‘शुभवर्तमानाचा प्रसार करणारा धाडसी प्रवासी’
‘शुभवर्तमानाचा प्रसार करणारा धाडसी प्रवासी’
जॉर्ज बॉरो याला वयाच्या १८ वर्षांपर्यंत १२ भाषा अवगत होत्या, असे म्हटले जाते. दोन वर्षांनंतर तो २० वेगवेगळ्या भाषांमध्ये “सहजपणे व सुरेखपणे” भाषांतर करू शकला.
अठराशे तेहतीस साली, असामान्य हुन्नर असलेल्या या मनुष्याला इंग्लंडमधील लंडनच्या ब्रिटिश आणि परदेशी बायबल संस्थेने मुलाखतीसाठी आमंत्रण दिले. पण तिथे जाण्याकरता त्याच्याजवळ गाडीभाडे नव्हते आणि चालून आलेली ही संधी हातची जाऊ द्यायची नाही असा निश्चय केल्यामुळे ३० वर्षीय बॉरोने नॉर्वीच येथील आपल्या घरापासूनचा हा १८० किलोमीटरचा प्रवास पायी केला; केवळ २८ तासांत त्याने ते ठिकाण गाठले.
बायबल संस्थेने त्याला एक कठीण कामगिरी दिली—सहा महिन्यांत चीनच्या काही भागांत बोलली जाणारी मंचू भाषा शिकायची. त्याने व्याकरणाचे एक पुस्तक मागवले, पण व्याकरणाच्या पुस्तकाऐवजी ते त्याला मंचू भाषेतील मत्तयाच्या शुभवर्तमानाची एक प्रत आणि मंचू-फ्रेंच शब्दकोश देऊ शकले. तरीपण, १९ आठवड्यांतच त्याने लंडनला असे पत्र लिहिले: “मी देवाच्या मदतीने मंचूवर प्रभुत्व मिळवले आहे.” ही कार्यसिद्धी अधिक उल्लेखनीय होती कारण असे म्हटले जाते, की तो याच वेळी नाव्हातल या मेक्सिकोच्या एका स्थानिक भाषेतील लूकच्या शुभवर्तमानात सुधार करत होता.
मंचूतील बायबल
सतराव्या शतकात, मंगोलियन वीगुर अक्षरमालेतून तयार केलेल्या लिपीचा उपयोग करून मंचू भाषा लेखी रूपात प्रथम वापरली जाऊ लागली तेव्हा चिनी सरकारही ही भाषा वापरू लागले. कालांतराने, या भाषेचा वापर कमी झाला तरीसुद्धा ब्रिटिश आणि परदेशी बायबल संस्थेच्या सदस्यांची, मंचू भाषेत बायबल छापून त्याचे वितरण करण्याची फार इच्छा होती. अठराशे बावीसपर्यंत त्यांनी स्टायपान लिपोफ्टसफ याने भाषांतरीत केलेल्या मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या आवृत्तीच्या ५५० प्रतींसाठी पैसेही दिले. स्टायपान रशियन विदेशी कार्यालयाचा एक सदस्य होता व २० वर्षे चीनमध्ये राहिला होता. मत्तयाचा हा शुभवर्तमान सेंट पीटर्सबर्ग येथे छापण्यात आला; परंतु यातील फक्त काही प्रतींचे वितरण करण्यात आले आणि उरलेल्या प्रती एका पुरात नष्ट झाल्या.
यानंतर लगेचच संपूर्ण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे भाषांतर करण्यात आले. अठराशे चौतीसमध्ये इब्री शास्त्रवचनांचा बहुतेक भाग असलेला एक अतिप्राचीन हस्तलेख मिळाल्यावर बायबलमधील आस्था वाढू लागली. अस्तित्वात असलेल्या मंचू बायबलमध्ये सुधार करून उरलेले भाषांतर कोण पूर्ण करेल? ब्रिटिश आणि परदेशी बायबल संस्थेने आपल्या वतीने जॉर्ज बॉरोवर ही कामगिरी सोपवली.
