व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे चमत्कार—तुम्ही काय शिकू शकता?

येशूचे चमत्कार—तुम्ही काय शिकू शकता?

येशूचे चमत्कारतुम्ही काय शिकू शकता?

तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, येशूच्या पार्थिव जीवनाबद्दलच्या बायबलमधील अहवालांमध्ये “चमत्कार” यासाठी असलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा वापर कोठेच केलेला नाही. काही वेळा, “चमत्कार” असा अनुवाद करण्यात आलेल्या (थीनामीस) या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ “शक्‍ती” असा होतो. (लूक ८:४६) याचा अनुवाद ‘योग्यता’ किंवा ‘पराक्रम’ असाही केला जाऊ शकतो. (मत्तय ११:२०; २५:१५) एका विद्वानाच्या मते, हा ग्रीक शब्द “एखाद्या प्रतापी कार्यावर आणि विशेषकरून ते ज्या शक्‍तीद्वारे करण्यात आले त्यावर जोर देतो. देवाची शक्‍ती कार्यरत असण्याकडे लक्ष जाईल अशाप्रकारे त्या प्रसंगाचे वर्णन करण्यात येते.”

आणखी एक ग्रीक शब्द (टेरास) याचा सहसा “विलक्षण गोष्टी” किंवा “अद्‌भुते” असा अनुवाद केला जातो. (योहान ४:४८; प्रेषितांची कृत्ये २:१९, सुबोध भाषांतर) या अभिव्यक्‍तीतून पाहणाऱ्‍यांवर कसा प्रभाव पडतो त्यावर जोर दिला आहे. पुष्कळदा, येशूची सामर्थ्यशाली कृत्ये पाहून जमावातले लोक आणि त्याचे शिष्य अचंबित झाले.—मार्क २:१२; ४:४१; ६:५१; लूक ९:४३.

येशूच्या चमत्कारांच्या संबंधाने वापरण्यात येणारा तिसरा ग्रीक शब्द (सिमिऑन) “चिन्ह” यास सूचित करतो. रॉबर्ट डेफिन्बॉ हे विद्वान म्हणतात की, तो शब्द “चमत्काराच्या गहन अर्थावर जोर देतो. चिन्ह म्हणजे प्रभू येशूविषयी सत्य सांगणारा चमत्कार.”

आभास की देवाने दिलेली शक्‍ती?

बायबलमध्ये येशूच्या चमत्कारांचे वर्णन लोकांच्या मनोरंजनासाठी असलेल्या युक्‍त्‌या किंवा आभास असे केलेले नाही. तर ती ‘देवाच्या महान सामर्थ्याची’ प्रकटने होती जसे की, येशूने एका मुलाच्या अंगातून भूत काढताना दाखवले. (लूक ९:३७-४३) अशी सामर्थ्यशाली कृत्ये “महासमर्थ” असे ज्याचे वर्णन करण्यात आले आहे त्या सर्वशक्‍तिमान देवाकरता अशक्य असू शकतात का? (यशया ४०:२६) मुळीच नाही!

शुभवर्तमानाच्या अहवालांत येशूच्या सुमारे ३५ चमत्कारांचा उल्लेख केला आहे. परंतु त्याने एकूण किती चमत्कार केले हे सांगितलेले नाही. उदाहरणार्थ, मत्तय १४:१४ मध्ये असे म्हटले आहे: “त्याने [येशूने] बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्‍यांस त्याने बरे केले.” त्या प्रसंगी त्याने नेमक्या किती आजारी लोकांना बरे केले हे आपल्याला सांगितलेले नाही.

येशूने, स्वतः देवाचा पुत्र व वाग्दत्त मशीहा असल्याचा दावा केला होता व त्याची ही सामर्थ्यशाली कृत्ये याला मूळ आधार होती. शास्त्रवचनांमध्ये हे निश्‍चितपणे दाखवण्यात आले होते की, देवाने दिलेल्या शक्‍तीमुळे येशूला चमत्कार करण्याची शक्‍ती प्राप्त झाली. प्रेषित पेत्राने येशूविषयी म्हटले की “महत्कृत्ये, अद्‌भुते व चिन्हे [दाखवून] . . . देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता.” (प्रेषितांची कृत्ये २:२२) दुसऱ्‍या एका प्रसंगी, पेत्राने सांगितले की, “येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.”—प्रेषितांची कृत्ये १०:३७, ३८.

