व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे राज्य सरकार—आज एक वास्तविकता

देवाचे राज्य सरकार—आज एक वास्तविकता

देवाचे राज्य सरकार—आज एक वास्तविकता

“विकासाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या विविध संस्कृतींच्या अनेक देशांमध्ये एकमत कसे होऊ शकेल? असे म्हटले जाते की, परग्रहावरून आक्रमण झाले तरच मानवजात एकत्र येईल.”—दी एज, ऑस्ट्रेलियन बातमीपत्र.

परग्रहावरून आक्रमण? यामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे एक होतील की नाही हे ठाऊक नाही. पण बायबलच्या भविष्यवाणीनुसार एक संकटप्रसंग येणार आहे ज्यात जगातील सर्व राष्ट्रे एक होतील आणि हा संकटप्रसंग पृथ्वीच्या बाहेरील शक्‍तींद्वारे येणार आहे एवढे मात्र नक्की.

या जागतिक स्थितीविषयी प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने भविष्यवाणी केली होती. ईश्‍वरी प्रेरणेने त्याने लिहिले: “परमेश्‍वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ.” (स्तोत्र २:२, ३; प्रेषितांची कृत्ये ४:२५, २६) लक्ष द्या की, पृथ्वीवरील राजे यहोवाविरुद्ध अर्थात विश्‍वाच्या निर्माणकर्त्याविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध अर्थात त्याचा नियुक्‍त राजा, येशू ख्रिस्त याच्याविरुद्ध उठतील. हे कसे घडेल?

बायबलची कालगणना आणि पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या यांच्यानुसार १९१४ साली देवाचे राज्य स्वर्गात स्थापन झाले व येशू ख्रिस्त हा राजा बनला. * तेव्हा जगातील राष्ट्रांच्या मनात एकच विचार होता. देवाच्या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचा अधिकार मान्य करण्याऐवजी ते सत्ता संघर्षात—मोठ्या युद्धात अर्थात पहिल्या महायुद्धात गुंतले होते.

मानवी शासकांच्या या प्रतिक्रियेबद्दल यहोवा देवाचा काय दृष्टिकोन आहे? “स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभु त्यांचा उपहास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्‍त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करील.” मग यहोवा आपल्या पुत्राला, राज्याच्या अभिषिक्‍त राजाला म्हणेल: “माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन; लोहदंडाने तू त्यांस फोडून काढिशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करिशील.”—स्तोत्र २:४, ५, ८, ९.

विरोधी राष्ट्रांचे लोहदंडाने शेवटी चूर्ण केले जाणे हे अर्मगिदोन किंवा हर्मगिदोनात घडेल. प्रकटीकरण या बायबलच्या शेवटल्या पुस्तकात, या नाट्यमय घटनेचे वर्णन, ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ असे केले आहे ज्यामध्ये “संपूर्ण जगातील राजांस” एकत्र केले जात आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) सैतानाच्या प्रभावाखाली पृथ्वीवरील राष्ट्रे शेवटी एका उद्दिष्टासाठी एक होतील—सर्वसमर्थ देवाविरुद्ध लढाई करणे.

देवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध लढाई करण्यासाठी मानव एकत्र होतील तो काळ झपाट्याने येत आहे. परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे न घडता, त्यांच्या ‘एकतेमुळे’ त्यांना कसलाही व्यक्‍तिगत लाभ मिळणार नाही. उलट, त्यांचे हे पाऊल सर्व मानवजातीकरता दीर्घकाळापासून वाट पाहिलेल्या शांतीचा प्रारंभ असेल. ते कसे? शेवटल्या लढाईत, देवाचे राज्य, “[जगातील] सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) जागतिक शांतीसाठी मानवजातीची इच्छा कोणतीही मानवी संघटना नव्हे तर देवाच्या राज्याचे सरकार पूर्ण करील.

राज्याच्या सरकाराचा मुख्य व्यवस्थापक

या राज्यासाठी अनेक प्रामाणिक लोकांनी प्रार्थना करून म्हटले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) देवाचे हे राज्य मनातली अमूर्त स्थिती नाही तर ते एक खरे सरकार आहे; १९१४ मध्ये स्वर्गात स्थापन झाल्यापासून या सरकाराने अनेक अद्‌भुत कृत्ये पार पाडली आहेत. देवाचे राज्य हे वास्तविक असून आज ते पूर्णपणे कार्यरत आहे हे दाखवणारे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू या.

सर्वात प्रथम, सिंहासनाधिष्ठ राजा, येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली त्याची एक शक्‍तिशाली आणि कार्यक्षम नियामक शाखा आहे. सा.यु. ३३ मध्ये, यहोवा देवाने, येशू ख्रिस्ताला ख्रिस्ती मंडळीचा मस्तक बनवले. (इफिसकर १:२२) तेव्हापासून, येशू आपले मस्तकपद गाजवत आहे आणि अशाप्रकारे आपली व्यवस्थापक क्षमता दाखवत आहे. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात, यहुदीयात एक मोठा दुष्काळ आला तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळीने आपल्या सदस्यांच्या मदतीसाठी लगेच पावले उचलली. मदतकार्याची योजना करण्यात आली आणि बर्णबा आणि शौल यांना मदत सामग्री घेऊन अंत्युखियाहून रवाना करण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये ११:२७-३०.

देवराज्याचे सरकार आज कार्यरत आहे म्हणून येशू ख्रिस्ताकडून यापेक्षा कितीतरी अधिक अपेक्षा करता येऊ शकते. भूकंप, दुष्काळ, पूर, वावटळे, वादळे किंवा ज्वालामुखीचे उद्रेक यांसारखी अरिष्टे येतात तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांची ख्रिस्ती मंडळी सहउपासकांना आणि संकटग्रस्त भागांमधील इतरांना मदत करण्यास तत्पर असते. उदाहरणार्थ, २००१ सालाच्या जानेवारी आणि फेब्रुवारीत एल साल्व्हादोरमध्ये भूकंपांचे जबरदस्त हादरे बसले तेव्हा, संपूर्ण देशात मदतकार्याची आयोजना करण्यात आली आणि कॅनडा, ग्वातेमाला व अमेरिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या गटांनी मदत केली. तेथे अल्पावधीत, तीन उपासना स्थळांची आणि ५०० हून अधिक घरांची पुनर्बांधणी करण्यात आली.

देवराज्याच्या सरकाराची प्रजा

देवाचे स्वर्गीय राज्य १९१४ मध्ये स्थापन झाल्यापासून, ते जगभरातील लोकांमधून प्रजा गोळा करत आहे व त्यांना संघटित करत आहे. हे कार्य यशयामध्ये नमूद केलेल्या उल्लेखनीय भविष्यवाणीच्या पूर्णतेत होत आहे: “शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, . . . त्याकडे सर्व राष्टांतील लोक लोटतील.” या भविष्यवाणीत पुढे असे म्हटले आहे, की “देशादेशातील लोकांच्या झुंडी” या पर्वतावर जातील आणि यहोवाकडून येणाऱ्‍या सूचना व नियम स्वीकारतील.—यशया २:२, ३.

या कार्यामुळे आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाच्या चळवळीची सुरवात झाली आहे—पृथ्वीवरील २३० हून अधिक देशांमध्ये ६०,००,००० पेक्षा अधिक ख्रिश्‍चनांचे एक आंतरराष्ट्रीय बंधुत्व निर्माण झाले आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये, राष्ट्रीयत्वाच्या, संस्कृतीच्या आणि भाषेच्या सीमा पार करून प्रेमाने, शांतीने आणि ऐक्याने राहत असलेल्या लोकांचे मोठे समूह पाहून लोकांना सहसा आश्‍चर्य वाटते. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) जे सरकार शेकडो जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात शांती आणि सूसूत्रपणा निर्माण करते ते खरोखरच परिणामकारक, स्थिर आणि खरे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

देवाचे राज्य आणि शिक्षण

प्रत्येक सरकाराच्या काही अपेक्षा असतात ज्या नागरिकांना आणि त्या सरकाराखाली राहणाऱ्‍या प्रत्येकाला पूर्ण कराव्या लागतात. अशाचप्रकारे, देवाच्या राज्याच्याही काही अपेक्षा आहेत ज्या प्रजेला पूर्ण कराव्या लागतील. परंतु, विविध पार्श्‍वभूमींतील इतक्या सर्व लोकांना समान नियम मान्य करायला लावून ते पाळायला लावणे हे एक प्रचंड मोठे काम आहे. यातून, देवाचे राज्य वास्तविक असल्याची आणखी एक ग्वाही मिळते, ती म्हणजे, त्या राज्याचा परिणामकारक शैक्षणिक कार्यक्रम जो लोकांच्या मनावरच नव्हे तर त्यांच्या अंतःकरणावरही प्रभाव पाडून त्यांच्यात बदल घडवून आणतो.

हे आव्हानात्मक काम राज्याच्या सरकाराद्वारे कशाप्रकारे पूर्ण केले जाते? प्रेषितांनी केले त्याप्रमाणे “घरोघर” प्रचार करून व वैयक्‍तिकांना देवाच्या वचनातून शिकवून हे पूर्ण केले जाते. (प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०) ही शिक्षण पद्धत किती परिणामकारक ठरली आहे? एक स्त्री यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करत होती. तिचा हा अभ्यास थांबवण्याचा झॉक जॉन्सन या कॅथलिक पाळकाने खूप प्रयत्न केला; त्याविषयी त्याने एका कॅनेडियन बातमीपत्रकात लिहिले: “मला काय करावं ते सूचेना, मी अशा एका लढाईत उतरलो होतो ज्यात माझा पराजय निश्‍चित होता हे मला जाणवलं. काही महिन्यांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या स्त्रियांनी, घरात स्वतःला कोंडून घेतलेल्या या तरुण मातेसोबत अर्थपूर्ण नातेसंबंधांचे जाळे निर्माण केल्याचे माझ्या लक्षात आले. तिला मदत करून, तिच्याशी मैत्री करून त्यांनी तिचे मन जिंकून घेतले होते. पाहता पाहता, ती त्यांच्या धर्मातली एक सक्रिय सदस्या बनली आणि मी फक्‍त पाहतच राहिलो.” पूर्वी कॅथलिक असलेल्या या मातेचे हृदय जसे यहोवाच्या साक्षीदारांनी शिकवलेल्या बायबल संदेशाने व त्यांच्या ख्रिस्ती वर्तनाने जिंकले होते त्याचप्रमाणे जगभरातल्या लाखो लोकांची मने यांनी स्पर्शून जातात.

हे शिक्षण—राज्याविषयीचे शिक्षण—बायबलवर आधारित असून ते बायबलच्या मूल्यांचे व नीतिविषयक दर्जांचे समर्थन करते. ते लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास, एकमेकांचा आदर करण्यास शिकवते—मग ते कोणत्याही जाती-धर्माचे, भाषेचे असोत. (योहान १३:३४, ३५) ते लोकांना पुढील सल्ल्याला प्रतिसाद देण्यासही मदत करते: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) लाखो जणांनी आपली पूर्वीची जीवनशैली त्यागून देवराज्याच्या सरकाराच्या नियमांचे आणि तत्त्वांचे आनंदाने पालन करून आताच्या जीवनात शांती आणि आनंद प्राप्त केला आहे व ते भावी उज्ज्वल प्रत्याशांची आशा करत आहेत.—कलस्सैकर ३:९-११.

जागतिक ऐक्य साध्य करण्यामध्ये ही पत्रिका अर्थात टेहळणी बुरूज हे महत्त्वाचे साधन राहिले आहे. सुसंघटित भाषांतराची पद्धत आणि बहुभाषा प्रकाशन साधनांमुळे टेहळणी बुरूज यातील मुख्य लेख एकाच वेळी १३५ भाषांमध्ये प्रकाशित केले जातात आणि जगभरातील ९५ टक्क्यांहून अधिक वाचक एकाच वेळी आपल्या स्वतःच्या भाषेत या साहित्याचा अभ्यास करू शकतात.

एका मोर्मोन लेखकाने, आपल्या चर्चने साध्य केलेल्या गोष्टींसोबत उल्लेखनीय पद्धतीने यशस्वी ठरलेल्या इतर मिशनरी कार्यांची यादी केली. यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिके सर्वोत्तम सुवार्तिक नियतकालिके आहेत असे म्हणून ते पुढे म्हणाले: “टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! ही नियतकालिके निश्‍चिंतपणे जीवन जगण्याला उत्तेजन देत असल्याचा आरोप कोणीही करू शकणार नाही—या उलट, ती लोकांमध्ये जागृती निर्माण करतात; हा प्रकार इतर धार्मिक प्रकाशनांमध्ये मला क्वचितच आढळला आहे. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांमधील माहिती सत्य परिस्थितीवर आधारित, संशोधन करून गोळा केलेली व वास्तविक असल्यामुळे ती उत्कृष्ट आहे.”

देवाचे राज्य हे पूर्णपणे कार्यरत असलेली एक वास्तविकता आहे याविषयी जितका पुरावा मिळवावा तितका कमीच आहे. यहोवाचे साक्षीदार आनंदाने आणि संपूर्ण उत्साहाने “राज्याची ही सुवार्ता” आपल्या शेजाऱ्‍यांना सांगतात आणि त्यांना या राज्याची प्रजा होण्याचे आमंत्रण देतात. (मत्तय २४:१४) ही भावी प्रत्याशा तुम्हाला आकर्षक वाटते का? देवाच्या राज्याविषयी शिकणाऱ्‍या लोकांसोबत व त्या राज्याच्या दर्जांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांसोबत संगती केल्यामुळे त्यांना मिळणारे आशीर्वाद तुम्हालाही प्राप्त होऊ शकतील. एवढेच नव्हे तर, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते” अशा नवीन वाग्दत्त जगाच्या राज्य शासनाखाली जगण्याच्या प्रत्याशेचा आनंद तुम्हाला लुटता येईल.—२ पेत्र ३:१३.

[तळटीप]

^ परि. 5 यावरील तपशीलवार चर्चेसाठी, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातला पृष्ठे ९०-७ वरील “देवाचे राज्य आधिपत्य गाजवते” हा अध्याय १० पाहावा.

[४, ५ पानांवरील चित्र]

१९१४ मध्ये, राष्ट्रे महायुद्धात गुंतली होती

[६ पानांवरील चित्रे]

स्वेच्छिक मदतकार्य, ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा आहे

[७ पानांवरील चित्र]

जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना एकच शिक्षण मिळते