“एकमुखाने” देवाचे गौरव करा
“एकमुखाने” देवाचे गौरव करा
“तुम्ही . . . एकमुखाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे.”—रोमकर १५:५.
१. मतभेद हाताळण्यासंबंधी पौलाने सहविश्वासू बांधवांना कोणता सल्ला दिला?
सर्वच ख्रिश्चनांच्या आवडीनिवडी एकसारख्या नसतात. तरीसुद्धा जीवनाच्या मार्गावर सर्व ख्रिश्चनांनी खांद्याला खांदा लावून एकमताने चालणे महत्त्वाचे आहे. हे शक्य आहे का? होय, जर आपण क्षुल्लक मतभेदांना गंभीर समस्यांचे रूप देण्याचे टाळले तर हे शक्य आहे. पहिल्या शतकातील सहविश्वासू बांधवांना प्रेषित पौलाने हेच मार्गदर्शन दिले. हा महत्त्वाचा मुद्दा त्याने कशाप्रकारे स्पष्ट केला? आणि त्याने दिलेल्या प्रेरित मार्गदर्शनाचे आपण कशाप्रकारे पालन करू शकतो?
ख्रिस्ती एकतेचे महत्त्व
२. पौलाने एकतेच्या गरजेवर कशाप्रकारे भर दिला?
२ ख्रिस्ती एकता अत्यावश्यक आहे हे पौलाला माहीत होते आणि ख्रिश्चनांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे व एकमेकांचे सहन करावे म्हणून त्याने त्यांना उत्तम सल्ला दिला. (इफिसकर ४:१-३; कलस्सैकर ३:१२-१४) तरीसुद्धा, २० वर्षांपेक्षा अधिक काळ अनेक मंडळ्या स्थापन करण्यात व त्यांना भेटी देण्यात खर्च केल्यानंतर, त्याला हे माहीत होते की एकता कायम राखणे तितके सोपे नाही. (१ करिंथकर १:११-१३; गलतीकर २:११-१४) म्हणूनच त्याने रोममध्ये राहणाऱ्या सहख्रिस्ती बांधवांना असा आग्रह केला: “तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो.” (रोमकर १५:५, ६) आज आपण देखील यहोवा देवाच्या लोकांचा एकजूट समूह या नात्याने, “एकमुखाने” त्याचे गौरव केले पाहिजे. आपण याबाबतीत कितपत यशस्वी ठरत आहोत?
३, ४. (अ) रोममधील ख्रिस्ती कोणत्या विविध पार्श्वभूमींचे होते? (ब) आपसांत काही मतभेद असूनही रोममधील ख्रिस्ती कशाप्रकारे “एकमुखाने” यहोवाची सेवा करू शकत होते?
३ रोममधील अनेक ख्रिस्ती पौलाचे वैयक्तिक स्नेही होते. (रोमकर १६:३-१६) त्यांच्या पार्श्वभूमी वेगवेगळ्या होत्या तरीसुद्धा पौलाने आपल्या सर्व बांधवांना “देवाचे प्रियजन” म्हणून स्वीकारले. त्याने लिहिले: “तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.” नक्कीच, रोमी ख्रिस्ती अनेक बाबतीत अनुकरणीय होते. (रोमकर १:१, ७, ८; १५:१४) त्याच वेळेस, मंडळीतल्या काहींची विशिष्ट विषयांवर वेगवेगळी मते होती. आज ख्रिस्ती विविध पार्श्वभूमी व संस्कृतींतून आले असल्यामुळे मतभेद हाताळण्यासंबंधी पौलाच्या प्रेरित मार्गदर्शनाचा अभ्यास केल्यास त्यांना “एकमुखाने” बोलण्यास मदत होईल.
