सुखी होणे शेवटी कशावर अवलंबून आहे
सुखी होणे शेवटी कशावर अवलंबून आहे
“धन्यवादित देव” यहोवा आणि “धन्य व एकच अधिपती” येशू ख्रिस्त, हे जाणतात की सुखी होणे हे कशावर अवलंबून आहे. (१ तीमथ्य १:११; ६:१५) त्यामुळे, देवाचे वचन बायबल, यातच सुखी होण्याचा मार्ग सांगितलेला आहे यात नवल नाही.—प्रकटीकरण १:३; २२:७.
सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात येशूने सुखी होणे हे कशावर अवलंबून आहे याचे वर्णन केले. तो कशाप्रकारच्या लोकांचे वर्णन “धन्य” अथवा सुखी असे करतो? तर जे (१) आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी जागरूक आहेत, (२) जे शोक करीत आहेत, (३) जे सौम्य आहेत, (४) जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले आहेत, (५) जे दयाळू आहेत, (६) जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, (७) जे शांती करणारे आहेत, (८) नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे, आणि (९) ख्रिस्तामुळे ज्यांची निंदा व छळ केला जातो ते लोक धन्य किंवा सुखी आहेत असे त्याने म्हटले.—मत्तय ५:३-११, NW *
येशूच्या विधानांत तथ्य आहे का?
येशूच्या विधानांपैकी काही अगदी उघडपणे पटण्याजोगी
आहेत. सौम्य, दयाळू, शांतिप्रिय आणि शुद्ध अंतःकरणाची माणसे ही क्रोधिष्ट, भांडखोर, निर्दय माणसांपेक्षा जास्त सुखी असतात हे कोण नाकारेल?पण जे लोक नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले आहेत किंवा जे शोक करतात त्यांना सुखी कसे म्हणता येईल, असा कदाचित आपण विचार करू. पण खरे पाहता, अशा व्यक्तींचा जगातील परिस्थितीविषयी वास्तववादी दृष्टिकोन असतो. आपल्या या काळात ‘होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे ते उसासे टाकून विलाप करतात.’ (यहेज्केल ९:४) अर्थात, यामुळे त्यांना सुखी म्हणता येणार नाही. पण जेव्हा त्यांना या पृथ्वीवर नीतिमत्वाची परिस्थिती आणण्याच्या व दीनदुबळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या देवाच्या उद्देशाविषयी समजते तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो.—यशया ११:४.
योग्य काय ते कळत असूनही जेव्हा जीवनात वारंवार आपल्या हातून उलटच घडते, तेव्हा देखील नीतिमत्त्वावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती शोक करतात. या व्यक्ती आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक असतात. मार्गदर्शनाकरता अशा व्यक्ती देवाकडे वळण्यास तयार असतात कारण केवळ तोच आपल्याला आपल्या स्वभावातील त्रुटींवर मात करण्यास मदत करू शकतो याची त्यांना जाणीव असते.—नीतिसूत्रे १६:३, ९; २०:२४.
जे लोक शोक करतात, जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले आहेत आणि जे आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक आहेत, ते निर्माणकर्त्यासोबत चांगला नातेसंबंध राखण्याचे महत्त्व जाणतात. इतर मानवांसोबत चांगले संबंध असल्यास आपल्या आनंदात भर पडते, पण देवासोबत उत्तम नातेसंबंध असल्यास माणूस यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुखी होऊ शकतो. होय, जे चांगले आहे त्याविषयी प्रेम बाळगणाऱ्या व देवाचे मार्गदर्शन स्वीकारण्यास तयार असणाऱ्या विचारी लोकांना खरोखर सुखी म्हणता येईल.
पण ज्याचा छळ केला जातो व ज्याची निंदा केली जाते अशी व्यक्ती तर सुखी असूच शकत नाही असे आपल्याला वाटेल. पण स्वतः येशूने असे म्हटले, त्यामुळे ते नक्कीच खरे असावे. मग त्याच्या शब्दांचा काय अर्थ असू शकतो?
छळ होत असूनही आनंदी—हे कसे शक्य आहे?
लक्षात घ्या, की निंदा व छळ होत असल्यामुळे एक व्यक्ती आनंदी होते असे येशूने म्हटले नाही. तर त्याने एक अट दिली: “नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, . . . माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील . . . तेव्हा तुम्ही धन्य” असे त्याने म्हटले. (मत्तय ५:१०, ११) तेव्हा, ख्रिस्ताचा अनुयायी असल्यामुळे व त्याने शिकवलेल्या नीतिमान तत्त्वांनुसार जगत असल्यामुळे जेव्हा एका व्यक्तीला निंदानालस्ती व छळ सहन करावा लागतो तेव्हा ती व्यक्ती आनंदी आहे असे म्हणता येते.
