व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आम्ही नेहमी यहोवाच्या बळावर अवलंबून राहिलो

आम्ही नेहमी यहोवाच्या बळावर अवलंबून राहिलो

जीवन कथा

आम्ही नेहमी यहोवाच्या बळावर अवलंबून राहिलो

अर्झेबेट हॉफ्नर यांच्याद्वारे कथित

मला चेकोस्लोव्हाकिया सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे असं जेव्हा टिबोर हॉफ्नर यांना समजलं, तेव्हा ते म्हणाले, “मी असं होऊ देणार नाही.” मग ते मला म्हणाले: “तुझा होकार असेल तर मी तुझ्याशी लग्न करेन, मग तू नेहमी माझ्यासोबतच राहशील.”

ही अनपेक्षित मागणी आल्यावर काही आठवड्यानंतरच म्हणजे जानेवारी २९, १९३८ रोजी माझं टिबोर यांच्याशी लग्न झालं; टिबोर यांनीच पहिल्यांदा माझ्या कुटुंबाला साक्ष दिली होती. लग्नाचा हा निर्णय सोपा नव्हता. मला नुकतीच १८ वर्षं पूर्ण झाली होती आणि यहोवाच्या साक्षीदारांमधली पूर्ण वेळेची सेविका या नात्याने मला माझं तारुण्य फक्‍त देवाच्या सेवेसाठीच खर्च करायचं होतं. मी रडले. प्रार्थना केली. पण मग शांत डोक्यानं मी विचार केला, की टिबोर यांनी केवळ माझी दया आल्यामुळे मला मागणी घातली नव्हती; त्यांचं खरोखरच माझ्यावर प्रेम होतं. आणि आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्‍या या व्यक्‍तीसोबत सबंध आयुष्य घालवावं असं मलाही वाटू लागलं.

पण मी तर अशा एका देशात राहत होते ज्याला आपल्या लोकशाही व्यवस्थेवर आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत गर्व होता. मग मला हद्दपार का केलं जात होतं? आणखी पुढे जाण्याआधी मला तुम्हाला माझ्या पार्श्‍वभूमीविषयी थोडं सांगावं लागेल.

डिसेंबर २६, १९१९ रोजी, हंगेरी, बुडापेस्टच्या पूर्वेकडे सुमारे १६० किलोमीटरवर असलेल्या शायोसन्टपीटरच्या गावात माझा जन्म झाला; माझे आईवडील ग्रीक कॅथलिक चर्चचे सदस्य होते. पण माझा जन्म व्हायच्या आधीच बाबा वारले. माझ्या आईनं एका विधूर मनुष्याशी लग्न केलं ज्याला चार मुलं होती आणि आई व आम्ही भावंडं तेव्हा चेकोस्लोव्हाकिया म्हटल्या जाणाऱ्‍या देशातील लुचेन्यट्‌झ या सुंदर शहरात राहायला गेलो. त्या दिवसांत, सावत्र कुटुंबात जगणं सोपं नव्हतं. पाच मुलांमध्ये मी सर्वात धाकटी असल्यामुळे, मला कधी कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटलं नाही. आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती; मला फक्‍त भौतिक वस्तुंचीच नव्हे तर आईवडिलांचं लक्ष, त्यांचं प्रेम याची देखील वाण होती.

कुणाला उत्तर माहीत आहे का?

मी १६ वर्षांची होते तेव्हा माझ्या मनात अनेक गंभीर प्रश्‍नांचं काहूर माजलं. पहिल्या महायुद्धाच्या इतिहासाविषयी मी खूप आवडीनं वाचायचे; तेव्हा ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या सुसंस्कृत राष्ट्रांत होत असलेल्या कत्तलींचं मला आश्‍चर्य वाटायचं. याशिवाय, मी सगळीकडे लष्करवाद वाढत चालल्याचं पाहू शकत होते. शेजाऱ्‍यांना प्रेम दाखवलं पाहिजे हे जे मी चर्चमध्ये शिकत होते त्याच्याशी कशाचाच मेळ बसत नव्हता.

