यहोवा, ‘संकटसमयी आपला दुर्ग आहे’
यहोवा, ‘संकटसमयी आपला दुर्ग आहे’
“परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे.”—स्तोत्र ३७:३९.
१, २. (अ) येशूने आपल्या शिष्यांकरता काय प्रार्थना केली? (ब) आपल्या लोकांसंबंधी देवाची काय इच्छा आहे?
यहोवा सर्वशक्तिमान आहे. आपल्या विश्वासू उपासकांचे वाटेल त्या पद्धतीने संरक्षण करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. वेळ आल्यास, तो आपल्या लोकांना अक्षरशः सबंध जगापासून अलिप्त अशा सुरक्षित व शांतीपूर्ण ठिकाणी नेऊन ठेवू शकतो. पण, आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करताना येशूने आपल्या शिष्यांविषयी म्हटले: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो.”—योहान १७:१५.
२ यहोवाने आपल्याला ‘जगातून काढून न घेता’ आपल्याला जगातच राहू देण्याचे निवडले आहे. त्याची इच्छा आहे की आपण या जगातील सर्वसामान्य लोकांमध्येच राहून त्यांना देवाकडील आशेचा व सांत्वनाचा संदेश घोषित करावा. (रोमकर १०:१३-१५) पण येशूने आपल्या प्रार्थनेत सुचवले होते त्याप्रमाणे, या जगात राहिल्यामुळे आपण ‘वाईटाच्या’ अर्थात सैतानाच्या संपर्कात येतो. देवाच्या आज्ञा न पाळणारे मानव आणि दुष्ट आत्मिक प्राणी बरेच दुःख व यातना यांना कारणीभूत आहेत आणि ख्रिस्ती देखील या दुःखातून सुटलेले नाहीत.—१ पेत्र ५:९.
३. यहोवाच्या विश्वासू उपासकांना देखील कोणत्या वस्तुस्थितीला तोंड द्यावे लागते पण देवाच्या वचनात आपल्याला कोणते सांत्वन मिळते?
३ अशाप्रकारच्या परीक्षांना तोंड देताना, काही काळपर्यंत निराश होणे साहजिक आहे. (नीतिसूत्रे २४:१०) बायबलमध्ये अशा अनेक विश्वासू व्यक्तींची उदाहरणे आहेत ज्यांना दुःखद परिस्थितीला तोंड द्यावे लागले. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” (स्तोत्र ३४:१९) होय, ‘नीतिमानालाही’ वाईट अनुभव येतात. स्तोत्रकर्ता दावीद याच्यासारखे कधीकधी तर आपल्याला ‘बधिर व फारच ठेचून गेल्यासारखे वाटेल.’ (स्तोत्र ३८:८) पण “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो,” हे जाणून आपल्याला सांत्वन मिळते.—स्तोत्र ३४:१८; ९४:१९.
४, ५. (अ) नीतिसूत्रे १८:१० यानुसार, देवाचे संरक्षण मिळवण्याकरता आपण काय केले पाहिजे? (ब) देवाची मदत मिळवण्याकरता आपण कोणती काही खास पावले उचलू शकतो?
४ येशूने प्रार्थना केल्याप्रमाणे, यहोवाने खरोखरच आपल्याला आजवर राखले आहे. “संकटसमयी तोच [आपला] दुर्ग आहे.” (स्तोत्र ३७:३९) नीतिसूत्रांचे पुस्तक देखील मिळत्याजुळत्या शब्दांत हाच विचार व्यक्त करते: “परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” (नीतिसूत्रे १८:१०) हे वचन यहोवा आपल्या प्राण्यांची कशाप्रकारे कोमलतेने काळजी घेतो याविषयी एक मूलभूत सत्य प्रकट करते. जे नीतिमान जन सक्रियपणे यहोवाचा शोध घेतात, अर्थात आश्रयाकरता दुर्गाकडे धाव घेतात त्यांना खासकरून तो संरक्षण देऊ करतो.
५ पण आपल्यावर दुःखदायक संकटे येतात तेव्हा आपण यहोवाकडे संरक्षणाकरता कशाप्रकारे धाव घेऊ शकतो? यहोवाची मदत मिळवण्याकरता आपण कोणती तीन आवश्यक पावले उचलू शकतो याविषयी विचार करू या. सर्वप्रथम, आपण आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना केली पाहिजे. दुसरे म्हणजे आपण त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले पाहिजे. आणि तिसरे म्हणजे यहोवाच्या व्यवस्थेला अधीनता दाखवून ख्रिस्ती बांधवांसोबत सहवास राखला पाहिजे; ते आपले दुःख कमी करू शकतात.
