व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तम सल्ल्याची गरज आहे का?

उत्तम सल्ल्याची गरज आहे का?

उत्तम सल्ल्याची गरज आहे का?

आज पुष्कळ लोकांना असे वाटते, की त्यांच्याजवळ चांगले आणि वाईट समजण्याची कुवत आहे व मनास येईल त्याप्रमाणे वागण्याचा त्यांना हक्क आहे. इतरजण म्हणतात, की एखाद्या व्यक्‍तीची जीवनशैली, तिला त्यातून जर आनंद मिळत राहतो तर ती स्वीकृत आहे. मानव समाजाचे मूलभूत घटक समजले जाणारे विवाह आणि कौटुंबिक जीवन यांवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे.—उत्पत्ति ३:५.

मेक्सिकोत राहणाऱ्‍या वेरोनिकाचे उदाहरण घ्या. * ती म्हणते: “आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला १५ वर्षं पूर्ण व्हायला फक्‍त काही दिवस उरले होते तेव्हा माझ्या नवऱ्‍यानं मला सांगितलं, की त्याचे एका दुसऱ्‍या स्त्रीबरोबर संबंध आहेत. तो म्हणाला, की ती स्त्री तरुण आहे आणि त्याला तिचा सहवास आवडत असल्यामुळे तो तिला सोडणार नाही. मी ज्याला माझा जिवाभावाचा सोबती समजत होते तो इथूनपुढे मला साथ देणार नाही या विचारनंच मला धक्का बसला. मला वाटायचं, की आपल्या प्रिय जनांचा मृत्यू, दुःखाचं सर्वात मोठं कारण असू शकतं. पण माझ्या बाबतीत, जारकर्म याहूनही अधिक दुःखदायक आहे कारण, मी ज्याच्यावर जिवापाड प्रेम करत होते त्याला मी फक्‍त गमावलंच नाही तर तो माझ्या मनाला लागत राहील अशा प्रकारच्या गोष्टीही करत राहिला.”

दुसरे उदाहरण, एका २२ वर्षीय मनुष्याचे आहे ज्याचा घटस्फोट झाला आणि ज्याला एक मुलगाही आहे; परंतु तो पिता यानात्याने आपली जबाबदारी पूर्ण करू इच्छित नाही. आपल्या आईने आपल्याला आणि आपल्या मुलाला सांभाळावे अशी तो अपेक्षा करतो. त्याच्या आईने त्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर वळण नसलेल्या मुलासारखा तो चिडतो, तिला शिवीगाळ करतो. अशा आक्रमक परिस्थितीत आईला हतबल वाटते.

या अशा घटना काही नवीन नाहीत. कायदेशीररीत्या फारकत आणि घटस्फोट यांचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. आई किंवा वडील यांच्यापैकी कोणीतरी एक जण घर सोडून दुसऱ्‍या व्यक्‍तीबरोबर राहायला जातात, हे मुले पाहतात. काही तरुण तर, आईवडिलांसोबतच इतरांबद्दलचा देखील आदर गमावतात; आणि पूर्वी ज्याचा विचारही केला जात नसे असे वागतात. लैंगिक प्रयोग, मादक पदार्थांचा गैरवापर, तरुणांचे हल्ले, शिक्षक किंवा पालकांची मुलांनी केलेली हत्या या सर्व गोष्टी अनेक राष्ट्रांत सर्वसामान्य झाल्या आहेत. आणि तुम्ही कदाचित पाहिले असेल, की आजच्या जगात फक्‍त मुलांचे संगोपन आणि विवाह या दोन क्षेत्रातच समस्या आहेत असे नाही.

या घडामोडी पाहत असताना आपल्या मनात असा प्रश्‍न येऊ शकतो, की या समाजाला झाले तरी काय? लोकांकडे चांगले आणि वाईट समजण्याची कुवत खरोखरच आहे तर मग इतक्या समस्यांचे निरसन अद्याप कसे झालेले नाही? उत्तम सल्ल्याची खरेच गरज आहे का? असा विश्‍वसनीय ठरलेला व फायदेकारक सल्ला मिळण्याची शक्यता आहे का? पुष्कळ लोक, देव आणि त्याचे लिखित वचन बायबल यावर विश्‍वास असल्याचा दावा करत असले तरी, या दाव्याचा त्यांच्या निर्णयांवर परिणाम होत असल्याचे मात्र दिसून येत नाही. देवाचा सल्ला शोधून तो प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केल्यास आपल्याला काय लाभ मिळू शकेल? हे आपण पुढील लेखात पाहू या.

[तळटीप]

^ परि. 3 नाव बदलण्यात आले आहे.