चेस्टर बिटीच्या खजिन्यावर एक कटाक्ष
चेस्टर बिटीच्या खजिन्यावर एक कटाक्ष
“लोप पावलेल्या संस्कृतींच्या अमाप खजिन्यांचे, . . . सुरेख लहान चित्रांचे व चित्रकलांचे जतन करणारे भांडार.” या थोडक्या शब्दांत, भूतपूर्व संग्राहक आर. जे. हेयज यांनी आयर्लंड, डब्लिन येथील चेस्टर बिटी लायब्ररीचे वर्णन केले. या लायब्ररीत, असंख्य अमूल्य पुरातनवस्तू, अप्रतिम शिल्पाकृती आणि अंदाजही लावता येणार नाही इतक्या मोलाची दुर्मिळ पुस्तके व हस्तलेख आहेत. हा चेस्टर बिटी कोण होता? आणि त्याने कोणता खजिना गोळा केला?
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये १८७५ साली आल्फ्रेड चेस्टर बिटी याचा जन्म झाला; त्याचे पूर्वज स्कॉटिश, आयरीश आणि इंग्लिश होते. वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत त्याने खाण अभियंता आणि सल्लागार म्हणून बक्कळ पैसा मिळवला होता. त्याच्या संपूर्ण जीवनात त्याने बऱ्याचशा पैशातून, सुरेख व उत्कृष्ट वस्तू गोळा केल्या होत्या. १९६८ साली वयाच्या ९२ व्या वर्षी तो मरण पावला तेव्हा गोळा केलेल्या सर्व वस्तू तो आयर्लंडच्या लोकांसाठी सोडून गेला.
त्याने काय गोळा केले?
बिटीने मोठ्या प्रमाणात आणि विविध गोष्टी गोळा केल्या. पण एका वेळी केवळ एक तृतीयांश गोष्टीच प्रदर्शनात मांडल्या जातात. त्याने हजारो वर्षांपूर्वीच्या म्हणजे मध्ययुगातील, प्रबोधनकालीन युरोपमधील तसेच अनेक आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांतील अनेक विविध कालखंडाच्या आणि संस्कृतींच्या दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्टी गोळा केल्या. जसे की, जगात सर्वात उत्कृष्ट समजले जाणारे अप्रतिम जपानी ब्लॉक प्रिंट्स किंवा लाकडी ठशांचा संग्रह.
शिल्पाकृतीपासून अगदी भिन्न असलेला एक कुतूहलजनक संग्रह होता शंभरपेक्षा अधिक बॅबिलोनियन व सुमेरियन मातीच्या पाट्यांचा ज्यावर प्राचीन कीलाकार शिलालेख होता. ४,००० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी मेसोपोटामियात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या जीवनशैलीचे बारीकसारीक तपशील मातीच्या ओल्या पाट्यांवर कोरले आणि मग त्या पाट्या भाजल्या. अशाप्रकारच्या अनेक पाट्या आपल्या दिवसांपर्यंत टिकून राहिल्या आहेत; यामुळे आपल्याला लेखनकला ही जुनी प्रथा असल्याचा स्पष्ट पुरावा मिळतो.
पुस्तकांचे वेड
चेस्टर बिटीला म्हणे, सुंदर पुस्तके बनवण्यातील कलेचे खूप आकर्षण होते. त्याने हजारो लौकिक आणि धार्मिक पुस्तके आणि नाजूक नक्षीकाम केलेल्या कुराणाच्या काही प्रती गोळा केल्या. एक लेखक म्हणतो, की तो “अरेबिक लिपीच्या गणिती प्रमाणांनी आकर्षित झाला होता . . . आणि सोने, चांदी आणि इतर चमकणाऱ्या धातूंच्या पातळ पत्र्यावरील नाजूक, शोभेचे अक्षरलेखन पाहून मोहीत झाला होता.”
पूर्वीच्या शतकांत चीनमधील काही सम्राटांप्रमाणे चेस्टर बिटीलाही मर्गझ (जेड) रत्नाचे आकर्षण होते. सर्व धातूंपैकी उत्तम जेड, सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, असा या सम्राटांचा समज होता. त्यांनी निपुण कारागिरांना जेडचे गुळगुळीत, पातळ पत्रे बनवण्याची आज्ञा दिली. मग कुशल कारागीर जेडच्या या पातळ पानांवर नाजूक सुवर्ण अक्षरे आणि चित्रे कोरत असत; अशाप्रकारे त्यांनी अजोड पुस्तके तयार केली. बिटीच्या या पुस्तकांचा संग्रह सर्वश्रुत आहे.