प्रार्थनेचे सामर्थ्य
६. खरे ख्रिस्ती प्रार्थनेविषयी कसा दृष्टिकोन बाळगतात?
६ काही आरोग्य तज्ज्ञ, मानसिक खिन्नता व तणावावरती उपाय म्हणून प्रार्थना करण्याचे सुचवतात. शांतपणे प्रार्थनापूर्वक मनन केल्यामुळे तणाव बराच कमी होऊ शकतो हे खरे आहे; पण निसर्गातील काही ध्वनी ऐकल्यास किंवा कोणी पाठ चोळल्यास एका व्यक्तीवर हाच परिणाम होऊ शकतो, तिचा तणाव कमी होतो. पण खरे ख्रिस्ती प्रार्थनेविषयी असा उथळ दृष्टिकोन बाळगत नाहीत; त्यांच्याकरता प्रार्थना केवळ तणाव कमी करण्याचा एक मानसोपचार नाही. प्रार्थना म्हणजे आपल्या निर्माणकर्त्यासोबत केलेला आदरपूर्वक संवाद होय. प्रार्थनेचा संबंध आपल्याला देवाप्रती वाटणाऱ्या भक्तिभावाशी व त्याच्यावर आपल्याला असलेल्या भरवशाशी आहे. होय, प्रार्थना आपल्या उपासनेत समाविष्ट आहे.
७. पूर्ण भरवशाने प्रार्थना करण्याचा काय अर्थ होतो आणि अशाप्रकारे प्रार्थना केल्याने आपल्याला आपल्या संकटांना तोंड देण्यास कशी मदत मिळते?
७ आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला यहोवावर आत्मविश्वास किंवा पूर्ण भरवसा असला पाहिजे. प्रेषित योहानाने लिहिले: “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) सर्वश्रेष्ठ देव यहोवा, एकच खरा व सर्वशक्तिमान देव, आपल्या उपासकांच्या प्रामाणिक प्रार्थनांकडे लक्ष देतो. आपण आपल्या चिंता आणि समस्या सांगतो तेव्हा आपला प्रेमळ देव आपले ऐकतो, ही जाणीवच किती सांत्वनदायक आहे.—फिलिप्पैकर ४:६.
८. विश्वासू ख्रिश्चनांना कधीही यहोवाला प्रार्थना करताना संकोच किंवा आपण लायक नाही असे का वाटू नये?
८ यहोवाला प्रार्थना करताना विश्वासू ख्रिश्चनांना कधीही संकोच, आपण लायक नाही अशी भावना किंवा आत्मविश्वासाची कमी वाटू नये. आपण स्वतःच्या वागणुकीमुळे निराश असतो किंवा आपल्या समस्यांनी बेजार होतो तेव्हा यहोवाला प्रार्थना करावेसे आपल्याला नेहमीच वाटणार नाही हे कबूल आहे. पण अशा वेळी आपण आठवणीत ठेवले पाहिजे, की यहोवा “आपल्या पीडलेल्या लोकांवर दया” आणि “दीनांचे सांत्वन” करतो. (यशया ४९:१३; २ करिंथकर ७:६) खासकरून दुःखाच्या व संकटाच्या काळातच आपण आपल्या स्वर्गीय पित्याला आपला दुर्ग मानून पूर्ण खात्रीने त्याच्याकडे धाव घेतली पाहिजे.
९. प्रार्थनापूर्वक देवाजवळ येण्यात विश्वासाची काय भूमिका आहे?
९ प्रार्थनेच्या सुहक्काचा पुरेपूर फायदा होण्यासाठी इब्री लोकांस ११:६) केवळ देवाच्या अस्तित्वावर, “तो आहे” या गोष्टीवर विश्वास असणे म्हणजे विश्वास नव्हे. खरा विश्वास बाळगणाऱ्या व्यक्तीला, याची मनापासून खात्री असते की आपण आज्ञाधारक राहिल्यास देव आपल्याला त्याचे प्रतिफळ देण्यास समर्थ आहे आणि तो ते देऊ इच्छितो. “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे.” (१ पेत्र ३:१२) यहोवाच्या प्रेमळ काळजीची सतत जाणीव बाळगल्यास आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनतात.