येशूचे चमत्कार त्याच्या संदेशाचा अविभाज्य भाग होते. मार्क १:२१-२७ मध्ये येशूच्या शिकवणुकींबद्दल आणि त्याच्या एका चमत्काराबद्दल लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली हे सांगितले आहे. मार्क १:२२ येथे म्हटले आहे की, “त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले,” आणि २७ व्या वचनात म्हटले आहे की, त्याने एका अशुद्ध आत्म्याला काढले तेव्हा लोक “आश्‍चर्यचकित” झाले. येशूची सामर्थ्यशाली कृत्ये आणि त्याचा संदेश या दोन्ही गोष्टींमधून तो वाग्दत्त मशीहा असल्याचा पुरावा मिळाला.

येशूने आपण मशीहा असल्याचा केवळ दावाच केला नाही; तर त्याच्या शब्दांच्या व इतर कृत्यांच्या व्यतिरिक्‍त त्याच्या चमत्कारांतून दिसणाऱ्‍या देवाच्या शक्‍तीद्वारे तो मशीहा असल्याचा स्पष्ट पुरावा देण्यात आला. त्याच्या भूमिकेविषयी आणि कामगिरीविषयी शंका निर्माण झाल्या तेव्हा, येशूने धैर्याने असे उत्तर दिले: “माझ्याजवळ जी साक्ष आहे ती [बाप्तिस्मा देणाऱ्‍या] योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे, म्हणजे जी कार्ये मी करितो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठविले आहे.”—योहान ५:३६.

सत्यतेचे पुरावे

येशूचे चमत्कार खरे होते, सत्य होते अशी खात्री आपण का बाळगू शकतो? सत्यतेचे काही पुरावे पाहा.

येशूने शक्‍तिशाली कार्ये केली तेव्हा त्याने स्वतःकडे लक्ष वेधले नाही. कोणत्याही चमत्काराचे श्रेय आणि गौरव देवाला जाईल याची त्याने खात्री केली. उदाहरणार्थ, एका अंध माणसाला बरे करण्याआधी, येशूने हे स्पष्ट केले की त्याच्या “ठायी देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून” तो बरा होईल.—योहान ९:१-३; ११:१-४.

आभास निर्माण करणारे, जादूगार आणि प्रार्थना करून बरे करणाऱ्‍या लोकांप्रमाणे, येशूने संमोहन विद्या, हातचलाखी, थाटामाटाची प्रदर्शने, जादुई मंत्र किंवा भावनातिरेकी विधी यांचा उपयोग कधीच केला नाही. त्याने अंधश्रद्धा किंवा पवित्र वस्तू यांचाही उपयोग केला नाही. येशूने किती साध्या पद्धतीने दोन अंध व्यक्‍तींना बरे केले ते पाहा. त्या अहवालात म्हटले आहे, “येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांस स्पर्श केला; तेव्हा त्यांस तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.” (मत्तय २०:२९-३४) यात विधी, रीतभाती किंवा दिखाऊपणा नव्हता. येशूने खुलेआम, अनेकांदेखत चमत्कारिक कृत्ये केली. त्याने खास व्यासपीठ, रोषणाई वगैरे देखावा केला नाही. याच्या उलट, आधुनिक काळातील तथाकथित चमत्कार लिखित पुराव्यांद्वारे शाबीत करता येत नाहीत.—मार्क ५:२४-२९; लूक ७:११-१५.

काही वेळा, चमत्कारांचा लाभ झालेल्यांना विश्‍वास असल्याचे येशूने कबूल केले. परंतु, एका व्यक्‍तीला विश्‍वास नाही म्हणून तो चमत्कार करू शकला नाही असे नव्हते. गालीलातील कफर्णहूम येथे असताना “लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणिले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालविली व सर्व दुखणाइतांना बरे केले.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय ८:१६.

येशूने लोकांच्या खऱ्‍या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी चमत्कार केले, त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी नव्हे. (मार्क १०:४६-५२; लूक २३:८) शिवाय, येशूने स्वतःच्या लाभासाठी कधीही चमत्कार केले नाहीत.—मत्तय ४:२-४; १०:८.

शुभवर्तमानाच्या अहवालांविषयी काय?

येशूच्या चमत्कारांचे वास्तविक वृत्तान्त चार शुभवर्तमानाच्या अहवालांतून आपल्यापर्यंत पोचवण्यात आले आहेत. येशूने जे चमत्कार केले असे म्हटले जाते ते सत्य आहेत की नाहीत हे पारखताना या अहवालांवर विश्‍वास करण्यास कारण आहे का? हो, निश्‍चितच आहे.

