व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

श्रेष्ठपणाबद्दल ख्रिस्तासारखा दृष्टिकोन विकसित करणे

श्रेष्ठपणाबद्दल ख्रिस्तासारखा दृष्टिकोन विकसित करणे

श्रेष्ठपणाबद्दल ख्रिस्तासारखा दृष्टिकोन विकसित करणे

“जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल.”मत्तय २०:२६.

१. श्रेष्ठपणाविषयी जगिक दृष्टिकोन काय आहे?

थीब्स (आधुनिक काळातील कर्नाक), या प्राचीन इजिप्त शहराजवळ, कैरोच्या सुमारे ५०० किलोमीटर दक्षिणेकडे फारो अमेनहोटेप तिसरा याचा एक १८ मीटर उंचीचा मोठा पुतळा उभा आहे. त्या भव्य मूर्तीकडे पाहून आपण किती लहान आहोत हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. हे स्मारक, त्या शासकाबद्दल लोकांच्या मनात पूज्यभाव निर्माण करण्यासाठी बनवण्यात आले होते यात शंका नाही; ते श्रेष्ठपणाबद्दलच्या जगिक दृष्टिकोनाचे—स्वतःला होता होईल तितके मोठे आणि महत्त्वाचे भासवणे आणि इतरांना क्षुद्र वाटायला लावणे—याचे प्रतीक आहे.

२. येशूने आपल्या अनुयायांकरता कोणते उदाहरण मांडले आणि आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

श्रेष्ठपणाविषयीच्या या दृष्टिकोनाची तुलना येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या दृष्टिकोनाशी करा. येशू जरी आपल्या अनुयायांचा “प्रभु व गुरू” होता तरी इतरांची सेवा करण्यात श्रेष्ठता आहे हे त्याने त्यांना शिकवले. पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या शेवटल्या दिवशी त्याने, आपल्या शिष्यांचे पाय धुऊन आपल्याला नेमके काय शिकवायचे होते हे दर्शवले. किती ही नम्रतेची सेवा! (योहान १३:४, ५, १४) तुम्हाला काय अधिक आवडते—सेवा करणे की सेवा करवून घेणे? ख्रिस्ताचे उदाहरण तुमच्यामध्ये त्याच्यासारखीच नम्र मनोवृत्ती दाखवण्याची इच्छा निर्माण करते का? मग, जगामध्ये सामान्यपणे असलेल्या दृष्टिकोनाविरुद्ध श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्ताच्या दृष्टिकोनाचे आपण परीक्षण करू या.

श्रेष्ठपणाविषयीच्या जगिक दृष्टिकोनापासून दूर पळा

३. लोकांकडून गौरव मिळवण्याची हाव असलेल्यांचा कोणता वाईट परिणाम बायबलच्या उदाहरणांतून दिसून येतो?

बायबलमधली अनेक उदाहरणे दाखवतात की, श्रेष्ठपणाविषयीचा जगिक दृष्टिकोन नाशाला कारणीभूत ठरतो. सामर्थ्यशाली हामानाचा विचार करा; एस्तेर आणि मर्दखयच्या काळात पर्शियन राजाच्या दरबारात तो महत्त्वाचा व्यक्‍ती होता. हामानाने सन्मानाची हाव बाळगल्यामुळे त्याचा अनादर व मृत्यू झाला. (एस्तेर ३:५; ६:१०-१२; ७:९, १०) हट्टी नबुखदनेस्सरविषयी काय? तो अति सामर्थ्यशाली बनल्यावर वेडा झाला. श्रेष्ठपणाविषयी त्याचा चुकीचा दृष्टिकोन पुढील शब्दांमधून व्यक्‍त होतो: “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना!” (दानीएल ४:३०) मग अभिमानी हेरोद अग्रीप्पा पहिला याचेही उदाहरण आहे ज्याने, त्याची स्तुती होत असताना देवाला गौरव देण्याऐवजी ते स्वतःसाठी अनुचितपणे स्वीकारले. परिणामी “तो किडे पडून मेला.” (प्रेषितांची कृत्ये १२:२१-२३) श्रेष्ठपणाविषयी यहोवाचा दृष्टिकोन न समजून घेतल्यामुळे या सर्वांचा लाजिरवाण्या पद्धतीने पराभव झाला.

४. या जगाच्या अभिमानी आत्म्याचा उगम कोठून आहे?