त्यामुळे एकदा मी एका रोमन कॅथलिक पाळकाकडे गेले आणि त्यांना विचारलं: “ख्रिस्ती या नात्याने आपण कोणत्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे—युद्धात जाऊन आपल्या शेजाऱ्‍यांना ठार मारण्याच्या आज्ञेचं की त्यांच्यावर प्रेम करण्याच्या आज्ञेचं?” माझ्या प्रश्‍नावर ते चिडले आणि आपल्याला जे सांगण्यात आलं आहे तेच आपण शिकवतो अशी त्यांनी सफाई दिली. अशीच गोष्ट, मी जेव्हा एका कॅल्व्हनिस्ट सेवकाला आणि नंतर एका यहुदी रब्बीला भेटायला गेले तेव्हा घडली. मला माझ्या प्रश्‍नाचं उत्तर मिळालंच नाही; पण माझा विचित्र प्रश्‍न ऐकून तेच भांबावून गेले. शेवटी मी एका ल्युथेरियन सेवकाला भेटायला गेले. तेसुद्धा माझ्यावर खूप चिडले, पण निघायच्या आधी मला ते म्हणाले: “तुला खरोखरच जाणून घ्यायचं असेल तर यहोवाच्या साक्षीदारांना विचार.”

मी साक्षीदारांना शोधून काढायचा खूप प्रयत्न केला, पण मला काही ते सापडले नाहीत. काही दिवसांनंतर एकदा मी कामावरून घरी येत होते तेव्हा आमच्या घराचं दार अर्धवट उघडं असल्याचं मला दिसलं. एक देखणा तरुण माझ्या आईला बायबलमधून काहीतरी वाचून दाखवत होता. मला अचानक सुचलं, ‘हा नक्कीच यहोवाचा साक्षीदार असेल!’ आम्ही त्याला आत बोलवलं; त्याचं नाव टिबोर हॉफ्नर होतं. मी त्याला माझे प्रश्‍न विचारले. त्याला स्वतःला काय वाटतं हे सांगण्यापेक्षा, खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं चिन्ह काय आहे तसेच आपण कोणत्या काळात जगत आहोत याविषयी बायबल काय म्हणतं ते त्यानं मला दाखवलं.—योहान १३:३४, ३५; २ तीमथ्य ३:१-५.

काही महिन्यातच, मला १७ वर्षं पूर्ण व्हायच्या आतच माझा बाप्तिस्मा झाला. मला वाटायचं, की मला इतक्या प्रयत्नांनंतर जे अमूल्य सत्य मिळालं होतं ते सर्वांना समजलं पाहिजे. मी पूर्णवेळ प्रचार करू लागले; १९३० च्या दशकाच्या शेवटच्या काळात चेकोस्लोव्हाकियात प्रचार कार्य इतकं सोपं नव्हतं. आपल्या कामाची अधिकृतरीत्या नोंद करण्यात आली होती तरीपण आम्हाला पाळकांच्या चेतवण्यामुळे तीव्र विरोधाचा सामना करावा लागायचा.

छळाचा पहिला अनुभव

एकोणीसशे सदतीस साली एके दिवशी मी, लुचेन्यट्‌झजवळच्या एका गावात आणखी एका ख्रिस्ती भगिनीसोबत प्रचारकार्य करत होते. आम्हाला लगेच अटक करून तुरूंगात डांबण्यात आलं. आमच्या कोठडीचे दार जोरात लावत तिथला रक्षक आम्हाला म्हणाला: “तुम्ही इथंच खितपत मराल.”

सध्याकाळपर्यंत आमच्या कोठडीत आणखी चौघींना टाकण्यात आलं. आम्ही त्यांना सांत्वन देऊ लागलो आणि साक्ष द्यायला लागलो. त्या शांत झाल्या आणि मग रात्रभर आम्ही त्यांना बायबलमधील सत्य सांगत राहिलो.

