परंतु, विद्यार्थी त्यांच्या दैनिक जीवनात आणि सेवाकार्यात ख्रिस्ताच्या सूचना पाळण्याचा प्रयत्न करतात तेव्हाही आपण त्यांना मार्गदर्शन दिले पाहिजे. (योहान १४:१५; १ योहान २:३) याचा अर्थ, शिष्य बनवण्याची ख्रिस्ताची आज्ञा पूर्णपणे पार पाडायची असल्यास आपण शिक्षक आणि मार्गदर्शकही होणे आवश्‍यक आहे. मग, आपण येशूने व खुद्द यहोवाने मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण करत असतो.—स्तोत्र ४८:१४; प्रकटीकरण ७:१७.

५. शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करण्यास आपला बायबल विद्यार्थी का कचरत असेल?

येशूच्या आज्ञा पाळण्यास इतरांना शिकवणे म्हणजे शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे पालन करण्यास त्यांना मदत करणे. आपण बायबल अभ्यास ज्यांच्यासोबत करतो त्यांच्यापैकी काहींना ही गोष्ट कठीण वाटत असेल. या आधी ते ख्रिस्ती धर्मजगताच्या एखाद्या चर्चचे सक्रिय सदस्य असतील तरीही त्यांच्या धार्मिक शिक्षकांनी त्यांना जाऊन शिष्य बनवण्यास कधीही शिकवले नसेल. काही धर्मगुरू साफ साफ कबूल करतात की, आपल्या कळपाला सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी शिकवण्याच्या बाबतीत ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेस पूर्णपणे फसले आहेत. जगात जाऊन सर्व तऱ्‍हेच्या लोकांना शिष्य बनवण्याच्या येशूच्या आज्ञेविषयी बायबल विद्वान जॉन आर. डब्ल्यू. स्टॉट म्हणतात: “या आज्ञेमध्ये सामील असलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्यात आपण उणे पडलो हीच सुवार्ता प्रचाराच्या कार्यातील सुवार्तिक ख्रिश्‍चनांची सर्वात मोठी कमतरता आहे.” त्यांनी पुढे म्हटले: “आपण दूर राहूनच आपला संदेश सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण काही वेळा त्या लोकांसारखे दिसतो जे स्वतः किनारपट्टीवर सुरक्षित ठिकाणी उभे राहून पाण्यात बुडणाऱ्‍या लोकांना ओरडून सूचना देत असतात. त्यांना वाचवण्यासाठी आपण पाण्यात उडी मारत नाही. आपल्याला भिजण्याची भीती वाटते.”

६. (अ) बायबल विद्यार्थ्याला मदत करताना आपण फिलिप्पच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो? (ब) बायबल विद्यार्थी प्रचार कार्यात भाग घेऊ लागतो तेव्हा आपण आपली काळजी कशी व्यक्‍त करू शकतो?

आपला बायबल विद्यार्थी पूर्वी ज्या धर्मात होता त्या धर्मातील सदस्यांना “भिजण्याची भीती” वाटत असल्यास आपल्या विद्यार्थ्यालाही ‘पाण्याची भीती’ मनातून काढून टाकणे व शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करणे कठीण वाटेल. त्याला मदतीची आवश्‍यकता भासेल. ज्याप्रमाणे फिलिप्पाच्या शिकवणींमुळे कुशी षंढाला शिकायला मिळाले आणि त्याला बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा मिळाली त्याचप्रमाणे आपणही आपल्या विद्यार्थ्याची समज वाढवणारी आणि त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करणारी शिकवण आणि मार्गदर्शन धीराने देत राहिले पाहिजे. (योहान १६:१३; प्रेषितांची कृत्ये ८:३५-३८) शिवाय, आपल्या बायबल विद्यार्थ्यांना, शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे पालन करण्यास शिकवण्याची आपली इच्छा, राज्य प्रचारात ते पहिले पाऊल उचलतील तेव्हा त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत असण्यास आपल्याला प्रवृत्त करते.—उपदेशक ४:९, १०; लूक ६:४०.

“जे काही . . . ते सर्व”

७. इतरांना ‘सर्व पाळावयास’ शिकवण्यामध्ये कोणत्या आज्ञा शिकवणे सामील होते?

