कोणता वारसा तुम्ही आपल्या मुलांना दिला पाहिजे?
कोणता वारसा तुम्ही आपल्या मुलांना दिला पाहिजे?
पावलोस, हे दक्षिण युरोपमधील एक गृहस्थ, आपली पत्नी आणि १३ आणि ११ वर्षांच्या दोन मुली व ७ वर्षांचा मुलगा यांच्याबरोबर वेळ घालवायला घरी क्वचितच असतात. आपले स्वप्न साकार होण्यासाठी पैसे कमवण्याकरता आठवड्यातील सातही दिवस पावलोस दोन पाळ्या करतात. आपल्या दोन्ही मुलींसाठी एक एक अपार्टमेंट खरेदी करण्याचा आणि मुलासाठी एक लहानसा व्यापार सुरू करून देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांची पत्नी सोफिया आतापासूनच आपल्या मुलांच्या संसाराच्या तयारीला लागली आहे. कपडालत्ता, स्टीलची, चिनी मातीची भांडीकुंडी यांची जमवाजमव करू लागली आहे. तुम्ही इतके कष्ट का करत आहात असे विचारल्यावर त्या दोघांनी एकच उत्तर दिले: “आमच्या मुलांसाठी!”
पावलोस आणि सोफियाप्रमाणे संपूर्ण जगातील अनेक पालक आपल्या मुलांचा संसार थाटून देण्यासाठी होईल तितका प्रयत्न करतात. काही पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पैशांची जमवाजमव करतात. इतर काही पालक आपल्या मुलांना पुरेसे शिक्षण देतात, कलाकुसरींचे प्रशिक्षण देतात जेणेकरून पुढे जाऊन त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल. आपण हे सर्व आपल्या मुलांबद्दल असलेल्या प्रेमापोटी करत आहोत, असे जरी त्यांना वाटत असले तरी, या सर्व गोष्टी करण्यासाठी ते अजाणतेत, नातेवाईक, मित्रजन आणि समाजातील लोक यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली येतात. त्यामुळे, चिंतातूर पालक उचितपणे असे विचारतात: ‘आम्ही आमच्या मुलांना किती दिले पाहिजे?’
भविष्याची तरतूद करणे
ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद करणे हे केवळ त्यांचे स्वाभाविक कर्तव्यच नव्हे तर शास्त्रवचनानुसार देखील आहे. प्रेषित पौलाने आपल्या दिवसांतील ख्रिश्चनांना असे सांगितले: “आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.” (२ करिंथकर १२:१४) पौलाने पुढे म्हटले, की पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे ही एक गंभीर जबाबदारी आहे. त्याने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) बायबलमधील अनेक अहवाल दाखवून देतात, की बायबल काळांत वारशाच्या बाबी देवाच्या सेवकांमध्ये महत्त्वपूर्ण होत्या.—रूथ २:१९, २०; ३:९-१३; ४:१-२२; ईयोब ४२:१५.
परंतु, पालक कधीकधी आपल्या मुलांसाठी खूप मोठा वारसा देण्यासाठी गुंतून जातात. का? दक्षिण युरोपहून संयुक्त संस्थानात राहायला आलेले मनोलीस नावाचे एक वडील एक कारण सांगतात: “दुसऱ्या महायुद्धाचे, अन्नटंचाईचे आणि द्रारिद्र्याचे चटके बसलेल्या आईवडिलांना
वाटते, की आपल्या मुलांनी तरी सुखात राहावे. परंतु जबाबदारीची अति जाणीव आणि आपल्या मुलांना सर्वात उत्तम बस्तान मांडून देण्याची फाजील इच्छा यांमुळे काही पालक स्वतःलाच हानी करून घेतात.” होय, काही पालक आपल्या मुलांसाठी भौतिक संपत्ती साठवून ठेवण्यासाठी पोटाला चिमटा काढून दिवस काढतात. परंतु पालकांनी असे करणे सुज्ञपणाचे आहे का?“व्यर्थ व मोठे अनिष्ट”
प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने वारशाच्या बाबतीत एक ताकीद दिली. त्याने लिहिले: “माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्यामागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे, हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे कांही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादिले आहे त्यावर तो ताबा चालविणार; हेहि व्यर्थच! . . . कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वांट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय.”—उपदेशक २:१८-२१.
शलमोनाने म्हटले त्याप्रमाणे, ज्यांना वारशात भरपूर मिळते त्यांना कदाचित त्यांची किंमत समजणार नाही कारण ते मिळवण्यासाठी त्यांनी कष्ट केलेले नसतात. परिणामतः, पालकांनी काबाडकष्ट करून जे जमवलेले असते त्याची अविचारी मुलांना कदाचित कसली कदर राहणार नाही. ते कदाचित कष्टाने मिळवलेली धनसंपत्ती उधळून टाकतील. (लूक १५:११-१६) असे झाले तर ते किती “व्यर्थ व मोठे अनिष्ट” ठरेल!
वारसा आणि लोभ
पालकांनी आणखी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. वारशाने मिळणाऱ्या संपत्तीची व विवाहाच्या वेळी मिळणाऱ्या बक्षीसांना फाजील महत्त्व देणाऱ्या काही संस्कृतींमधील मुले लोभी होतात, आणि आईवडील जितके देऊ शकतात त्याच्यापेक्षा अधिक जमीनजुमला किंवा हुंडा मागतात. ग्रीसमधले लुकस नामक एक वडील असा टोमणा मारतात: “दोन किंवा तीन मुली असलेल्या वडिलांचे तर मग काय विचारूच नका. या मुली त्यांच्या वडिलांनी त्यांना जे दिले आहे त्याची तुलना, इतर मुलींच्या पालकांनी त्यांच्यासाठी जमवून ठेवलेल्या ‘अमाप’ संपत्तीशी करतील. आपण मोठा हुंडा देऊ शकलो नाही तर आपल्याशी कोण लग्न करेल, असं त्या म्हणतील.”
