व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘परक्यांच्या वाणीपासून’ सावध

‘परक्यांच्या वाणीपासून’ सावध

‘परक्यांच्या वाणीपासून’ सावध

“ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.”—योहान १०:५.

१, २. (अ) येशू मरीयेचे नाव घेऊन तिला हाक मारतो तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असते आणि या घटनेवरून येशूने आधी केलेल्या कोणत्या विधानाचा प्रत्यय येतो? (ब) कशामुळे आपल्याला येशूच्या जवळ राहण्यास मदत मिळेल?

येशूचे पुनरुत्थान झाले आहे. आपल्या रिकाम्या कबरेजवळ उभ्या असलेल्या एका स्त्रीकडे तो पाहात आहे. तो तिला चांगले ओळखतो. तिचे नाव मरीया मग्दालीया. जवळजवळ दोन वर्षांपूर्वी त्याने तिला दुष्ट आत्म्यापासून मुक्‍त केले होते. तेव्हापासून ती त्याच्यासोबत व प्रेषितांसोबत गावोगावी जाऊन, त्यांची सेवाचाकरी करीत होती. (लूक ८:१-३) पण आज मरीया रडत आहे; येशूचा मृत्यू तिने आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि आता तर त्याचा मृतदेहसुद्धा गायब झाला आहे. ती अतिशय दुःखी आहे! म्हणून, येशू तिला विचारतो: “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करितेस?” त्याला तिथला माळी समजून ती उत्तर देते: “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” तेव्हा येशू म्हणतो: “मरीये!” येशूने नेहमीच्या पद्धतीने हाक मारताच ती त्याला ओळखते. अत्यानंदाने, “गुरुजी!” असे म्हणून ती त्याला बिलगते.—योहान २०:११-१८.

या हृदयस्पर्शी घटनेवरून येशूने काही काळाआधी उद्‌गारलेल्या शब्दांचा प्रत्यय येतो. स्वतःची तुलना मेंढपाळाशी व आपल्या अनुयायांची तुलना मेंढरांशी करून तो म्हणतो की मेंढपाळ आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो आणि ते त्याचा आवाज ओळखतात. (योहान १०:३, ४, १४, २७, २८) मेंढरू आपल्या मेंढपाळाला ओळखते, त्याचप्रकारे मरीयेने आपला मेंढपाळ येशू याला ओळखले. येशूच्या आजच्या काळातल्या शिष्यांविषयीही हेच म्हणता येते. (योहान १०:१६) आपल्या मेंढपाळाचा आवाज ओळखता येत असल्यामुळे मेंढराला त्याच्या जवळ राहता येते; त्याचप्रकारे आध्यात्मिक रितीने, आपल्या उत्तम मेंढपाळाचा अर्थात येशू ख्रिस्ताचा आवाज आपण ओळखला तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्यासोबत चालण्यास आपल्याला मदत मिळेल.—योहान १३:१५; १ योहान २:६; ५:२०.

३. येशूने मेंढवाड्याचा जो दृष्टान्त दिला त्यावरून कोणते प्रश्‍न मनात उद्‌भवतात?

पण, त्याच उदाहरणानुसार, मेंढरांना मानवांचे आवाज ओळखण्याची क्षमता असल्यामुळे, जसे ते आपल्या मित्राला ओळखू शकतात तसेच ते शत्रूलाही ओळखू शकतात. हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपलेही अनेक धूर्त विरोधक आहेत. हे कोण आहेत? ते कशाप्रकारे कार्य करतात? आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे पाहण्याआधी येशूने मेंढवाड्याच्या दृष्टान्तात आणखी काय म्हटले त्याकडे लक्ष देऊ.

‘जो दाराने आत जात नाही तो”

४. मेंढपाळाच्या दृष्टान्तानुसार, मेंढरे कोणाच्या मागे चालतात आणि कोणाच्या मागे ती जात नाहीत?