रशियाला प्रयाण
सेंट पीटर्सबर्ग येथे आल्यावर बॉरोने, मुद्रितशोधन (प्रूफ-रीडींग) व बायबल लिखाणाचे संपादन अचूकपणे करता यावे म्हणून मंचू भाषेचा सखोल अभ्यास करण्यात
बराच वेळ खर्च केला. ही कामगिरी अतिशय कष्टप्रद होती, नवा करार याच्या चलखिळ्यांची जुळवणी करण्यासाठी तो दिवसाला १३ तास काम करत असे; पण शेवटी या नव्या कराराचे वर्णन, “पौर्वात्य कृतीची सुरेख आवृत्ती” असे करण्यात आले. अठराशे पसतीस साली एक हजार प्रती छापण्यात आल्या. या प्रती चीनला नेऊन तेथे त्यांचे वितरण करण्याची बॉरोची योजना मात्र खोडण्यात आली. रशियन सरकारने, चीनमध्ये बायबलचे वितरण केल्याने ते मिशनरी कार्य ठरेल ज्यामुळे कदाचित चीनबरोबरचे त्यांचे मैत्रीसंबंध धोक्यात येतील या भीतीपोटी बॉरोला “मंचू बायबलची एक प्रत” देखील घेऊन चीनच्या सीमेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली नाही.सुमारे दहा वर्षांनंतर काही प्रतींचे वितरण करण्यात आले आणि समांतर रकान्यांत मंचू व चिनी भाषेतील मत्तय व मार्कच्या शुभवर्तमानाचे भाषांतर १८५९ मध्ये प्रकाशित करण्यात आले. पण तोपर्यंत मंचू वाचू शकणारे बहुतेक लोक चिनी भाषा वाचू लागले होते व मंचू भाषेत संपूर्ण बायबल तयार होण्याची शक्यता कमी होऊ लागली. खरे पाहता मंचू भाषा ही लोप पावत असलेली भाषा होती व लवकरच तिची जागा चिनी भाषा घेणार होती. चीन प्रजासत्ताक झाले तेव्हा म्हणजे १९१२ पर्यंत हा बदल पूर्ण झाला.
आयबेरियन पेनीनसुला
अनुभवांचे गाठोडे घेऊन जॉर्ज बॉरो लंडनला उत्साहाने आला. अठराशे पसतीस साली त्याला पुन्हा पोर्तुगाल व स्पेनला, त्याने नंतर म्हटल्यानुसार “ख्रिस्ती धर्माची सत्ये स्वीकारायला लोकांची मानसिक तयारी कितपत झाली होती हे ठरवण्यासाठी” नेमण्यात आले. त्या वेळी दोन्ही राष्ट्रांच्या बहुतेक क्षेत्रावर, सर्वत्र राजकीय व सामाजिक अशांततेमुळे ब्रिटिश आणि परदेशी बायबल संस्थेचा प्रभाव नव्हता. बॉरोला पोर्तुगीज ग्रामीण समाजातील लोकांबरोबर बायबलवर संभाषण करायला आवडायचे परंतु काही काळातच तेथील धार्मिक उदासीनतेच्या अनुभवामुळे त्याला स्पेनला जावे लागले.
स्पेनमध्ये त्याला एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला, खासकरून जिप्सी लोकांकडून; बॉरोला या जिप्सी लोकांची भाषा बोलायला येत असल्यामुळे त्याची या लोकांबरोबर जवळीक झाली. तेथे पोहंचताच, त्याने किटानो या स्पॅनिश जिप्सी भाषेत ‘नव्या कराराचे’ भाषांतर सुरू केले. या कामात त्याला मदत करण्यासाठी त्याने दोन जिप्सी स्त्रियांना बोलवले. तो त्यांना स्पॅनिश आवृत्ती वाचून दाखवायचा आणि मग त्याचे भाषांतर करण्यास त्यांना सांगायचा. अशाप्रकारे तो जिप्सी वाक्प्रचारांचा अचूक वापर करण्यास शिकू शकला. या त्याच्या प्रयत्नांमुळे १८३८ सालच्या वसंतऋतूत लूकचे शुभवर्तमान प्रकाशित करण्यात आले; हे पाहून एका बिशपाने असे उद्गार काढले: “जिप्सी भाषेद्वारे तो अख्ख्या स्पेनचे धर्मांतर करेल.”
जॉर्ज बॉरोला, “बास्क भाषेत शास्त्रवचनांचे भाषांतर करण्यास सक्षम असलेल्या एखाद्या व्यक्तीला” शोधून काढण्याचा अधिकार देण्यात आला. ही कामगिरी वैद्य असलेल्या डॉ. ओटेसा यांच्यावर सोपवण्यात आली; बॉरो यांनी लिहिले: “मला ज्या पोटभाषेचे काही ज्ञान आहे त्यात निपुण असलेली” ही व्यक्ती आहे. अठराशे अडतीस साली लूकचे शुभवर्तमान, स्पॅनिश बास्कमध्ये आलेले सर्वात पहिले बायबलचे पुस्तक होते.
