व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”

“देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”

“देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”

“सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची [“संपूर्ण,” NW] शस्त्रसामग्री धारण करा.”—इफिसकर ६:११.

१, २. स्वतःच्या शब्दांत, ख्रिश्‍चनांना कोणती आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करायची आहे याचे वर्णन करा.

सा.यु. पहिल्या शतकात रोमी साम्राज्य उत्कर्षाच्या सर्वोच्च शिखरावर होते. रोमी सैन्यांच्या प्राबल्यामुळे तेव्हाच्या ज्ञात जगाच्या बव्हंशी भागावर या शहराचे वर्चस्व होते. एका इतिहासकाराने रोमी सैन्याचे वर्णन, “इतिहासातील सर्वात यशस्वी लष्करी संघटन” या शब्दांत केले. रोमच्या प्रशिक्षित सैन्यात उत्तम अनुशासन असलेले शिपाई होते ज्यांना अतिशय कठोर तालिमीतून जावे लागे; पण एक प्रभावी सैन्य या नात्याने त्यांचे यश त्यांच्या शस्त्रसामग्रीवरही अवलंबून होते. प्रेषित पौलाने रोमी सैनिकाच्या शास्त्रसामग्रीचे उदाहरण घेऊन, दियाबलाविरुद्ध यशस्वीरित्या लढण्याकरता ख्रिश्‍चनांना कोणत्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीची गरज आहे हे स्पष्ट केले.

या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीचे वर्णन इफिसकर ६:१४-१७ यात आढळते. पौलाने लिहिले: “आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्‍या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्‍वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.” शारीरिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, पौलाने वर्णन केलेली शस्त्रसामग्री रोमी सैनिकाला बऱ्‍याच प्रमाणात संरक्षण पुरवत असावी. तसेच, त्याच्याजवळ एक तलवार देखील असे, जी दुसऱ्‍या व्यक्‍तीसोबत लढण्याचे त्याचे मुख्य शस्त्र होते.

३. आपण येशू ख्रिस्ताच्या सूचनांचे पालन व त्याच्या आदर्शाचे अनुकरण का केले पाहिजे?

ही सर्व सामग्री आणि प्रशिक्षण असूनही, सैनिक आपल्या सेनापतीच्या हुकुमांचे कितपत पालन करतात यावर रोमी सैन्याचे यश अवलंबून होते. त्याचप्रकारे, ख्रिश्‍चनांनी येशू ख्रिस्ताच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे, ज्याचे वर्णन बायबलमध्ये “राष्ट्रांचा नेता” या शब्दांत केले आहे. (यशया ५५:४) तसेच, तो “मंडळीचे मस्तक” देखील आहे. (इफिसकर ५:२३) येशू आपल्याला आपल्या आध्यात्मिक लढाईविषयी सूचना देतो आणि आध्यात्मिक शस्त्रसामग्री आपण कशी धारण करावी यासंबंधी तो उत्तम आदर्श आपल्यापुढे मांडतो. (१ पेत्र २:२१) आध्यात्मिक शस्त्रसामग्री ही ख्रिस्तासमान व्यक्‍तिमत्त्वाशी बरीच मिळतीजुळती असल्यामुळे, शास्त्रवचनांत आपल्याला ख्रिस्ताच्या मनोवृत्तीरूपी “शस्त्र धारण” करण्याचा सल्ला दिला आहे. (१ पेत्र ४:१) तर मग आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील प्रत्येक शस्त्राचे परीक्षण करताना आपण येशूच्या उदाहरणावरून त्याचे महत्त्व व उपयुक्‍तता समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

कंबर, ऊर व पायांचे संरक्षण

४. सैनिकाच्या शस्त्रसामग्रीत कंबरपट्ट्याचे काय महत्त्व होते आणि यावरून काय दिसून येते?

