व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विनाकारण द्वेष केलेले

विनाकारण द्वेष केलेले

विनाकारण द्वेष केलेले

‘त्यांनी माझा विनाकारण द्वेष केला.’योहान १५:२५.

१, २. (अ) ख्रिश्‍चनांविषयी लोक बरेवाईट बोलतात तेव्हा काहीजणांना आश्‍चर्य का वाटते, पण अशाप्रकारच्या बोलण्याने आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये? (ब) या लेखात आपण “द्वेष” हा शब्द कोणत्या अर्थाने विचारात घेणार आहोत? (तळटीप पाहावी.)

यहोवाचे साक्षीदार देवाच्या वचनातील तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेक देशांत त्यांचे चांगले नाव आहे. पण कधीकधी त्यांच्याविषयी खोटी माहिती पसरवली जाते. उदाहरणार्थ, रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग शहरातल्या एका सरकारी अधिकाऱ्‍याने असे म्हटले: “यहोवाचे साक्षीदार म्हणजे लहान मुलांचा बळी घेणारा आणि आत्महत्या करण्यास उत्तेजन देणारा एक भयानक गुप्त पंथ असे चित्र आमच्यासमोर मांडण्यात आले होते.” पण एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने यहोवाच्या साक्षीदारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर याच अधिकाऱ्‍याने असे म्हटले: “आता यहोवाचे साक्षीदार म्हटले की मला चारचौघांसारख्याच, हसमुख लोकांचे चित्र समोर येते . . . ते शांतीप्रिय आणि शांतीपूर्ण आहेत आणि एकमेकांवर त्यांचे खूप प्रेम आहे.” या अधिकाऱ्‍याने पुढे म्हटले: “मला कळत नाही लोक त्यांच्याविषयी इतकी खोटी माहिती का पसरवतात.”—१ पेत्र ३:१६.

लोक देवाच्या सेवकांना वाईट म्हणतात व त्यांची बदनामी करतात तेव्हा अर्थातच त्यांना हे आवडत नाही. पण तरीसुद्धा लोक आपल्याविरुद्ध बोलतात याचे त्यांना आश्‍चर्यही वाटत नाही. येशूने आपल्या शिष्यांना आधीच बजावले होते: “जग जर तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाहि केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. . . . विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.” * (योहान १५:१८-२०, २५; स्तोत्र ३५:१९; ६९:४) याआधी त्याने आपल्या शिष्यांना सांगितले होते: “घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?” (मत्तय १०:२५) आपण ख्रिस्ताचे अनुयायी झालो तेव्हा “वधस्तंभ” स्वीकारला, त्याअर्थी लोकांकडून तिरस्कार सहन करावा लागेल याची ख्रिश्‍चनांना जाणीव आहे.—मत्तय १६:२४.

३. खऱ्‍या उपासकांचा कितपत छळ झाला आहे?

खऱ्‍या उपासकांच्या छळाचा इतिहास फार जुना आहे; तो आपल्याला थेट “नीतिमान हाबेल” याच्या काळापर्यंत नेतो. (मत्तय २३:३४, ३५) हा छळ केवळ दोन चार तुरळक घटनांपुरता सीमित नाही. येशूने म्हटले की त्याच्या नावामुळे “सर्व लोक” त्याच्या अनुयायांचा “द्वेष करितील.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १०:२२) नंतर, प्रेषित पौलानेही लिहिले की देवाच्या सर्व सेवकांनी छळ होण्याची अपेक्षा करावी; यात आपल्यापैकी प्रत्येक जणाचा समावेश होतो. (२ तीमथ्य ३:१२) याचे कारण काय?

अन्यायी छळाचा उगम

४. सर्व अन्यायी द्वेषाचे मूळ कारण बायबलमध्ये कशाप्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे?