येशू म्हणतो: “जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.” (योहान १०:२-५) येथे येशूने “वाणी” हा शब्द तीनदा वापरला. दोनदा तो मेंढपाळाच्या वाणीबद्दल किंवा आवाजाबद्दल बोलतो तर एकदा तो ‘परक्यांच्या वाणीबद्दल’ उल्लेख करतो. येशू कोणत्या प्रकारच्या परक्या व्यक्‍तीबद्दल येथे बोलत होता?

५. योहान अध्याय १० यात ज्या प्रकारच्या परक्या व्यक्‍तीचा उल्लेख केला आहे तिला आपण आतिथ्य का बरे दाखवत नाही?

काही परक्या व्यक्‍तींची ओळख नसताना आपण त्यांना आतिथ्य दाखवतो—बायबलच्या मूळ भाषेत अतिथिप्रेम या शब्दाचा अर्थ “अनोळखी व्यक्‍तींबद्दल प्रेम” असा आहे. पण येशू अशा परक्या व्यक्‍तींबद्दल बोलत नव्हता. (इब्री लोकांस १३:२) येशूच्या दृष्टान्तात, ही परकी व्यक्‍ती निमंत्रणाशिवाय आलेल्या पाहुण्यासारखी आहे. हा परका “मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो.” “तो चोर व लुटारू आहे.” (योहान १०:१) जो चोर व लुटारू बनला असा देवाच्या वचनात उल्लेख केलेला पहिला कोण आहे? दियाबल सैतान. याचा पुरावा आपल्याला उत्पत्तिच्या पुस्तकात सापडतो.

परक्याची वाणी पहिल्यांदा ऐकू आली

६, ७. सैतानाला परका व चोर म्हणणे योग्य का आहे?

उत्पत्ति ३:१-५ यात पृथ्वीवर पहिल्यांदा एका परक्याचा आवाज कशाप्रकारे ऐकू आला याचे वर्णन केले आहे. या अहवालात सांगितले आहे की कशाप्रकारे सैतान पहिली स्त्री हव्वा हिच्याजवळ जाऊन एका सर्पाच्या माध्यमाने तिच्याशी धूर्तपणे बोलला. अर्थात, या अहवालात सैतानाला ‘परका’ म्हटलेले नाही. पण त्याच्या कृतींवरून दिसून येते की येशूने योहानाच्या १० व्या अध्यायात वर्णन केलेल्या परक्या व्यक्‍तीशी त्याचे बऱ्‍याच प्रकारे साम्य आहे. काही समान गोष्टींकडे लक्ष द्या.

येशू सांगतो की परका मेंढवाड्यात आडवळणाने येतो. त्याचप्रकारे हव्वेला फसवण्याकरता सैतान आडवळणाने, सर्पाच्या माध्यमाने गेला. या कावेबाज कृतीतून सैतान खरोखर एक धूर्त आगंतुक असल्याचे शाबित झाले. शिवाय, मेंढवाड्यात प्रवेश करणारा परका, मेंढरांच्या हक्काच्या मालकाची चोरी करण्याचा प्रयत्न करतो. तो तर चोरापेक्षाही वाईट असतो कारण त्याचा इरादा “घात व नाश” करण्याचा असतो. (योहान १०:१०) त्याचप्रकारे सैतान देखील चोर होता. हव्वेला फसवून, तिने जी निष्ठा देवाला दाखवली पाहिजे होती तिची एका अर्थाने सैतानाने चोरी केली. शिवाय, सैतानाने मानवांना मृत्यूच्या खाईत ढकलले. तो खरोखरच एक घातक खूनी आहे.

८. सैतानाने यहोवाच्या शब्दांचा व हेतूंचा विपर्यास कसा केला?