आपली कंबर सत्याने कसा. बायबल लिहिण्यात आले त्या काळात सैनिक एक रुंद चामड्याचा कंबरपट्टा लावत. याची रुंदी ५ ते १५ सेंटीमीटर इतकी असे. हा कंबरपट्टा सैनिकाच्या कटिप्रदेशाच्या सुरक्षेसाठी होता तसेच तलवार लटकवण्यासाठीही त्याचा उपयोग होत असे. सैनिकाने कंबर कसली म्हणजे तो लढाईसाठी तयार होत आहे असे समजत. पौलाने सैनिकाच्या या कंबरपट्ट्याचे उदाहरण घेऊन, बायबलमधील सत्याचा आपल्या जीवनावर कितपत प्रभाव असला पाहिजे हे दाखवले. आपल्या जीवनाभोवती ते घट्टपणे गुंडाळलेले असले पाहिजे जेणेकरून आपण या सत्यानुरूप जगू व कोणत्याही प्रसंगी त्याचे समर्थन करू शकू. (स्तोत्र ४३:३; १ पेत्र ३:१५) म्हणूनच आपण बायबलचा मनःपूर्वक अभ्यास व त्यातील मजकुरावर मनन केले पाहिजे. देवाचे नियमशास्त्र येशूच्या “अंतर्यामी” सामावलेले होते. (स्तोत्र ४०:८) म्हणूनच विरोधकांनी प्रश्‍न विचारले तेव्हा, तो आपल्या स्मरणशक्‍तीतून शास्त्रवचने तोंडपाठ म्हणू शकला.—मत्तय १९:३-६; २२:२३-३२.

५. शास्त्रवचनांतील सल्ला आपल्याला मोह अथवा परीक्षा येतात तेव्हा कशाप्रकारे साहाय्यक ठरू शकतो हे स्पष्ट करा.

आपण बायबलमधील सत्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्यास तयार असल्यास, ते आपल्याला खोट्या युक्‍तिवादांपासून संरक्षण देऊन, उत्तम निर्णय घेण्यास समर्थ करू शकते. मोह किंवा परीक्षा आपल्यावर येतात तेव्हा बायबलमधील सूचना आपल्याला योग्य ते करण्याचा आपला निर्धार अधिक पक्का करण्यास मदत करतील. जणू आपण आपल्या महान शिक्षक यहोवाला पाहू आणि आपल्या मागून ही वाणी ऐकू, की “हाच मार्ग आहे; याने चला.”—यशया ३०:२०, २१.

६. आपल्या लाक्षणिक हृदयाला संरक्षणाची गरज का आहे आणि नीतिमत्त्वामुळे त्याचे संरक्षण कसे होऊ शकते?

नीतिमत्त्वाचे उरस्त्राण. सैनिकाचे उरस्त्राण एका महत्त्वाच्या अंगाचे, अर्थात हृदयाचे रक्षण करीत असे. आपले लाक्षणिक हृदय, अर्थात आपले आंतरिक व्यक्‍तिमत्त्व विशेषकरून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे कारण त्याचा कल वाईटाकडे आहे. (उत्पत्ति ८:२१) म्हणूनच आपण यहोवाचे नीतिमान दर्जे समजून घेण्यास व ते प्रिय मानण्यास शिकून घेतले पाहिजे. (स्तोत्र ११९:९७, १०५) नीतिमत्त्वावरील आपले प्रेम आपल्याला, यहोवाच्या सुस्पष्ट मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या व त्यात भेसळ करून त्यास सौम्य करू पाहणाऱ्‍या जगिक विचारसरणीचा धिक्कार करण्यास प्रवृत्त करेल. शिवाय जे योग्य त्यावर आपण प्रीती करतो आणि जे अयोग्य त्याचा द्वेष करतो तेव्हा आपण अशा मार्गाक्रमणापासून दूर राहतो की ज्यामुळे आपल्या जीवनाचा नाश होऊ शकेल. (स्तोत्र ११९:९९-१०१; आमोस ५:१५) याबाबतीत येशूचे उदाहरण अनुकरण करण्याजोगे आहे कारण शास्त्रवचनांत त्याच्याविषयी असे म्हटले आहे: “तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे.”—इब्री लोकांस १:९. *

७. रोमी सैनिकाला मजबूत पादत्राणांची गरज का होती आणि हे कशास सूचित करते?

शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. रोमी सैनिकांना टिकाऊ व मजबूत बुटांची किंवा पादत्राणांची गरज होती कारण लष्करी मोहिमेत कधीकधी त्यांना, जवळजवळ २७ किलो वजनाची शस्त्रसामग्री वाहून अथवा धारण करून, दिवसाला ३० किलोमीटरचे अंतर पायी चालावे लागत. तेव्हा, राज्याची सुवार्ता जो कोणी ऐकून घेऊ इच्छितो त्यांना ती सांगण्यास आपण उत्सुक असावे हे दाखवण्यासाठी पौलाने पादत्राणांचे अगदी योग्य रूपक वापरले. हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण जर आपण प्रचार करण्यास तयार व उत्सुक नसू, तर मग लोकांना यहोवाची ओळख कशी घडेल?—रोमकर १०:१३-१५.

८. सुवार्तेचा उद्‌घोषक या नात्याने आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

येशूच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते होते? त्याने रोमी सुभेदार पंतय पिलात याला सांगितले: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” ऐकून घेण्यास तयार असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीला येशू प्रचार करत असे, आणि त्याला आपले सेवाकार्य इतके आनंददायक वाटे की त्याने आपल्या शारीरिक गरजांपेक्षाही त्याला अधिक महत्त्व दिले. (योहान ४:५-३४; १८:३७) जर आपण येशूप्रमाणे उत्सुक असलो, तर आपल्याला सुवार्ता घोषित करण्यास अनेक संधी सापडतील. शिवाय, सेवाकार्यात तल्लीन राहिल्याने आपल्याला आध्यात्मिकरित्या दृढ राहण्यास मदत मिळेल.—प्रेषितांची कृत्ये १८:५.

ढाल, शिरस्त्राण व तरवार

९. मोठी ढाल कशाप्रकारे रोमी सैनिकाला संरक्षण देत होती?

विश्‍वासाची मोठी ढाल. “ढाल” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द मुळात एका मोठ्या ढालीस सूचित करत होता, जी एका व्यक्‍तीच्या सबंध शरीरास झाकत होती. ही ढाल इफिसकर ६:१६ यात सांगितल्याप्रमाणे ‘जळत्या बाणांपासून’ संरक्षण पुरवण्याकरता होती. बायबल काळात, सैनिक सहसा विशिष्ट प्रकारचे बाण वापरत; पोकळ वेतापासून बनवलेल्या या बाणांच्या तोंडाशी लहानसे लोखंडी पात्र असायचे, ज्यात जळता बारूद भरता येत होता. “प्राचीन युद्धकलेतील सर्वात भयानक शस्त्र” असे एका अभ्यासकाने या बाणांचे वर्णन केले. अशा बाणांपासून स्वतःचे संरक्षण करण्याकरता एखाद्या सैनिकाकडे मोठी ढाल नसल्यास, तो गंभीररित्या जखमी होऊ शकत होता किंवा त्याचा मृत्यूही होण्याची शक्यता होती.

१०, ११. (अ) सैतानाचे कोणते “जळते बाण” आपल्या विश्‍वासाचा नाश करू शकतात? (ब) परीक्षेत असताना विश्‍वासाचे महत्त्व येशूच्या उदाहरणावरून कशाप्रकारे दिसून येते?

१० आपल्या विश्‍वासाला नष्ट करण्यासाठी सैतान कोणत्या ‘जळत्या बाणांचा’ उपयोग करतो? कदाचित तो कुटुंबीयांकडून, कामाच्या ठिकाणी, शाळेत आपला छळ किंवा विरोध होईल असे घडवून आणू शकतो. अधिकाधिक भौतिक वस्तू बाळगण्याच्या इच्छेमुळे, तसेच अनैतिकतेच्या मोहात पडूनही काही जणांचा आध्यात्मिक नाश झाला आहे. अशा धोकेदायक गोष्टींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ‘विश्‍वासाची ढाल हाती घेतली पाहिजे.’ विश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी यहोवाबद्दल शिकून घेणे, त्याच्यासोबत प्रार्थनेद्वारे नियमित संभाषण करणे आणि तो आपले संरक्षण कसे करतो व आपल्याला कशाप्रकारे आशीर्वादित करतो हे ओळखणे आवश्‍यक आहे.—यहोशवा २३:१४; लूक १७:५; रोमकर १०:१७.

११ येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने कठीण प्रसंगी दृढ विश्‍वास असणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवले. त्याला आपल्या पित्याच्या निर्णयांवर पूर्ण भरवसा होता आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यात त्याने आनंद मानला. (मत्तय २६:४२, ५३, ५४; योहान ६:३८) गेथशेमाने बागेत तो अतिशय व्याकूळ झाला तेव्हा देखील त्याने आपल्या पित्याला म्हटले: “माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय २६:३९) शेवटपर्यंत विश्‍वासू राहून आपल्या पित्याचे मन आनंदित करणे किती महत्त्वाचे आहे हे तो कधीही विसरला नाही. (नीतिसूत्रे २७:११) जर आपल्यालाही येशूसारखा यहोवावर भरवसा असेल तर आपण लोकांच्या टीकेमुळे किंवा विरोधामुळे आपला विश्‍वास कमजोर होऊ देणार नाही. उलट जर आपण देवावर विसंबून राहिलो, त्याच्याविषयी आपल्याला प्रीती आहे हे दाखवले आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले तर आपला विश्‍वास मजबूत केला जाईल. (स्तोत्र १९:७-११; १ योहान ५:३) यहोवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्‍यांकरता जे आशीर्वाद राखून ठेवले आहेत त्यांची तुलना कोणत्याही भौतिक फायद्यांशी अथवा क्षणिक शारीरिक सुखाशी करता येणार नाही.—नीतिसूत्रे १०:२२.

१२. लाक्षणिक शिरस्त्राण कोणत्या एका महत्त्वाच्या गोष्टीचे रक्षण करते आणि हे संरक्षण महत्त्वाचे का आहे?

१२ तारणाचे शिरस्त्राण. शिरस्त्राण हे सैनिकाच्या डोक्याचे किंवा बौद्धिक क्रियांचे केंद्र असलेल्या मेंदूचे रक्षण करीत असे. आपल्या ख्रिस्ती आशेची तुलना शिरस्त्राणाशी केली आहे कारण ती आपल्या बुद्धीचे रक्षण करते. (१ थेस्सलनीकाकर ५:८) आपण देवाच्या वचनातील अचूक ज्ञानाकरवी आपल्या मनाचे नवीनीकरण केले आहे, पण काही झाले तरी, आपण अजूनही दुर्बल व अपरिपूर्ण मानव आहोत. आपली बुद्धी सहज भ्रष्ट होऊ शकते. या संसाराची ध्येये आपले लक्ष विचलित करू शकतात, इतकेच काय तर देवाने दिलेल्या आशेऐवजी त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ती आपल्याला प्रवृत्त करू शकतात. (रोमकर ७:१८; १२:२) दियाबलाने येशूला “जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव” देण्याचे आमीष दाखवून त्याला बहकवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. (मत्तय ४:८) पण येशूने त्याला धुडकावून लावले; पौलाने येशूविषयी असे म्हटले: “जो आनंद त्याच्यापुढे [येशूपुढे] होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”—इब्री लोकांस १२:२.

१३. भविष्यातील आपल्या आशेवरील आपला भरवसा आपण कसा टिकवून ठेवू शकतो?

१३ येशूला होता तशा प्रकारचा भरवसा आपोआप निर्माण होत नाही. जर आपण भविष्यातील आपल्या आशेवर मन केंद्रत ठेवण्याऐवजी, या व्यवस्थीकरणाच्या स्वप्नांत व ध्येयांत रमलो तर साहजिकच देवाच्या प्रतिज्ञांवरील आपला विश्‍वास कमकुवत होईल. कालांतराने आपली आशा पूर्णपणे नाहीशी होईल. त्याऐवजी जर आपण नियमित देवाच्या प्रतिज्ञांविषयी मनन केले तर आपल्यापुढे असलेल्या आशेत आपण सदोदित आनंदित राहू.—रोमकर १२:१२.

