व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शोध चांगल्या सरकाराचा

शोध चांगल्या सरकाराचा

शोध चांगल्या सरकाराचा

“राष्ट्रे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे एकामागोमाग एक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत ज्या आता एकएकटे राष्ट्र सोडवू शकत नाहीत. मानवजातीसमोर दिवसेंदिवस येणाऱ्‍या धोक्यांचा आणि अडचणींचा सामना केवळ जागतिक सहकार्याने करणे शक्य आहे.”—गुलाम उमार, पाकिस्तानातील राजनीतीचे अभ्यासक.

आजच्या जगात सगळीकडे विरोधाभास दिसून येतो. एकीकडे भौतिक सुसंपन्‍नता आहे तर दुसरीकडे अगदीच हलाखीची परिस्थिती. संगणकाचे हे युग आतापर्यंतचे सर्वात शिक्षित आणि ज्ञानी युग असले तरी अधिकाधिक लोकांना स्थिर नोकरी मिळवणे देखील कठीण जात आहे. मानवांना पूर्वीपेक्षा अधिक स्वातंत्र्य असले तरी कोट्यवधी लोक भीती, असुरक्षितपणा आणि अनिश्‍चिततेच्या छायेत राहतात. आकर्षक संधी उपलब्ध आहेत परंतु खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंतच्या भ्रष्टाचारामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

मानवजातीसमोर असलेल्या समस्या इतक्या भारावून टाकणाऱ्‍या आहेत की एक राष्ट्र किंवा राष्ट्रांचा एखादा समूह देखील त्या सोडवू शकत नाही. म्हणूनच, पुष्कळ निरीक्षक या निष्कर्षाला येऊन पोचले आहेत की, जागतिक शांती आणि सुरक्षा प्राप्त करण्यासाठी सर्व राष्ट्रांना एका सरकाराखाली एकत्र व्हावे लागेल. उदाहरणार्थ, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी फार पूर्वीपासून या कल्पनेचे समर्थन केले होते. १९४६ मध्ये त्यांनी असे ठासून सांगितले: “जगातील बहुतांश लोकांना शांती आणि सुरक्षिततेत राहण्यास आवडेल अशी मला खात्री आहे . . . शांतीने राहण्याची मानवजातीची इच्छा केवळ जागतिक सरकार निर्माण केल्यानेच साध्य होऊ शकते.”

या गोष्टीला पाच दशके होऊन गेली आहेत, पण ही महत्त्वपूर्ण गरज आजही अपुरीच राहिली आहे. २१ व्या शतकातील समस्यांविषयी बोलताना, फ्रान्सच्या पॅरिस येथील ला मॉन्ड हे बातमीपत्रक म्हणते: “वांशिक हत्याकांडाच्या प्रकरणांमध्ये, जगभरात कोठेही तत्काळ कार्यवाही करण्यास समर्थ असलेल्या आंतरराष्ट्रीय सरकाराचा न्यायिक, व्यवस्थापनात्मक, संविधानात्मक पाया घालण्याची गरज आहे. यापुढे सबंध पृथ्वी ही एकच राष्ट्र आहे ही कल्पना स्वीकारण्याची गरज आहे.” मानवजातीला शांतीमय भविष्य लाभेल याची खात्री करण्यासाठी ही गोष्ट साध्य करण्याची शक्‍ती आणि सामर्थ्य कोणामध्ये किंवा कशामध्ये आहे?

संयुक्‍त राष्ट्रसंघ याचे उत्तर आहे का?

अनेकांनी जागतिक शांतीसाठी संयुक्‍त राष्ट्रसंघावर आपली आशा टाकली आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघ हे जगाला खरी शांती-सुरक्षितता आणवून देणारे सरकार आहे का? हे खरे आहे की, लोकांची आशा वाढवणाऱ्‍या राजनैतिक आश्‍वासनांची काही कमी नाही. उदाहरणार्थ, २००० सालच्या “सहस्रक घोषणा” यात संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने हा ठराव केला: “गेल्या दशकात ज्यामध्ये ५० लाखांहून अधिक लोक ठार झाले त्या देशांतर्गत किंवा दोन देशांमध्ये होणाऱ्‍या युद्धांच्या पीडेतून आमच्या लोकांना मुक्‍त करण्यासाठी आम्ही कसलीही कसर बाकी राहू देणार नाही.” अशा घोषणांनी संयुक्‍त राष्ट्रसंघाला लोकांची स्तुती-प्रशंसा त्याचप्रमाणे २००१ नोबेल शांती पारितोषिक देखील मिळवून दिले आहे. अशाप्रकारे संयुक्‍त राष्ट्रसंघाला सन्मानित करून, नॉर्व्हेजियन नोबेल समितीने म्हटले की, “जागतिक शांती आणि सहकार्य केवळ संयुक्‍त राष्ट्रसंघाद्वारे यशस्वीपणे मिळवले जाऊ शकते.”

पण, १९४५ साली स्थापन झालेला संयुक्‍त राष्ट्रसंघ खरी व कायमची जागतिक शांती आणण्यात यशस्वी ठरलेले सरकार आहे का? याचे उत्तर नाही असे आहे, कारण त्याच्या सदस्य राष्ट्रांचा स्वार्थ आणि राष्ट्रीय आकांक्षा यांमुळे बरेच प्रयत्न फोल ठरले आहेत. एका बातमीपत्रकाच्या संपादकाच्या शब्दांत, जनमताप्रमाणे, संयुक्‍त राष्ट्रसंघ केवळ “जागतिक मताचे मापक साधन” आहे व “त्याच्या अजेंडात वर्षानुवर्षे वादविवाद करून न सुटलेल्या समस्यांची यादी” आहे. यामुळे मुख्य प्रश्‍न असाच राहतो: जगातील राष्ट्रे एके दिवशी एकत्र येतील का?

बायबल म्हणते की, ही एकता फार लवकर साध्य होईल. हे कसे घडेल? आणि कोणते सरकार हे घडवून आणेल? उत्तरे मिळवण्यासाठी कृपया पुढचा लेख वाचा.

[३ पानांवरील चित्र]

आइन्स्टाईनने जागतिक सरकाराची गरज आहे याचे समर्थन केले

[चित्राचे श्रेय]

आईन्स्टाईन: U.S. National Archives photo