आपल्याला सन्मान व आदर प्राप्त होईल असे जीवन जगण्याची इच्छा असणे योग्यच आहे. परंतु, दियाबल या इच्छेचा गैरफायदा घेतो व आपल्यामध्ये अभिमानी आत्मा निर्माण करतो; हा आत्मा त्याच्या स्वतःच्या आकांक्षांना चित्रित करतो. (मत्तय ४:८, ९) हे कधीही विसरू नका की, तो या ‘युगाचे दैवत’ आहे आणि पृथ्वीवर आपली विचारसरणी फैलावण्याचा त्याने चंग बांधला आहे. (२ करिंथकर ४:४; इफिसकर २:२; प्रकटीकरण १२:९) अशा विचारसरणीचा उगम कोठून आहे हे माहीत असल्यामुळे ख्रिस्ती जन श्रेष्ठपणाविषयी जगाचा दृष्टिकोन बाळगत नाहीत.

५. कार्यसिद्धी, प्रसिद्धी आणि धनसंपत्ती यांमुळे कायमचे समाधान मिळण्याची खात्री मिळते का? स्पष्ट करा.

जगामध्ये मोठे नाव कमावले, लोकांकडून कौतुक मिळवले आणि भरपूर धनसंपत्ती गोळा केली तर आपले जीवन आपोआप सुखी बनते अशा एका कल्पनेचा प्रसार दियाबल करत आहे. हे खरे आहे का? कार्यसिद्धी, प्रसिद्धी आणि धनसंपत्ती यांनी समाधानी जीवन मिळण्याची खात्री मिळते का? अशा विचाराने आपण फसू नये म्हणून बायबल आपल्याला सावधान करते. सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले: “मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली; ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाहि व्यर्थ व वायफळ उद्योग होय.” (उपदेशक ४:४) जगामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले ते बायबलमधील या प्रेरित सल्ल्याच्या सत्याची ग्वाही देऊ शकतात. एका मनुष्याचे उदाहरण आहे, ज्याने मनुष्याला चंद्रावर पोहंचवणारे अंतराळयान रचण्यात, तयार करण्यात व त्याची परीक्षा घेण्यात मदत केली होती. तो नंतर म्हणाला: “मी फार मेहनत घेतली आणि माझ्या कामात मी एकदम निपुण झालो. तरीही हे सर्व व्यर्थ, वायफळ ठरले होते कारण मला कायमचा आनंद आणि मनःशांती मिळाली नाही.” * श्रेष्ठपणाविषयी जगाची धारणा, मग ती व्यापाराच्या क्षेत्रात असो, खेळक्रिडेच्या असो नाहीतर मनोरंजनाच्या क्षेत्रात असो तिने कायमचे समाधान मिळत नाही एवढे मात्र नक्की.

प्रेमापोटी केलेल्या सेवेतील श्रेष्ठपणा

६. याकोब आणि योहानाचा श्रेष्ठपणाविषयी चुकीचा दृष्टिकोन होता हे कशावरून दिसते?

खरा श्रेष्ठपणा काय आहे हे येशूच्या जीवनातील एका घटनेवरून कळते. येशू आणि त्याचे शिष्य सा.यु. ३३ च्या वल्हांडणासाठी जेरूसलेमला प्रवास करून जात होते. वाटेवर, येशूचे दोन नातलग, याकोब आणि योहान यांनी श्रेष्ठपणाविषयी चुकीचा दृष्टिकोन दाखवला. आपल्या आईला त्यांनी येशूला अशी विनंती करायला लावली: ‘तुमच्या राज्यात आम्ही तुमच्या उजवीकडे व डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.’ (मत्तय २०:२१) यहुद्यांमध्ये, उजवीकडे आणि डावीकडे बसणे मोठ्या सन्मानाची गोष्ट मानली जाई. (१ राजे २:१९) याकोब आणि योहानाने अनुचितपणे सर्वात महत्त्वाची स्थाने मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना ही अधिकारपदे हवी होती. येशूला त्यांच्या मनात काय विचार चालला आहे हे ठाऊक होते आणि त्याने संधी साधून श्रेष्ठपणाविषयी त्यांचा चुकीचा दृष्टिकोन सुधारला.

७. खरा ख्रिस्ती श्रेष्ठपणा मिळवण्याचा मार्ग येशूने कसा दाखवला?