आधीच नमूद केल्याप्रमाणे, येशूने लोकांदेखत चमत्कार केले; पुष्कळांनी त्याचे चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आणि ते लोक अद्याप जिवंत होते तेव्हाच पहिले शुभवर्तमान अहवाल लिहिण्यात आले. शुभवर्तमानाच्या लेखकांच्या प्रामाणिकतेविषयी, द मिरायकल्स ॲण्ड द रेझरेक्शन हे पुस्तक म्हणते: “शुभवर्तमानाच्या सुवार्तिकांवर धर्मप्रसाराकरता ऐतिहासिक घटनांमध्ये खोट्या चमत्कारांचे अहवाल जोडण्याचा आरोप करणे धडधडीत अन्याय ठरेल. . . . ते तर प्रामाणिकपणे लिहून ठेवणारे होते.”

ख्रिस्ती धर्माचा विरोध करणाऱ्‍या यहुदी लोकांनी शुभवर्तमानातील सामर्थ्यशाली कार्यांबद्दल कधीही शंका व्यक्‍त केली नाही. फक्‍त ही कृत्ये कोणाच्या शक्‍तीने केली याबद्दल त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. (मार्क ३:२२-२६) शिवाय, नंतरच्या टीकाकारांनाही येशूचे चमत्कार पूर्णपणे नाकारता आले नाहीत. याच्या उलट, सा.यु. पहिल्या आणि दुसऱ्‍या शतकांदरम्यानच्या संदर्भांमध्ये येशूने केलेल्या चमत्कारांचा उल्लेख आढळतो. स्पष्टपणे, त्याच्या चमत्कारांचे शुभवर्तमान अहवाल सत्य आहेत असा विश्‍वास करण्यास आपल्याजवळ कारण आहे.

चमत्कारांमागील व्यक्‍ती

येशूच्या चमत्कारांची सत्यता केवळ तर्कशुद्ध वादांच्या आधारे पारखली तर त्यांचे परीक्षण अपुरे पडेल. शुभवर्तमानाच्या अहवालांमध्ये येशूच्या शक्‍तिशाली कार्यांच्या वर्णनातून गहिऱ्‍या भावना असलेला, अतुलनीय कणव असलेला, सहमानवांच्या कल्याणाची अत्यंत काळजी बाळगणारा मनुष्य सामोरा येतो.

येशूकडे कळवळून विनंती केलेल्या कुष्ठरोग्याचे उदाहरण पाहा: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” “तेव्हा त्याला [येशूला] त्याचा कळवळा आला” आणि त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तो कुष्ठरोगी क्षणार्धात बरा झाला. (मार्क १:४०-४२) अशाप्रकारे, सहानुभूतीमुळे येशू चमत्कार करण्यासाठी देवाने दिलेली शक्‍ती वापरण्यास प्रवृत्त झाला हे त्याने प्रदर्शित केले.

येशूला नाईन शहरातून बाहेर चालेली एक प्रेतयात्रा दिसली तेव्हा काय झाले? ती प्रेतयात्रा ज्याची होती तो एका विधवेचा एकुलता एक तरुण मुलगा होता. येशूला त्या स्त्रीचा “कळवळा आला” व तो तिला म्हणाला: “रडू नको.” मग त्याने तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केले.—लूक ७:११-१५.

येशूच्या चमत्कारांमधून आपल्याला हे जाणून सांत्वन वाटते की, येशूला ‘कळवळा यायचा’ व तो लोकांची मदत करायचा. पण हे चमत्कार केवळ इतिहासजमा झालेले नाहीत. “येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे,” असे इब्री लोकांस १३:८ म्हणते. तो सध्या स्वर्गीय राजा म्हणून राज्य करत असून पृथ्वीवर मानव या नात्याने होता तेव्हापेक्षा भव्य प्रमाणात देवाने दिलेली चमत्कारिक शक्‍ती वापरण्यास सज्ज आणि समर्थ आहे. लवकरच येशू आज्ञाधारक मानवजातीला बरे करण्यासाठी या शक्‍तीचा उपयोग करील. यहोवाचे साक्षीदार भविष्याच्या या भव्य प्रत्याशेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वखुशीने मदत करतील.

[४, ५ पानांवरील चित्रे]

येशूचे चमत्कार ‘देवाच्या महान सामर्थ्याचे’ प्रदर्शन होते

[७ पानांवरील चित्र]

येशू सहानुभूतीशील होता