सकाळी सहा वाजता रक्षकानं मला बाहेर बोलवलं. मी माझ्याबरोबरच्या बहिणीला म्हणाले: “आपण देवाच्या राज्यात भेटू या.” ती जर जिवंत राहिलीच तर जे जे घडेल ते तिनं माझ्या कुटुंबाला सांगावं, अशी मी तिला विनंती केली. मनात लहानशी प्रार्थना केल्यानंतर मी रक्षकाबरोबर गेले. त्यानं मला तुरूंगाच्या आवारात असलेल्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये नेलं. तो मला म्हणाला: “ए मुली, मला तुला काही प्रश्‍न विचारायचे आहेत. काल रात्री तू म्हणालीस, की देवाचं नाव यहोवा आहे. हे मला तू बायबलमधून दाखवू शकशील का?” मला किती आश्‍चर्य वाटलं! मी सुटकेचा निःश्‍वास टाकला. त्यानं आपलं बायबल आणलं आणि मी त्याला आणि त्याच्या बायकोला बायबलमधून यहोवाचं नाव दाखवलं. रात्रीच्या वेळी, आम्ही कोठडीतल्या त्या चार बायकांबरोबर ज्या विषयांवर चर्चा केली होती त्यावर त्याचे पुष्कळ प्रश्‍न होते. उत्तरं मिळाल्यानंतर त्याला खूप समाधान वाटलं, त्यानं त्याच्या बायकोला माझ्यासाठी आणि कोठडीतल्या माझ्या सोबतीणीसाठी नाश्‍ता बनवायला सांगितला.

काही दिवसांनंतर आम्हाला सोडण्यात आलं; पण एका न्यायाधीशानं ठरवलं, की मी हंगेरीची नागरीक असल्यामुळे मला चेकोस्लोव्हाकिया सोडावं लागेल. याच घटनेनंतर टिबोर हॉफ्नर यांनी मला मागणी घातली. आमचं लग्न झालं आणि मी त्यांच्या आईवडिलांच्या घरी गेले.

छळ तीव्र होतो

टिबोर यांना संघटनेचं पुष्कळ काम होतं तरीपण आम्ही दोघांनीही प्रचार कार्य चालू ठेवलं. नोव्हेंबर १९३८ साली हंगेरियन सैनिक आमच्या शहरात यायच्या काही दिवसांआधीच आमचा मुलगा, टिबोर ज्युनियर याचा जन्म झाला. युरोपमध्ये तर दुसरं महायुद्ध तोंडाशी आलं होतं. चेकोस्लोव्हाकियाच्या बहुतेक भागावर हंगेरीनं कब्जा केला होता; यामुळे ताब्यात घेतलेल्या या भागात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांवर छळ आणखी वाढला.

ऑक्टोबर १०, १९४२ रोजी टिबोर काही बांधवांना भेटण्यासाठी डेब्रिकनला गेले. पण ह्‍यावेळेस ते घरी परतलेच नाही. नंतर त्यांनी मला काय झालं होतं ते सांगितलं. टिबोर बांधवांना पुलावर जिथं भेटणार होते तिथं म्हणे बांधवांच्या ऐवजी काही पोलिस, कामगारांच्या वेषात होते. ते, तिथं येणाऱ्‍या माझ्या पतीला आणि पॉल नॉजपॉल यांना अटक करण्यासाठी थांबले होते; ते दोघे सर्वात शेवटी तेथे आले होते. पोलिसांनी यांना पोलिस स्टेशनला नेलं आणि बेशुद्ध पडेपर्यंत ते त्यांच्या तळपायांवर मारत राहिले.

