वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
काही लोक असा दावा करतात, की पौलाचे जहाज सिसिलीच्या दक्षिणेकडील माल्टा द्वीपावर नव्हे तर दुसऱ्या कुठल्या तरी द्वीपावर फुटले. ते नक्की कोठे फुटले?
पौलाचे जहाज माल्टा द्वीपावर नव्हे तर पश्चिम ग्रीसच्या किनाऱ्याजवळ आयोनियन समुद्रात कोर्फूजवळील केफालोनिया (किंवा केफालिनिया) येथे फुटले असे अलीकडेच सुचवण्यात आले; तर याला उद्देशून हा प्रश्न आहे. प्रेरित अहवालानुसार, पौल, रोमी अधिकारी यूल्य याच्या ताब्यात इतर सैनिक आणि आपले सोबती यांच्यासह कैसऱ्याहून समुद्रप्रवासाला निघाला. नकाशावर दाखवल्याप्रमाणे ते सीदोन आणि मुर्या बंदरावरही गेले. प्रेषितांची कृत्ये २७:१–२८:१.
इजिप्तच्या आलेक्सांद्रिया येथून ते धान्य वाहून नेणाऱ्या दुसऱ्या एका मोठ्या तारूत चढले आणि पश्चिमेकडील कनिदाला गेले. ग्रीसच्या टोकावरून रोमकडे जाणाऱ्या एजिअन समुद्रातील सुचवलेल्या मार्गावरून ते जाऊ शकले नाहीत. वादळवाऱ्यामुळे त्यांना दक्षिणेकडील क्रीटच्या (क्रेताच्या) किनाऱ्यावर आसरा घ्यावा लागला. तेथील सुंदर बंदर नावाच्या बंदरावर ते उतरले. ‘क्रेताहून निघाल्यानंतर’ ‘युरकुलोन नावाच्या एका तुफानी वाऱ्यात’ तारू ‘सापडले.’ चौदाव्या रात्रीपर्यंत धान्याने भरलेले तारू “इकडे तिकडे हेलकावे खात” राहिले. शेवटी, बुडणाऱ्या तारवातून सर्व २७६ प्रवासी एका बेटावर पोहंचले; पवित्र शास्त्रवचनाच्या ग्रीक लिखाणात या बेटाचे नाव मिलिता असे आहे.—गतकाळापासून, मिलिता या बेटाविषयी अनेकांनी आपले मत माडंले आहे. काहींना असे वाटले आहे, की ते बेट मेलाय इल्रीका होते ज्याला आज मल्येट असे नाव आहे; एड्रिआटिक समुद्रावरील क्रोएशियाच्या किनाऱ्यावर ते आहे. पण हे अशक्य वाटते कारण, मल्येटला उत्तरेकडून पाहिल्यास, पौलाने जो पुढील प्रवास केला त्याजशी प्रवासाचे वर्णन जुळत नाही. जसे की तो सुराकूस, सिसिली मग इटलीच्या पश्चिम किनाऱ्यावर गेल्याचा अहवाल आहे.—प्रेषितांची कृत्ये २८:११-१३.
पुष्कळ बायबल भाषांतरकारांनी असा निष्कर्ष काढला आहे, की मिलिता हे आज ज्याला माल्टा म्हटले जाते त्या मिलिता ॲफ्रिकानस द्वीपाला सूचित होते. पौलाला घेऊन जाणाऱ्या जहाजाचे शेवटले बंदर, क्रीटमधील सुंदर बंदर होते. मग एका जोरदार वाऱ्याने जहाजाला पश्चिमेकडील कौदाच्या दिशेने वाहवत नेले. अनेक दिवसांपर्यंत वारे जहाजाला वाहवत नेत होते. वाऱ्याने वाहवत गेलेले जहाज दूर पश्चिमेकडे वाहत जाऊन माल्टाला पोहंचले, यात तथ्य आहे.
झंझावती वारे आणि “वाहवत जाण्याची दिशा व प्रमाण” यांविषयी कानीबार आणि हाऊसन यांनी द लाईफ ॲण्ड एपिस्टल्स ऑफ सेंट पॉल या आपल्या पुस्तकात असे म्हटले: “क्लौदा [किंवा कौदा] आणि माल्टा मधील अंतर ७७० किलोमीटरपेक्षा थोडेसे कमी आहे. या प्रवाशांचे [माल्टाला] पोहंचणे खरोखरच उल्लेखनीय होते कारण, चौदाव्या रात्री त्यांनी माल्टाऐवजी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पोहंचणे अशक्य होते. ते [माल्टाला] गेले असावेत याचीच शक्यता मोठी आहे.”
याविषयी लोकांची वेगवेगळी मते असली तरी, सोबतच्या नकाशावर माल्टा येथे झालेल्या नौकाभंगाचे चित्र बायबलमधील अहवालाशी जुळते.
[३१ पानांवरील नकाशा/चित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
जेरुसलेम
कैसऱ्या
सीदोन
मुर्या
कनिद
क्रीट
कौदा
माल्टा
सिसिली
सुराकूस
रोम
मल्येट
ग्रीस
केफालोनिया