व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘विसरलेल्या बळींची’ आठवण

‘विसरलेल्या बळींची’ आठवण

राज्य घोषकांचा वृत्तान्त

‘विसरलेल्या बळींची’ आठवण

हायगज हा १५ वर्षीय यहोवाचा साक्षीदार २००१ सालच्या सुरवातीला स्वीत्झर्लंड येथील बर्नमध्ये भरवलेल्या “विसरलेले बळी” नावाचे प्रदर्शन पाहायला गेला; नात्सींनी केलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या छळाविषयी हे प्रदर्शन होते. प्रदर्शनाच्या शेवटी हायगज म्हणाला: “नात्सी शासनात यहोवाच्या साक्षीदारांनी अमानुष व क्रूर छळ सहन केला होता याविषयी मी फक्‍त ऐकलं होतं परंतु आता पहिल्यांदा मी त्या वेळचे खरे लेख आणि फोटो पाहिले. प्रदर्शनातील लेख, हा छळ ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला होता त्यांनी दिलेली माहिती आणि इतिहासकारांची विधाने या सर्वांचा माझ्या मनावर व अंतःकरणावर खोल प्रभाव पडला.”

यानंतर काही दिवसांनी, हायगजला उच्च शाळेत आपल्या वर्गासाठी एक लेख लिहिण्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने “यहोवाचे साक्षीदार—नात्सी शासनातील विसरलेले बळी” हा विषय निवडला. त्याच्या शिक्षकाने या विषयावर लेख लिहिण्यास त्याला परवानगी दिली परंतु त्याला म्हटले की त्याने आपल्या लेखात लौकिक प्रकाशनांतील उताऱ्‍यांचा देखील समावेश केला पाहिजे. हायगजने हे आनंदाने मान्य केले. तो म्हणतो: “मी ज्यांची उजळणी केली होती अशा नात्सी युगातील यहोवाच्या साक्षीदारांविषयीच्या काही पुस्तकांची संक्षिप्त माहिती दिली. ‘विसरलेले बळी’ प्रदर्शन पाहिल्यावर माझ्या मनावर कोणती छाप पडली होती याविषयीचे वर्णन देखील मी दिले. ४३ पानांच्या लेखात उदाहरणे आणि फोटो देखील होते.”

नोव्हेंबर २००२ मध्ये, हायगजने हा लेख आपल्या शाळासोबत्यांना, शिक्षकांना, कुटुंबाला आणि मित्रांना दाखवला. नंतर, यावर एक प्रश्‍नोत्तर कार्यक्रम होता ज्यामुळे हायगजला आपल्या बायबल आधारित विश्‍वासांचे स्पष्टीकरण देण्याची संधी मिळाली. श्रोत्यांमधील एका मुलीने त्याला जेव्हा असे विचारले, की त्याने हा विषय का निवडला होता तेव्हा हायगज म्हणाला, मी हा विषय यासाठी निवडला कारण पुष्कळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांविषयी काहीच सांगण्यात आलेले नाही; आणि दुसरे कारण म्हणजे, साक्षीदारांनी किती धैर्याने आपल्या ख्रिस्ती विश्‍वासाचे समर्थन केले होते हे लोकांना समजले पाहिजे. याचा परिणाम काय झाला?

हायगज म्हणतो: “माझ्या शाळासोबत्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. गट या नात्यानं यहोवाच्या साक्षीदारांचा क्रूर छळ करण्यात आला होता हे त्यांना माहीत नव्हतं. शिवाय, पुष्कळांना हेही माहीत नव्हतं, की नात्सी छळछावण्यांत असलेल्या साक्षीदारांना एक खास ओळखचिन्ह—जांभळं त्रिकोण धारण करावं लागायचं.”

यानंतर हायगजला आपल्या वर्गमित्रांबरोबर बोलण्याच्या आणि रक्‍त संक्रमण, मद्य, नैतिकता यांविषयी साक्षीदारांच्या बायबल आधारित भूमिकेची चर्चा करायच्या अनेक संधी मिळू लागल्या. तो म्हणतो: “माझ्या एकाही शाळासोबत्यानं माझी थट्टा केली नाही.” शिवाय, त्याचा लेख शाळेच्या लायब्ररीत ठेवण्यात आला आहे. यामुळे ही खात्री मिळते, की यहोवाच्या साक्षीदारांची धैर्यशील भूमिका विसरली जाणार नाही.