आरंभीच्या ख्रिश्चनांच्या अनुभवावरून हे स्पष्ट होते. सन्हेद्रिन अर्थात, यहुदी उच्च न्यायालयाच्या सदस्यांनी “प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.” यावर प्रेषितांची काय प्रतिक्रिया होती? “ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले; आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये ५:४०-४२; १३:५०-५२.
निंदा व आनंद यातील संबंधावर प्रेषित पेत्रानेही अधिक प्रकाश टाकला. त्याने लिहिले: “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.” (१ पेत्र ४:१४) होय, एक ख्रिस्ती या नात्याने योग्य ते करण्याबद्दल जेव्हा दुःख सहन करावे लागते तेव्हा हा अनुभव अर्थातच कोणालाही हवाहवासा वाटत नाही; पण आपल्याला देवाचा पवित्र आत्मा मिळाला आहे हे जाणून एक व्यक्ती आनंदी होऊ शकते. देवाच्या आत्म्याचा आनंदाशी संबंध आहे का?
देहाची कर्मे की आत्म्याची फळे?
देवाचा पवित्र आत्मा केवळ अशाच व्यक्तींवर राहतो, की जे देवाला आपला नियंता मानून त्याच्या आज्ञा पाळतात. (प्रेषितांची कृत्ये ५:३२) जे “देहाची कर्मे” करतात अशांना यहोवा आपला आत्मा देत नाही. ही कर्मे म्हणजे, “जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी.” (गलतीकर ५:१९-२१) आजच्या जगात “देहाची कर्मे” सर्वत्र आढळतात हे खरे आहे. पण जे ही कर्मे करतात त्यांना खरे आणि कायमस्वरूपी सुख मिळत नाही. उलट अशा कर्मांमुळे नातेवाईक, स्नेही आणि परिचितांशी त्यांचे चांगले संबंध बिघडतात. शिवाय, देवाचे वचन सांगते की “अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”
या उलट, जे “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ,” प्रदर्शित करतात अशांना देव आपला आत्मा देतो. या फळात ज्या गुणांचा समावेश आहे ते म्हणजे, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.” (गलतीकर ५:२२, २३) आपण हे गुण प्रदर्शित करतो तेव्हा इतरांसोबत व देवासोबत शांतीपूर्ण नातेसंबंधांकरता पोषक असे वातावरण आपण तयार करतो आणि यामुळे खरा आनंद प्राप्त होतो. (चौकट पाहा.) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रीती, दयाळूपणा, चांगुलपणा, आणि देवाला प्रिय असणारे इतर गुण दाखवल्यामुळे आपण यहोवाला आनंदित करतो आणि देवाच्या नीतिमान नव्या जगात सार्वकालिक जीवनाची आनंदी आशा आपल्याला प्राप्त होते.
सुखाचा मार्ग निवडणे आपल्या हातात
जर्मनीत राहणारे वोल्फगँग आणि ब्रीगिट नावाचे एक जोडपे प्रामाणिकपणे बायबलचा अभ्यास करू लागले. जीवनात सुखी होण्याकरता ज्या वस्तू आपल्याजवळ असाव्यात असे बरेच लोकांना वाटते त्या जवळजवळ सर्व वस्तू या जोडप्याजवळ होत्या. ते तरुण आणि निरोगी होते. ते महागडे कपडे घालायचे, आलिशान घरात राहायचे आणि व्यवसायातही ते अतिशय यशस्वी होते. त्यांचा बहुतेक वेळ हा आणखी नवनवीन भौतिक वस्तू मिळवण्यातच खर्च होत असे; पण एवढे सर्व असूनही ते खऱ्या अर्थाने सुखी नव्हते. पण कालांतराने वोल्फगँग व ब्रीगिट यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ते आध्यात्मिक ध्येये साध्य करण्याकरता अधिक वेळ व शक्ती खर्च करू लागले आणि यहोवाशी घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याचे मार्ग शोधू लागले. हा मार्ग निवडल्यानंतर आपोआपच त्यांची मनोवृत्ती बदलू लागली आणि यामुळे त्यांनी अधिक साधेपणाने जगता यावे म्हणून आपल्या राहणीमानात काही फेरबदल केले आणि पायनियर, अर्थात पूर्ण वेळेचे राज्य प्रचारक म्हणून सेवा करू लागले. आज ते जर्मनी येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहेत. शिवाय, देवाचे वचन बायबल यातील सत्य परदेशाहून आलेल्या लोकांना शिकवता यावे म्हणून ते एक आशियाई भाषा देखील शिकून घेत आहेत.