यहोवाच्या शब्दांचा व हेतूंचा सैतानाने ज्याप्रकारे विपर्यास केला त्यावरून त्याचा कपटीपणा दिसून आला. त्याने हव्वेला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” आपल्याला अगदी धक्का बसला आहे असे सैतानाने भासवले, जणू तो असे विचारू इच्छित होता, ‘देव इतका अन्याय करूच कसा शकतो?’ पुढे त्याने म्हटले: “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील.” त्याच्या शब्दांकडे लक्ष द्या: ‘देवाला ठाऊक आहे.’ दुसऱ्‍या शब्दांत, सैतानाला असे म्हणायचे होते: ‘देवाला जे ठाऊक आहे ते मलाही ठाऊक आहे. मला त्याचे हेतू ठाऊक आहेत, त्याचे हेतू चांगले नाहीत.’ (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २:१६, १७; ३:१,) दुःखाची गोष्ट म्हणजे, हव्वा आणि आदाम दोघांनी या परक्या वाणीकडे दुर्लक्ष केले नाही. उलट त्यांनी सैतानाचे ऐकले आणि अशारितीने स्वतःवर व आपल्या संततीवर दुःख ओढवले.—रोमकर ५:१२, १४.

९ आजही परक्यांची वाणी ऐकू येण्याची अपेक्षा आपण का करू शकतो?

सैतान आज देखील देवाच्या लोकांना पथभ्रष्ट करण्यासाठी अशाच पद्धतींचा उपयोग करतो. (प्रकटीकरण १२:९) तो “लबाडीचा बाप” आहे आणि जे त्याच्यासारखेच देवाच्या सेवकांना पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात ते त्याचीच मुले आहेत. (योहान ८:४४) या परक्यांचा आवाज आज कोणत्या काही मार्गांनी ऐकू येतो याकडे लक्ष देऊ या.

आज परक्यांची वाणी कशाप्रकारे ऐकू येते

१०. परक्यांची वाणी कोणत्या एका मार्गाने ऐकू येत आहे?

१० फसवे युक्‍तिवाद. प्रेषित पौल म्हणतो: “विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका.” (इब्री लोकांस १३:९) तो कोणत्या शिक्षणाविषयी बोलत होता? या शिक्षणामुळे आपण “बहकून” जाऊ शकतो, त्याअर्थी नक्कीच पौल अशा शिकवणुकींविषयी बोलत होता की ज्या आपल्या आध्यात्मिक स्थैर्याला घातक ठरू शकतात. कोण या विचित्र शिकवणुकी प्रतिपादित करत आहेत? ख्रिस्ती वडिलांच्या एका गटाला पौलाने असे सांगितले: “तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रेषितांची कृत्ये २०:३०) खरोखर, पौलाच्या काळाप्रमाणे आज देखील काही व्यक्‍ती, ज्या आधी ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांपैकी होत्या, त्या आता “विपरीत गोष्टी”—अर्धसत्ये व धडधडीत खोट्या गोष्टी—सांगून मेंढरांना बहकवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेषित पेत्राच्या शब्दांत, ते “बनावट गोष्टी” अर्थात, अशा गोष्टी सांगतात की ज्या वरवर सत्य वाटतात पण बनावट नोटांप्रमाणे, मुळात निरुपयोगी असतात.—२ पेत्र २:३.

११. दुसरे पेत्र २:१, ३ यांतून धर्मत्यागी व्यक्‍तींच्या कार्यपद्धतीचा व हेतूचा कशाप्रकारे पर्दाफाश होतो?

११ धर्मत्यागी व्यक्‍तींच्या कार्यपद्धतींचा आणखी पर्दाफाश करीत, पेत्र पुढे सांगतो, की ते “विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारांत आणतील.” (२ पेत्र २:१,) येशूने सांगितलेल्या मेंढवाड्याच्या दृष्टान्तातील चोर ज्याप्रकारे “दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो,” त्याचप्रकारे, धर्मत्यागीही सहसा मोठ्या चलाखीने आपल्यापर्यंत येतात. (गलतीकर २:४; यहूदा ४) त्यांचे उद्दिष्ट काय असते? पेत्र सांगतो: “[ते] तुम्हांवर पैसे मिळवितील.” धर्मत्यागी कदाचित कधीही ही गोष्ट मानणार नाहीत, पण खरे पाहता त्यांचा मूळ हेतू, “चोरी, घात व नाश” करण्याचाच असतो. (योहान १०:१०) अशा परक्यांपासून सावध राहा!

