व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूची प्रार्थना—तुमच्यासाठी तिचा अर्थ

प्रभूची प्रार्थना—तुमच्यासाठी तिचा अर्थ

प्रभूची प्रार्थना—तुमच्यासाठी तिचा अर्थ

येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनात शिकवलेली प्रभूची प्रार्थना बायबलमधील मत्तयाच्या पुस्तकाच्या ६ व्या अध्यायाच्या ९ ते १३ वचनात लिहून ठेवण्यात आली आहे. ही प्रार्थना शिकवण्याआधी येशूने म्हटले: “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.”—मत्तय ६:७.

स्पष्टतः, प्रभूची प्रार्थना जशीच्या तशी म्हणावी अशी येशूची इच्छा नव्हती. त्याने इतर श्रोत्यांसाठी ही प्रार्थना पुन्हा बोलून दाखवली, हे खरे आहे. (लूक ११:२-४) परंतु, मत्तयाच्या आणि लूकच्या शुभवर्तमान अहवालांतील या प्रार्थनेच्या शब्दांत थोडासा फरक आहे. शिवाय, येशू आणि त्याच्या शिष्यांनी नंतर केलेल्या प्रार्थना, या नमुना प्रार्थनेतील शब्दांशी तंतोतंत जुळत नव्हत्या.

प्रभूची प्रार्थना बायबलमध्ये का लिहून ठेवण्यात आली आहे? प्रार्थनेचा हा नमुना देण्याद्वारे, आपण देवाला स्वीकारयोग्य प्रार्थना कशा करू शकतो हे येशू शिकवत होता. या प्रार्थनेत आपल्याला जीवनाच्या काही मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे देखील मिळतात. यास्तव, आपण प्रभूच्या प्रार्थनेतील एकेका भागाची चर्चा करू या.

देवाचे नाव काय आहे?

“हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ६:९) नमुना प्रार्थनेच्या सुरवातीच्या शब्दांमुळे, देवाला ‘आपला पिता’ असे संबोधण्याद्वारे आपल्याला त्याच्या जवळ जाण्यास मदत मिळते. एखादे मूल जसे सहजपणे प्रेमळ आणि समजदार पालकाच्या जवळ जाते तसेच आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ जाऊ शकतो आणि तो आपले ऐकेल हा भरवसा बाळगू शकतो. राजा दाविदाने असे गायिले: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.”—स्तोत्र ६५:२.

आपण देवाचे नाव पवित्र व्हावे म्हणून प्रार्थना केली पाहिजे, अशी सूचना येशू देतो. परंतु देवाचे नाव आहे तरी काय? बायबल या शब्दांत या प्रश्‍नाचे उत्तर देते: “परमेश्‍वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.” (निर्गम १५:३) बायबलमध्ये तुम्ही याव्हे किंवा यहोवा हे नाव कधी वाचले आहे का?

खरे पाहता, यहोवा हे देवाचे नाव, बायबलच्या प्राचीन हस्तलेखांमध्ये ७,००० पेक्षा अधिक वेळा येते. परंतु काही भाषांतरकारांनी बायबलच्या आपल्या आवृत्तींमधून ते नाव गाळून टाकण्याइतपत मजल मारली आहे. पण आपण आपल्या निर्माणकर्त्याचे नाव पवित्र करण्यासाठी प्रार्थना करतो. (यहेज्केल ३६:२३) तेव्हा या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करण्याचा एक मार्ग म्हणजे देवाला प्रार्थना करतेवेळी यहोवा या त्याच्या नावाचा उपयोग करणे होय.

पट्रिशिया नावाची एक स्त्री कॅथलिक म्हणून वाढली आणि तिला प्रभूची प्रार्थना तोंडपाठ होती. मग यहोवाच्या एका साक्षीदाराने तिला बायबलमधून देवाचे नाव दाखवले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती? “मला तर विश्‍वासच बसत नव्हता! मी लगेच माझं बायबल उघडून पाहिलं, तर त्यातही देवाचं नाव होतं! मग साक्षीदारांनी मला मत्तय ६:९, १० वाचून दाखवलं आणि मला म्हणाले, की प्रभूच्या प्रार्थनेत याच नावाला पवित्र करण्याविषयी म्हटलं आहे. मला खरंच खूप आनंद झाला. मी तिला माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास सांगितलं.”

पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होणे

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ६:१०) येशूच्या नमुन्यादाखल प्रार्थनेतील हा भाग कसा पूर्ण होईल? पुष्कळ लोकांना वाटते, की स्वर्ग हे शांती आणि समाधानाचे ठिकाण आहे. शास्त्रवचनांत स्वर्ग यहोवाच्या ‘पवित्रतेचे व प्रतापाचे निवासस्थान’ आहे असे म्हटले आहे. (यशया ६३:१५) म्हणूनच आपण अशी प्रार्थना करतो, की देवाच्या इच्छेप्रमाणे “जसे स्वर्गात तसे” पृथ्वीवरही होवो! पण हे होईल का?

यहोवाचा संदेष्टा दानीएल याने असे भाकीत केले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या [पृथ्वीवरील] सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) हे स्वर्गीय राज्य किंवा सरकार धार्मिक शासनाधीन विश्‍वव्यापी शांती आणण्यासाठी लवकरच कार्यवाही करणार आहे.—२ पेत्र ३:१३.

देवाचे राज्य येवो आणि पृथ्वीवर त्याच्या इच्छेप्रमाणे होवो अशी प्रार्थना केल्याने आपला विश्‍वास दिसून येतो ज्याची केव्हाच निराशा होणार नाही. ख्रिस्ती प्रेषित योहान याने असे लिहिले: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’” पुढे योहानाने असे लिहिले: “तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: . . . ‘लिही; कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.’”—प्रकटीकरण २१:३-५.

प्रार्थना आणि आपल्या भौतिक गरजा

नमुनादाखल प्रार्थनेत येशूने जे म्हटले त्यावरून तो हे दाखवतो, की प्रार्थना करताना आपल्या मागण्या देवाचे नाव आणि त्याची इच्छा यांजशी संबंधित असल्या पाहिजेत. तरीपण, नमुनादाखल प्रार्थनेत वयैक्‍तिक मागण्यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे ज्या यहोवाला उचितपणे सादर केल्या आहेत.

यांपैकी पहिली मागणी अशी आहे: “आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ६:११) भौतिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी ही मागणी नाही. येशूने आपल्याला “रोजची भाकर रोज” देण्याकरता प्रार्थना करण्यास उत्तेजन दिले. (लूक ११:३) प्रभूच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने आपण जर, देवावर प्रेम केले आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले तर पूर्ण विश्‍वासानिशी अशी प्रार्थना करू शकतो, की तो आपल्या भौतिक गरजा पूर्ण करेल.

आर्थिक समस्यांबाबत अनावश्‍यक चिंता करीत बसल्यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होऊ शकते आणि देव आपल्याकडून ज्याची अपेक्षा करतो ते करण्यास आपण चुकू. परंतु देवाच्या उपासनेला आपण आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले तर, अन्‍न, वस्र यांसारख्या आपल्या भौतिक गरजांबद्दल आपण करत असलेली विनंती आनंदाने ऐकली जाईल, ही खात्री आपण बाळगू शकतो. येशूने म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे [देवाचे] नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:२६-३३) देवाचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटणे इतके सोपे नाही कारण आपण सर्व पापी आहोत आणि आपल्याला क्षमेची गरज आहे. (रोमकर ५:१२) प्रभूच्या प्रार्थनेत याविषयी देखील सांगितले आहे.

आपल्या प्रार्थना आणि क्षमा

“जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ६:१२) लूकच्या अहवालातील प्रभूच्या प्रार्थनेत या ‘ऋणांना’ ‘पाप’ असे म्हटले आहे. (लूक ११:४) यहोवा देव खरोखरच आपल्या पापांची क्षमा करेल का?

प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने घोर पातके केली होती तरीपण त्याने पश्‍चात्ताप केला आणि पूर्ण विश्‍वासाने अशी प्रार्थना केली: “हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.” (स्तोत्र ८६:५) किती हा दिलासा देणारा विचार! आपला स्वर्गीय पिता, पश्‍चात्तापी मनोवृत्तीने त्याची धाव घेणाऱ्‍यांना ‘क्षमा करण्यास तयार’ आहे. एक ऋण जसे पूर्णपणे फेडले जाऊ शकते त्याच प्रकारे यहोवा देव आपली पातके पूर्णपणे क्षमा करू शकतो.

परंतु, यासाठी येशूने एक अट दिली: देवाकडून क्षमा मिळवायची असेल तर आपण इतरांना क्षमा केली पाहिजे. (मत्तय ६:१४, १५) धार्मिक ईयोबाला त्याच्या तीन दोस्तांनी गैरवागणूक दिली तरीसुद्धा त्याने त्यांना क्षमा केली, इतकेच नव्हे तर त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना देखील केली. (ईयोब ४२:१०) आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांना आपण क्षमा केल्यास आपण देवाला संतुष्ट करू आणि त्याची दया मिळण्यास पात्र ठरू.