४ रोममध्ये यहुदी व विदेशी उपासक देखील होते. (रोमकर ४:१; ११:१३) काही यहुदी ख्रिश्चनांना मोशेच्या नियमशास्त्राधीन ते जे रितीरिवाज पाळत होते त्यांचा त्याग करणे कठीण जात होते; खरे तर त्यांना हे समजायला हवे होते की तारणाकरता आता या रितीभाती पाळणे आवश्यक नव्हते. दुसरीकडे पाहता, कित्येक यहुदी ख्रिश्चनांनी ही गोष्ट स्वीकारली होती की ख्रिस्ती बनण्यापूर्वी पाळाव्या लागत असलेल्या निर्बंधांपासून ख्रिस्ताच्या बलिदानाने त्यांना मुक्त केले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या काही वैयक्तिक सवयींत व रितीभातींत बदल केला होता. (गलतीकर ४:८-११) हा फरक असूनही पौलाने म्हटल्याप्रमाणे ते सर्वजण “देवाचे प्रियजन” होते. सर्वांनी एकमेकांप्रती योग्य मनोवृत्ती बाळगल्यास ते सर्व मिळून “एकमुखाने” देवाचे गौरव करू शकत होते. आज आपलीही काही बाबतीत वेगवेगळी मते असू शकतात; तेव्हा, पौलाने त्या महत्त्वपूर्ण तत्त्वाचे कशाप्रकारे स्पष्टीकरण दिले याचे जवळून परीक्षण करणे आपल्याकरता बोधकारक ठरेल.—रोमकर १५:४.
“एकमेकांचा स्वीकार करा”
५, ६. रोमी मंडळीत मतभेद का होते?
५ रोमकरांना लिहिलेल्या पत्रात पौल अशा एका विषयाचा रोमकर १४:२; लेवीय ११:७) पण येशूच्या मृत्यूनंतर तो नियम आता बंधनकारक नव्हता. (इफिसकर २:१५) मग येशूच्या मृत्यूनंतर साडेतीन वर्षे उलटल्यावर एका स्वर्गदूताने प्रेषित पेत्राला सांगितले की देवाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचे खाद्य अशुद्ध मानायचे नव्हते. (प्रेषितांची कृत्ये ११:७-१२) हे सर्व लक्षात घेऊन काही यहुदी ख्रिश्चनांनी असे ठरवले की आपण आता डुकराचे मांस खाऊ शकतो—किंवा नियमशास्त्राखाली वर्ज्य असलेले इतर प्रकारचे खाद्य देखील खाऊ शकतो.
उल्लेख करतो की ज्याबद्दल ख्रिस्ती बांधवांची वेगवेगळी मते होती. तो लिहितो: “एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेहि खाद्य चालते; परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो.” अशी परिस्थिती का होती? मोशेच्या नियमाधीन, डुकराचे मांस वर्ज्य होते. (६ पण इतर यहुदी ख्रिश्चनांना मात्र पूर्वी अशुद्ध मानलेले खाद्यपदार्थ खाण्याचा विचारही किळसवाणा वाटला असावा. आपले यहुदी ख्रिस्ती बांधव खुशाल ते खाद्य खातात हे पाहून या संवेदनशील बांधवांना साहजिकच वाईट वाटले असेल. शिवाय, त्यांच्यामध्ये काही विदेशी ख्रिस्ती देखील होते, ज्यांच्या पूर्वीच्या धार्मिक विश्वासात कोणत्याही प्रकारचे अन्न खाण्यासंबंधी निर्बंध नव्हते; तेव्हा खाण्यापिण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून काहीजण वादविवाद करतात याचे त्यांना आश्चर्य वाटले असेल. अर्थात, एखाद्या व्यक्तीने विशिष्टप्रकारचे खाद्य वर्ज्य करणे चुकीचे नव्हते, फक्त एवढेच की, तारणाकरता असे करणे आवश्यक आहे असा अट्टाहास त्याने करायला नको होता. काहीही असो, या वेगवेगळ्या मतांमुळे मंडळीत अगदी सहज कलहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. या मतभेदांमुळे “एकमुखाने” देवाचे गौरव करण्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रोममधील ख्रिश्चनांना खबरदारी बाळगण्याची गरज होती.
७. दर आठवडी एक खास दिवस पाळण्यासंबंधी कोणती वेगवेगळी मते होती?