१२. (अ) आपल्या सोबत्यांच्या माध्यमाने आपण कशाप्रकारे परक्यांच्या वाणीच्या संपर्कात येऊ शकतो? (ब) सैतानाचे डावपेच व आजच्या काळातील परक्यांच्या पद्धतींत कोणते साम्य आहे?

१२ हानीकारक संगत. आपण ज्यांच्यासोबत संगती करतो त्यांच्या माध्यमानेही परक्यांची वाणी ऐकू येऊ शकते. हानीकारक संगतीचा सर्वात जास्त धोका तरुणांना आहे. (१ करिंथकर १५:३३) सैतानानेही आदाम व हव्वा यांच्यापैकी—वयाने लहान असलेल्या व कमी अनुभव असलेल्या हव्वेलाच आपला निशाणा बनवले. त्याने तिला खात्री पटवून दिली की यहोवाने तिच्या स्वातंत्र्यावर विनाकारण आळा घातला आहे. खरे पाहता हे अगदी खोटे होते. यहोवाचे आपल्या मानवी निर्मितीवर प्रेम होते आणि त्यांच्या कल्याणाची त्याला काळजी होती. (यशया ४८:१७) त्याचप्रकारे आजही, परके तुम्हा तरुणांना अशी खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करतील, की तुमचे ख्रिस्ती पालक तुमच्या स्वातंत्र्यावर विनाकारण आळा घालतात. या परक्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो? एक ख्रिस्ती मुलगी कबूल करते: “माझ्या वर्गसोबत्यांमुळे, काही काळ का होईना पण माझा विश्‍वास कमकुवत झाला होता. ते वारंवार म्हणायचे की तुझ्या धर्मात खूप अवाजवी निर्बंध आहेत.” पण खरी गोष्ट ही आहे की तुमच्या आईवडिलांचे तुमच्यावर प्रेम आहे. तेव्हा शाळासोबती तुमच्या आईवडिलांबद्दल शंका घेण्यास तुम्हाला प्रवृत्त करू लागतात तेव्हा हव्वेप्रमाणे बहकू नका.

१३. दाविदाने कोणता सूज्ञ मार्ग पत्करला आणि त्याचे अनुकरण करण्याचा आपल्यासमोर कोणता मार्ग आहे?

१३ हानीकारक संगतीविषयी स्तोत्रकर्ता दावीद म्हणाला: “अधम लोकात मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.” (स्तोत्र २६:४) येथेही परक्यांच्या एका खास गुणाकडे तुमचे लक्ष गेले का? ते कपटी आहेत—सर्पाचा उपयोग करणाऱ्‍या सैतानाप्रमाणेच ते कपटीपणे आपली खरी ओळख लपवतात. आज काही अनैतिक लोक इंटरनेटच्या माध्यमाने कपटीपणे आपली खरी ओळख व वास्तविक हेतू लपवतात. चॅट रूम्समध्ये, या विकृत प्रौढ व्यक्‍ती देखील आपण तरुण असल्याचे भासवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. तरुणांनो, आध्यात्मिकरित्या स्वतःची हानी करून घ्यायची नसेल, तर कृपा करून अत्यंत सावध राहा.—स्तोत्र ११९:१०१; नीतिसूत्रे २२:३.

१४. कधीकधी, प्रसारमाध्यमे परक्यांची वाणी कशाप्रकारे प्रसारित करतात?

१४ खोटे आरोप. यहोवाच्या साक्षीदारांविषयी लिहिली जाणारी काही वृत्ते कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय लिहिली जातात हे खरे आहे; पण कधीकधी प्रसारमाध्यमे परक्यांची पूर्वग्रहदूषित वाणी प्रसारित करण्याकरता त्यांना स्वतःचा उपयोग करू देतात. उदाहरणार्थ एका देशात एका बातमी वृत्ताने, दुसऱ्‍या महायुद्धात साक्षीदारांनी हिटलरच्या शासनाला पाठिंबा दिल्याचे खोटे विधान केले. दुसऱ्‍या एका वृत्तात साक्षीदारांवर चर्च इमारतींची नासधूस करण्याचा आरोप करण्यात आला. कित्येक देशांतील प्रसार माध्यमांनी साक्षीदारांवर आपल्या मुलांना वैद्यकीय उपचारापासून वंचित ठेवण्याचा व सह विश्‍वासू सदस्यांच्या गंभीर पापांवर पांघरूण घालण्याचा आरोप लावला. (मत्तय १०:२२) तरीसुद्धा, जे प्रामाणिक लोक आपल्याला वैयक्‍तिकरित्या ओळखतात त्यांना हे आरोप खोटे असल्याचे माहीत आहे.

१५. प्रसारमाध्यमांत प्रसारित केल्या जाणाऱ्‍या सर्व माहितीवर विश्‍वास ठेवणे सुज्ञपणाचे का नाही?

१५ अशा परक्यांच्या आरोपांविषयी आपल्याला माहिती मिळाल्यास आपण काय करावे? नीतिसूत्रे १४:१५ यातील सल्ला आपण अशावेळी पाळला पाहिजे: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” प्रसारमाध्यमांत सत्य म्हणून प्रसारित केल्या जाणाऱ्‍या प्रत्येकच गोष्टीवर विश्‍वास ठेवणे सुज्ञतेचे ठरणार नाही. आपण सर्व प्रापंचिक माहितीबद्दल संशयी वृत्ती बाळगत नाही पण एक गोष्ट आपण ओळखतो, ती अशी की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (तिरपे वळण आमचे.)—१ योहान ५:१९.

‘प्रेरित वचनांची परीक्षा करा’

१६. (अ) मेंढरांच्या वर्तनावरून, योहान १०:४ येथील येशूच्या शब्दांची कशाप्रकारे सत्यता पटते? (ब) बायबल आपल्याला काय करण्याचे प्रोत्साहन देते?

१६ पण, मित्र व शत्रू यांतला फरक आपण कसा ओळखू शकतो? येशू मेंढरांविषयी म्हणतो की ते मेंढपाळाची ‘वाणी ओळखत असल्यामुळे’ त्याच्या मागून चालतात. (योहान १०:४) मेंढरे केवळ मेंढपाळ कसा दिसतो हे पाहून त्याच्यामागे चालत नाही; तर ती त्याचा आवाज ओळखतात. बायबल प्रदेशांविषयी असलेल्या एका ग्रंथात एका लहानशा घटनेविषयी सांगितले आहे. एका पर्यटकाने एकदा असा दावा केला की मेंढरे मेंढपाळाच्या आवाजामुळे नव्हे तर त्याच्या कपड्यांमुळे त्याला ओळखतात. पण एका मेंढपाळाने उत्तर दिले की आवाजावरूनच मेंढरे मेंढपाळाला ओळखतात. आपले म्हणणे शाबीत करण्यासाठी त्याने त्या अनोळखी व्यक्‍तीसोबत कपड्यांची अदलाबदल केली. मेंढपाळाचे कपडे घालून या अनोळखी व्यक्‍तीने मेंढरांना हाक मारली पण त्यांनी त्याला कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्याचा आवाज त्यांच्या ओळखीचा नव्हता. पण मेंढपाळाने त्यांना हाक मारताच, तो वेगळ्या कपड्यांमध्ये असूनही, मेंढरे लगेच आली. तर, एखादी व्यक्‍ती कदाचित मेंढपाळासारखी दिसेल, पण केवळ यावरून मेंढरे त्याला आपला खरा मेंढपाळ मानत नाहीत. एका अर्थाने ही मेंढरे हाक मारणाऱ्‍याच्या आवाजाची परीक्षा करतात आणि त्याची तुलना मेंढपाळाच्या आवाजाशी करतात. देवाचे वचन आपल्यालाही हेच करण्यास सांगते: “प्रेरित वचने देवापासून आहेत किंवा नाहीत ह्‍याविषयी त्यांची परीक्षा करा.” (१ योहान ४:१, NW; २ तीमथ्य १:१३) असे करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१७. (अ) आपण यहोवाच्या वाणीशी परिचित कसे होऊ शकतो? (ब) यहोवाचे ज्ञान आपल्याला काय करण्यास मदत करते?