सामान्य लोकांचे प्रबोधन करण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित होऊन बॉरो ग्रामीण भागातील गरीब लोकांना बायबलच्या पुस्तकांचे वितरण करण्यासाठी लांबचा आणि बहुतेकदा जोखीमीचा प्रवास करत असे. धार्मिक अज्ञान व अंधश्रद्धा यांपासून त्यांना मुक्त करण्याचा त्याचा विचार होता. ते विकत घेत असलेल्या अनुज्ञांच्या व्यर्थपणाविषयी उघडपणे सांगून तो त्यांच्याशी असा तर्क करायचा: “जो देव चांगला आहे तो पापाची विक्री स्वीकारेल का?” पण स्थापित विश्वासांची अशाप्रकारे टीका केल्याने आपल्या कार्यांवर बंदी येईल अशा भीतीपोटी बायबल संस्थेने त्याला, शास्त्रवचनांच्या वितरणावरच केवळ आपले लक्ष केंद्रित ठेवण्यास सांगितले.
बॉरोने एल न्यूवो टेस्टामेंटो हा स्पॅनिश नवा करार, रोमन कॅथलिक सिद्धान्तांच्या नोंदींविना छापण्यासाठी तोंडी परवानगी मिळवली. भाषांतराला घातक आणि “अनुचित पुस्तक” असे ज्याने म्हटले त्या मुख्य मंत्र्याने सुरवातीला विरोध केला असतानाही बॉरोला अनुमती मिळाली. बॉरोने मग हा स्पॅनिश नवा करार विकण्यासाठी माद्रिदमध्ये एक पुस्तकभांडार उघडले; पण यामुळे धार्मिक नेते आणि लौकिक अधिकारी या दोघांचा त्याच्यावर रोष ओढवला. त्याला १२ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. त्याने जेव्हा निषेध केला तेव्हा त्याला मुकाट्याने निघून जाण्यास सांगण्यात आले. त्याचा तुरुंगवास बेकायदेशीर होता हे त्याला स्पष्टपणे माहीत असल्यामुळे त्याने प्रेषित पौलाच्या उदाहरणाचा उल्लेख केला आणि जोपर्यंत आपल्या नावावरील कलंक मिटवून आपल्याला उचितपणे दोषमुक्त केले जात नाही तोपर्यंत आपण येथून जाणार नाही असे ठरवले.—प्रेषितांची कृत्ये १६:३७.
बायबल संस्थेने पाठवलेला आवेशी दूत अर्थात बॉरो १८४० मध्ये स्पेन सोडून गेल्यानंतर बायबल संस्था असे म्हणू शकली: “गेल्या पाच वर्षांत शास्त्रवचनांच्या जवळजवळ १४,००० प्रतींचे स्पेनमध्ये वितरण करण्यात आले आहे.” यात सिंहाचा वाटा असलेल्या बॉरोने आपल्या स्पॅनिश अनुभवांचे वर्णन, “माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी वर्षं” असे केले.
अठराशे बेचाळीसमध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले आणि आजही प्रकाशित होत असलेले द बायबल इन स्पेन यात, जॉर्ज बॉरो याच्या प्रवासांचे, साहसांचे स्पष्ट, व्यक्तिगत वर्णन आहे. लगेच प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात त्याने स्वतःचा उल्लेख, “शुभवर्तमानाचा प्रसार करणारा प्रवासी” असे केले आहे. त्याने लिहिले: “उबडखाबड डोंगर दऱ्यांमध्ये गुप्त व जगापासून दूर असलेल्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना भेटून माझ्या पद्धतीने ख्रिस्ताविषयी त्यांना सांगण्याचा माझा हेतू होता.”
शास्त्रवचनांचे वितरण व भाषांतर अशा उत्साहाने करण्याद्वारे जॉर्ज बॉरोने इतरांसाठी एक पाया रचला—खरोखरच एक अमूल्य सुहक्क!
[२९ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
बायबलचे भाषांतर आणि वितरण करण्याकरता जॉर्ज बॉरोला (१) इंग्लंडहून (२) रशिया, (३) पोर्तुगाल आणि (४) स्पेनला जावे लागले
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.
[२८ पानांवरील चित्र]
अठराशे पसतीसमध्ये छापण्यात आलेले मंचू भाषेतील योहानाच्या शुभवर्तमानाचे सुरवातीचे शब्द, डावीकडून उजवीकडे खाली वाचत जायचे
[चित्राचे श्रेय]
From the book The Bible of Every Land, १८६०
[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]
From the book The Life of George Borrow by Clement K. Shorter, १९१९