नवीन शिष्यांना आणखी शिष्य बनवण्यास शिकवणे एवढ्यावरच आपण थांबत नाही. येशूने जे आज्ञापिले ‘ते सर्व पाळण्यास’ इतरांना शिकवण्याची सूचना त्याने आपल्याला दिली. यामध्ये निश्‍चितच दोन मोठ्या आज्ञांचा समावेश होतो—देवावर प्रेम करणे आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करणे. (मत्तय २२:३७-३९) एका शिष्याला या आज्ञांचे पालन करण्यास कसे शिकवले जाऊ शकते?

८. एका नवीन शिष्याला प्रेम दाखवण्याच्या आज्ञेचे पालन करण्यास कसे शिकवले जाऊ शकते हे उदाहरणाने समजवा.

शिकाऊ चालकाच्या उदाहरणाचा पुन्हा एकदा विचार करा. शिकाऊ चालक आपल्या शिक्षकासोबत रस्त्यावर गाडी चालवतो तेव्हा तो केवळ शिक्षकाचे ऐकून शिकत नाही तर इतर चालकांकडे पाहूनही शिकतो. उदाहरणार्थ, एका चालकाने दुसऱ्‍या एका चालकाला आपल्यासमोर मुख्य रस्त्यावर येऊ दिले, किंवा समोरच्या वाहन चालकांच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडू नये म्हणून एका चालकाने आपल्या कारचे हेडलाईट कमी करण्याचा विचारीपणा दाखवला; किंवा कोणा परिचित व्यक्‍तीची गाडी बंद पडलेली पाहून त्याला मदत करण्यासाठी एका चालकाने आपली गाडी थांबवली हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला दाखवेल. अशा उदाहरणांवरून शिकाऊ चालकाला बरेच शिकायला मिळते ज्याचा अवलंब तो नंतर गाडी चालवताना करू शकतो. त्याचप्रमाणे, जीवनाच्या मार्गावर प्रवास करणारा नवा शिष्य केवळ आपल्या शिक्षकाकडूनच नव्हे तर मंडळीतल्या इतरांच्या उत्तम उदाहरणांवरूनही शिकतो.—मत्तय ७:१३, १४.

९. प्रेम दाखवण्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा काय अर्थ होतो हे नवीन शिष्य कसा शिकतो?

उदाहरणार्थ, एक एकटी पालक आपल्या लहान मुलांना, बराच खटाटोप करून राज्य सभागृहात घेऊन येत असल्याचे, दुःखाने पीडित असलेली एक बहीण विश्‍वासूपणे सभांना येत असल्याचे, एखादी वृद्ध विधवा बहीण आपल्या कारमधून इतर वृद्ध जनांना प्रत्येक मंडळीच्या सभांना घेऊन येत असल्याचे अथवा एखादा तरुण राज्य सभागृहाची साफसफाई करत असल्याचे एक बायबल विद्यार्थी कदाचित पाहत असेल. किंवा तो मंडळीतल्या एखाद्या वडिलांना पाहील की, जे मंडळीतल्या इतर जबाबदाऱ्‍या असतानाही क्षेत्र सेवाकार्यात विश्‍वासूपणे पुढाकार घेतात. तो अशा एखाद्या साक्षीदाराला भेटेल जो अपंगत्वामुळे घराबाहेर पडू शकत नसेल परंतु तरीही त्याला भेटायला येणाऱ्‍या सर्वांना तो आध्यात्मिक उत्तेजन देत असेल. विद्यार्थी पाहील की, एका जोडप्याने आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी आपल्या जीवनात पुष्कळ बदल केले. तो नवीन शिष्य, अशा नम्र, मदतपूर्ण आणि विश्‍वसनीय ख्रिश्‍चनांकडे पाहून देवावर आणि शेजाऱ्‍यावर—विशेषकरून सहउपासकांवर—प्रेम करण्याच्या ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करण्याचा काय अर्थ होतो हे उदाहरणाने शिकतो. (नीतिसूत्रे २४:३२; योहान १३:३५; गलतीकर ६:१०; १ तीमथ्य ५:४, ८; १ पेत्र ५:२, ३) अशाप्रकारे, ख्रिस्ती मंडळीतील प्रत्येक सदस्य शिक्षक आणि मार्गदर्शक होऊ शकतो—आणि असलेही पाहिजे.—मत्तय ५:१६.

“युगाच्या समाप्तीपर्यंत”

१०. (अ) आपण केव्हापर्यंत शिष्य बनवण्याचे कार्य चालू ठेवू? (ब) नेमून दिलेले कार्य पार पाडण्यासंबंधी येशूने कोणते उदाहरण मांडले?

१० शिष्य बनवण्याचे कार्य आपण केव्हापर्यंत चालू ठेवावे? युगाच्या समाप्तीपर्यंत. (मत्तय २८:२०) येशूने नेमून दिलेल्या कामगिरीचा हा पैलू आपण पूर्ण करू शकू का? जगव्याप्त मंडळी या नात्याने ते पूर्ण करण्याचा दृढनिश्‍चय आपण केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांना’ शोधून काढण्यासाठी आपण स्वेच्छेने आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्ती उपयोगात आणली आहे. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) सध्या, यहोवाचे साक्षीदार वर्षातील प्रत्येक दिवशी सरासरी ३० लाखांहून अधिक तास राज्याच्या प्रचार कार्यात आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात खर्च करतात. आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करत असल्यामुळे हे करतो. त्याने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (तिरपे वळण आमचे.) (योहान ४:३४) आपली देखील मनापासून हीच इच्छा आहे. (योहान २०:२१) आपल्याला नेमलेले कार्य केवळ सुरू करायचे नाही, तर ते संपवायचे आहे.—मत्तय २४:१३; योहान १७:४.

११. आपल्या काही ख्रिस्ती बंधू-बहिणींना काय झाले आहे आणि आपण स्वतःला काय विचारावे?

११ त्याच वेळी, आपले काही सहउपासक आध्यात्मिकरित्या कमजोर बनले आहेत आणि यामुळे शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करण्यात मंदावले आहेत किंवा पूर्णपणे थंड पडले आहेत ही दुःखाची गोष्ट आहे. मंडळीसोबत त्यांनी आपला सहवास पुन्हा एकदा सुरू करावा आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभागी व्हावे म्हणून आपण काही मदत करू शकतो का? (रोमकर १५:१; इब्री लोकांस १२:१२) येशूचे प्रेषित काही काळापुरते कमजोर झाले होते तेव्हा त्याने त्यांची मदत कशी केली यावरून आपण आज काय करावे ते शिकू शकतो.

काळजी व्यक्‍त करा

१२. (अ) येशूच्या मृत्यूची वेळ जवळ आली होती तेव्हा त्याच्या प्रेषितांनी काय केले? (ब) येशूच्या प्रेषितांनी दाखवलेला कमजोरपणा गंभीर स्वरूपाचा होता तरी देखील त्याने त्यांच्याशी कसा व्यवहार केला?

१२ येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या शेवटी, त्याच्या मृत्यूची वेळ फार जवळ येऊन ठेपली होती तेव्हाच त्याचे प्रेषित “त्याला सोडून पळून गेले.” येशूने आधीच भाकीत केल्याप्रमाणे ते “सर्व आपआपल्या घरी” गेले. (मार्क १४:५०; योहान १६:३२) येशूने आध्यात्मिकरित्या कमजोर असलेल्या आपल्या साथीदारांशी कसा व्यवहार केला? आपले पुनरुत्थान झाल्यावर येशूने आपल्या काही अनुयायांना म्हटले: “भिऊ नका; जा माझ्या भावांस सांगा की, त्यांनी गालीलात जावे; तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.” (मत्तय २८:१०) प्रेषितांनी दाखवलेला कमजोरपणा गंभीर स्वरूपाचा होता तरी देखील येशूने त्यांना “माझे भाऊ” असे संबोधले. (मत्तय १२:४९) त्यांच्यावरून त्याचा भरवसा पूर्णपणे उडाला नाही. अशाप्रकारे, येशूने यहोवाप्रमाणे कृपा आणि क्षमाशीलता दाखवली. (२ राजे १३:२३) आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो?

१३. आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्यांविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा?