७ पौल दुसरे एक उदाहरण देतो: “कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो.” (रोमकर १४:५अ) मोशेच्या नियमशास्त्रानुसार, शब्बाथ दिवशी कोणतेही काम करण्यास मनाई होती. त्या दिवशी प्रवास करण्यासंबंधीही काटेकोर नियम होते. (निर्गम २०:८-१०; मत्तय २४:२०; प्रेषितांची कृत्ये १:१२) पण नियमशास्त्र रद्द करण्यात आल्यानंतर हे निर्बंध कालबाह्य झाले. असे असूनही, काही यहुदी ख्रिश्चनांना पूर्वी पवित्र मानलेल्या या दिवशी कोणतेही काम करण्यास किंवा लांबचा प्रवास करण्यास कसेसेच वाटले असावे. ख्रिस्ती झाल्यानंतरही त्यांनी सातवा दिवस हा खास आध्यात्मिक कार्यांकरता राखून ठेवण्याचा प्रघात चालू ठेवला असावा. देवाच्या दृष्टीने मात्र शब्बाथ आता बंधनकारक राहिला नव्हता. मग त्यांचे वागणे चुकीचे होते का? शब्बाथ पाळणे हे देवाच्या दृष्टीने अनिवार्य आहे असा त्यांनी अट्टाहास न केल्यास त्यांनी स्वतः तो पाळणे चुकीचे नव्हते. म्हणूनच, आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या विवेकाचा विचार करून पौलाने लिहिले: “प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी.”—रोमकर १४:५ब.
८. इतरांच्या विवेकाबद्दल विचारीपणा दाखवण्यासोबत रोममधील ख्रिश्चनांनी काय करायला नको होते?
८ विवेकावर अवलंबून असलेल्या बाबींसंबंधी निर्णय घेणे ज्यांना कठीण जात होते त्यांच्याप्रती सहनशील असण्याचे इतर बांधवांना पौलाने प्रेमळपणे प्रोत्साहन दिले. पण तारणाकरता मोशेचे नियमशास्त्र पाळणे अजूनही अनिवार्य आहे असे म्हणून सहविश्वासू बांधवांवर जे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना पौलाने कडक शब्दांत खडसावले. उदाहरणार्थ सा.यु. ६१ सालाच्या सुमारास पौलाने इब्री लोकांस एक जोरदार पत्र लिहिले. यात त्याने यहुदी ख्रिश्चनांना स्पष्टपणे समजावून सांगितले की मोशेच्या नियमशास्त्राला अधीन होणे आता काही उपयोगाचे नाही कारण ख्रिस्ती लोकांना येशूच्या खंडणी बलिदानावर आधारित असलेली श्रेष्ठ आशा प्राप्त झाली आहे.—गलतीकर ५:१-१२; तीत १:१०, ११; इब्री लोकांस १०:१-१७.
९, १०. ख्रिश्चनांनी काय करण्याचे टाळावे? स्पष्ट करा.
९ पौलाने, आपण पाहिल्याप्रमाणे असा युक्तिवाद केला की जोपर्यंत कोणत्याही ख्रिस्ती तत्त्वांचा स्पष्टपणे भंग होत नाही तोपर्यंत, ख्रिश्चनांनी वेगवेगळे मार्ग निवडले तरीसुद्धा यामुळे त्यांची एकता नष्ट होण्याचे कारण नाही. त्यानुषंगाने, पौल दुर्बल विवेकाच्या ख्रिश्चनाला असा प्रश्न करतो: “तू आपल्या भावाला दोष का लावतोस?” आणि जो सशक्त आहे, (कदाचित अशी व्यक्ती जिचा विवेक तिला नियमशास्त्राधीन वर्ज्य केलेले खाद्य खाण्याची परवानगी देतो, किंवा शब्बाथ दिवशी आध्यात्मिक स्वरूपाचे नसणारे काम करण्याची परवानगी देतो) त्याला पौल असे विचारतो: “तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस?” (रोमकर १४:१०) पौलानुसार, दुर्बल विवेकाच्या ख्रिश्चनांनी खुल्या विचारांच्या आपल्या बांधवांना दोषी ठरवण्याचे टाळले पाहिजे. त्याचवेळेस, जे ख्रिस्ती सशक्त आहेत त्यांनी अद्याप काही बाबतींत दुर्बल विवेकबुद्धी असलेल्या आपल्या बांधवांना तुच्छ लेखता कामा नये. सर्वांनी एकमेकांच्या चांगल्या हेतूंचा आदर करावा आणि “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू [नये].”—रोमकर १२:३, १८.
१० याबाबतीत समतोल दृष्टिकोन कसा राखावा हे पौल स्पष्ट करतो: “जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे.” तो पुढे म्हणतो: “देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला.” सशक्त व दुर्बल या दोघांनाही स्वीकारण्यास देव व ख्रिस्त तयार आहेत, त्याअर्थी आपणही अशीच उदार रोमकर १४:३; १५:७) याबाबतीत कोण योग्यपणे आक्षेप घेऊ शकत होता?
मनोवृत्ती दाखवून ‘एकमेकांचा स्वीकार करणे’ गरजेचे आहे. (बंधूप्रेम आजही एकता उत्पन्न करते
११. पौलाच्या काळात कोणती विशिष्ट परिस्थिती अस्तित्वात होती?
११ रोमनांना लिहिलेल्या पत्रात पौल एका विशिष्ट परिस्थितीविषयी बोलत होता. त्यावेळी परिस्थिती अशी होती, की यहोवाने अलीकडेच एक करार रद्द करून एक नवा करार स्थापन केला होता. काहींना त्याच्याशी जुळवून घेण्यास कठीण जात होते. आज ती परिस्थिती नाही पण कधीकधी त्याचप्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
१२, १३. आज ख्रिस्ती कोणत्या प्रकारच्या परिस्थितींत आपल्या बांधवांच्या विवेकाबद्दल आदर दाखवू शकतात?
१२ उदाहरणार्थ एक ख्रिस्ती स्त्री पूर्वी कदाचित अशा एका धर्माची सदस्या असेल, की ज्यात अगदी साधी वेषभूषा करण्यावर जोर दिला जात असेल. सत्य स्वीकारल्यानंतर, तिला ही गोष्ट स्वीकारण्यास कदाचित कठीण जाईल की योग्य प्रसंगी शालीन, रंगीत कपडे घालण्यास किंवा सुरुचीपूर्ण पद्धतीने सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यासही कोणतीही मनाई नाही. कोणतीही बायबल तत्त्वे गोवलेली नसल्यामुळे कोणीही त्या ख्रिस्ती स्त्रीला तिच्या विवेकाविरुद्ध वागण्यास जबरदस्ती करणे योग्य ठरणार नाही. त्याचवेळी ती देखील हे ओळखते, की ज्या ख्रिस्ती स्त्रियांना त्यांचा विवेक अशाप्रकारच्या वस्तूंचा वापर करण्यास परवानगी देतो त्यांची तिने टीका करू नये.
१३ दुसरे उदाहरण पाहा. एखादा ख्रिस्ती पुरुष कदाचित अशा वातावरणात लहानाचा मोठा झाला असेल की ज्यात मद्यपान वाईट समजले जात असेल. सत्याचे शिक्षण मिळाल्यावर त्याला बायबलचा दृष्टिकोन कळतो की द्राक्षारस ही देवाकडून मिळालेली एक देणगी असून योग्य प्रमाणात त्याचा वापर चुकीचा नाही. (स्तोत्र १०४:१५) तो या दृष्टिकोनाचा स्वीकार करतो. तरीपण त्याच्या लहानपणीच्या संस्कारांमुळे तो स्वतः अल्कोहोल असलेले कोणतेही पेय न घेण्याचेच पसंत करतो, पण जे योग्य प्रमाणात ही पेये घेतात त्यांची तो टीका करत नाही. अशारितीने तो पौलाच्या पुढील शब्दांनुसार वागतो: “मग शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावे.”—रोमकर १४:१९.
१४. कोणत्या प्रकारच्या परिस्थितींत ख्रिस्ती, पौलाने रोमकरांना दिलेल्या सल्ल्याचा आशय समजून घेऊन त्यानुसार वागू शकतात?
१४ पौलाने रोमनांना दिलेल्या सल्ल्याचा आशय समजून घेऊन त्यानुसार वागण्याजोगे इतरही प्रसंग उद्भवतात. ख्रिस्ती मंडळीत अनेक व्यक्ती आहेत आणि त्या सर्वांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. यामुळे ते वेगवेगळे निर्णय घेण्याची शक्यता आहे—उदाहरणार्थ, वेषभूषेच्या बाबतीत. अर्थात बायबलमध्ये काही सुस्पष्ट तत्त्वे दिलेली आहेत ज्यांचे सर्व प्रांजळ ख्रिश्चन पालन करतात. आपल्यापैकी कोणाचेही कपडे किंवा केशरचना विक्षिप्त अथवा असभ्य असू नये की ज्यामुळे जगातल्या वाईट लोकांशी आपली तुलना केली जाऊ शकेल. (१ योहान २:१५-१७) खरे ख्रिस्ती सर्व प्रसंगी, अगदी घरात असतानाही हे आठवणीत ठेवतात की आपण विश्वाच्या सार्वभौम प्रभू यहोवाचे सेवक आहोत. (यशया ४३:१०; योहान १७:१६; १ तीमथ्य २:९, १०) पण बऱ्याच बाबतीत ख्रिश्चनांना स्वीकारार्ह वैयक्तिक निवड करण्याची मुभा आहे. *
इतरांना अडखळण्याचे कारण बनू नका
१५. कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत एक ख्रिस्ती व्यक्ती आपल्या बांधवांच्या फायद्याकरता स्वतःच्या हक्कांचा त्याग करू शकते?
१५ रोमी ख्रिश्चनांना दिलेल्या सल्ल्यात पौल एक शेवटचे महत्त्वपूर्ण तत्त्व आपल्या लक्षात आणून देतो. प्रसंगी, एक सुप्रशिक्षित विवेक असलेली ख्रिस्ती व्यक्ती देखील विशिष्ट निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असूनही तो निर्णय घेणार नाही. का? कारण विशिष्ट मार्ग निवडल्याने इतरांना नुकसान होऊ शकते हे ती ओळखते. अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे? पौल सांगतो: “मांस न खाणे, द्राक्षरस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो] ते न करणे हे चांगले.” (रोमकर १४:१४, २०, २१) अशारितीने, “आपण जे सशक्त आहो त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.” (रोमकर १५:१, २) आपल्या वागण्याने सहख्रिस्ती बांधवाच्या विवेकाला ठेच लागेल अशी शक्यता असल्यास, बंधूप्रेम आपल्याला विचारीपणा दाखवून असे निर्णय न घेण्यास मदत करेल. मद्यपानाचे उदाहरण घेता येईल. माफक प्रमाणात मद्य घेण्यास ख्रिश्चनांना परवानगी आहे. पण जर यामुळे एखाद्या बांधवाला ठेच लागणार असेल तर, ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या हक्कांवर अडून राहू नये.
१६. आपल्या क्षेत्रातील लोकांप्रती आपण विचारीपणा कसा दाखवू शकतो?
१६ ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरील लोकांशी व्यवहार करतानाही हेच तत्त्व लागू केले जाऊ शकते. उदाहरणार्थ आपण कदाचित अशा ठिकाणी राहात असू जेथे लोक आपल्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे आठवड्यातला एक दिवस विश्रांतीचा दिवस म्हणून पाळत असतील. असे असल्यास, आपल्या शेजाऱ्यांना अडखळण होऊ नये आणि प्रचार कार्याकरता अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण त्या विशिष्ट दिवशी आपल्या शेजाऱ्यांना वाईट वाटेल असे काहीही करण्याचे शक्यतो टाळणेच बरे राहील. दुसऱ्या प्रकारच्या परिस्थितीचा विचार करा. एक श्रीमंत ख्रिस्ती जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याकरता तेथे स्थाईक होतो. समजा या ठिकाणचे लोक गरीब आहेत. अशी परिस्थिती असल्यास ती ख्रिस्ती व्यक्ती, चैनीत राहण्याची ऐपत असतानाही आपल्या नव्या शेजाऱ्यांप्रती विचारीपणा दाखवून, आपले कपडे व राहणी साधी ठेवण्याचा प्रयत्न करू शकते.
१७. वैयक्तिक निर्णय घेतानाही इतरांचा विचार करणे का योग्य आहे?
