वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
“सैतान आकाशांतून विजेसारखा पडला हे मी पाहिले” असे जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?
येशूने नुकतीच ७० शिष्यांची निवड केली होती आणि त्याने “ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले.” हे सत्तर शिष्य परत आले तेव्हा, आपण आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडू शकलो याचा त्यांना खूप आनंद झाला. ते येशूला म्हणाले: “प्रभुजी, आपल्या नावाने भुते देखील आम्हाला वश होतात.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “सैतान आकाशांतून विजेसारखा पडला हे मी पाहिले.”—लूक १०:१, १७, १८.
सुरवातीला असे भासू शकते, की येशू आधीच घडलेल्या एखाद्या घटनेविषयी बोलत होता. परंतु, येशूने हे जे शब्द उच्चारले त्याच्या ६० वर्षांच्या नंतर वृद्ध प्रेषित योहान याने अशाच शब्दांचा उपयोग करून असे लिहिले: “तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:९.
योहानाने हे शब्द लिहिले तेव्हा सैतान अद्यापही स्वर्गातच होता. हे आपल्याला कसे माहीत होते? प्रकटीकरणाचे पुस्तक इतिहासाचे नव्हे तर भविष्यवाणीचे पुस्तक आहे. (प्रकटीकरण १:१) यास्तव, योहान जिवंत होता तोपर्यंत तरी सैतानाला पृथ्वीवर टाकण्यात आलेले नव्हते. खरे तर, पुरावा हे दाखवतो, की १९१४ मध्ये येशूला देवाच्या राज्याचा राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ केल्यानंतर काही काळापर्यंत सैतानाला पृथ्वीवर फेकण्यात आले नव्हते. *—प्रकटीकरण १२:१-१०.
मग, सैतानाला स्वर्गातून आधीच हाकलून लावण्यात आले असे येशू का बोलला? काही विद्वानांचे असे मत आहे, की येशू आपल्या शिष्यांनी अनुचित प्रकारचा गर्व दाखवल्यामुळे त्यांची कानउघाडणी करत होता. त्यांच्या मते तो खरे तर असे म्हणत होता: ‘तुम्ही भुतांना वश केले, तर त्याची बढाई मारू नका. सैतानही बढाईखोर झाला आणि यामुळे त्याचे लगेच पतन झाले.’
याबाबतीत आपण ठाम असू शकत नाही. परंतु, असे दिसते, की येशूलाही आपल्या शिष्यांबरोबर आनंद झाला होता आणि तो सैतानाला भविष्यात वश केले जाईल याविषयी बोलत होता. त्याच्या कोणत्याही शिष्यांपेक्षा येशूला, दियाबलाच्या क्रूर शत्रूभावाची अधिक जाणीव होती. त्यामुळे, आपल्या अपरिपूर्ण मानवी शिष्यांना शक्तिशाली भुते वश झाली, हे ऐकून येशूला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! भुतांचे हे वशीकरण, आद्यदेवदूत मीखाएल म्हणून येशू सैतानाबरोबर युद्ध करून त्याला स्वर्गातून पृथ्वीवर फेकेल त्या दिवसाची पूर्वझलक होते.
सैतान “पडला” हे मी पाहिले असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा तो सैतानाच्या पतनाच्या निश्चिततेवर जोर देत होता. बायबलमधल्या इतर भविष्यवाण्यांच्या बाबतीतही, त्या जणू गतकाळात घडून गेल्या अशाप्रकारे सांगण्यात आल्या आहेत. जसे की, यशया ५२:१३–५३:१२ मधील मशीहाच्या संबंधाने केलेली भविष्यवाणी, गतकाळ आणि भविष्यकाळ अशा दोन्ही काळांचा मिलाफ करून करण्यात आली आहे. तेव्हा वरील वचनात येशू, सैतानाचे स्वर्गातून हाकलले जाणे आपल्या पित्याच्या उद्देशानुसार घडेल यावर भरवसा प्रदर्शित करत होता. येशूला ही देखील खात्री होती, की देवाच्या नियुक्त समयी, सैतान आणि त्याचे दुरात्मे यांना अथांग डोहात टाकले जाईल आणि त्यानंतर नेहमीसाठीच त्यांचा नाश केला जाईल.—रोमकर १६:२०; इब्री लोकांस २:१४; प्रकटीकरण २०:१-३, ७-१०.
[तळटीप]
^ परि. 5 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा १० वा अध्याय आणि प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तकाचा २७ वा अध्याय पाहा.