अमूल्य बायबल हस्तलेख
बायबलप्रेमींसाठी चेस्टर बिटीची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे प्राचीन व मध्ययुगातील बायबल हस्तलेखांचा प्रचंड संग्रह. सुंदर
नक्षीकाम केलेले हे हस्तलेख, हाताने नक्कल केलेल्या परूशांच्या धीराची, त्यांच्या अंगी असलेल्या कलेची ग्वाही देतात. छापील पुस्तके, प्राचीन पुस्तकांची बांधणी करणाऱ्यांचे आणि मुद्रकांचे हुन्नर आणि कलाकुसर दाखवतात. जसे की योहानस गुटनबर्गच्या जमान्यात हयात असलेल्या ॲन्टन कोबर्गर याने १४७९ साली न्यूरेम्बर्ग येथे बिब्लिआ लॅटिना छापले आणि त्याचे वर्णन, “प्राचीन मुद्रकांपैकी सर्वात महत्त्वाचा व प्रभावी मुद्रक,” असे करण्यात आले आहे.चेस्टर बिटी संग्रहालयातील एक अनोखी वस्तू आहे इफ्राईम या सिरियन विद्वानाने लिहिलेला चवथ्या शतकातील चामड्याचा लेख. इफ्राईमने थिऑटेसॉरॉन नावाच्या दुसऱ्या शतकातील ग्रंथातून अनेक संदर्भ दिले आहेत. थिऑटेसॉरॉन याचा लेखक टेशन याने येशू ख्रिस्ताच्या जीवनाचे चार शुभवर्तमान अहवाल एकत्र करून त्यांचा एकच सुसंगत अहवाल बनवला. नंतरच्या लेखकांनी थिऑटेसॉरॉनचा संदर्भ दिला परंतु त्याची एकही प्रत टिकली नाही. १९ व्या शतकातील काही विद्वानांनी तर, हा ग्रंथ अस्तित्वात होता, यावर शंकाही व्यक्त केली. परंतु १९५६ मध्ये बिटीला टेशनच्या थिऑटेसॉरॉनवर इफ्राईमने केलेल्या भाष्याचा शोध लागला—या शोधामुळे, बायबलचा खरेपणा आणि सत्यतेच्या पुराव्याला आणखी पुष्टी मिळाली.
पपायरस हस्तलेखांचे डबोले
बिटीने धार्मिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारचे पुष्कळ पपायरस हस्तलेख देखील गोळा केले. ५० पेक्षा अधिक पपायरस कोडेक्स सा.यु. चवथ्या शतकाच्याही आधीचे आहेत. यांतील काही गुंडाळ्या, इजिप्शियन वाळवंटात शतकानुशतकांपासून कोणाच्याही लक्षात आल्या नाहीत अशा स्थितीत पडलेल्या पपायरसच्या ढिगांत सापडल्या. त्यांना विक्रीसाठी ठेवण्यात आले तेव्हा पुष्कळ दस्तऐवज अपुरे होते. व्यापारी, पपायरसच्या तुकड्यांनी भरलेली पुठ्यांची खोकी आणायचे. “जे ह्या गुंडाळ्या विकत घेऊ इच्छित होते ते फक्त खोक्यात हात घालून सर्वात जास्त लिखाण असलेली मोठी गुंडाळी उचलायचे,” असे चेस्टर बिटी लायब्ररीच्या वेस्टर्न कलेक्शन्सचे संग्राहक चार्ल्स हॉर्टन म्हणतात.
हॉर्टन पुढे म्हणाले, की बिटीला लागलेला “सर्वात खळबळजनक शोध” म्हणजे मूल्यवान बायबल कोडेक्स ज्यात “ख्रिस्ती जुन्या व नव्या कराराच्या काही सर्वात जुन्या प्रतींचा समावेश होता.” विक्रेत्यांना या कोडेक्सची खरी किंमत माहीत असती तर त्यांनी त्या फाडून वेगवेगळ्या लोकांना विकल्या असत्या. परंतु, बिटी बहुतेक कोडेक्स विकत घेऊ शकला. असे हे कोडेक्स होते तरी किती मूल्यवान? सर फ्रेडरीक केन्यन यांच्या मते, १८४४ साली टिशेनडॉर्फ याला कोडेक्स सायनायटिकसचा शोध लागल्यानंतरचा हा “सर्वात महत्त्वाचा शोध” होता.