देवाचे वचन प्रकट करते की सुरवातीपासून हा छळ घडवून आणण्यास चिथावणारी एक अदृश्‍य व्यक्‍ती आहे. पहिला विश्‍वासू पुरुष हाबेल याच्या क्रूर हत्येविषयी विचार करा. बायबल सांगते की हाबेलचा खून करणारा त्याचा भाऊ काईन हा ‘त्या दुष्टापासून’ होता, अर्थात, दियाबल सैतानापासून. (१ योहान ३:१२) काईन सैतानी वृत्तीने वागला आणि दियाबलाने आपले दुष्ट हेतू साध्य करण्याकरता त्याचा उपयोग केला. ईयोब आणि येशू ख्रिस्तावर करण्यात आलेल्या दुष्ट हल्ल्यांतही सैतानाची भूमिका होती असे बायबल स्पष्ट करते. (ईयोब १:१२; २:६, ७; योहान ८:३७, ४४; १३:२७) येशूच्या अनुयायांचा छळ का होत होता याविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक आपल्याला स्पष्ट माहिती देते: “तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरूंगात टाकणार आहे.” (तिरपे वळण आमचे.) (प्रकटीकरण २:१०) होय देवाच्या लोकांचा जो अन्यायीपणे द्वेष केला जातो त्याचे मूळ कारण सैतान आहे.

५. खऱ्‍या उपासकांबद्दल सैतानाला द्वेष का वाटतो?

सैतान खऱ्‍या उपासकांचा द्वेष का करतो? अत्यंत धूर्ततेने रचलेल्या एका कारस्थानात सैतानाने खुद्द ‘सनातन राजा’ यहोवा देव याला ललकारले आहे. (१ तीमथ्य १:१७; ३:६) त्याचा असा दावा आहे की देव आपल्या सजीव प्राण्यांवर शासन करताना त्यांच्यावर अनावश्‍यक निर्बंध घालतो; तसेच, कोणीही यहोवाची सेवा शुद्ध हेतूने करत नाही तर केवळ स्वार्थापोटी करतात. सैतान असे प्रतिपादित करतो की मानवांची परीक्षा घेण्याची त्याला परवानगी मिळाल्यास तो प्रत्येकाला देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करून दाखवू शकतो. (उत्पत्ति ३:१-६; ईयोब १:६-१२; २:१-७) यहोवाला जुलमी, लबाड आणि अयशस्वी म्हणून त्याची बदनामी करण्याद्वारे सैतान स्वतःला सार्वभौम शाबीत करू इच्छितो. तर, देवाच्या सेवकांविरुद्ध त्याचा क्रोध, हा लोकांनी आपली उपासना करावी या त्याच्या दुष्ट लालसेतून उत्पन्‍न झाला आहे.—मत्तय ४:८, ९.

६. (अ) यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयात आपण वैयक्‍तिकरित्या कशाप्रकारे गोवलेलो आहोत? (ब) हा वादविषय समजून घेतल्यामुळे आपल्याला यहोवाप्रती विश्‍वासू राहण्यास कशाप्रकारे मदत मिळते? (पृष्ठ १६ वरील चौकट पाहावी.)

या वादविषयाचा तुमच्या जीवनाशी कशाप्रकारे संबंध आहे हे तुमच्या लक्षात आले का? यहोवाचा सेवक या नात्याने तुम्हाला कदाचित आधीच याची प्रचिती आली असेल की देवाची इच्छा करण्यास बराच प्रयत्न करावा लागत असला तरीसुद्धा, असे केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद अवर्णनीय आहेत. पण समजा जीवनातल्या समस्यांमुळे यहोवाच्या नियमांचे व तत्त्वांचे पालन करणे कठीण, किंबहुना यातनादायक झाले, तर तुम्ही काय कराल? आणि मोबदल्यात तुम्हाला काहीही मिळत नाही असे आढळल्यास तुम्ही काय कराल? अशा परिस्थितीत, यहोवाची सेवा करत राहणे व्यर्थ आहे असा निष्कर्ष तुम्ही काढाल का? की यहोवाबद्दलचे प्रेम आणि त्याच्या अद्‌भुत गुणांविषयी तुम्हाला वाटणारी कदर तुम्हाला त्याच्या सर्व मार्गांचे सदोदित अनुसरण करत राहण्यास प्रेरित करेल? (अनुवाद १०:१२, १३) सैतानाला आपल्यावर काही प्रमाणात संकटे आणू देण्यास यहोवाने परवानगी दिली आहे; असे केल्यामुळे त्याने आपल्यापैकी प्रत्येकाला सैतानाच्या आव्हानाला आपला वैयक्‍तिक जबाब देण्याची संधी दिली आहे.—नीतिसूत्रे २७:११.