आपला विश्वास मजबूत असणे आवश्यक आहे. बायबल म्हणते, की “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (१०. यहोवाकडून आध्यत्मिक साहाय्य मिळवायचे असल्यास आपल्या प्रार्थना कशा असाव्यात?
१० आपण संपूर्ण मनाने प्रार्थना करतो तेव्हा यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “मी अगदी मनापासून तुझा धावा करितो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन.” (स्तोत्र ११९:१४५) अनेक धर्मांत विधीनुसार प्रार्थना केली जाते पण आपल्या प्रार्थना केवळ परिपाठाने केलेल्या किंवा कर्तव्यभावनेतून केलेल्या नसतात. आपण यहोवाला ‘अगदी मनाने’ प्रार्थना करतो तेव्हा आपले शब्द आपोआपच अर्थपूर्ण व उद्देशपूर्ण असतात. अशाप्रकारे मनःपूर्वक प्रार्थना केल्यानंतर ‘आपला भार परमेश्वरावर टाकल्यामुळे’ मिळणारी शांती आपल्याला जाणवू लागते. बायबलमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे, ‘तो आपला पाठिंबा होईल.’—स्तोत्र ५५:२२; १ पेत्र ५:६, ७.
देवाचा आत्मा आपला साहाय्यकर्ता आहे
११. आपण यहोवाची मदत ‘मागतो’ तेव्हा तो आपल्याला कोणत्या एका मार्गाने उत्तर देतो?
११ यहोवा केवळ प्रार्थना ऐकणारा नसून प्रार्थनांचे उत्तर देणाराही आहे. (स्तोत्र ६५:२) दाविदाने लिहिले: “मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.” (स्तोत्र ८६:७) यानुसार येशूने आपल्या शिष्यांना यहोवाची मदत “मागा” असे उत्तेजन दिले कारण ‘स्वर्गीय पिता’ निश्चितच ‘जे मागतात त्यास पवित्र आत्मा देईल.’ (लूक ११:९-१३) होय देवाची सक्रिय शक्ती अर्थात त्याचा पवित्र आत्मा त्याच्या लोकांकरता एक साहाय्यकर्ता किंवा कैवारी म्हणून कार्य करतो.—योहान १४:१६.
१२. समस्या आपल्याला भारावून टाकू लागतात तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला कशाप्रकारे साहाय्य करू शकतो?
१२ आपल्याला परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हा देखील, देवाचा आत्मा आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. (२ करिंथकर ४:७) प्रेषित पौल ज्याने अनेक तणावपूर्ण परिस्थितींना तोंड दिले होते, त्याने पूर्ण खात्रीने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) त्याचप्रमाणे आज अनेक ख्रिस्ती प्रार्थनापूर्वक याचना करतात तेव्हा त्यांना आत्मिक व भावनिक शक्ती नव्याने मिळाल्याचे ते सांगतात. कित्येकदा देवाच्या आत्म्याची मदत मिळाल्यानंतर दुःखदायक समस्या देखील आपल्याला अगदीच भारावून टाकणाऱ्या वाटत नाहीत. देवाने दिलेल्या या सामर्थ्यामुळे आपण प्रेषित पौलाप्रमाणे म्हणू शकतो, की “आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.”—२ करिंथकर ४:८, ९.
१३, १४. (अ) यहोवा त्याच्या लिखित वचनाकरवी कशाप्रकारे आपला दुर्ग ठरला आहे? (ब) बायबल तत्त्वांचे पालन केल्याने तुम्हाला वैयक्तिकरित्या कसा फायदा झाला आहे?
१३ पवित्र आत्म्याने आपल्या फायद्याकरता देवाचे लिखित वचन प्रेरित करून ते आजवर जतन केले आहे. यहोवा त्याच्या वचनाकरवी आपल्या संकटसमयी कशाप्रकारे एक दुर्ग होतो? तर तो आपल्याला चातुर्य आणि विवेक अर्थात विचारशक्ती देतो. (नीतिसूत्रे ३:२१-२४) बायबल आपल्या विचारशक्तीला प्रशिक्षित करते आणि आपली तर्कशक्ती सुधारते. (रोमकर १२:१) देवाच्या वचनाच्या नियमित वाचनाने व अभ्यासाने, तसेच त्यानुसार आचरण केल्याने आपण “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” देऊ शकतो. (इब्री लोकांस ५:१४) कठीण प्रसंग येतात तेव्हा बायबलची तत्त्वे कशाप्रकारे आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करतात हे कदाचित तुम्ही स्वतः अनेकदा अनुभवले असेल. दुःखदायक समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधून काढण्यास बायबल आपल्याला चाणाक्षपण देते.—नीतिसूत्रे १:४.