आपल्या विनंत्या ऐकण्याची देवाची तयारी आहे यामुळे आपण त्याची मर्जी प्राप्त करण्यास प्रवृत्त झालो पाहिजे. आपण अपरिपूर्ण असलो तरीसुद्धा आपण त्याची मर्जी प्राप्त करू शकतो. (मत्तय २६:४१) याबाबतीतही यहोवा आपल्याला मदत करू शकतो; नमुन्यादाखल प्रार्थनेच्या शेवटी एका महत्त्वपूर्ण विनंतीद्वारे येशूने ही गोष्ट दाखवून दिली.

धार्मिक मार्गाक्रमणासाठी प्रार्थना

“आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाइटापासून सोडीव.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ६:१३) आपण मोहात पडावे किंवा पापात पडावे म्हणून यहोवा आपल्याला निराधार सोडत नाही. त्याचे वचन म्हणते: “देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” (याकोब १:१३) देव आपल्याला मोहात पाडत नाही तर, जो मोहात पाडण्यात पटाईत आहे त्या “वाईटापासून” अर्थात दियाबल सैतानापासून तो आपल्याला सोडवू शकतो.

प्रेषित पेत्राने सहख्रिश्‍चनांना असे आर्जवले: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) सैतानाने तर परिपूर्ण मनुष्य येशू ख्रिस्त यालाही मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता! सैतानाला काय हवे होते? येशूने यहोवा देवाची शुद्ध उपासना करण्याचे सोडून द्यावे, ही सैतानाची इच्छा होती. (मत्तय ४:१-११) तुम्ही जर यहोवा देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हालाही गिळंकृत करण्याची सैतानाची इच्छा आहे!

सैतानाच्या विळख्यात असलेल्या या जगाद्वारे तो आपल्याला अशा गोष्टी करण्यास मोहात पाडील की ज्या देवाला आवडत नाहीत. (१ योहान ५:१९) यास्तव, आपण देवाकडे सतत प्रार्थनेद्वारे मदत मागणे महत्त्वाचे आहे; खासकरून आपल्याला एखादी वाईट गोष्ट करण्याचा सतत मोह होतो तेव्हा आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. आपण जर यहोवाच्या प्रेरित वचनाच्या अनुषंगाने त्याची उपासना केली तर तो आपल्याला दियाबलाचा प्रतिकार करण्यास मदत करण्याद्वारे मोहातून सोडवील. बायबल म्हणते: “देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही.”—१ करिंथकर १०:१३.

देवावर विश्‍वास ठेवणे महत्त्वाचे आहे

आपल्या स्वर्गीय पित्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे, हा विचार किती सांत्वनदायक आहे! त्याने तर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्याला प्रार्थना कशी करायची हे देखील शिकवले. यामुळे निश्‍चितच आपल्याला यहोवा देवाला संतुष्ट करण्याची इच्छा होते. हे आपण कसे करू शकतो?

बायबल म्हणते: “विश्‍वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) हा विश्‍वास कसा मिळवता येऊ शकेल? “विश्‍वास वार्तेने” होतो असे बायबल म्हणते. (रोमकर १०:१७) यहोवाच्या साक्षीदारांना, खऱ्‍या विश्‍वासाने देवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍या सर्वांबरोबर बायबलच्या शिकवणींबद्दल बोलायला आनंद वाटतो.

प्रभूच्या प्रार्थनेवरील या चर्चेमुळे, या प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला अधिक स्पष्टरीत्या समजला असेल अशी आम्ही आशा करतो. यहोवाविषयी आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना” तो देत असलेल्या प्रतिफळांविषयी आणखी शिकून घेतल्याने तुम्ही देवावरील तुमचा विश्‍वास आणखी मजबूत करू शकता. तुम्ही त्याच्याविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी आणखी शिकून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचा स्वर्गीय पिता याच्याबरोबर जवळचा नातेसंबंध जोडता येऊ शकेल.—योहान १७:३.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड; आणि आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाइटापासून सोडीव.”—मत्तय ६:९-१३.

[७ पानांवरील चित्र]

जे यहोवावर प्रेम करतात अशांच्या गरजा तो पुरवतो

[७ पानांवरील चित्र]

दियाबलाचा प्रतिकार करण्यासाठीही यहोवा मदत देतो

[७ पानांवरील चित्र]

आपण, ईयोबाप्रमाणे इतरांना क्षमा केली तर आपण देवाची दया मिळण्यास पात्र ठरू शकू