हे कोडेक्स सा.यु. दुसऱ्या व चवथ्या शतकामधले आहेत. ग्रीक सेप्ट्युआजिंट आवृत्तीतील इब्री शास्त्रवचनांतील पुस्तकांपैकी दोन उत्पत्तीच्या प्रती आहेत. या अत्यंत मौल्यवान आहेत ‘कारण, चवथ्या शतकातील व्हॅटिकॅनस आणि सायनायटिकस’ या चामड्याच्या हस्तलेखांमध्ये उत्पत्तिचे ‘संपूर्ण पुस्तकच नाही,’ असे केन्यनचे म्हणणे आहे. तीन कोडेक्समध्ये ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पुस्तके आहेत. यांपैकी एकात चार शुभवर्तमानांची बहुतेक पुस्तके आणि प्रेषितांची कृत्ये पुस्तकाचा बराचसा भाग आहे. बिटीने नंतर मिळवलेले ज्यादा पानांच्या दुसऱ्या कोडेक्समध्ये प्रेषित पौलाच्या पत्रांची संपूर्ण प्रत आणि इब्रीकरांना त्याने लिहिलेले पत्र देखील आहे. तिसऱ्या कोडेक्समध्ये प्रकटीकरण पुस्तकाचा एक तृतीयांश भाग आहे. केन्यन यांच्या मते, या पपायरसच्या हस्तलेखांमुळे, “आता आपल्याकडे असलेल्या नव्या करारावरील आपला आधीपासूनचा भक्कम विश्वास आणखी मजबूत होण्यास ठोस पुरावा मिळाला आहे.”
चेस्टर बिटी लायब्ररीतील बायबलच्या पपायरस प्रतींवरून दिसून येते, की ख्रिश्चनांनी फार आधीपासून, कदाचित सा.यु. पहिल्या शतकाचा अंत होण्याआधीपासूनच, वापरायला जड असलेल्या गुंडाळ्यांचा वापर करण्याचे सोडून कोडेक्स किंवा पानांचे पुस्तक वापरायला सुरवात केली होती. शिवाय हेही दिसून येते, की लेखन साहित्याच्या अभावामुळे नक्कलाकार सहसा वापरलेल्या पपायरस पत्रांचा वापर करीत असत. उदाहरणार्थ, योहानाच्या शुभवर्तमानाच्या एका भागाचा एक कॉप्टिक हस्तलेख, “कदाचित ग्रीक गणित असलेल्या शालेय वहीत” लिहिण्यात आला आहे.
हे पपायरस हस्तलेख मुळीच आकर्षक नाहीत परंतु ते खूप मौल्यवान आहेत. ते ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीचे दृश्य, ठोस दुवे आहेत. “तुमच्या अगदी डोळ्यांसमोर तुम्हाला, सर्वात प्राचीन ख्रिस्ती समाजांनी वापरलेली पुस्तके पाहायला मिळतील जी त्यांच्यासाठी अत्यंत मौल्यवान होती,” असे चार्ल्स हॉर्टन म्हणतात. (नीतिसूत्रे २:४, ५) चेस्टर बिटी लायब्ररीतील हा खजिना पाहायला तुम्हाला कधी संधी मिळालीच तर तुमची खचितच निराशा होणार नाही.
[३१ पानांवरील चित्र]
कात्सुशिका होकुसाय यांचे जपानी लाकडी ठशांचे छापकाम
[३१ पानांवरील चित्र]
“बिब्लिआ लॅटिना” हे बायबलच्या छापील प्रतींपैकी सर्वात प्राचीन होते
[३१ पानांवरील चित्र]
टेशनच्या “थिऑटेसॉरॉन” यावर इफ्राईमने केलेले भाष्य, बायबलच्या खरेपणाला बळकट करते
[३१ पानांवरील चित्र]
चेस्टर बिटी P४५, या जगातल्या सर्वात जुन्या कोडेक्सच्या एकाच खंडात चार शुभवर्तमानांची बहुतेक पुस्तके आणि प्रेषितांची कृत्ये पुस्तकाचा बराचसा भाग आहे
[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]
Reproduced by kind permission of The Trustees of the Chester Beatty Library, Dublin
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
सर्व चित्रे: Reproduced by kind permission of The Trustees of the Chester Beatty Library, Dublin