व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निराशेचा सामना कसा करता येईल?

निराशेचा सामना कसा करता येईल?

निराशेचा सामना कसा करता येईल?

तुम्ही निराश झाला आहात का? अनिश्‍चिततेच्या व संघर्षाच्या या काळात पुष्कळ लोक निराश होत आहेत. काहीजण बेकारीमुळे निराश होतात. इतर जण एखाद्या अपघातानंतर सोसाव्या लागणाऱ्‍या हालअपेष्टांचा सामना करत आहेत. आणखी काही, कौटुंबिक समस्या, गंभीर आजारपण, एकटेपणाच्या भावना यांच्याशी झगडत आहेत.

तुम्ही निराश झाला असाल तर तुम्हाला मदत कोठून मिळू शकेल? संपूर्ण जगातील लाखो लोकांना देवाचे वचन बायबल वाचल्याने सांत्वन मिळाले आहे. “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो,” या प्रेषित पौलाच्या शब्दांतून त्यांना दिलासा मिळतो. (२ करिंथकर १:३, ४) तेव्हा हे आणि बायबलमधील इतर वचने वाचून पाहायला काय हरकत आहे? असे केल्याने ‘तुमच्या मनाचे सांत्वन होईल, आणि तुम्ही स्थिर’ व्हाल.—२ थेस्सलनीकाकर २:१७.

निराशेचा सामना करण्यासाठी लागणारी मदत तुम्हाला, यहोवाची सेवा करणाऱ्‍यांसोबत सहवास राखूनही मिळू शकते. नीतिसूत्रे १२:२५ म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” आपण ख्रिस्ती सभांना हजर राहतो तेव्हा असे “गोड शब्द” ऐकतो जे “मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.” (नीतिसूत्रे १६:२४) अशा सभांचा बलवर्धक परिणाम अनुभवण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहायला काय हरकत आहे?

प्रार्थनेच्या शक्‍तीचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. जीवनाच्या चिंतांनी तुम्ही बेजार झाला असाल तर जो ‘प्रार्थना ऐकतो’ त्याच्याजवळ तुम्ही आपले मन हलके करू शकता. (स्तोत्र ६५:२) आपला निर्माणकर्ता यहोवा देव, आपण स्वतःला जितके ओळखतो त्याच्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे ओळखतो. आपण त्याच्यावर संपूर्ण भरवसा ठेवू शकतो. त्याचे वचन आपल्याला असे वचन देते: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) होय, यहोवाची “आशा धरून राहणारे नवीन शक्‍ति संपादन करितील.”—यशया ४०:३१.

निराशेचा यशस्वीरीत्या सामना करण्यासाठी यहोवा देवाने आपल्याला सर्व शक्‍तिशाली मदत पुरवली आहे. या मदतीचा फायदा तुम्ही घ्याल का?