येशूला माहीत होते की, या अभिमानी जगात, श्रेष्ठ मानली जाणारी व्यक्‍ती आपल्या हातात सर्व कारभार घेते, सर्वांवर आपला अधिकार गाजवते व स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांना आपल्या बोटांवर नाचवू शकते. परंतु, येशूच्या अनुयायांमध्ये एखाद्या व्यक्‍तीची श्रेष्ठता तिच्या नम्र सेवेच्या आधारावर मोजली जाते. येशूने म्हटले: “जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.”—मत्तय २०:२६, २७.

८. सेवक बनण्याचा काय अर्थ होतो आणि आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

बायबलमधील “सेवक” असा भाषांतरित केलेला ग्रीक शब्द, इतरांची मेहनतीने आणि सातत्याने सेवा करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करतो. येशू आपल्या शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवत होता: इतरांवर हुकूम सोडल्याने एक व्यक्‍ती श्रेष्ठ बनत नाही; तर प्रेमापोटी इतरांची सेवा केल्याने श्रेष्ठ बनते. स्वतःला विचारा: ‘मी याकोब किंवा योहान असतो तर कशी प्रतिक्रिया दाखवली असती? प्रेमाचा हेतू बाळगून इतरांची सेवा करण्यात खरा श्रेष्ठपणा आहे हे मला समजले असते का?’—१ करिंथकर १३:३.

९. येशूने इतरांसोबत वागताना कोणते उदाहरण ठेवले?

येशूने आपल्या शिष्यांना हे दाखवले की, श्रेष्ठपणाविषयी जगाचा दर्जा हा ख्रिस्तासमान श्रेष्ठपणाचा दर्जा नाही. त्याने ज्यांची सेवा केली त्यांच्यासमोर त्याने स्वतःला कधीही श्रेष्ठ समजले नाही किंवा त्यांना कमीपणा जाणवू दिला नाही. सर्व प्रकारच्या लोकांना—पुरुष, स्त्रिया, लहान मुले, श्रीमंत, गरीब, शक्‍तिशाली त्याचप्रमाणे लोकांच्या नजरेत पापी असलेले—या सर्वांना त्याच्या सहवासात निश्‍चिंत वाटले. (मार्क १०:१३-१६; लूक ७:३७-५०) सहसा दुर्बल असलेल्यांशी लोक अधीरपणे वागतात. पण येशू तसा नव्हता. त्याचे शिष्य काही वेळा अविचारीपणे वागत होते आणि आपापसांत भांडत होते तरी त्याने सहनशीलतेने त्यांना शिकवले आणि दाखवून दिले की तो खरोखर नम्र आणि सौम्य मनाचा आहे.—जखऱ्‍या ९:९; मत्तय ११:२९; लूक २२:२४-२७.

१०. येशूच्या संपूर्ण जीवनक्रमाद्वारे इतरांप्रती त्याची निःस्वार्थ सेवा कशी दिसून आली?

१० देवाच्या या सर्वश्रेष्ठ पुत्राने मांडलेल्या निःस्वार्थ उदाहरणातून श्रेष्ठपणाचा नेमका काय अर्थ होतो हे दाखवले आहे. येशू सेवा करवून घेण्यासाठी नव्हे तर इतरांची सेवा करण्यासाठी, ‘नाना प्रकारचे रोग’ बरे करण्यासाठी आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांना मुक्‍त करण्यासाठी आला होता. त्याला थकवा येत असे आणि विश्रामाची गरज होती तरी तो नेहमी स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना महत्त्व द्यायचा आणि त्यांना सांत्वन देण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करायचा. (मार्क १:३२-३४; ६:३०-३४; योहान ११:११, १७, ३३) तो लोकांना आध्यात्मिकरित्या मदत करण्यासाठी प्रेमापोटी प्रेरित झाला; राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी कच्च्या रस्त्यांवरून त्याने शेकडो किलोमीटरचा प्रवास केला. (मार्क १:३८, ३९) इतरांची सेवा करण्याला येशूने महत्त्व दिले यात शंका नाही.

ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण करा

११. मंडळीत पर्यवेक्षक म्हणून नेमलेल्या बांधवांमध्ये कोणते गुण असावयास हवेत?