१४ देवाचे वचन आपल्याला आणखी एका मार्गाने बळ देते—तारणाच्या आशेद्वारे. (रोमकर १५:४) बायबल आपल्याला सांगते की वाईट गोष्टी सर्वकाळ घडत राहणार नाहीत. आपल्याला कोणत्याही संकटांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा ती तात्पुरती आहेत. (२ करिंथकर ४:१६-१८) आपल्याजवळ “जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले” त्याची आशा आहे. (तीत १:२) जर आपण ही आशा मनाशी बाळगून आनंदी राहिलो, यहोवाने वचन दिलेल्या उज्ज्वल भविष्याची सतत जाणीव बाळगली तर आपण संकटसमयी धीर धरू शकतो.—रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर १:३.
मंडळी—देवाचे प्रेम व्यक्त करणारे माध्यम
१५. ख्रिस्ती एकमेकांकरता एक आशीर्वाद कशाप्रकारे ठरू शकतात?
१५ संकटसमयी आपल्याला ज्यामुळे मदत मिळू शकेल अशी यहोवाने केलेली आणखी एक तरतूद म्हणजे ख्रिस्ती मंडळीत आपल्याला लाभणारा सहवास. बायबल म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) देवाचे वचन मंडळीतल्या सर्वांना एकमेकांचा आदर करण्याचे व एकमेकांवर प्रीती करण्याचे उत्तेजन देते. (रोमकर १२:१०) प्रेषित पौलाने लिहिले, “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे.” (१ करिंथकर १०:२४) अशाप्रकारची मनोवृत्ती ठेवल्यास आपल्याला केवळ स्वतःच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या गरजांविषयी विचार करण्यास मदत होईल. जेव्हा आपण इतरांकरता काही करतो तेव्हा केवळ त्यांनाच मदत होत नाही, तर आपल्यालाही आनंद व समाधान मिळते, ज्यामुळे आपली ओझी देखील थोडी सुसह्य होतात.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
१६. प्रत्येक ख्रिस्ती इतरांना प्रोत्साहन कशाप्रकारे देऊ शकतो?
१६ आध्यात्मिकरित्या प्रौढ स्त्रिया व पुरुष इतरांना साहाय्य पुरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. असे करण्याकरता त्यांचे व्यक्तिमत्त्व असे असावे की जेणेकरून इतरांना त्यांच्याकडे मदतीकरता येण्यास संकोच वाटू नये. (२ करिंथकर ६:११-१३) सर्वजण जेव्हा मंडळीतल्या तरुणांना शाबासकी देण्याकरता, नवीन सदस्यांना उत्तेजन देण्याकरता आणि खिन्न झालेल्यांना प्रोत्साहन देण्याकरता पुढाकार घेतात तेव्हा मंडळीला खरोखर अनेक आशीर्वाद लाभतात. (रोमकर १५:७) बंधुप्रेम आपल्याला एकमेकांप्रती संशयी वृत्ती न बाळगण्यासही मदत करते. वैयक्तिक समस्या या आध्यात्मिक दुर्बलतेचा पुरावा आहेत असा निष्कर्ष आपण लगेच काढू नये. म्हणूनच पौलाने ख्रिश्चनांना “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या,” असे आर्जवले. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) बायबल दाखवते, की विश्वासू ख्रिश्चनांनाही संकटे सोसावी लागू शकतात.—प्रेषितांची कृत्ये १४:१५.
१७. ख्रिस्ती बंधुत्वाचे बंधन बळकट करण्याच्या कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत?
१७ ख्रिस्ती सभा एकमेकांना सांत्वन व प्रोत्साहन इब्री लोकांस १०:२४, २५) या प्रेमळ प्रोत्साहनाची देवाणघेवाण केवळ मंडळीच्या सभांतच होऊ शकते असे नाही. उलट देवाचे लोक अनौपचारिक प्रसंगीही एकमेकांच्या हितकारक सहवासाचा आनंद लुटण्याची संधी शोधतात. दुःखदायक प्रसंग येतात तेव्हा आपण लगेच एकमेकांच्या मदतीला धावून जाऊ कारण आपल्यात दृढ मैत्रीचे बंधन आधीच स्थापन झालेले असेल. प्रेषित पौलाने लिहिले: “शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.”—१ करिंथकर १२:२५, २६.