१७ “जे सशक्त” आहेत त्यांच्याकडून अशाप्रकारच्या तडजोडी करण्याची अपेक्षा करणे योग्य आहे का? या उदाहरणाचा विचार करा: महामार्गावर गाडी चालवत असताना आपल्याला काही लहान मुले अगदी रस्त्याच्या कडेने चाललेली दिसतात. पण फक्त त्या रस्त्यावर अमुक वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असल्यामुळे आपल्याला तसे करण्याचा हक्क आहे असे म्हणून आपण मुलांना पाहिल्यावरही त्याच वेगाने गाडी चालवतो का? नाही, मुलांना अपघात होण्याची शक्यता टाळण्यासाठी आपण आपोआपच आपला वेग कमी करतो. कधीकधी, आपल्या सहविश्वासू बांधवांसोबतच्या किंवा इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधातही अशाचप्रकारे आपला वेग कमी करण्याची किंवा त्यांच्या फायद्याकरता आपल्या इच्छा त्यागण्याची तयारी दाखवावी लागते. आपण कदाचित जे करत असू ते करण्याचा आपल्याला पूर्ण हक्क असेल. कोणत्याही बायबल तत्त्वांचे त्यामुळे उल्लंघन होण्याची शक्यता नसेल. पण तरीसुद्धा जर आपली ती कृती दुबळ्या विवेकाच्या बांधवांना दुखावणार असेल, तर ख्रिस्ती प्रीती आपल्याला वेळीच सावधगिरीने पाऊल टाकण्यास मदत करेल. (रोमकर १४:१३, १५) आपल्या वैयक्तिक हक्कांचा वापर करण्यापेक्षा एकता कायम राखणे आणि राज्याच्या कार्यांची उन्नती करणे केव्हाही जास्त महत्त्वाचे आहे.
१८, १९. (अ) इतरांप्रती विचारीपणा दाखवताना आपण कशाप्रकारे येशूच्या आदर्शाचे अनुकरण करत असतो? (ब) कोणत्या बाबतीत आपण पूर्णपणे एकचित्ताने वागतो आणि पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
१८ अशाप्रकारे वागताना आपण सर्वात उत्तम आदर्शाचे अनुकरण करत असतो. पौल म्हणतो: “ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर ‘तुझी निंदा करणाऱ्याने केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.” येशू आपल्याकरता स्वतःचा जीव देण्यास तयार झाला. मग निश्चितच आपणही, ‘अशक्तांना’ आपल्यासोबत एकतेने देवाचे गौरव करता यावे म्हणून स्वतःच्या काही हक्कांचा त्याग करण्यास तयार झालो पाहिजे. दुबळ्या विवेकबुद्धीच्या बांधवांप्रती जेव्हा आपण सहनशील व उदार मनोवृत्ती दाखवतो—आपल्या हक्कांविषयी अट्टाहास न करता आपल्या इच्छेचा त्याग करून निर्णय घेतो—तेव्हा खरोखर आपण “ख्रिस्त येशूप्रमाणे” मनोवृत्ती असल्याचे दाखवतो.—रोमकर १५:१-५.
१९ शास्त्रवचनीय तत्त्वांशी संबंध नसलेल्या बाबींवर आपली मते थोडीफार वेगळी असली तरीसुद्धा उपासनेच्या बाबतीत आपण पूर्ण एकचित्ताने वागतो. (१ करिंथकर १:१०) उदाहरणार्थ, जे लोक खऱ्या उपासनेचा विरोध करतात त्यांच्याप्रती आपल्या प्रतिक्रियेत ही एकता दिसून येते. देवाचे वचन अशा विरोधकांना परके म्हणते आणि अशा ‘परक्यांच्या वाणीपासून’ आपण सावध राहावे अशी आपल्याला ताकीद देते. (योहान १०:५) अशा परक्यांना आपण कसे ओळखू शकतो? त्यांच्याप्रती आपली प्रतिक्रिया काय असावी? हे प्रश्न पुढच्या लेखात विचारात घेतले जातील.
[तळटीप]
^ परि. 14 वेषभूषेच्या बाबतीत अल्पवयीन मुलांनी आपल्या आईवडिलांच्या इच्छेला मान द्यावा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• वैयक्तिक बाबतींत वेगवेगळी मते असणे हे एकतेला बाधक का नव्हते?
• ख्रिस्ती या नात्याने आपण एकमेकांप्रती प्रेमळपणाने व विचारीपणाने का वागले पाहिजे?
• एकतेविषयी पौलाच्या सल्ल्याचा आपण आज कोणकोणत्या मार्गांनी अवलंब करू शकतो आणि असे करण्यास कोणती गोष्ट आपल्याला प्रेरित करेल?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
एकतेविषयी पौलाने दिलेले मार्गदर्शन मंडळीकरता अत्यावश्यक होते
[१० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती बांधवांच्या पार्श्वभूमी वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा त्यांच्यात एकता आहे
[१२ पानांवरील चित्र]
आता या वाहनचालकाने काय करावे?