‘जेव्हा लोक तुमची निंदा करतील’

७. आपण यहोवाकडे पाठ फिरवावी म्हणून दियाबल कोणत्या कुयुक्‍तीचा वापर करतो?

वादविषयातील स्वतःची बाजू खरी ठरवण्याच्या उद्देशाने सैतान ज्या निरनिराळ्या कुयुक्‍त्‌यांचा वापर करतो त्यांपैकी एक आपण आता विचारात घेऊ या—खोटेपणाने निंदा करण्याची कुयुक्‍ती. येशूने सैतानाला “लबाडीचा बाप” म्हटले. (योहान ८:४४) दियाबल या त्याच्या स्वरूपदर्शक नावाचा अर्थच मुळात “निंदक” असा आहे; देव, त्याचे उत्तम वचन आणि त्याचे पवित्र नाव या सर्वांची निंदा करणारा आद्य निंदक सैतान आहे अशी त्याची ओळख या नावावरून घडते. यहोवाच्या सार्वभौमत्वाला ललकारण्याकरता दियाबल व्यंगोक्‍त्‌या, खोटे आरोप आणि सरसकट लबाड्यांचा वापर करतो आणि देवाच्या निष्ठावान सेवकांची बदनामी करण्याकरताही तो याच डावपेचांचा उपयोग करतो. साक्षीदारांची अशाप्रकारे निंदा केल्याने तो त्यांच्यासमोर असलेल्या परीक्षांना तोंड देणे अधिकच कठीण बनवू शकतो.

८. सैतानाने ईयोबाची निंदा कशाप्रकारे केली आणि याचा काय परिणाम झाला?

ईयोब, ज्याच्या नावाचा अर्थ “ज्याच्याप्रती शत्रुत्व दाखवण्यात आले” असा होतो, त्याला कसा अनुभव आला हे लक्षात घ्या. ईयोबाच्या उदरनिर्वाहाचे साधन, त्याची मुलेबाळे, त्याचे आरोग्य हे सर्वकाही त्याच्यापासून हिरावून घेतल्यानंतर सैतानाने असे भासवण्याचा प्रयत्न केला जणू ईयोब हा एक पापी मनुष्य असून केवळ देवाची शिक्षा भोगतोय. पूर्वी ईयोबाचा आदर केला जात असे, पण नंतर सर्वजण, अगदी त्याचे नातलग आणि जिवलग मित्रसुद्धा त्याला तुच्छ लेखू लागले. (ईयोब १९:१३-१९; २९:१, २, ७-११) शिवाय, ढोंगी सांत्वनकर्त्यांच्या माध्यमाने सैतानाने ‘शब्दांनी ईयोबाचा चुराडा करण्याचा’ प्रयत्न केला; आधी त्याने अप्रत्यक्षपणे असे सुचवण्याचा प्रयत्न केला की कदाचित ईयोबाने काहीतरी गंभीर पाप केले असावे आणि नंतर अगदी थेट तोंडावर त्याला पापी म्हणून त्याची निंदा केली. (ईयोब ४:६-९; १९:२; २२:५-१०) ईयोब किती निराश झाला असेल याची कल्पना करा!

