व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

प्रकटीकरण पुस्तकातील १,४४,००० हा आकडा लाक्षणिक नव्हे तर शब्दशः आहे असे यहोवाचे साक्षीदार का समजतात?

प्रेषित योहानाने लिहिले: “ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; . . . एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.” (प्रकटीकरण ७:४) बायबलमध्ये “ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला” हा वाक्यांश, पृथ्वीवर येणाऱ्‍या परादीसवर स्वर्गातून ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यासाठी मानवजातीतून निवडलेल्या लोकांच्या एका गटाला सूचित होतो. (२ करिंथकर १:२१, २२; प्रकटीकरण ५:९, १०; २०:६) या गटाची १,४४,००० ही संख्या अनेक कारणांसाठी शब्दशः समजली जाते. एक कारण, प्रकटीकरण ७:४ च्या आसपासच्या वचनांमध्ये मिळते.

प्रेषित योहानाला दृष्टान्तात १,४४,००० जणांच्या गटाविषयी सांगितल्यानंतर त्याने आणखी एक गट पाहिला. हा दुसरा गट “मोठा लोकसमुदाय” आहे जो, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा,” आहे. हा मोठा लोकसमुदाय, सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करणाऱ्‍या “मोठ्या संकटातून” बचावलेल्यांना सूचित करतो. (तिरपे वळण आमचे.)—प्रकटीकरण ७:९, १४.

परंतु, प्रकटीकरण पुस्तकाच्या सातव्या अध्यायाच्या चवथ्या आणि नवव्या वचनात योहान एक फरक दाखवतो, याची नोंद घ्या. तो म्हणतो, की “ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला” आहे तो पहिला गट सीमित संख्येचा आहे. परंतु, दुसरा गट अर्थात “मोठा लोकसमुदाय” असीमित संख्येचा आहे. हे लक्षात घेतल्यास, १,४४,००० ही संख्या शब्दशः अर्थाने घेणे तर्काला पटणारे आहे. १,४४,००० ही लाक्षणिक संख्या असती व ती अगणित संख्येच्या लोकांच्या गटाला सूचित करणारी असती तर या दोन वचनातील फरक उठून दिसला नसता. यास्तव, संदर्भावरून हे स्पष्टपणे सूचित होते, की १,४४,००० ही संख्या शब्दशः अर्थाने घेतली पाहिजे.

गतकाळांतील आणि आजचे विविध बायबल विद्वान याच निष्कर्षावर पोहंचले आहेत, की ही संख्या शब्दशः आहे. उदाहरणार्थ, प्रकटीकरण ७:४, ९ वर विवेचन मांडताना ब्रिटिश शब्दकोशकार डॉ. एथेलबर्ट डब्ल्यू. बुलींगर यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी असे म्हटले: “हे अगदी सरळसोपे विधान आहे: एकाच अध्यायात दोन संख्यांमधील फरक दाखवण्यात आला आहे, एक सीमित संख्या आणि एक असीमित संख्या.” (दी ॲपोकॅलिप्स ऑर “द डे ऑफ द लॉर्ड,” पृष्ठ २८२) अगदी अलीकडे, संयुक्‍त संस्थानातील द मास्टर्स सेमिनरी येथील नव्या कराराचे प्राध्यापक रॉबर्ट एल. थॉमस जुनियर, यांनी असे लिहिले: “१,४४,००० या संख्येला लाक्षणिक समजण्यासाठी ठोस आधार नाही.” ते पुढे म्हणाले: “असीमित संख्येच्या [७:९] तुलनेत ही संख्या [७:४] सीमित आहे. जर १,४४,००० ही संख्या लाक्षणिक आहे तर प्रकटीकरण पुस्तकातील कोणतीच संख्या शब्दशः असू शकत नाहीत.”—रेव्हलेशन: ॲन एक्सेजेटिकल कॉमेंट्री, खंड १, पृष्ठ ४७४.

काहींचे असे मत आहे, की प्रकटीकरण पुस्तकात बहुतेक लाक्षणिक भाषा वापरल्यामुळे या पुस्तकातील सर्व संख्या आणि १,४४,००० ही संख्या देखील लाक्षणिक असावी. (प्रकटीकरण १:१, ४; २:१०) परंतु, हा निष्कर्ष निश्‍चितच बरोबर नाही. हे खरे आहे, की प्रकटीकरण पुस्तकात अनेक लाक्षणिक आकडे आहेत परंतु त्यात शब्दशः आकडे देखील आहेत. जसे की, योहान ‘कोकऱ्‍याच्या बारा प्रेषितांच्या बारा नावांविषयी’ बोलतो. (प्रकटीकरण २१:१४) या वचनातील १२ हा आकडा लाक्षणिक नव्हे तर शब्दशः आहे. पुढे, प्रेषित योहान ख्रिस्ताच्या हजार वर्ष राजवटीविषयी देखील लिहितो. बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर समजते, की हा आकडा देखील शब्दशः आहे. * (प्रकटीकरण २०:३, ५-७) यास्तव, प्रकटीकरण पुस्तकातील आकडा शब्दशः अर्थाने समजायचा की लाक्षणिक ते, वचनाच्या मागच्या पुढच्या संदर्भावर अवलंबून आहे.

तेव्हा, १,४४,००० हा आकडा शब्दशः समजावा आणि ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ तुलनेत तो सीमित संख्येच्या लोकांच्या गटाला सूचित करतो हे, बायबलमधील इतर उताऱ्‍यांशी देखील जुळते. जसे की, योहानाला नंतर झालेल्या दृष्टान्तात, १,४४,००० जण, “प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत,” असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १४:१,) “प्रथमफळ” हा शब्द मानवजातीतून निवडून घेतलेल्या एका लहानशा गटाला सूचित करतो. तसेच, येशू पृथ्वीवर होता तेव्हा तो त्याच्याबरोबर स्वर्गीय राज्यात राज्य करणाऱ्‍यांविषयी बोलला व त्यांना त्याने ‘लहान कळप’ असे संबोधले. (तिरपे वळण आमचे.) (लूक १२:३२; २२:२९) होय, मानवजातीपैकी स्वर्गात राज्य करणाऱ्‍यांची संख्या, पृथ्वीवर येणाऱ्‍या परादीसमध्ये राहणाऱ्‍या मानवजातीच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे.

यास्तव, प्रकटीकरण ७:४ च्या संदर्भानुसार आणि बायबलमध्ये इतरत्र वरील परिच्छेदाशी संबंधित असलेल्या विधानांनुसार, १,४४,००० हा आकडा शब्दशः समजला पाहिजे. यहोवा देवाची उपासना करणाऱ्‍या एका मोठ्या व असीमित संख्येच्या लोकांनी भरणाऱ्‍या परादीस पृथ्वीवर ख्रिस्तासोबत स्वर्गातून राज्य करणाऱ्‍यांना हा आकडा सूचित करतो.—स्तोत्र ३७:२९.

[तळटीप]

^ परि. 7 ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीविषयी अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पृष्ठ २८९-९० पाहा.

[३१ पानांवरील संक्षिप्त आशय]

स्वर्गीय वारसांचा १,४४,००० हा आकडा सीमित आहे

[३१ पानांवरील चित्र]

“मोठा लोकसमुदाय” असीमित आहे

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

तारा: Courtesy of Anglo-Australian Observatory, photograph by David Malin