पूर्वी ज्यांचा उल्लेख केला ते मनोलीस म्हणतात: “एखादा तरुण मुलगा कदाचित, जोपर्यंत त्याचा भावी सासरा हुंडा म्हणून मुलीला जमीनजुमला किंवा रोकड देत नाही तोपर्यंत तो लग्न लांबणीवर टाकेल. हे एकप्रकारचे ब्लॅकमेलींगच होऊ शकते.”
बायबल आपल्याला सर्व प्रकारच्या लोभापासून दूर पळा अशी ताकीद देते. शलमोनाने लिहिले: “आरंभी उतावळीने मिळविलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक नीतिसूत्रे २०:२१) प्रेषित पौलाने हे जोर देऊन सांगितले: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:१०; इफिसकर ५:५.
होत नाही.” (“वतनाबरोबर शहाणपण”
वारसा किंवा वतन मौल्यवान आहे हे कबूल आहे परंतु शहाणपण किंवा बुद्धी भौतिक संपत्तीपेक्षा कैक पटीने मौल्यवान आहे. राजा शलमोनाने लिहिले: “वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे; . . . ते विशेष हितावह आहे. ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” (उपदेशक ७:११, १२; नीतिसूत्रे २:७; ३:२१) पैशाने आर्थिक सुरक्षितता मिळते आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो, त्याला जे हवे ते घेऊ शकतो हे कबूल आहे परंतु पैसा कधीतरी नाहीसा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला पाहता, बुद्धी—समस्या सोडवण्यासाठी आणि विशिष्ट ध्येये साध्य करण्यासाठी लागणारी समज वापरण्याची कुशलता—एखाद्याला अविचारी धोके पत्करण्यापासून सुरक्षित ठेवू शकते. देवाबद्दलच्या भयावर आधारित असलेली बुद्धी एखाद्याला लवकरच येणाऱ्या देवाच्या नवीन जगात चिरकालिक जीवन प्राप्त करण्यास मदत करू शकते. हा एक अमुल्य वारसा ठरू शकतो!—२ पेत्र ३:१३.
ख्रिस्ती पालक, स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याद्वारे बुद्धी व्यक्त करतात. (फिलिप्पैकर १:१०) मुलांसाठी गोळा केलेल्या धनसंपत्तीला, आध्यात्मिक गोष्टींपेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ नये. येशूने आपल्या अनुयायांना असे उत्तेजन दिले: “तुम्ही पहिल्याने त्याचे [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) आपल्या ख्रिस्ती कुटुंबासाठी आध्यात्मिक ध्येये ठेवणारे पालक, समृद्ध आशीर्वादाची अपेक्षा करू शकतात. राजा शलमोनाने लिहिले: “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.”—नीतिसूत्रे २३:२४, २५.
चिरकाल टिकणारा वारसा
प्राचीन इस्राएली लोक, वारशा हक्काला खूप महत्त्व द्यायचे. (१ राजे २१:२-६) परंतु यहोवाने त्यांना असा सल्ला दिला: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) आज ख्रिस्ती पालकांनाही हेच सांगितले जाते: “तुम्ही आपल्या मुलांना . . . प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात . . . वाढवा.”—इफिसकर ६:४.
घरच्यांची तरतूद करण्यामध्ये, बायबलमधील शिक्षण देणे समाविष्ट आहे याची आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या पालकांना जाणीव आहे. तीन मुलांचे वडील असलेले आन्थ्रीयास म्हणतात: “मुलं जर ईश्वरी तत्त्वं आपल्या जीवनात लागू करायली शिकली तर ती भविष्यासाठी तयार होतील.” अशाप्रकारचा वारसा, मुलांना त्यांच्या निर्माणकर्त्याशी व्यक्तिगत नातेसंबंध जोडून तो कायम टिकवून ठेवण्यास मदत करण्यावरही भर देतो.—१ तीमथ्य ६:१९.
आपल्या मुलांना आध्यात्मिक भवितव्य देण्याचा तुम्ही विचार केला आहे का? उदाहरणार्थ, आपली मुले पूर्ण-वेळेच्या सेवेत असतील तर पालक काय करू शकतात? एका पूर्ण वेळेच्या सेवकाने आर्थिक मदत मागू नये किंवा त्याची अपेक्षा देखील करू नये; अशावेळी प्रेमळ पालक, त्याला पूर्ण वेळेच्या सेवेत टिकून राहता यावे म्हणून ‘त्याच्या गरजा भागवण्यास’ मदत करण्याचे ठरवू शकतात. (रोमकर १२:१३; १ शमुवेल २:१८, १९; फिलिप्पैकर ४:१४-१८) अशाप्रकारची मदत करण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवा निश्चित्तच आनंदी होतो.
तेव्हा, पालकांनी आपल्या मुलांना कोणता वारसा दिला पाहिजे? त्यांच्या भौतिक गरजा पुरवण्याव्यतिरिक्त ख्रिस्ती पालक आपल्या मुलांच्या चिरकालिक लाभास्तव समृद्ध आध्यात्मिक वतन मिळेल याची खात्री करतील. अशाप्रकारे, स्तोत्र ३७:१८ मधील शब्द खरे ठरतील ज्यात असे म्हटले आहे: “सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल.”
[२६, २७ पानांवरील चित्रे]
तुमच्या मनात तुमच्या मुलांसाठी कोणते भविष्य आहे?