११ अठराशे दशकाच्या उत्तरार्धात, देवाच्या लोकांची सेवा करण्यासाठी प्रवासी प्रतिनिधींकरता पुरुषांची निवड केली जात असताना ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी कोणती योग्य मनोवृत्ती विकसित केली पाहिजे यावर जोर देण्यात आला. सप्टेंबर १, १८९४ च्या झायन्स वॉच टावरनुसार “लीन—म्हणजे गर्वाने न फुगलेले . . . , नम्र, स्वतःची नव्हे तर ख्रिस्ताची प्रशंसा करणारे—स्वतःच्या ज्ञानाची बढाई मारणारे नव्हे तर त्याचे सोपे व शक्‍तिशाली वचन सांगणारे” पुरुष हवे होते. स्पष्टतः, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी स्वतःची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा इतरांवर प्रभुत्व, सत्ता आणि अधिकार मिळवण्यासाठी जबाबदारीचे पद मिळवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. एका नम्र पर्यवेक्षकाने हे लक्षात ठेवावे की, त्याच्या जबाबदाऱ्‍या म्हणजे एक प्रकारचे ‘चांगले काम’ असून स्वतःला गौरव आणविणारे उच्च पद नाही. (१ तीमथ्य ३:१, २) सर्व वडिलांनी आणि सेवा सेवकांनी नम्रपणे इतरांची सेवा करण्याचा आणि पवित्र सेवेत पुढाकार घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा व इतरांच्या अनुकरणासाठी एक उत्तम उदाहरण मांडावे.—१ करिंथकर ९:१९; गलतीकर ५:१३; २ तीमथ्य ४:५.

१२. मंडळीमध्ये विशेषाधिकार प्राप्त करू पाहणारे स्वतःला कोणते प्रश्‍न विचार शकतात?

१२ विशेषाधिकार प्राप्त करू पाहणाऱ्‍या बांधवाने स्वतःस हे प्रश्‍न विचारावेत: ‘मी इतरांची सेवा करण्याची संधी शोधतो का की माझी सेवा लोकांनी करावी अशी माझी मनोवृत्ती असते? इतरांच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारची मदत करायला मी तयार असतो का?’ उदाहरणार्थ, एक तरुण पुरुष ख्रिस्ती मंडळीत भाषण द्यायला तयार असेल पण वडीलधाऱ्‍या लोकांना मदत करायला तो पुढे येत नसेल. त्याला मंडळीमध्ये जबाबदार पदी असलेल्या बांधवांसोबत राहायला आवडत असेल परंतु प्रचार कार्यात भाग घ्यायला तो कदाचित मागेपुढे करत असेल. अशा तरुणाने स्वतःला पुढील प्रश्‍न विचारल्यास बरे राहील: ‘देवाच्या सेवेमध्ये प्रसिद्धी आणि गौरव देणारी कामे करण्याकडे मी जास्त लक्ष देतो का? मी इतरांपुढे चमकण्याचा प्रयत्न करतो का?’ स्वतःसाठी गौरव प्राप्त करणे हे ख्रिस्तासमान कदापि नाही.—योहान ५:४१.

१३. (अ) पर्यवेक्षकाने नम्रतेचे उदाहरण राखल्यामुळे इतरांवर त्याचा कसा परिणाम पडू शकतो? (ब) नम्रता किंवा लीनता हा ख्रिश्‍चनासाठी मर्जीचा प्रश्‍न नाही असे का म्हणता येऊ शकेल?

१३ ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण करण्यासाठी आपण प्रयास करतो तेव्हा इतरांची सेवा करण्यास आपल्याला प्रेरणा मिळते. यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तराचा कारभार पाहणाऱ्‍या एका झोन पर्यवेक्षकांचे उदाहरण घ्या. हे बांधव अत्यंत व्यस्त होते आणि त्यांच्यावर भारी जबाबदारी होती तरीही एक तरुण बांधव शिलाईच्या मशिनवरचे सेटिंग ठीक करण्यासाठी झटत होता हे पाहिल्यावर ते त्याला मदत करायला थांबले. तो तरुण बांधव म्हणतो, “मला विश्‍वासच बसेना! त्यांनी मला सांगितलं, की ‘तरुणपणी मी बेथेलमध्ये अशाचप्रकारच्या मशिनवर काम करायचो आणि योग्य सेटिंग लावणं किती कठीण होतं हे मला चांगलं आठवतं.’ त्यांच्याकडे इतर महत्त्वाची कामं असतानाही त्यांनी माझ्यासोबत त्या मशिनवर काही वेळ काम केलं. याचा माझ्यावर फार प्रभाव पडला.” हा बांधव यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा दफ्तरात सध्या पर्यवेक्षक आहे; त्याला नम्रतेचे ते कृत्य अजूनही आठवते. आपण फार मोठे आहोत, आपण छोटीमोठी कामे करू शकत नाही, किंवा आपण महत्त्वाचे बनले आहोत त्यामुळे आपण क्षुल्लक कामे करू शकत नाही असा विचार आपण कधीही करू नये. या उलट, आपण ‘लीनता’ लेऊ या. हा मर्जीचा प्रश्‍न नाही. तर ख्रिश्‍चनाला “जो नवा मनुष्य” धारण करायचा आहे त्याचा एक भाग आहे.—फिलिप्पैकर २:३; कलस्सैकर ३:१०, १२; रोमकर १२:१६.

श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्ताचा दृष्टिकोन कसा प्राप्त करावा

१४. देवासोबत आणि आपल्या सहमानवासोबतच्या नातेसंबंधावर मनन केल्यावर श्रेष्ठपणाविषयी उचित दृष्टिकोन विकसित करण्यास आपल्याला कशी मदत मिळेल?

१४ श्रेष्ठपणाविषयी आपण योग्य दृष्टिकोन कसा प्राप्त करू शकतो? एक मार्ग म्हणजे यहोवा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर मनन करून. त्याचे ऐश्‍वर्य, शक्‍ती आणि बुद्धी यांमुळे तो क्षुद्र मानवांपेक्षा फार श्रेष्ठ ठरतो. (यशया ४०:२२) सहमानवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर मनन केल्यानेही आपल्याला लीनता धारण करण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, आपल्यामध्ये इतरांपेक्षा काही उत्तम गुण असतील, पण कदाचित इतरजण जीवनाच्या अधिक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील, किंवा आपल्या ख्रिस्ती बांधवांमध्ये आपल्यामध्ये नसलेले काही गुण असतील. उलट, देवाच्या नजरेत मौल्यवान असणाऱ्‍या पुष्कळांना लीन आणि नम्र असल्यामुळे लोकांमध्ये उठून दिसायला आवडत नाही.—नीतिसूत्रे ३:३४; याकोब ४:६.

१५. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटण्यास कोणालाही कारण नाही हे देवाच्या लोकांच्या सचोटीवरून कसे दिसून येते?

१५ आपल्या विश्‍वासामुळे परीक्षेत असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अनुभवातून हा मुद्दा स्पष्ट होतो. बहुतेक वेळा, जगाच्या दृष्टीत अगदी सामान्य असलेल्यांनीच अग्नीमय परीक्षांतही देवाशी आपली सचोटी राखली आहे. अशा उदाहरणांवर मनन केल्याने नम्र राहण्यास आपल्याला मदत मिळेल आणि ‘आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक न मानण्यास’ आपण शिकू शकतो.—रोमकर १२:३. *

१६. येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून मंडळीतले सर्वजण श्रेष्ठपणा कसा धारण करू शकतात?

१६ तरुण आणि वृद्ध अशा सर्व ख्रिश्‍चनांनी, श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंडळीत, विविध कामे असतात. एखादे क्षुल्लक वाटणारे काम करायला लावल्यावर कधीही रागावू नका. (१ शमुवेल २५:४१; २ राजे ३:११) पालकांनो, तुमच्या मुलांना आणि किशोरवयीनांना राज्य सभागृहात, संमेलनात किंवा अधिवेशन ठिकाणी कोणतीही नेमणूक दिल्यास ती आनंदाने पार पाडण्याचे उत्तेजन तुम्ही देता का? तुम्हाला लहानसहान कामे करताना ते पाहतात का? यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सध्या सेवा करणाऱ्‍या एका बांधवाला आपल्या पालकांचे उदाहरण आठवते. ते म्हणतात: “राज्य सभागृहात किंवा अधिवेशन ठिकाणी ते ज्या पद्धतीनं स्वच्छतेचं काम करायचे त्यावरून ते काम त्यांना महत्त्वाचं वाटतं हे मला कळत होतं. मंडळीच्या किंवा बांधवांच्या भल्यासाठी असलेली कामं, मग ती कितीही क्षुल्लक वाटत असली तरी, ती करण्यासाठी सहसा ते पुढं यायचे. या मनोवृत्तीमुळे इथं बेथेलमध्ये कसलीही नेमणूक स्वीकारायला मला मदत मिळाली आहे.”

१७. नम्र स्त्रिया मंडळीला एक आशीर्वाद कशा ठरू शकतात?

१७ स्वतःपेक्षा इतरांचे भले करण्यासंबंधी, एस्तेरचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. एस्तेर ही सा.यु.पू. पाचव्या शतकात पर्शियन साम्राज्याची राणी बनली. ती राजमहालात राहत होती तरी, देवाच्या इच्छेप्रमाणे ती त्याच्या लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार झाली. (एस्तेर १:५, ६; ४:१४-१६) आज देखील ख्रिस्ती स्त्रिया, आर्थिक अडचणी असतानाही एस्तेरसारखी मनोवृत्ती दर्शवून खिन्‍न लोकांना उत्तेजन देऊ शकतात, आजाऱ्‍यांना जाऊन भेटू शकतात, प्रचारकार्यात भाग घेऊ शकतात आणि वडिलांना सहकार्य देऊ शकतात. अशा नम्र बहिणी मंडळीला एक आशीर्वाद ठरतात!

ख्रिस्तासमान असलेल्या श्रेष्ठपणाचे आशीर्वाद

१८. ख्रिस्तासमान श्रेष्ठपणा दर्शवल्याने कोणते फायदे प्राप्त होतात?

१८ श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होतील. इतरांची निःस्वार्थपणे सेवा केल्याने त्यांना आणि तुम्हालाही आनंद प्राप्त होईल. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) तुम्ही आपल्या बांधवांसाठी स्वेच्छेने आणि उत्सुकतेने काम करता तेव्हा तुम्ही त्यांना अधिक प्रिय होता. (प्रेषितांची कृत्ये २०:३७) त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही सहख्रिश्‍चनांच्या कल्याणासाठी जे काही करता त्यास यहोवा स्तुतीयज्ञ असे समजतो.—फिलिप्पैकर २:१७.

१९. श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन राखण्यासंबंधी आपला दृढनिश्‍चय काय असावा?

१९ प्रत्येकाने आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करून असे विचारावे: ‘श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन धारण करण्यासंबंधी मी फक्‍त तोंडाने बोलतो की त्याप्रमाणे कार्यही करतो?’ गर्विष्ठ लोकांविषयी यहोवाला काय वाटते हे अगदी स्पष्ट आहे. (नीतिसूत्रे १६:५; १ पेत्र ५:५) आपल्या कार्यांवरून, श्रेष्ठपणाविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन प्रदर्शित करण्यास आपल्याला आवडते हे आपण दाखवू या; मग ते ख्रिस्ती मंडळीत असो, आपल्या कौटुंबिक जीवनात असो नाहीतर सहमानवांसोबत दररोजच्या व्यवहारांत असो; आपण प्रत्येक गोष्ट देवाच्या गौरवासाठी व स्तुतीसाठी करू या.—१ करिंथकर १०:३१.

[तळटीपा]

^ परि. 5 पाहा टेहळणी बुरूज, (इंग्रजी) मे १, १९८२, पृष्ठे ३-६, “यशाच्या शोधात.”

^ परि. 15 उदाहरणांसाठी, पाहा १९९२ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक (इंग्रजी) पृष्ठे १८१-२ आणि टेहळणी बुरूज, (इंग्रजी) सप्टेंबर १, १९९३, पृष्ठे २७-३१.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

• श्रेष्ठपणाविषयी जगाच्या दृष्टिकोनापासून आपण दूर का पळाले पाहिजे?

• येशूने कशाला श्रेष्ठपणा म्हटले?

• पर्यवेक्षक ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण कसे करू शकतात?

• ख्रिस्तासमान श्रेष्ठपणा आपण कसा धारण करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चौकट]

ख्रिस्तासमान श्रेष्ठपणा कोणाजवळ आहे?

सेवा करवून घेणाऱ्‍याकडे की सेवा करण्याची इच्छा असणाऱ्‍याकडे?

लोकांमध्ये उठून दिसण्याची इच्छा असणाऱ्‍याकडे की लहानसहान कामे स्वाकारणाऱ्‍याकडे?

स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्‍याकडे की इतरांना श्रेष्ठ समजणाऱ्‍याकडे?

[१४ पानांवरील चित्र]

फारो अमेनहोटेप तिसरा याची अजस्र मूर्ती

[१५ पानांवरील चित्र]

हामानचा पराजय कशामुळे झाला हे तुम्हाला माहीत आहे का?

[१६ पानांवरील चित्रे]

इतरांची सेवा करण्याची तुम्ही संधी शोधता का?