९. येशू एक पापी मनुष्य आहे असे कशाप्रकारे भासवण्यात आले?

यहोवाच्या सार्वभौमत्वाचा आद्य समर्थक या नात्याने देवाचा पुत्र सैतानाच्या शत्रुत्वाचे मुख्य निशाण बनला. ईयोबाला ज्याप्रमाणे सैतानाने एक पापी मनुष्य ठरवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे, येशू पृथ्वीवर आला तेव्हा सैतानाने त्याची आध्यात्मिक प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. (यशया ५३:२-४; योहान ९:२४) लोकांनी त्याला खादाड व दारूबाज म्हटले आणि काहींनी त्याला “भूत लागले आहे” असे म्हटले. (मत्तय ११:१८, १९; योहान ७:२०; ८:४८; १०:२०) त्याच्यावर देवाची निंदा करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला. (मत्तय ९:२, ३; २६:६३-६६; योहान १०:३३-३६) येशू अर्थातच दुःखी झाला कारण या सर्व निंदेमुळे आपल्या पित्याच्या नावाची नाहक बदनामी होत आहे याची त्याला जाणीव होती. (लूक २२:४१-४४) शेवटी येशूला एका शापित अपराध्याप्रमाणे वधस्तंभावर खिळण्यात आले. (मत्तय २७:३८-४४) “पातक्यांनी केलेला इतका विरोध” किंवा दुर्भाषण सहन करूनही येशूने परिपूर्ण सचोटी राखली.—इब्री लोकांस १२:२, ३.

१०. अभिषिक्‍तांपैकी शेषजन आधुनिक काळात सैतानाचे निशाण कशाप्रकारे बनले आहेत?

१० आधुनिक काळात अशाचप्रकारे ख्रिस्ताचे अभिषिक्‍त अनुयायी दियाबलाच्या शत्रुत्वाचे खास निशाण बनले आहेत. सैतानाचे वर्णन, “[ख्रिस्ताच्या] बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा,” असे करण्यात आले आहे. (प्रकटीकरण १२:९, १०) सैतानाला स्वर्गातून कायमचे खाली पृथ्वीवर फेकण्यात आले, तेव्हापासून त्याने ख्रिस्ताच्या बंधूंना जगासमोर तिरस्करणीय ठरवण्याचा व त्यांना एकटे पाडण्याचा पूर्ण शक्‍तिनिशी प्रयत्न करण्यास सुरवात केली आहे. (१ करिंथकर ४:१३) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना ज्याप्रमाणे बदनाम करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना देखील काही देशांत एक समाजविरोधक गुप्त पंथ म्हणून त्यांची निंदा करण्यात आली आहे. (प्रेषितांची कृत्ये २४:५, १४; २८:२२) सुरवातीला सांगितल्याप्रमाणे खोट्या प्रचाराद्वारे त्यांची बदनामी करण्यात आली आहे. तरीसुद्धा, “गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने,” ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांनी, नम्रपणे ‘देवाच्या आज्ञा पाळण्याचा व येशूविषयी साक्ष देण्याचा’ सतत प्रयत्न केला आहे; आणि याकरता त्यांना ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेल्या’ त्यांच्या सोबत्यांचे सहकार्य लाभले आहे.—२ करिंथकर ६:८; योहान १०:१६; प्रकटीकरण १२:१७.

११, १२. (अ) ख्रिश्‍चनांना सहन कराव्या लागणाऱ्‍या निंदेचे काही वेळा काय कारण असू शकते? (ब) ख्रिस्ती व्यक्‍तीला कशाप्रकारे आपल्या विश्‍वासामुळे अन्याय सोसावा लागू शकतो?