१४, १५. (अ) आपली लाक्षणिक तरवार कशास सूचित करते आणि तिचा उपयोग आपण कसा करू शकतो? (ब) आत्म्याची तरवार आपल्याला मोहांचा प्रतिकार करण्यास कशी मदत करू शकते हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१४ आत्म्याची तरवार. बायबलमध्ये लिहून ठेवलेले देवाचे वचन अथवा त्याचा संदेश एका दुधारी तरवारीप्रमाणे शक्‍तिशाली आहे; खोट्या धार्मिक शिकवणुकींना भेदून ही तरवार प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्‍तींना आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते. (योहान ८:३२; इब्री लोकांस ४:१२) आपल्यासमोर मोह येतात किंवा धर्मत्यागी व्यक्‍ती आपल्या विश्‍वासास नष्ट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही आध्यात्मिक तरवार आपला बचाव करू शकते. (२ करिंथकर १०:४, ५) “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे,” याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत.—२ तीमथ्य ३:१६, १७.

१५ सैतानाने अरण्यात येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशूने त्याच्या खोट्या युक्‍तिवादाला व कावेबाज मोहांना धुडकावून लावण्याकरता कुशलतेने आत्म्याच्या तरवारीचा उपयोग केला. सैतानाच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देताना येशूने म्हटले, “असा शास्त्रलेख आहे.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ४:१-११) स्पेनमध्ये डेव्हीड नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदाराला देखील मोहावर विजय मिळवण्याकरता शास्त्रवचनांची मदत झाली. तो १९ वर्षांचा असताना, त्याच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्‍या एका आकर्षक तरुणीने त्याच्यासोबत “मौजमजा” करण्याची इच्छा प्रदर्शित केली. डेव्हीडने तिच्या प्रस्तावांना नाकारून, आपल्या सुपरव्हायजरला दुसऱ्‍या ठिकाणी काम देण्याची विनंती केली जेणेकरून असा प्रसंग पुन्हा येणार नाही. डेव्हीड म्हणतो, “मला योसेफाच्या उदाहरणाची आठवण झाली. अनैतिकतेस झिडकारून तो लगेच तेथून निघून गेला. मी देखील तेच केले.”—उत्पत्ति ३९:१०-१२.

१६. ‘सत्याचे वचन नीट सांगण्याकरता’ प्रशिक्षणाची गरज का आहे हे स्पष्ट करा.

१६ येशूने देखील इतरांना सैतानाच्या नियंत्रणातून मुक्‍त होण्याकरता मदत करण्यासाठी आत्म्याच्या तरवारीचा उपयोग केला. येशूने म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” (योहान ७:१६) येशूच्या कौशल्यपूर्ण शिकवणुकींचे अनुकरण करण्याकरता आपल्याला सरावाची गरज आहे. रोमी सैनिकांविषयी यहुदी इतिहासकार जोसीफस याने लिहिले: “प्रत्येक सैनिकाकडून दररोज व्यायाम करून घेतला जातो; तोही साधा व्यायाम नव्हे, तर जणू युद्ध सुरू असल्याप्रमाणे अतिशय कठोर परिश्रम. म्हणूनच हे सैनिक युद्धाचा थकवा सहज पेलतात.” आपल्या आत्मिक लढाईत आपण बायबलचा वापर केला पाहिजे. शिवाय, आपण ‘सत्याचे वचन नीट सांगणारे, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेले, देवाच्या पसंतीस उतरलेले कामकरी, असे स्वतःला सादर करण्यास होईल तितके केले’ पाहिजे. (२ तीमथ्य २:१५) एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीच्या प्रामाणिक प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता आपण शास्त्रवचनांचा उपयोग करतो तेव्हा आपल्याला किती समाधान मिळते!

सर्व प्रसंगी प्रार्थना करा

१७, १८. (अ) सैतानाचा प्रतिकार करण्यात प्रार्थनेची कोणती भूमिका आहे? (ब) प्रार्थनेचे महत्त्व दाखवण्याकरता एक उदाहरण द्या.

१७ संपूर्ण शस्त्रसामग्रीविषयी सांगितल्यावर पौल आणखी एक महत्त्वाचा सल्ला देतो. सैतानाचा प्रतिकार करताना ख्रिश्‍चनांनी “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी” करण्याच्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. किती वेळा प्रार्थना केली पाहिजे? पौलाने लिहिले: “सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा.” (इफिसकर ६:१८) जेव्हा आपल्यासमोर मोह येतात, परीक्षा येतात किंवा आपण निराश होतो तेव्हा प्रार्थना आपल्याला विलक्षण सामर्थ्य देऊ शकते. (मत्तय २६:४१) येशूने “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ . . . आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली.”—इब्री लोकांस ५:७.