देण्याकरता उत्तम संधी पुरवतात. (१८. आपल्याला निराश वाटते तेव्हा आपण कोणती प्रवृत्ती टाळावी?
१८ कधीकधी आपण इतके निराश असतो की सह ख्रिस्ती बांधवांच्या सहवासाचा आनंद लुटण्याच्या मनःस्थितीत नसतो. पण आपण अशा भावनांचा प्रतिकार केला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या सहविश्वासू बांधवांकडून मिळणाऱ्या सांत्वनापासून व उत्तेजनापासून वंचित राहणार नाही. बायबल आपल्याला इशारा देते: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” (नीतिसूत्रे १८:१) आपले बंधू व भगिनी देवाला आपल्याबद्दल असलेल्या काळजीचा पुरावा आहेत. जर आपण ही प्रेमळ तरतूद ओळखली तर संकटसमयी नक्कीच आपल्याला साहाय्य लाभेल.
आशावादी मनोवृत्ती राखा
१९, २०. शास्त्रवचने आपल्याला नकारात्मक विचार टाळण्यास कशाप्रकारे मदत करतात?
१९ निराशा व दुःख आपल्या जीवनात येते तेव्हा नकारात्मक विचार सहज मनात घर करू शकतात. उदाहरणार्थ, संकटांना तोंड देताना काहीजण स्वतःच्या आध्यात्मिकतेविषयी साशंक होऊ शकतात; त्यांच्यावर आलेला कठीण प्रसंग देवाच्या नापसंतीचे लक्षण आहे असा निष्कर्षही कदाचित ते काढतील. पण आठवणीत असू द्या, यहोवा कधीही ‘वाईट गोष्टींनी’ कोणाला मोहात पाडीत नाही. (याकोब १:१३) बायबल म्हणते, “तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांस दुःख देत नाही.” (विलापगीत ३:३३) उलट, आपल्या सेवकांना दुःखे सोसताना पाहून यहोवाला दुःख होते.—यशया ६३:८, ९; जखऱ्या २:८.
२० यहोवा “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” आहे. (२ करिंथकर १:३) तो आपल्याविषयी काळजी करतो आणि योग्य वेळी तो आपली उन्नती करतो. (१ पेत्र ५:६, ७) देवाला आपल्याबद्दल किती प्रीती आहे हे सदोदित मनात बाळगल्यास आपल्याला आशावादी दृष्टिकोन बाळगणे, इतकेच काय तर आनंदी राहणेही शक्य होईल. याकोबाने लिहिले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.” (याकोब १:२) का? तो उत्तर देतो: “कारण आपणावर प्रीति करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.”—याकोब १:१२.
२१. कोणत्याही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा देवाला विश्वासू राहणाऱ्यांना तो कोणते आश्वासन देतो?
२१ येशूने बजावल्याप्रमाणे जगात आपल्याला क्लेश होतील. (योहान १६:३३) पण बायबल आश्वासन देते की कोणतेही “क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट” आपल्याला यहोवाच्या प्रेमापासून आणि त्याच्या पुत्राच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाहीत. (रोमकर ८:३५, ३९) आपल्याला सोसावे लागणारे कोणतेही संकट केवळ तात्पुरते आहे हे जाणणे किती सांत्वनदायक आहे! मानवी दुःखाच्या अंताची वाट पाहत असताना, या मधल्या काळात आपला प्रेमळ पिता यहोवा आपले रक्षण करतो. आपण त्याच्याजवळ संरक्षणाकरता धाव घेतल्यास आपली निराशा होणार नाही, कारण तो “पीडितासाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे.”—स्तोत्र ९:९.
आपण काय शिकलो?
• या दुष्ट जगात राहात असताना ख्रिश्चनांनी कशाची अपेक्षा करावी?
• परीक्षांना तोंड देताना कळकळीच्या प्रार्थना कशाप्रकारे आपले साहाय्य करू शकतात?
• देवाचा आत्मा कशाप्रकारे साहाय्यकर्ता ठरतो?
• एकमेकांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
भक्कम बुरुजात आश्रयाकरता धावल्याप्रमाणे आपण यहोवाकडे धाव घेतली पाहिजे
[२० पानांवरील चित्रे]
आध्यात्मिकरित्या प्रौढ जन इतरांची प्रशंसा करण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेतात