“यहोवाच्या नावाचा पुरस्कार करण्याकरता”
“यहोवाच्या नावाचा पुरस्कार करण्याकरता”
संपूर्ण जगभरात, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांची, त्यांतील बोधकारक आध्यात्मिक विषयांसाठी प्रशंसा केली जाते. याबाबतीत, अलीकडेच फ्रान्समधील एका वाचकाने पुढीलप्रमाणे पत्र पाठवले:
“मी एक तरुण स्त्री, मूळची आफ्रिकाची आहे; माझं फार कमी शिक्षण झालं आहे. अलीकडेच मी तुमची नियतकालिके वाचायला सुरू केली. त्यांतील विषयांकडे आकर्षित झाल्यामुळे मला वाचनाचे मूल्य समजू लागले आहे. तुमची नियतकालिके मी सतत वाचत असल्यामुळे माझी शब्दसंपत्ती वाढली आहे आणि आता मी फार कमी चुका करत एक पत्र लिहू शकले आहे.
“मला आश्चर्य वाटतं, की तुम्ही मानव, पृथ्वी, निर्माणकर्ता यांच्यासंबंधाने असलेल्या प्रत्येक विषयावर लेख छापू शकता. हे लेख इतके साध्यासोप्या भाषेत लिहिलेले असतात, की त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ते सारखेच वाचावेसे वाटतात. एकाच वेळी सर्व प्रकारच्या लोकांना शिक्षण देण्याची क्षमता या नियतकालिकांव्यतिरिक्त आणखी कुणाकडे नाही.
“मला याचंही आश्चर्य वाटतं, की हे सर्वकाही पैसे कमवण्यासाठी नव्हे तर यहोवाच्या नावाचा पुरस्कार करण्याकरता केलं जात आहे. मला माहीत आहे, की तुम्हाला यहोवाची स्वीकृती आहे; मी तुमचे खूप आभार मानते. शिकवण्यासाठी निर्माणकर्त्याकडून तुम्हाला अशीच शक्ती मिळत राहो.”
यहोवाचे साक्षीदार आपले बायबलचे शैक्षणिक काम सध्या २३५ राष्ट्रांत करत आहेत. टेहळणी बुरूज नियतकालिक १४८ भाषांत तर सावध राहा! ८७ भाषांत प्रकाशित केले जात आहे. ही नियतकालिके, कोणत्याही मानवाची स्तुती करण्याकरता छापली जात नाहीत. यांतील बायबल आधारित सल्ला आणि अद्ययावत माहिती निर्माणकर्त्याचा आदर करण्याकरता छापली जाते; निर्माणकर्ता असे म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो.” (यशया ४८:१७) या बायबल अभ्यासाच्या प्रकाशनांसह पवित्र शास्त्रवचनांचे वाचन केल्याने तुम्हालाही लाभ होवो.