या जोडप्याला खरे सुख प्राप्त झाले का? वोल्फगँग सांगतात: “आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ लागल्यापासून आम्ही अधिक सुखी झालो आणि आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक समाधान प्राप्त झाले. यहोवाची मनापासून सेवा केल्यामुळे आमचा वैवाहिक संबंधही दृढ झाला आहे. पूर्वी देखील वैवाहिक जीवनात आम्ही सुखी होतो पण दोघांच्या
वेगवेगळ्या कर्तव्यांमुळे व कामांमुळे आम्हाला वेगवेगळ्या दिशेने जाणे भाग होते. पण आता आम्ही दोघांनीही स्वतःला एकाच ध्येयाकरता वाहून घेतले आहे.”सुखी होणे शेवटी कशावर अवलंबून आहे?
थोडक्यात सांगायचे झाल्यास: “देहाची कर्मे” टाळा आणि “[देवाच्या] आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ,” उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. सुखी होण्याकरता देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याची मनःपूर्वक ओढ असणे आवश्यक आहे. जी व्यक्ती असे करण्याचा प्रयत्न करते ती येशूने वर्णन केल्याप्रमाणे धन्य किंवा सुखी होईल.
तेव्हा, आपण जीवनात कधी सुखी होऊच शकत नाहीत असा चुकीचा निष्कर्ष कधीही काढू नका. कदाचित सध्या तुमचे आरोग्य तुम्हाला साथ देत नसेल, किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात कदाचित समस्या असतील. कदाचित, संततिसुख प्राप्त करण्याचे तुमचे वय निघून गेले असेल किंवा यशस्वी व्यवसाय स्थापित करण्यासाठी तुम्ही झगडत असाल. कदाचित पूर्वी तुमच्याजवळ जितके पैसे असायचे तितके आजकाल तुम्हाला मिळत नसतील. यापैकी कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल तरीसुद्धा निराश होण्याचे कारण नाही. देवाचे राज्य या व अशा कितीतरी समस्यांचे निवारण करील. लवकरच यहोवा देव आपली प्रतिज्ञा पूर्ण करील, जी स्तोत्रकर्त्याने या शब्दांत व्यक्त केली: “तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. . . . तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१३, १६) यहोवाची ही दिलासादायक प्रतिज्ञा मनात बाळगल्यामुळे, सध्याच्या जीवनातही तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकता; या गोष्टीला जगभरातील यहोवाचे लाखो सेवक दुजोरा देतात.—प्रकटीकरण २१:३.
[तळटीप]
^ परि. 3 धन्य असण्याच्या या नऊ कारणांपैकी प्रत्येक कारणाची सुरवात मूळ ग्रीक भाषेत माकारिआई या शब्दाने केली आहे. काही भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर “धन्य” असे केले आहे. पण नवे जग भाषांतर (इंग्रजी) व टुडेज इंग्लिश व्हर्शन यात “सुखी” किंवा आनंदी असे अधिक अचूक भाषांतर केले आहे.
[६ पानांवरील चौकट/चित्र]
सौख्यानंदात भर टाकणारे गुण
प्रीती केल्यास इतरांनाही तुमच्यावर प्रीती करण्याची प्रेरणा मिळते.
आनंद तुम्हाला जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्याचे बळ देतो.
शांती तुम्हाला इतरांशी असलेल्या नातेसंबंधांतून कलह दूर करण्यास मदत करील.
सहनशीलता तुम्हाला परीक्षेत असतानाही आनंदी राहण्यास मदत करते.
ममता दाखवून वागल्यास इतरांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल.
चांगुलपणा दाखवल्यास तुम्हाला गरज असते तेव्हा इतरजणही तुमच्या मदतीला धावून येतील.
विश्वास असल्यास देव खात्रीने तुम्हाला प्रेमळ मार्गदर्शन देईल.
सौम्यता. सौम्यतेने वागल्यामुळे तुमचे मन, विचार व शरीर शांत राहू शकेल.
इंद्रियदमन दाखवल्यास, तुमच्या हातून कमी चुका घडतील.
[७ पानांवरील चित्रे]
सुखी होण्याकरता, आपल्या आध्यात्मिक गरजा तृप्त करणे गरजेचे आहे