११ अर्थात देवाच्या वैयक्‍तिक सेवकांना सोसावी लागणारी निंदा ही नेहमीच “नीतिमत्त्वाकरिता” नसते. (मत्तय ५:१०) काही समस्या आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळेही निर्माण होतात. “पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे [आपण] निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा?” पण यहोवाच्या दृष्टिकोनातून, जर एक ख्रिस्ती “अन्याय सोसतांना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करितो तर ते उचित आहे.” (१ पेत्र २:१९, २०) हे कोणत्या परिस्थितीत घडू शकते?

१२ काहींना अंत्यविधीच्या गैरशास्त्रीय रितीरिवाजांत सहभागी न झाल्यामुळे छळण्यात आले आहे. (अनुवाद १४:१) यहोवाच्या नैतिक दर्जांना जडून राहिल्यामुळे, शाळा कॉलेजांत साक्षीदार तरुणांची इतर मुलांकडून सतत टिंगल केली जाते. (१ पेत्र ४:४) काही ख्रिस्ती आईवडिलांनी आपल्या मुलांवर रक्‍तविरहित उपचार केल्यामुळे त्यांच्यावर, “मुलांची पर्वा नसलेले” किंवा “मुलांशी दुर्व्यवहार करणारे” या आशयाचे खोटे आरोप लावण्यात आले आहेत. (प्रेषितांची कृत्ये १५:२९) काही ख्रिश्‍चनांना केवळ यहोवाचे सेवक बनल्यामुळे नातेवाईकांनी व शेजारपाजाऱ्‍यांनी वाळीत टाकले आहे. (मत्तय १०:३४-३७) हे सर्व जण अन्याय सोसणाऱ्‍या संदेष्ट्यांचे व खुद्द येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत आहेत.—मत्तय ५:११, १२; याकोब ५:१०; १ पेत्र २:२१.

निंदा केली जात असताना ती सहन करणे

१३. तीव्र निंदेला तोंड देताना आध्यात्मिक संतुलन कायम राखण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

१३ आपल्या विश्‍वासामुळे आपल्याला तीव्र निंदेला तोंड द्यावे लागते तेव्हा आपण हवालदिल होण्याची शक्यता आहे. यिर्मया संदेष्ट्याला वाटले त्याप्रमाणे कदाचित आपल्यालाही वाटेल की आपण देवाची सेवा यापुढे करू शकणार नाही. (यिर्मया २०:७-९) अशा परिस्थितीत आपल्याला आध्यात्मिक संतुलन कशाप्रकारे टिकवून ठेवता येईल? यहोवाच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. परीक्षेत विश्‍वासूपणे टिकून राहणाऱ्‍यांची यहोवा कीव करत नाही तर विजेते या दृष्टिकोनातून तो त्यांच्याकडे पाहतो. (रोमकर ८:३७) दियाबलाने सर्व प्रकारची अपमानास्पद वागणूक दिली तरीसुद्धा ज्यांनी यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले अशा व्यक्‍तींचे चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचा प्रयत्न करा—हाबेल, ईयोब, येशूची आई मरीया, आणि जुन्याकाळातील तसेच आधुनिक काळातील आपल्या विश्‍वासू सह उपासकांपैकी इतर विश्‍वासू स्त्रिया व पुरुष. (इब्री लोकांस ११:३५-३७; १२:१) त्यांच्या विश्‍वासू मार्गाक्रमणाविषयी मनन करा. विश्‍वासू जनांचा तो मोठा मेघ आपल्यालाही, विश्‍वासू राहून जगावर विजय मिळवणाऱ्‍यांच्या पंक्‍तीत उभे राहण्याकरता खुणावतो.—१ योहान ५:४.

१४. कळकळीची प्रार्थना आपल्याला विश्‍वासू राहण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?