१७ साहजिकच, आपण यहोवाचा आवाज किंवा त्याचा संदेश जितक्या चांगल्याप्रकारे ओळखू, तितक्याच स्पष्टपणे आपल्याला कोणत्याही परक्याचा आवाज ओळखता येईल. हे ज्ञान आपण कशाप्रकारे विकसित करू शकतो याकडे बायबल आपले लक्ष वेधते. “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.” (यशया ३०:२१) आपल्या मागून येणारी ती “वाणी” देवाच्या वचनातून येते. जेव्हाजेव्हा आपण देवाचे वचन वाचतो तेव्हा तेव्हा जणू आपला थोर मेंढपाळ यहोवा याचा आवाज आपण ऐकत असतो. (स्तोत्र २३:१) त्याअर्थी, आपण बायबलचा जितका अधिक अभ्यास करू तितकेच आपण देवाच्या वाणीशी अधिक परिचित होऊ. हे सखोल ज्ञान आपल्याला परक्यांचा आवाज लगेच ओळखण्यास मदत करते.—गलतीकर १:८.

१८. (अ) यहोवाची वाणी ओळखणे यात कशाचा समावेश आहे? (ब) मत्तय १७:५ यानुसार आपण येशूची वाणी ऐकून त्यानुसार का वागले पाहिजे?

१८ यहोवाची वाणी ओळखण्यात आणखी कशाचा समावेश आहे? ऐकण्याव्यतिरिक्‍त त्याचा संबंध आज्ञापालनाशीही आहे. यशया ३०:२१ याकडे पुन्हा लक्ष द्या. देवाचे वचन आपल्याला सांगते: “हाच मार्ग आहे.” होय बायबलच्या अभ्यासातून आपल्याला यहोवाचे निर्देश ऐकण्यास मिळतात. पण “हाच मार्ग आहे” हे सांगण्यासोबत तो आपल्याला आज्ञा करतो: “याने चला.” आपण जे ऐकतो त्यानुसार आपण वागावे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. शिकलेल्या गोष्टींचे अनुसरण केल्याने आपण दाखवतो की आपण यहोवाची वाणी केवळ वरवर ऐकली नाही तर लक्षपूर्वक ऐकली आहे. (अनुवाद २८:१) यहोवाची वाणी ऐकून त्याचे आज्ञापालन करण्यात येशूची वाणी ऐकणे हे देखील समाविष्ट आहे कारण स्वतः यहोवाने आपल्याला असे करण्यास सांगितले आहे. (मत्तय १७:५) उत्तम मेंढपाळ येशू आपल्याला काय करण्यास सांगतो? तो आपल्याला शिष्य बनवण्यास व ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासावर’ पूर्ण भरवसा ठेवण्यास शिकवतो. (मत्तय २४:४५; २८:१८-२०) त्याची वाणी ऐकून त्यानुसार वागण्यावरच आपले सार्वकालिक जीवन अवलंबून आहे.—प्रेषितांची कृत्ये ३:२३.

“ती त्याच्यापासून पळतील”

१९. परक्यांच्या वाणीला आपली प्रतिक्रिया कशी असावी?