मग त्यांना बूट घालून उभे राहा अशी आज्ञा देण्यात आली. त्यांना खूप दुखत होतं तरीसुद्धा त्यांना रेल्वे स्टेशनला जायला सांगण्यात आलं. पोलिसांनी आणखी एका मनुष्याला आणलं; त्याच्या डोक्याला इतक्या पट्ट्या बांधल्या होत्या त्याला काहीच दिसत नव्हतं. ते बंधू ॲन्ड्राश पिलिंक होते; तेही या बांधवांना भेटायला आले होते. माझ्या नवऱ्‍याला बुडापेस्टपासून जवळ असलेल्या अलाग येथील कैदखान्यात नेण्यात आलं. टिबोर यांच्या मारलेल्या पायांकडे पाहत एक रक्षक थट्टेने म्हणाला: “काही लोक किती क्रूर असतात, नाही का? काळजी नका करू, आम्ही तुम्हाला बरं करू.” आणि दोन रक्षक टिबोर यांना पुन्हा मारू लागले; रक्‍ताच्या चिळकांड्या इकडेतिकडे उडू लागल्या. काही मिनिटांतच ते बेशुद्ध पडले.

दुसऱ्‍या महिन्यात, टिबोर आणि इतर ६० पेक्षा अधिक बंधूभगिनींची उलटतपासणी घेण्यात आली. बंधू ॲन्ड्राश बर्टा, डेनश फालुवेगी आणि यानॉश कॉनरॅड यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. बंधू ॲन्ड्राश पिलिंक यांना जन्मठेपेची शिक्षा आणि माझ्या नवऱ्‍याला १२ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. या सर्वांनी काय गुन्हा केला होता? खटला चालवणाऱ्‍या वकिलांनी त्यांच्यावर टोकाचा राजद्रोह, लष्करी सेवा करण्यास नकार, हेरगिरी आणि सर्वात पवित्र चर्चची निंदानालस्ती हे सर्व आरोप लावले. पण फाशीची शिक्षा नंतर बदलून जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली.

माझीही तीच गत

टिबोर बांधवांना भेटण्यासाठी डेब्रिकनला गेले त्याच्या दोन दिवसांनंतर मी पहाटे सहाच्या आधी उठले आणि कपड्यांना इस्री करत होते. इतक्यात कोणीतरी मोठ्यानं दार वाजवू लागलं. मी मनातल्या मनात म्हटलं, ‘आले वाटतं हे लोक.’ सहा पोलिस घरात घुसले आणि त्यांना घराची झडती घेण्याची परवानगी मिळाली आहे, असं ते मला म्हणाले. घरातील सर्वांना, आमच्या तीन वर्षांच्या टिबोरलाही अटक करून पोलिस स्टेशनात नेण्यात आलं. त्याच दिवशी हंगेरीतील पिटरवाशरा येथल्या तुरूंगात आमची रवानगी करण्यात आली.

तिथं गेल्यावर मला ताप आल्यामुळे मला तुरुंगातील इतर सहवासींपासून वेगळं ठेवण्यात आलं. मी बरी झाल्यावर दोन सैनिक माझ्या कोठडीत आले; त्यांच्यात वाद चालला होता. एक जण म्हणाला: “तिला गोळी घातली पाहिजे! मी तिला गोळी घालेन.” पण दुसऱ्‍याला, मला ठार मारण्याआधी, मी बरी झाली आहे की नाही हे पाहायचं होतं. मला जगू द्या, अशी मी त्यांना विनवणी करू लागले. शेवटी ते दोघंही कोठडीतून निघून गेले आणि मला मदत केल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानले.