१८ असाध्य रोगाने पीडित असलेल्या आपल्या पतीची १५ वर्षांपासून शुश्रुषा करणारी मीलाग्रोस म्हणते: “मला निराश झाल्यासारखे वाटते तेव्हा मी यहोवाला प्रार्थना करते. तो करू शकतो तशी मदत आणखी कोणीही मला करू शकत नाही. हो, कधीकधी मी अगदीच खचून जाते, आता आणखी सहन करता येणार नाही असे वाटते. पण पुन्हा पुन्हा मी हेच अनुभवलंय, की यहोवाला प्रार्थना केल्यानंतर मला नव्याने शक्‍ती मिळते आणि मला बरे वाटू लागते.”

१९, २०. सैतानाविरुद्धच्या आपल्या लढाईत विजयी होण्याकरता आपल्याला कशाची गरज आहे?

१९ दियाबलाला माहीत आहे, की आपल्याकडे फार थोडा काळ शिल्लक आहे, त्यामुळे तो आपल्यावर विजय मिळवण्याकरता अधिकच तीव्रतेने प्रयत्न करतो. (प्रकटीकरण १२:१२, १७) या शक्‍तिशाली शत्रूचा प्रतिकार करून आपल्याला, ‘विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध’ करायचे आहे. (१ तीमथ्य ६:१२) यासाठी असामान्य शक्‍तीची गरज आहे. (२ करिंथकर ४:७) आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचीही गरज आहे आणि त्याकरता आपण प्रार्थना केली पाहिजे. येशूने म्हटले: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”—लूक ११:१३.

२० तर आपण पाहिल्याप्रमाणे, यहोवाने पुरवलेली संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करणे आवश्‍यक आहे. ही आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करण्याकरता आपण विश्‍वास व नीतिमत्त्व यांसारखे ईश्‍वरी गुण विकसित केले पाहिजेत. तसेच, सत्यावर आपण प्रीती करून जणू त्याने स्वतःला वेढून घेतले पाहिजे. आपण प्रत्येक प्रसंगी सुवार्ता सांगण्यास तयार असले पाहिजे आणि भविष्यातील आपल्या आशेवर मन केंद्रित केले पाहिजे. तसेच आत्म्याची तरवार चालवण्यासही आपण शिकून घेतले पाहिजे. देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण केल्याने आपण दुरात्म्यांसोबतच्या आपल्याला लढाईत विजयी होऊन यहोवाच्या नावाचे खऱ्‍या अर्थाने गौरव करू शकतो.—रोमकर ८:३७-३९.

[तळटीप]

^ परि. 6 यशयाच्या भविष्यवाणीत, यहोवाबद्दल असे म्हटले आहे की, “त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले.” तेव्हा मंडळीच्या पर्यवेक्षकांकडून यहोवा हीच अपेक्षा करतो की त्यांनी न्यायत्वाने व नीतिमत्त्वाने वागावे.—यशया ५९:१४, १५, १७.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण करण्याचे सर्वोत्तम उदाहरण कोणाचे आहे आणि आपण त्याच्या उदाहरणाचे जवळून परीक्षण का केले पाहिजे?

• आपल्या बुद्धीचे व आपल्या लाक्षणिक हृदयाचे रक्षण आपण कसे करू शकतो?

• आत्म्याची तरवार चालवण्यात आपण तरबेज कसे होऊ शकतो?

• आपण सर्व प्रसंगी प्रार्थना का करावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्रे]

परिश्रमपूर्वक बायबल अभ्यास केल्यामुळे आपल्याला सर्व प्रसंगी सुवार्तेची घोषणा करण्याची प्रेरणा मिळते

[१८ पानांवरील चित्रे]

आपली खात्रीलायक आशा आपल्याला परीक्षांना तोंड देण्यास मदत करते

[१९ पानांवरील चित्रे]

तुम्ही सेवाकार्यात ‘आत्म्याच्या तरवारीचा’ उपयोग करता का?