१३ जे सेवाकार्यात मंदावले आहेत किंवा पूर्णपणे थंड पडले आहेत त्यांच्याविषयी आपल्याला काळजी असली पाहिजे. या विश्‍वासू उपासकांनी गतकाळात—काहींनी कदाचित कित्येक दशकांसाठी—केलेली प्रीतीची कार्ये आपल्याला अजूनही आठवतात. (इब्री लोकांस ६:१०) त्यांची आपल्याला निश्‍चितच आठवण येते. (लूक १५:४-७; १ थेस्सलनीकाकर २:१७) परंतु, आपण त्यांच्याविषयी काळजी कशी व्यक्‍त करू शकतो?

१४. येशूचे अनुकरण करून आपण एखाद्या कमजोर व्यक्‍तीला कशी मदत करू शकतो?

१४ येशूने आपल्या निराश झालेल्या प्रेषितांना गालीलात जायला सांगितले म्हणजे ते तेथे त्याला भेटू शकतील. अर्थात, येशूने त्यांना एका खास सभेकरता बोलावले. (मत्तय २८:१०) त्याचप्रमाणे आज, आपण आध्यात्मिकरित्या कमजोर असलेल्यांना ख्रिस्ती मंडळीच्या सभांना येण्यास उत्तेजन देतो आणि कदाचित असे उत्तेजन आपल्याला त्यांना अनेक वेळा द्यावे लागेल. प्रेषितांच्या बाबतीत, हे आमंत्रण फायद्याचे ठरले कारण हे “अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेविला होता त्यावर गेले.” (मत्तय २८:१६) त्याचप्रमाणे, कमजोर व्यक्‍ती आपल्या प्रेमळ आमंत्रणाला प्रतिसाद देतात आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो!—लूक १५:६.

१५. आपल्या सभांच्या ठिकाणी आलेल्या कमजोर जणांचे स्वागत करण्यात आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

१५ कमजोर झालेला एखादा ख्रिस्ती राज्य सभागृहात प्रवेश करतो तेव्हा आपली काय प्रतिक्रिया असेल? येशूने आपल्या प्रेषितांना—ज्यांचा विश्‍वास काही काळासाठी कमजोर झाला होता त्यांना—नेमलेल्या स्थळी आलेले पाहून काय केले? ‘येशू त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलला.’ (मत्तय २८:१८) तो दूर उभा राहून त्यांना बघत राहिला नाही, तर तो त्यांच्यापाशी गेला. येशूने स्वतः पुढाकार घेतल्यामुळे त्याच्या प्रेषितांना किती बरे वाटले असावे याची कल्पना करा! आध्यात्मिकरित्या कमजोर झालेले लोक ख्रिस्ती मंडळीत परत येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपणही पुढाकार घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत करू या.

१६. (अ) येशू आपल्या अनुयायांशी ज्याप्रमाणे वागला त्यातून आपण काय शिकू शकतो? (ब) कमजोर लोकांविषयी येशूप्रमाणे आपण दृष्टिकोन कसा बाळगू शकतो? (तळटीप पाहा.)

१६ येशूने आणखी काय केले? प्रथम त्याने अशी घोषणा केली: “सर्व अधिकार मला दिलेला आहे.” दुसरे त्याने त्यांना एक कामगिरी दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन . . . लोकांस शिष्य करा.” तिसरे, त्याने असे वचन दिले: “मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” पण येशूने काय केले नाही याची दखल तुम्ही घेतली का? आपले शिष्य चुकले, त्यांना संशय आला म्हणून त्याने त्यांना खडसावले नाही. (मत्तय २८:१७) त्याची ही पद्धत परिणामकारक ठरली का? निश्‍चितच. काही काळातच, प्रेषितांनी “शिकविण्याचे व . . . सुवार्ता गाजविण्याचे” काम सुरू केले. (प्रेषितांची कृत्ये ५:४२) कमजोर व्यक्‍तींबद्दल कसा दृष्टिकोन बाळगावा आणि त्यांच्याशी कसा व्यवहार करावा यासंबंधी येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपण आपल्या स्थानीय मंडळीत उत्तम परिणामांची अपेक्षा करू शकतो. *प्रेषितांची कृत्ये २०:३५.

“मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”

१७, १८. “मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” या येशूच्या शब्दांमधून कोणते सांत्वन मिळते?