१४ “[आपले] मन अनेक चिंतांनी व्यग्र होते” तेव्हा आपण यहोवाला कळकळीची प्रार्थना करू शकतो; तो आपले सांत्वन करेल आणि आपल्याला बळ देईल. (स्तोत्र ५०:१५; ९४:१९) परीक्षेला तोंड देण्याकरता लागणारी बुद्धी तो आपल्याला देईल आणि त्याच्या सेवकांचा अन्यायीपणे द्वेष ज्यामुळे केला जातो तो यहोवाच्या सार्वभौमत्वाचा महान वादविषय सदोदित दृष्टिपुढे ठेवण्यास तो आपली मदत करेल. (याकोब १:५) तसेच यहोवा आपल्याला ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांति’ देण्यासही समर्थ आहे. (फिलिप्पैकर ४:६, ७) देवाने दिलेली ही शांती आपल्याला तीव्र स्वरूपाच्या दबावाखाली असतानाही शांत व खंबीर राहण्यास, शंकाकुशंका व भीती यांपुढे हात न टेकण्यास मदत करेल. यहोवा आपल्यावर ज्या समस्या येऊ देतो त्यांना तोंड देण्याकरता तो त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला साहाय्य करतो.—१ करिंथकर १०:१३.

१५. आपल्याला अन्याय सोसावा लागतो तेव्हा सूडबुद्धी न बाळगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

१५ आपला विनाकारण द्वेष करणाऱ्‍यांप्रती सूडबुद्धीने विचार न करण्यास कशामुळे आपल्याला मदत होईल? आठवणीत असू द्या, आपले मुख्य शत्रू सैतान व त्याचे दुरात्मे आहेत. (इफिसकर ६:१२) काही मानव जाणूनबुजून आपला छळ करत असले तरीसुद्धा देवाच्या लोकांचा विरोध करणाऱ्‍यांपैकी अनेक जण अज्ञानामुळे किंवा इतरांच्या सांगण्यावरून असे करतात. (दानीएल ६:४-१६; १ तीमथ्य १:१२, १३) यहोवाची इच्छा आहे की ‘सर्व माणसांना तारण होण्याची व सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचण्याची’ संधी मिळावी. (१ तीमथ्य २:४) किंबहुना, पूर्वी विरोध करणारे कित्येकजण आपल्या निर्दोष वागणुकीमुळे प्रभावित झाल्यामुळे आज आपले ख्रिस्ती बंधू आहेत. (१ पेत्र २:१२) याशिवाय, आपण याकोबाचा पुत्र योसेफ याच्या उदाहरणावरूनही एक धडा घेऊ शकतो. योसेफाला त्याच्या भावांमुळे अतिशय दुःख सहन करावे लागले तरीसुद्धा त्याने त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धी बाळगली नाही. का? कारण यहोवाने आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता काही घटनांना वळण दिले हे त्याने ओळखले. (उत्पत्ति ४५:४-८) अशाचप्रकारे, आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्‍या अन्यायातूनही यहोवा त्याच्या नावाचे गौरव घडवून आणू शकतो.—१ पेत्र ४:१६.

१६, १७. प्रचार कार्यात विरोधक अडथळे आणतात तरीसुद्धा आपण विनाकारण चिंतीत का होऊ नये?

१६ सुवार्तेच्या प्रसारात अडथळा आणण्यात विरोधकांना काही काळापर्यंत यश येत आहे असे भासले तरीसुद्धा आपण याविषयी अनावश्‍यक काळजी करण्याची गरज नाही. यहोवा आज जागतिक साक्षकार्याद्वारे ‘राष्ट्रांस हालवून सोडत’ आहे आणि राष्ट्रांतील निवडक वस्तू येत आहेत. (हाग्गय २:७) उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त याने म्हटले: “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; . . . त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.” (तिरपे वळण आमचे.) (योहान १०:२७-२९) आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात पवित्र देवदूतही सामील आहेत. (मत्तय १३:३९, ४१; प्रकटीकरण १४:६, ७) तेव्हा विरोधकांनी काहीही म्हटले किंवा केले तरीसुद्धा ते देवाच्या उद्देशाच्या पूर्ततेत बाधा आणू शकत नाहीत.—यशया ५४:१७; प्रेषितांची कृत्ये ५:३८, ३९.

१७ कित्येकदा तर, विरोधकांच्या प्रयत्नांचा उलटच परिणाम होतो. एका आफ्रिकन क्षेत्रात, यहोवाच्या साक्षीदारांविषयी बऱ्‍याच भयंकर अफवा पसरवण्यात आल्या होत्या. काहीजण म्हणत की ते सैतानाचे उपासक आहेत. यामुळे ग्रेस या मुलीकडे जेव्हाही साक्षीदार यायचे तेव्हा ती घराच्या मागे जाऊन लपून बसायची. ते निघून जाईपर्यंत ती बाहेर येत नव्हती. एके दिवशी तिच्या चर्चच्या पाळकाने आपल्या प्रकाशनांपैकी एक सर्वांना दाखवून म्हटले की कोणीही हे पुस्तक वाचू नये कारण ते वाचल्यास तुम्ही आपला विश्‍वास त्यागण्यास प्रवृत्त व्हाल. हे ऐकून ग्रेसला त्या पुस्तकाविषयी जिज्ञासा वाटू लागली. पुढच्या वेळी साक्षीदार तिच्या घरी आले तेव्हा तिने लपून बसण्याऐवजी त्यांच्यासोबत संभाषण केले आणि त्या विशिष्ट प्रकाशनाची एक वैयक्‍तिक प्रत त्यांच्याकडून मिळवली. तिच्यासोबत बायबल अभ्यास करण्यात आला आणि १९९६ साली तिचा बाप्तिस्मा झाला. आज ग्रेस अशा लोकांना शोधण्याकरता आपला वेळ खर्च करते, की ज्यांना अशाचप्रकारे यहोवाच्या साक्षीदारांविषयी खोटी माहिती देण्यात आली आहे.

आताच आपला विश्‍वास बळकट करा

१८. तीव्र परीक्षा उद्‌भवण्याआधीच आपला विश्‍वास बळकट करणे का गरजेचे आहे आणि आपण असे कशाप्रकारे करू शकतो?

१८ सैतान आपला द्वेष व्यक्‍त करण्याकरता कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, तेव्हा आपला विश्‍वास आताच बळकट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण हे कसे करू शकतो? यहोवाच्या लोकांचा जेथे छळ करण्यात आला अशा एका देशातील वृत्तात असे म्हटले होते: “एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे: ज्यांना उत्तम आध्यात्मिक सवयी आहेत आणि सत्याविषयी मनस्वी कदर आहे त्यांना परीक्षा येतात तेव्हा खंबीर राहणे मुळीच जड जात नाही. पण जे ‘अनुकूल काळातही’ सभा चुकवतात, क्षेत्र सेवेत अनियमित असतात आणि लहानसहान गोष्टींत हातमिळवणी करतात असे लोक सहसा ‘तीव्र’ परीक्षा येताच विश्‍वासातून पडतात.” (२ तीमथ्य ४:२) जर वैयक्‍तिक जीवनात तुम्हाला सुधारणा करता येण्यासारखे एखादे क्षेत्र दिसत असेल तर जराही विलंब न करता असे करण्याचा प्रयत्न करा.—स्तोत्र ११९:६०.

१९. विनाकारण द्वेष करण्यात आला तरीसुद्धा देवाचे सेवक विश्‍वासू राहिल्यामुळे काय साध्य झाले आहे?

१९ सैतानाच्या द्वेषाची झळ सोसूनही टिकून राहिलेल्या खऱ्‍या उपासकांचा विश्‍वासूपणा, यहोवाचे सार्वभौमत्व योग्य, न्याय्य आणि नीतिमान आहे याची ग्वाही देतो. त्यांचा विश्‍वासूपणा देवाचे मन आनंदित करतो. मानव त्यांची कितीही निंदा करोत, पण ज्याचा महिमा पृथ्वी व स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे त्या देवाला ‘त्यांचा देव म्हणवून घ्यावयास, त्यांची लाज वाटत नाही.’ खरोखर अशा सर्व एकनिष्ठ जनांविषयी असेच म्हणता येईल, की ‘जग त्यांना योग्य नव्हते.’—इब्री लोकांस ११:१६, ३८.

[तळटीप]

^ परि. 2 शास्त्रवचनांत, “द्वेष” या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. काही संदर्भांत त्याचा अर्थ केवळ तुलनेत कमी प्रीती करणे असा होतो. (अनुवाद २१:१५, १६) “द्वेष” तीव्र नापसंती देखील सूचित करू शकतो, ज्यात द्वेष केल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीचे काही नुकसान करण्याचा इरादा नसतो, केवळ तिच्याबद्दल किळस वाटत असल्यामुळे तिला टाळण्याचा प्रयत्न केला जातो. पण “द्वेष” या शब्दाचा अर्थ तीव्र शत्रूभाव, जुने वैमनस्य आणि त्यासोबत हानी करण्याची दुष्टबुद्धी असाही होऊ शकतो. या लेखात द्वेष हा शब्द या अर्थाने वापरला आहे.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• खऱ्‍या उपासकांप्रती विनाकारण दाखवल्या जाणाऱ्‍या द्वेषामागे काय आहे?

• ईयोब व येशू यांची सचोटी भंग करण्याच्या प्रयत्नात सैतानाने निंदेचा कसा उपयोग केला?

• सैतानाच्या द्वेषाला तोंड देताना खंबीर राहण्यास यहोवा आपल्याला कशाप्रकारे बळ देतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चौकट/चित्र]

त्यांनी खरा वादविषय ओळखला

युक्रेन येथे राज्य प्रचाराच्या कार्यावर ५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून बंदी होती. तेथील एका यहोवाच्या साक्षीदाराने असे म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांवर जे गुदरले त्याबद्दल केवळ मानवी संबंधाच्या संदर्भात विचार केला जाऊ नये. . . . बहुतेक अधिकारी केवळ आपल्या वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करत होते. सरकार बदलले तेव्हा हेच अधिकारी नव्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळू लागले, पण आम्ही मात्र बदललो नाही. आम्हाला जाणीव होती की आमच्या संकटांचे मूळ कारण काय हे बायबलमध्ये पुरते स्पष्ट करण्यात आले होते.

“आम्ही स्वतःला जुलमी अधिकाऱ्‍यांच्या क्रूरतेचे निर्दोष बळी या दृष्टिकोनातून पाहिले नाही. एदेन बागेत उपस्थित करण्यात आलेल्या, अर्थात देवाच्या शासन करण्याच्या अधिकारासंबंधी उठवलेल्या वादविषयाची स्पष्ट समज असल्यामुळेच आम्हाला सारी संकटे सोसणे शक्य झाले. . . . आम्ही अशा एका वादविषयात स्वतःला सामील केले होते, की ज्यात केवळ मानवी हितसंबंध नव्हे तर विश्‍वाच्या सार्वभौमाचे हितसंबंध गोवलेले होते. ज्या वास्तविक वादविषयांशी या परिस्थितीचा संबंध होता त्यांकडे आम्ही एका उदात्त दृष्टिकोनातून पाहात होतो. यामुळे आम्हाला असामान्य बळ मिळाले आणि सर्वात उग्र स्वरूपाच्या परीक्षांतही टिकून राहणे आम्हाला शक्य झाले.”

[चित्र]

व्हीक्टर पोपोविच, यांना १९७० साली अटक झाली

[१३ पानांवरील चित्र]

येशूची जी निंदा करण्यात आली तिच्यामागे कोणाचा हात होता?

[१५ पानांवरील चित्रे]

ईयोब, मारिया व आधुनिक काळातील स्टॅनली जोन्स यांच्यासारख्या देवाच्या सेवकांनी त्याच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन केले