रक्षकांची चौकशी करण्याची खास पद्धत होती. त्यांनी मला जमिनीकडे तोंड करून खाली झोपायला सांगितलं, माझ्या तोंडात मोजे कोंबले, माझे हात आणि पाय बांधले आणि रक्‍तबंबाळ होईपर्यंत त्यांनी मला फटके मारले. एक सैनिक दमला तेव्हा त्यांनी मला मारायचं थांबवलं. माझ्या नवऱ्‍याला ज्या दिवशी अटक करण्यात आली त्या दिवशी तो कोणाला भेटणार होता हे ते मला विचारत राहिले. मी त्यांना सांगितलं नाही त्यामुळे मग तीन दिवस मला ते झोडत राहिले. चवथ्या दिवशी, मला माझ्या मुलाला माझ्या आईकडे नेण्याची परवानगी देण्यात आली. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती; मी माझ्या लेकराला माझ्या सडकून काढलेल्या पाठीवर उचलून रेल्वे स्टेशनपर्यंत १३ किलोमीटर चालत गेले. तिथून मी ट्रेननं घरी गेले पण मला पुन्हा छावणीत त्याच दिवशी परतायचं होतं.

मला सहा वर्षांसाठी बुडापेस्टमधल्या एका तुरुंगात पाठवण्यात आलं. तिथं आल्यावर, मला कळलं, की टिबोरही तिथंच होते. लोखंडाच्या जाळीतून फक्‍त काही मिनिटांसाठीच का होईना पण आम्हाला एकमेकांशी बोलायची परवानगी दिल्यामुळे आम्हाला किती आनंद झाला असेल याचा विचार करा! या अमूल्य क्षणांत, आम्हा दोघांना यहोवाचं प्रेम आणि शक्‍ती जाणवली. पुन्हा आमची भेट होण्याआधी, आम्हा दोघांनाही अतिशय भयानक परीक्षांचा सामना करावा लागणार होता आणि कित्येकदा आम्ही मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन पुन्हा माघारी येणार होतो.

एका तुरूंगातून दुसऱ्‍या तुरूंगात

एका कोठडीत आम्ही जवळजवळ ८० भगिनी होतो. आम्हाला आध्यात्मिक अन्‍नाची भूक लागली होती पण तुरूंगात काहीही आणणं इतकं सोप नव्हतं. मग तुरूंगाच्या आतूनच काही मिळणं शक्य होतं का? आम्ही काय केलं ते सांगते. मी तुरूंगाच्या कारकूनांचे मोजे दुरुस्त करून देईन असं सांगितलं. एका मोज्याच्या जोडीत मी एका कागदावर, तुरूंगाच्या लायब्ररीतल्या बायबलचा यादी क्रमांक किती आहे, असं विचारलं. कोणाला शंका येऊ नये म्हणून मी आणखी दोन पुस्तकांविषयीही विचारपूस केली.

दुसऱ्‍या दिवशी, मला कारकूनांकडून मोज्यांचा आणखी एक गठ्ठा मिळाला. एका मोज्यात उत्तर होतं. मग मी एका रक्षकाला हा कागद दिला आणि त्याच्याकडून ती पुस्तकं मागवली. ती पुस्तकं आणि बायबल मिळाल्यावर आम्हाला किती आनंद झाला! बाकीची पुस्तकं आम्ही दर आठवडी बदलत असू, पण बायबल मात्र आम्ही ठेवून घेतलं. रक्षक जेव्हा विचारायचा तेव्हा आम्ही नेहमी असं म्हणायचो: “मोठं पुस्तक आहे ना ते, आणि सर्वांना वाचायचं आहे!” अशाप्रकारे आम्ही बायबल वाचू शकत होतो.

एके दिवशी एका अधिकाऱ्‍यानं मला आपल्या कार्यालयात बोलवलं. त्याच्या अगदी अदबीनं वागण्याची मला जरा शंकाच आली.

तो मला म्हणाला: “श्रीमती हॉफ्नर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही घरी जाऊ शकता. कदाचित उद्याच. ट्रेन असेल तर आजही.”

मी त्याला म्हणाले: “तसं झालं तर बरं होईल.”

तो म्हणाला: “हो, खरंच बरं होईल. तुम्हाला एक मुलगा आहे आणि तुम्हाला त्याचं पालनपोषण करायचं आहे. तेव्हा फक्‍त या पत्रावर सही करा.”

मी त्याला विचारलं: “काय आहे या पत्रात?”

तो सारखा म्हणत राहिला: “तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्‍त सही करा, मग तुम्ही आझाद.” आणि पुढे तो म्हणाला: “आणि घरी गेल्याबरोबर तुम्हाला जे हवं ते करा. पण आता फक्‍त या पत्रावर सही करा, की इथूनपुढे तुम्ही यहोवाचे साक्षीदार नाहीत.”

मी मागे झाले आणि पत्रावर सही करण्यास ठामपणे नकार दिला.

“मग तर तुम्ही इथंच मराल,” असं माझ्यावर खेकसून मला त्यानं पाठवून दिलं.

१९४३ सालच्या मे महिन्यात मला बुडापेस्टमधल्या दुसऱ्‍या एका तुरूंगात पाठवण्यात आलं आणि त्यानंतर मारियनॉस्ट्रा गावातील एका मठात पाठवलं; तिथं जवळजवळ ७० जोगिणी होत्या. भूक, हालअपेष्टा असूनही आम्ही उत्साहानं आमच्या आशेविषयी त्यांना सांगायचो. एका जोगिणीनं आमच्या संदेशाबद्दल खरी आवड दाखवून म्हटलं: “ह्‍या किती सुरेख शिकवणी आहेत! मी पूर्वी कधी अशा शिकवणींविषयी ऐकलं नव्हतं. मला आणखी सांगा.” आम्ही तिला नवीन जगाविषयी आणि तिथल्या सुखी जीवनाविषयी सांगितलं. तिच्याबरोबर बोलत असताना मठातली मदर सुपिरिअर आली. आस्था दाखवणाऱ्‍या जोगिणीला लगेच नेण्यात आलं, तिचे कपडे उतरवून तिला एका चाबकानं खूप मारण्यात आलं. आम्ही तिला पुन्हा भेटलो तेव्हा तिनं आम्हाला विनंती केली: “माझ्यासाठी यहोवाला प्रार्थना करा म्हणजे तो मला वाचवेल आणि इथून मला बाहेर काढेल. मला तुमच्यासारखं व्हायचं आहे.”

यानंतर आम्हाला कोमारोममधील एका तुरूंगात टाकण्यात आलं; बुडापेस्टहून सुमारे ८० किलोमीटर दूर असलेल्या डॅन्यूब नदीवर कोमारोम हे शहर आहे. तिथलं जीवन अतिशय भयंकर होतं. इतर भगिनींप्रमाणे मलाही टायफस झाला, रक्‍ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि मी खूप अशक्‍त झाले. आम्हाला औषधं मिळायची नाहीत, मला वाटलं, मी काही आता जगत नाही. पण त्याच दरम्यान, कार्यालयातलं काम करू शकेल अशा व्यक्‍तीला तुरूंगातले अधिकारी शोधत होते. भगिनींनी माझं नाव सुचवलं. त्यामुळे मला औषधं देण्यात आली आणि मी बरी झाले.

माझं कुटुंब पुन्हा एकत्र येतं

सोव्हियत सैन्य पूर्वेकडून जसजसे आगेकूच करू लागले तसतसे आम्हाला पश्‍चिमेकडे पाठवण्यात येऊ लागले. आम्ही ज्या भयंकर परिस्थितीतून गुदरलो त्या सगळ्याचं वर्णन करायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. मी अनेकदा मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन माघारी आले; पण यहोवाच्या संरक्षक बाहूमुळे मी वाचले. युद्ध समाप्त झाले तेव्हा आम्ही प्रागपासून सुमारे ८० किलोमीटर दूर असलेल्या टाबोर या चेक शहरात होतो. माझी नणंद मग्दालेना आणि मला लुचेन्यट्‌झमधील आमच्या घरी जायला तीन आठवडे लागले; मे ३०, १९४५ रोजी आम्ही घरी पोहंचलो.

दूरूनच मी माझी सासू आणि माझा मुलगा टिबोर यांना ओळखलं, ते अंगणात उभे होते. माझ्या डोळ्यांत पाणी आलं, मी “टिबीक” अशी त्याला हाक मारली. तो पळत येऊन माझ्या गळ्यात पडला. “आई तू पुन्हा मला सोडून जाणार नाहीस ना?” असं तो मला म्हणाला. ते त्याचे पहिले शब्द होते, मी ते कधीच विसरणार नाही.

यहोवानं माझे पती टिबोर यांच्यावरही खूप दया दाखवली होती. बुडापेस्टच्या तुरूंगातून त्यांना सुमारे १६० बांधवांबरोबर बोर इथल्या मजूर छावणीत पाठवण्यात आलं. पुष्कळदा हे बांधवही मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन माघारी आले पण गट या नात्यानं ते जिवंत वाचले. एप्रिल ८, १९४५ रोजी, मी येण्याच्या सुमारे एक महिन्याआधी ते घरी आले.

युद्ध समाप्त झालं असलं तरी, चेकोस्लोव्हाकियातील कम्युनिस्ट शासनाखाली पुढील ४० वर्षांसाठी सहन कराव्या लागणाऱ्‍या परीक्षांत टिकून राहण्यासाठी आम्हाला यहोवाच्या शक्‍तीची गरज होती. टिबोर यांना पुन्हा एकदा दीर्घकाळासाठी तुरूंगात टाकण्यात आलं; त्यामुळे मला एकटीलाच आमच्या मुलाचं संगोपन करावं लागलं. टिबोर तुरूंगातून सुटून आल्यावर प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करू लागले. कम्युनिस्ट शासनाच्या ४० वर्षांच्या दरम्यान आमचा विश्‍वास इतरांना सांगण्यासाठी आम्ही प्रत्येक संधीचा फायदा उचलला. आम्ही पुष्कळ लोकांना सत्य शिकण्यास मदत करू शकलो. अशाप्रकारे आम्हाला अनेक आध्यात्मिक मुलं मिळाली.

१९८९ साली आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला! त्याच्या पुढील वर्षी कित्येक वर्षांनंतर आम्ही आमच्या राष्ट्रात पहिल्यांदा अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो. कित्येक दशकांपासून आपली सचोटी कायम राखणाऱ्‍या आपल्या हजारो बंधूभगिनींना आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला समजलं, की यहोवा या सर्वांसाठी शक्‍तिशाली शक्‍तीचा स्रोत ठरला होता.

माझे प्रिय पती टिबोर यांचा ऑक्टोबर १४, १९९३ साली मृत्यू झाला; ते शेवटपर्यंत यहोवाशी विश्‍वासू होते. आता मी स्लोव्हाकियातील झिलिना इथं माझ्या मुलाच्या जवळच राहते. माझ्यात आता शक्‍ती उरली नाही तरीपण यहोवाच्या शक्‍तीमुळे मनाने मात्र मी अजूनही भक्कम आहे. या जुन्या व्यवस्थीकरणातील कोणत्याही परीक्षेचा मी यहोवाच्या शक्‍तिनिशी सामना करू शकते याबद्दल मला जराही शंका नाही. शिवाय, मी त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा यहोवाच्या अपात्र कृपेमुळे मला सदासर्वकाळ जगता येईल.

[२० पानांवरील चित्र]

माझा मुलगा टिबोर ज्युनियर (वय ४) याला मला सोडून जावं लागलं होतं

[२१ पानांवरील चित्र]

माझे पती टिबोर सिनियर, बोरमधील इतर बांधवांबरोबर

[२२ पानांवरील चित्र]

१९४७ साली, टिबोर आणि माझी नणंद मग्दालेना यांच्याबरोबर ब्रनोत

[२३ पानांवरील चित्रे]

मी अनेकदा मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन माघारी आले; पण यहोवाच्या संरक्षक बाहूमुळे मी वाचले