१७ येशूने कामगिरी देताना, “मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” असे म्हटले. (तिरपे वळण आमचे.) हे त्याचे शेवटचे शब्द, शिष्य बनवण्याची ख्रिस्ताची आज्ञा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या सर्वांकरता उभारणीकारक आहेत. आपल्या राज्य प्रचाराच्या कार्याचा आपल्या शत्रुंनी कितीही विरोध केला किंवा कशीही निंदा केली तरी आपल्याला भिण्याचे कारण नाही. का नाही? कारण, आपला नेता, येशू ज्याला ‘र्स्वगातील आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार दिला आहे’ तो आपल्या पाठीशी आहे!

१८ “मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” हे येशूचे वचन देखील सांत्वन देणारे आहे. शिष्य बनवण्याच्या ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपले काही दिवस आनंदाचे असतात तर काही दिवस दुःखाचे. (२ इतिहास ६:२९) आपल्यातील काहींच्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर दुःख ओढवते. (उत्पत्ति २३:२; योहान ११:३३-३६) इतरांना वार्धक्याला तोंड द्यावे लागते ज्यामध्ये त्यांचे आरोग्य आणि त्यांचा जोम कमी होत असतो. (उपदेशक १२:१-६) आणखी इतरजण कित्येक दिवस नैराश्‍येच्या खाईत असतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) शिवाय, आपल्यातील बहुतेक जणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या असूनही आपण आपल्या सेवाकार्यात मात्र यशस्वी ठरतो कारण येशू “सर्व दिवस”—अगदी आपल्या सर्वात अडचणीच्या वेळीही—आपल्याबरोबर असतो.—मत्तय ११:२८-३०.

१९. (अ) शिष्य बनवण्याच्या येशूने दिलेल्या कामगिरीत कोणत्या सूचना गोवल्या आहेत? (ब) ख्रिस्ताने दिलेली कामगिरी आपण कशी पार पाडतो?

१९ आपण या तसेच आधीच्या लेखात पाहिले त्याप्रमाणे, येशूने शिष्य बनवण्याची दिलेली कामगिरी बहुसमावेशक आहे. आपण का व कोठे ही आज्ञा पूर्ण करावी हे येशूने आपल्याला सांगितले. त्याचप्रमाणे आपण काय शिकवावे आणि केव्हापर्यंत हे करत राहावे हे देखील त्याने आपल्याला सांगितले आहे. हे खरे आहे की, ही मोठी कामगिरी पार पाडणे आव्हानात्मक आहे. पण अधिकारपदी असलेला येशू आपल्या पाठीशी व आपल्या सोबत असल्यामुळे आपण हे साध्य करू शकतो! नाही का?

[तळटीपा]

^ परि. 3 एका संदर्भ ग्रंथात असा मुद्दा मांडला आहे की, येशूने ‘बाप्तिस्मा द्या आणि शिकवा’ असे म्हटले नाही तर “बाप्तिस्मा द्या . . . शिकवा” असे म्हटले. यास्तव, बाप्तिस्मा देण्याची आणि शिकवण्याची आज्ञा ‘काटेकोरपणे एकापाठोपाठ असलेली दोन कृत्ये नाहीत.’ तर, “शिकवण्याची क्रिया ही चालू क्रिया आहे जी बाप्तिस्म्याआधी काही प्रमाणात . . . आणि बाप्तिस्म्यानंतर काही प्रमाणात पार पाडली जाते.”

^ परि. 16 कमजोर जणांबद्दल कसा दृष्टिकोन बाळगावा आणि त्यांची मदत कशी करावी याविषयी अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १, २००३, पृष्ठे १५-१८ पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• येशूने दिलेली आज्ञा पाळण्यास आपण इतरांना कसे शिकवू शकतो?

• नवीन शिष्य मंडळीतील इतरांकडून काय शिकू शकतो?

• आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्यांची आपण मदत कशी करू शकतो?

• “मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” या येशूच्या वचनातून आपण कोणते उत्तेजन व सांत्वन प्राप्त करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

आपण शिक्षक आणि मार्गदर्शक दोन्ही असले पाहिजे

[१७ पानांवरील चित्रे]

नवीन शिष्य इतरांचे उदाहरण पाहून मौल्यवान धडे शिकतो