१९ मग आपण परक्यांच्या वाणीला कशी प्रतिक्रिया दाखवावी? मेंढरे देतात तसाच. येशू म्हणतो: “ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील.” (योहान १०:५) आपल्या प्रतिसादात दोन गोष्टींचा समावेश होतो. पहिले म्हणजे आपण “परक्याच्या मागे कधीच जाणार नाही.” होय परक्याला आपण पूर्ण निर्धाराने झिडकारतो. बायबल ज्या ग्रीक भाषेत लिहिण्यात आले होते, त्यात “कधीच” असे भाषांतर केलेले मूळ शब्द त्या भाषेत नकार व्यक्‍त करण्याचे सर्वात प्रभावशाली शब्द होते. दुसरे म्हणजे आपण परक्यापासून ‘पळू’ किंवा त्याकडे पाठ फिरवू. उत्तम मेंढपाळाच्या वाणीशी सुसंगत नसणाऱ्‍या शिकवणुकींना बढावा देणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीला आपण असाच प्रतिसाद दिला पाहिजे.

२०. आपण (अ) बहकवू इच्छिणारे धर्मत्यागी, (ब) हानीकारक सोबती, (क) प्रसार माध्यमांतील पूर्वग्रहदूषित वृत्ते यांच्या संपर्कात आल्यास कसा प्रतिसाद द्यावा?

२० म्हणूनच, धर्मत्यागी विचार व्यक्‍त करणाऱ्‍यांशी सामना झाल्यास आपण देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे करू इच्छितो: “तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरूद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.” (तिरपे वळण आमचे.) (रोमकर १६:१७; तीत ३:१०) त्याचप्रकारे हानीकारक संगतीचा धोका असलेले ख्रिस्ती तरुण पौलाने तरुण तीमथ्याला दिलेल्या सल्ल्याचे पालन करू इच्छितात: “तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ.” तसेच, प्रसार माध्यमांतून आपल्यावर खोटे आरोप केले जातात तेव्हा आपण पौलाने तीमथ्याला दिलेला आणखी एक सल्ला आठवणीत ठेवू: “ते [परक्यांची वाणी ऐकणारे] कल्पित कहाण्यांकडे वळतील . . . तू तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस.” (तिरपे वळण आमचे.) (२ तीमथ्य २:२२; ४:३-५) परक्यांचा आवाज कितीही लाघवी वाटला तरीसुद्धा आपला विश्‍वास ज्यामुळे भंग होऊ शकतो अशा सर्व गोष्टींपासून आपण दूरच राहू.—स्तोत्र २६:५; नीतिसूत्रे ७:५, २१; प्रकटीकरण १८:२,.

२१. परक्यांच्या वाणीचा धिक्कार करणाऱ्‍यांना कोणता आशीर्वाद प्राप्त होईल?

२१ परक्यांच्या वाणीचा धिक्कार केल्यामुळे आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती लूक १२:३२ येथे सापडणाऱ्‍या उत्तम मेंढपाळाच्या शब्दांना प्रतिसाद देतात. तेथे येशूने त्यांना म्हटले: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” त्याचप्रमाणे “दुसरी मेंढरे” देखील येशूच्या पुढील शब्दांच्या पूर्णतेची आतुरतेने वाट पाहतात: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” (योहान १०:१६; मत्तय २५:३४) ‘परक्यांच्या वाणीचा’ धिक्कार केल्यास किती अद्‌भुत आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल!

तुम्हाला आठवते का?

• येशूने दिलेल्या मेंढवाड्याच्या दृष्टान्तात उल्लेख केलेल्या परक्याचे वर्णन सैतानाशी कशाप्रकारे जुळते?

• आज परक्यांची वाणी कोणकोणत्या माध्यमांनी ऐकू येते?

• आपण परक्यांची वाणी कशी ओळखू शकतो?

• परक्यांच्या वाणीला आपली प्रतिक्रिया कशी असावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

मरीयेने ख्रिस्ताला ओळखले

[१६ पानांवरील चित्र]

परका मेंढरांकडे सरळ येत नाही

[१८ पानांवरील चित्र]

परक्यांच्या वाणीला आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो?