व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुखाच्या शोधात

सुखाच्या शोधात

सुखाच्या शोधात

“माणूस कशामुळे सुखी होऊ शकतो?” हा प्रश्‍न काही वर्षांआधी, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि संयुक्‍त संस्थानांत घेतलेल्या एका जनमतात लोकांना विचारण्यात आला. मुलाखत घेतलेल्यांपैकी ८९ टक्के लोकांनी उत्तर दिले की त्यासाठी निरोगी असणे आवश्‍यक आहे; ७९ टक्क्यांचे उत्तर होते समाधानदायक वैवाहिक जीवन अथवा नातेसंबंध; ६२ टक्के म्हणाले की आईवडील होण्याचे सुख सर्वात मोठे तर ५१ टक्के लोकांनी व्यवसायात यशस्वी होणे हे सुखी होण्याचे रहस्य असल्याचे सांगितले. आणि पैसा देऊन सुख विकत घेता येत नाही असे एरवी म्हटले जात असले तरीसुद्धा, सदर जनमतात ४७ टक्के लोकांनी ठामपणे सांगितले की पैसा असला तरच माणूस सुखी होऊ शकतो. वस्तुस्थिती यास दुजोरा देते का?

प्रथम आपण पैसा आणि सुख यातील तथाकथित संबंधावर एक नजर टाकू. संयुक्‍त संस्थानांतील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतून १०० व्यक्‍तींचा अभ्यास करण्यात आला तेव्हा, सर्वसामान्य लोकांपेक्षा ते काही जास्त सुखी असल्याचे आढळले नाही. शिवाय, संयुक्‍त संस्थानांत मागील तीन दशकांत बऱ्‍याच लोकांजवळील भौतिक संपत्ती जवळजवळ दुप्पट झाली असली तरीसुद्धा, मानसिक आरोग्य तज्ज्ञांनुसार हे लोक पूर्वी होते त्यापेक्षा जास्त सुखी झालेले नाहीत. किंबहुना, एका रिपोर्टनुसार: “याच काळादरम्यान डिप्रेशनचे (नैराश्‍याचा मनोरोग) प्रमाण कमालीचे वाढले. १३-१९ वयोगटातील मुलामुलींतील आत्महत्येचे प्रमाण तिप्पट झाले. घटस्फोटांचे प्रमाण दुप्पट झाले.” जवळजवळ ५० वेगवेगळ्या देशांत, पैसा व माणसाचे सुख यातील संबंधाचा अभ्यास करणाऱ्‍या तज्ज्ञांनी शेवटी असाच निर्वाळा दिला की पैशाने सुख विकत घेत येत नाही.

बरे, मग उत्तम आरोग्य, समाधानदायक वैवाहिक जीवन किंवा यशस्वी व्यवसाय यांसारख्या गोष्टी सुखी होण्याकरता कितपत महत्त्वाच्या आहेत? विचार करा, जर या वरील गोष्टी सुखी होण्याकरता अनिवार्य असतील, तर मग ज्यांच्याकडे उत्तम आरोग्य किंवा सुखी वैवाहिक जीवन नाही अशा कोट्यवधी लोकांचे काय? ज्या विवाहित जोडप्यांना अपत्य नाही शिवाय ज्या स्त्रीपुरुषांना व्यवसायात उल्लेखनीय यश लाभलेले नाही अशांविषयी काय? यांना जीवनात कधी सुख मिळणारच नाही का? शिवाय, ज्यांना सध्या उत्तम आरोग्य व समाधानदायी वैवाहिक जीवन लाभले आहे त्यांच्या परिस्थितीत बदल झाल्यास त्यांचे हे सुख संपुष्टात येणार नाही का?

सुखाचा शोध आपण चुकीच्या ठिकाणी तर घेत नाही ना?

जीवनात सुख किंवा आनंद कोणाला नकोय? मनुष्याच्या निर्माणकर्त्यालाच “आनंदी देव” म्हणण्यात आले आहे आणि माणसाला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. (१ तीमथ्य १:११, NW; उत्पत्ति १:२६, २७) तेव्हा, मनुष्य सुखाचा शोध घेतो, आनंदी राहू इच्छितो यात काही नवल नाही. पण बऱ्‍याच लोकांचा असा अनुभव आहे, की सुख वाळूसारखे असते—मुठीत धरून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी निसटून जाते.

पण, काही लोक सुखाचा शोध घेण्याकरता अगदी टोकाला जातात. याच मताचे प्रतिपादन करताना, एरिक हॉफर या तत्त्ववेत्त्याने म्हटले: “सुखाचा शोध हेच माणसाच्या दुःखाचे मुख्य कारण आहे.” आपण चुकीच्या ठिकाणी सुखाचा शोध घेतल्यास हे नक्कीच खरे ठरेल. चुकीच्या गोष्टींतून सुख मिळवण्याचा प्रयत्न केल्यास, निराशा व वैफल्य हेच आपल्या पदरी पडेल. उदाहरणार्थ, श्रीमंत होण्याचा प्रयत्न, प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळवण्याचा ध्यास; राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक ध्येयांचा पाठपुरावा; किंवा केवळ स्वार्थासाठी व त्वरित इच्छातृप्तीसाठी जगणे यांपैकी कोणत्याही मार्गाने आपल्याला सुख मिळू शकत नाही. म्हणूनच, बरेचजण एका लेखकाच्या या उपरोधात्मक मताशी सहमत होतात की “सुखी होण्याचा प्रयत्न सोडून दिला तर माणूस मजेत जगू शकतो!”

एक लक्ष देण्याजोगी गोष्ट अशी, की या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या जनमतानुसार, १० पैकी ४ लोकांनी म्हटले की इतरांचे भले केल्याने व त्यांना मदत केल्याने माणूस स्वतः सुखी होऊ शकतो. आणि प्रत्येक ४ जणांपैकी १ जणाने आनंदी होण्याकरता धार्मिक विश्‍वासाची व श्रद्धेची भूमिका असल्याचे सांगितले. तेव्हा, माणूस कशामुळे खरोखर सुखी होऊ शकतो याविषयी आणखी सखोल विचार करण्याची गरज आहे. पुढील लेख आपल्याला असे करण्यास मदत करेल.

[३ पानांवरील चित्रे]

पैसा, समाधानी कौटुंबिक जीवन, किंवा व्यावसायिक यशामुळे माणूस सुखी होऊ शकतो असे अनेकांना वाटते. तुमचे काय मत आहे?