व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘प्रभूमध्ये बलवान होत जा’

‘प्रभूमध्ये बलवान होत जा’

‘प्रभूमध्ये बलवान होत जा’

“प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.”—इफिसकर ६:१०.

१. (अ) सुमारे ३,००० वर्षांपूर्वी कोणती विलक्षण अशी लढाई झाली? (ब) दावीद विजयी का ठरला?

जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी विरुद्ध सैन्यांचे दोन लढवय्ये रणभूमीवर समोरासमोर उभे होते. त्यांच्यापैकी लहान असणारा, दावीद नावाचा एक मेंढपाळ होता. आणि त्याच्यासमोर उभा होता, असामान्य शक्‍ती असलेला अवाढव्य आकाराचा गल्याथ. गल्याथाचा अंगरखा ५७ किलो वजनाचा होता आणि त्याच्याजवळ एक भला मोठा भाला आणि भली मोठी तलवार होती. दाविदाकडे मात्र कोणतेही शस्त्र नव्हते; केवळ एक गोफण. इस्राएल सैन्यातर्फे या लहानशा मुलाने आपल्याला ललकारले हे पाहून पलिष्टी राक्षस गल्याथाला अपमानित वाटले. (१ शमुवेल १७:४२-४४) दोन्ही पक्षांच्या दर्शकांना या द्वंद्वाचा शेवट ठरलेला आहे असे वाटले असावे. पण युद्धात नेहमीच बलवानांचा विजय होत नसतो. (उपदेशक ९:११) शेवटी दाविदाचा विजय झाला कारण त्याने यहोवाच्या सामर्थ्याने गल्याथाचा सामना केला. त्याने म्हटले, “हे युद्ध परमेश्‍वराचे आहे.” बायबलमधील अहवाल सांगतो त्याप्रमाणे, “दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली.”—१ शमुवेल १७:४७, ५०.

२. ख्रिस्ती कोणत्या प्रकारच्या लढाईत सामील आहेत?

ख्रिस्ती आज शारीरिक स्वरूपाची लढाई लढत नाहीत. ते सर्वांसोबत शांतीने राहू इच्छितात पण तरीसुद्धा ते एका आध्यात्मिक स्वरूपाच्या लढाईत अतिशय शक्‍तिशाली अशा शत्रूंना झुंज देतात. (रोमकर १२:१८) इफिसकरांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटल्या अध्यायात पौलाने या लढाईचे वर्णन केले; एक अशी लढाई जिच्यात प्रत्येक ख्रिस्ती सामील आहे. पौलाने लिहिले: “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.”—इफिसकर ६:१२.

३. इफिसकर ६:१० या वचनानुसार, खात्रीने यशस्वी होण्याकरता आपल्याला कशाची गरज आहे?

हे ‘दुरात्मे’ म्हणजे सैतान व त्याचे पिशाच्च, जे यहोवा देवासोबतचा आपला नातेसंबंध तोडू इच्छितात. हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्‍तिशाली असल्यामुळे आपण जणू दाविदासारख्याच स्थितीत आहोत. आणि देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहिल्यास, स्वतःच्या बळावर आपण कधीही ही लढाई जिंकू शकत नाही. म्हणूनच पौल आपल्याला असा आग्रह करतो, “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.” (इफिसकर ६:१०) हा सल्ला दिल्यानंतर प्रेषित पौल अशा आध्यात्मिक तरतुदींचा व ख्रिस्ती गुणांचा उल्लेख करतो जे आपल्याला विजयी होण्यास साहाय्य करू शकतात.—इफिसकर ६:११-१७.

४. या लेखात आपण कोणते दोन मुख्य मुद्दे विचारात घेणार आहोत?

आपल्या शत्रूंच्या शक्‍तीविषयी व डावपेचांविषयी शास्त्रवचनांत काय म्हटले आहे याचे आपण आता परीक्षण करू या. त्यानंतर आपण हे पाहू या की स्वतःचे संरक्षण करण्याकरता आपण कोणत्या बचाव नीतिचा अवलंब केला पाहिजे. यहोवाच्या सूचनांचे पालन केल्यास आपण खात्री बाळगू शकतो की आपले शत्रू कधीही आपल्यावर विजय मिळवणार नाहीत.

दुरात्म्यांविरुद्ध लढणे

५. इफिसकर ६:१२ यातील “झगडणे” या शब्दावरून सैतानाच्या युद्धनीतीविषयी आपल्याला काय समजून घेण्यास मदत मिळते?

पौल स्पष्ट करतो की “आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” सर्वात प्रमुख दुरात्मा हा खुद्द दियाबल सैतान आहे, जो मुळात दुरात्म्यांचा म्हणजेच, “भुतांचा अधिपति” आहे. (मत्तय १२:२४-२६) आपल्या लढाईला बायबल “झगडणे” म्हणते. मूळ भाषेत याठिकाणी मल्लयुद्ध किंवा कुस्ती या अर्थाचा शब्द वापरण्यात आला होता. प्राचीन ग्रीसच्या मल्लयुद्धांत, प्रत्येक कुस्ती लढणारा आपल्या प्रतिस्पर्ध्याचा तोल बिघडवून त्याला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करत असे. त्याचप्रकारे दियाबलाची हीच इच्छा आहे की, आध्यात्मिक दृष्टीने आपला तोल जावा. हे तो कशाप्रकारे घडवू शकतो?

६. दियाबल आपला विश्‍वास कमजोर करण्याकरता कशाप्रकारे वेगवेगळ्या डावपेचांचा वापर करू शकतो हे शास्त्रवचनांतून स्पष्ट करा.

दियाबल कधी सर्पाचे, कधी गर्जणाऱ्‍या सिंहाचे तर कधी प्रकाशमान देवदूताचे रूप घेतो. (२ करिंथकर ११:३, १४; १ पेत्र ५:८) आपला छळ करण्याकरता किंवा आपल्याला निरुत्साहित करण्याकरता तो त्याच्या मानवी प्रतिनिधींचा उपयोग करू शकतो. (प्रकटीकरण २:१०) सगळे जगच सैतानाच्या ताब्यात असल्यामुळे, आपल्याला मोहात पाडण्यासाठी तो या जगाच्या वासना व आकर्षणांचा गैरवापर करू शकतो. (२ तीमथ्य २:२६; १ योहान २:१६; ५:१९) तसेच, त्याने हव्वेला फसवण्याकरता ज्याप्रकारे जगिक किंवा धर्मत्यागी विचारसरणीचा उपयोग केला, त्याप्रकारे तो आपल्यालाही याच मार्गांनी बहकवू शकतो.—१ तीमथ्य २:१४.

७. दुरात्म्यांना कोणत्या मर्यादा आहेत आणि कोणत्या वस्तुस्थिती आपल्याकरता अनुकूल आहेत?

सैतान व त्याच्या दुरात्म्यांजवळ असलेली शस्त्रे व त्यांची शक्‍ती अतिशय प्रभावशाली वाटत असली तरीसुद्धा त्यांनाही काही मर्यादा आहेत. हे दुष्टात्मे आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करण्यास भाग पाडू शकत नाहीत, की ज्या आपल्या स्वर्गीय पित्याला आवडणार नाहीत. आपल्याजवळ उपजत इच्छास्वातंत्र्य आहे आणि स्वतःच्या विचारांवर व कृतींवर आपण नियंत्रण करू शकतो. शिवाय, या लढाईत आपण एकटे लढत नाही. अलीशाच्या काळाप्रमाणे आजही हेच म्हणता येईल, की “त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” (२ राजे ६:१६) बायबल आपल्याला आश्‍वासन देते की जर आपण स्वतःला देवाच्या अधीन केले आणि दियाबलाचा विरोध केला, तर तो आपल्यापासून पळ काढेल.—याकोब ४:७.

सैतानाच्या कुयुक्‍तींची आपल्याला कल्पना आहे

८, ९. सैतानाने ईयोबाची निष्ठा भंग करण्यासाठी त्याच्यावर कोणती संकटे आणली आणि आज आपल्यासमोर कोणते आध्यात्मिक धोके आहेत?

सैतानाच्या कुयुक्‍तींबाबत आपण अंधारात नाही कारण शास्त्रवचनांत त्याच्या मूलभूत डावपेचांविषयी खुलासा करण्यात आला आहे. (२ करिंथकर २:११) नीतिमान ईयोबाविरुद्ध दियाबलाने बिकट आर्थिक समस्या, प्रियजनांचा मृत्यू, कौटुंबिक विरोध, शारीरिक दुखणी आणि ढोंगी मित्रांकडून निराधार टीका यांसारख्या कुयुक्‍तींचा वापर केला. ईयोब अतिशय खिन्‍न झाला आणि देवाने आपल्याला सोडून दिले आहे असा त्याचा समज झाला. (ईयोब १०:१, २) सैतान आज स्वतः अशा समस्या घडवून आणत नसला तरीसुद्धा, अनेक ख्रिस्ती जनांना या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि दियाबल त्यांचा उपयोग आपले हेतू साध्य करण्याकरता करू शकतो.

या शेवटल्या काळात आध्यात्मिक धोक्यांची वाण नाही. आपण अशा जगात राहतो की जेथे आध्यात्मिक ध्येयांपेक्षा भौतिक ध्येयांचा पाठलाग केला जातो. प्रसारमाध्यमांत सतत बेकायदेशीर सेक्ससंबंधांवर भर दिला जातो आणि अशा अनैतिक वर्तनामुळे दुःख नव्हे तर आनंद मिळतो अशाप्रकारे त्यांचे चित्रण केले जाते. बहुतेक माणसे आज, “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,” झाली आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) जर आपण आपल्या ‘विश्‍वासाचे समर्थन’ करण्यास झटलो नाही तर अशाप्रकारची विचारसरणी आपले आध्यात्मिक संतुलन बिघडवू शकते.—यहूदा ३.

१०-१२. (अ) येशूने बी पेरणाऱ्‍याच्या दृष्टान्तात कोणती ताकीद दिली? (ब) आध्यात्मिक कार्यांचा कशाप्रकारे गळा आवळला जाऊ शकतो हे उदाहरणासहित स्पष्ट करा.

१० सैतानाची सर्वात प्रभावी कुयुक्‍ती म्हणजे आपल्याला या जगात व त्यातील भौतिक ध्येयांत गुरफटून टाकणे. बी पेरणाऱ्‍याच्या दृष्टान्तात येशूने अशी ताकीद दिली की कधीकधी “संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही [राज्याच्या] वचनाची वाढ खुंटवितात.” (मत्तय १३:१८, २२) येथे “वाढ खुंटवितात” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “पूर्णतः आवळून टाकणे” असा होता.

११ उष्णकटिबंधातील अरण्यांत काही ठिकाणी आवळणाऱ्‍या अंजिरीचे वेल आढळतात. हा वेल हळूहळू एखाद्या वृक्षाच्या खोडावर वाढतो. वृक्षाला चहूबाजूंनी तो वेढू लागतो तसतशी त्याची मुळे अधिकाधिक पक्की होत जातात. आवळणाऱ्‍या अंजिराची बहुसंख्य मुळे शेवटी झाडाच्या मुळाशी असलेल्या जमिनीतून जवळजवळ सर्व पोषक पदार्थ शोषून घेतात आणि वेलाच्या सावलीमुळे वृक्षाला प्रकाशही मिळू शकत नाही. अशारितीने शेवटी वृक्ष मरून जातो.

१२ त्याचप्रकारे या संसाराच्या चिंता आणि धनसंपत्तीचा व आरामदायी जीवनशैलीचा ध्यास, हळूहळू आपला अधिकाधिक वेळ व शक्‍ती शोषून घेण्यास सुरवात करू शकतो. एकदा का आपले लक्ष जगिक गोष्टींकडे विचलित झाले, की मग वैयक्‍तिक बायबल अभ्यासाकडे आपण सहज दुर्लक्ष करू लागतो; ख्रिस्ती सभा बुडवण्याची आपल्याला सवय लागते आणि अशारितीने आपला आध्यात्मिक पोषणाचा नियमित पुरवठा बंद पडतो. आता आध्यात्मिक ध्येयांऐवजी आपल्या डोळ्यापुढे भौतिक ध्येये असतात आणि शेवटी आपण सहज सैतानाच्या हातात सापडतो.

टिकाव धरण्याची गरज आहे

१३, १४. सैतानाच्या हल्ल्यांविरुद्ध आपण कशाप्रकारची भूमिका घेतली पाहिजे?

१३ पौलाने सहविश्‍वासू बांधवांना, ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरण्याचे’ प्रोत्साहन दिले. (इफिसकर ६:११) अर्थात आपण दियाबलाला व त्याच्या दुरात्म्यांना नष्ट करू शकत नाही. हे कार्य देवाने येशू ख्रिस्ताला सोपवले आहे. (प्रकटीकरण २०:१, २) पण सैतानाचा नाश होईपर्यंत, आपण ‘टिकाव धरला’ पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्या हल्ल्यांना बळी पडू नये.

१४ प्रेषित पेत्रानेही सैतानाविरुद्ध टिकाव धरण्याच्या गरजेवर भर दिला. त्याने लिहिले: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो; त्याच्याविरुद्ध विश्‍वासांत दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:८, ९) खरोखर, दियाबल आपल्यावर गर्जणाऱ्‍या सिंहासारखा हल्ला करतो, तेव्हा आपल्या आध्यात्मिक बंधू भगिनींचा आधार आपल्याला टिकाव धरून राहण्याकरता अतिशय साहाय्यक ठरतो.

१५, १६. सहविश्‍वासू बांधवांचा आधार आपल्याला टिकाव धरून राहण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो हे शास्त्रवचनांतील उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१५ आफ्रिकेतील गवताळ प्रदेशांत जवळपास सिंहाची गर्जना ऐकू येताच, हरिणांचे थवे अतिशय वेगाने पळत सुटतात व धोक्याच्या क्षेत्रातून बाहेर गेल्यानंतरच थांबतात. पण एकमेकांना साहाय्य करण्याच्या बाबतीत हत्तींचे उदाहरण देता येईल. एलिफंट्‌स—जेंटल जायंट्‌स ऑफ ॲफ्रिका ॲन्ड एशिया या पुस्तकात सांगितले आहे: “धोक्याची चाहूल लागताच हत्तींचा कळप एक सामान्य बचावनीती अवलंबतात; प्रौढ हत्ती लगेच बाहेरच्या बाजूला धोक्याच्या दिशेने तोंड करून उभे राहून एक गोल तयार करतात आणि पिलांना या गोलात सुरक्षित ठेवले जाते.” ताकद आणि परस्पर साहाय्याचे हे प्रदर्शन पाहिल्यावर, सिंह अगदी लहान हत्तींवरही हल्ला करण्याचे क्वचितच धाडस करतो.

१६ सैतान व त्याच्या दुरात्म्यांचा हल्ला होतो तेव्हा आपणही अशाचप्रकारे, विश्‍वासात खंबीर असलेल्या आपल्या बांधवांच्या सोबत, त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. पौलाला रोममध्ये बंदिवान करण्यात आले होते तेव्हा त्याने कबूल केले की काही सहख्रिस्ती बांधव त्याच्याकरता एक “आधार” ठरले. (कलस्सैकर ४:१०, ११, ईजी टू रीड व्हर्शन) “आधार” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत केवळ एकदाच आढळतो. व्हाईन यांच्या एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वड्‌र्स यात सांगितल्यानुसार, “या शब्दाचे क्रियापद रूप, प्रशामक औषधांस सूचित करतो.” जखमेची जळजळ शांत करणाऱ्‍या मलमाप्रमाणे यहोवाच्या परिपक्व उपासकांचा आधार, भावनिक किंवा शारीरिक दुःखामुळे होणाऱ्‍या वेदना शांत करू शकतो.

१७. देवाला विश्‍वासू राहण्याकरता आपल्याला कोणते साहाय्य उपलब्ध आहे?

१७ सहख्रिस्ती बांधव आपल्याला प्रोत्साहन देतात, तेव्हा आपल्याला विश्‍वासूपणे देवाची सेवा करण्याचा आपला निर्धार पक्का करण्याची चालना मिळते. विशेषतः, ख्रिस्ती वडील आध्यात्मिक मदत पुरवण्यास उत्सुक असतात. (याकोब ५:१३-१५) नियमित बायबल अभ्यास, ख्रिस्ती सभांना, संमेलनांना व अधिवेशनांना उपस्थित राहणे यांमुळेही आपल्याला विश्‍वासू राहण्यास मदत मिळते. तसेच, देवासोबतचा आपला स्वतःचा घनिष्ट नातेसंबंध देखील आपल्याला त्याला विश्‍वासू राहण्यास मदत करू शकतो. खरे तर आपण खातो, पितो किंवा इतर जे काही करतो, ते सर्वकाही आपण देवाच्या गौरवाकरताच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (१ करिंथकर १०:३१) अर्थातच, यहोवाला संतोषविणाऱ्‍या मार्गात चालत राहण्याकरता प्रार्थनापूर्वक त्याच्यावर विसंबून राहणे अनिवार्य आहे.—स्तोत्र ३७:५.

१८. कष्टदायक परिस्थितीमुळे दुर्बल वाटते तेव्हा देखील आपण हिंमत का हारू नये?

१८ सिंहाला एखादा कमजोर प्राणी दिसला तर तो त्याच्यावर झडप घालतो. त्याचप्रमाणे, कधीकधी आपल्याला आध्यात्मिकरित्या थोडे दुर्बल वाटत असते तेव्हा सैतान आपल्यावर हल्ला करतो. कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, आजारपण यांसारख्या समस्यांमुळे कधीकधी आपली आध्यात्मिक शक्‍ती क्षीण होते. पण आपण कधीही देवाच्या नजरेत जे योग्य ते करण्याचे सोडू नये कारण पौलाने म्हटल्याप्रमाणे: “जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथकर १२:१०; गलतीकर ६:९; २ थेस्सलनीकाकर ३:१३) पौलाला काय म्हणायचे होते? हेच, की आपण यहोवाला सामर्थ्याची विनंती करतो तेव्हा त्याचे सामर्थ्य आपल्या मानवी दुर्बलतेमुळे येणारी कोणतीही कमी भरून काढू शकते. दाविदाने गल्याथावर मिळवलेला विजय हेच दाखवून देतो की देव आपल्या लोकांना सामर्थ्य देऊ शकतो आणि तो देतो देखील. सध्याच्या काळातील यहोवाचे साक्षीदार स्वतःच्या अनुभवावरून हे सांगू शकतात, की अतिशय कठीण परिस्थितीत त्यांना देवाच्या बलवंत बाहूचा आधार जाणवला आहे.—दानीएल १०:१९.

१९. यहोवा कशाप्रकारे आपल्या सेवकांना बळ देऊ शकतो याचे उदाहरण द्या.

१९ देवाने आपल्याला कशाप्रकारे साहाय्य व आधार दिला याविषयी एका विवाहित जोडप्याने असे लिहिले: “पती व पत्नी या नात्याने आम्ही यहोवाच्या सेवेत अनेक वर्षांपासून कित्येक आशीर्वाद अनुभवले आणि कित्येक प्रेमळ लोकांशी आमची ओळख घडली. तसेच आम्हाला कठीण परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्याचे यहोवाकडून प्रशिक्षण व बळ मिळाले. ईयोबाप्रमाणे, काही गोष्टी का घडत आहेत हे आम्हाला तेव्हा समजले नाही पण कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मदत करण्यासाठी यहोवा आमच्या पाठीशी आहे याची मात्र आम्हाला खात्री होती.”

२०. यहोवा नेहमी आपल्या लोकांना आधार देतो हे शास्त्रवचनांतील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

२० आपल्या विश्‍वासू सेवकांना आधार व शक्‍ती देता येत नाही इतका यहोवाचा हात तोकडा झालेला नाही. (यशया ५९:१) दाविदाने असे स्तोत्र गायिले: “पतन पावणाऱ्‍या सर्वांना परमेश्‍वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” (स्तोत्र १४५:१४) खरोखर आपला स्वर्गीय पिता, “प्रतिदिनी [आपला] भार वाहतो” व आपल्याला खरोखर ज्याची गरज आहे ते अवश्‍य पुरवतो.—स्तोत्र ६८:१९.

आपल्याला ‘देवाच्या संपूर्ण शस्त्रसामग्रीची’ गरज आहे

२१. आध्यात्मिक शस्त्रसामग्रीच्या गरजेवर पौलाने कशाप्रकारे भर दिला?

२१ आपण सैतानाच्या काही डावपेचांबद्दल पाहिले आणि त्याच्या हल्ल्यांपुढे टिकाव धरून राहण्याच्या गरजेवरही विचार केला. आता आपण आपल्या विश्‍वासाचे यशस्वीपणे संरक्षण करण्याकरता आवश्‍यक असलेल्या आणखी एका तरतुदीबद्दल परीक्षण करू या. इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात दोनदा प्रेषित पौलाने सैतानाच्या डावपेचांविरुद्ध टिकाव धरण्याकरता व दुरात्म्यांविरुद्ध आपल्या लढाईत विजयी होण्याकरता आवश्‍यक असलेल्या एका गोष्टीचा उल्लेख केला. पौलाने लिहिले: “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची [“संपूर्ण,” NW] शस्त्रसामग्री धारण करा. . . . तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची [“संपूर्ण,” NW] शस्त्रसामग्री घ्या.”—इफिसकर ६:११, १३.

२२, २३. (अ) आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीत कशाचा समावेश आहे? (ब) पुढील लेखात आपण काय विचारात घेणार आहोत?

२२ होय, आपण “देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री” धारण केली पाहिजे. पौलाने इफिसकरांना पत्र लिहिले तेव्हा त्याच्यावर एक रोमी सैनिक पाळत ठेवून होता; बरेचदा रोमी सैनिक संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करायचे. पण प्रेषित पौल देवाच्या प्रेरणेने यहोवाच्या प्रत्येक सेवकाला ज्याची नितांत गरज आहे त्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीविषयी चर्चा करण्यास प्रवृत्त झाला.

२३ यहोवाने दिलेल्या या शस्त्रसामग्रीत अशा गुणांचा समावेश आहे की जे एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वात असले पाहिजेत तसेच यहोवाने पुरवलेल्या आध्यात्मिक तरतुदींचाही यात समावेश आहे. पुढील लेखात आपण आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील प्रत्येक शस्त्राचे परीक्षण करू. यामुळे आपल्याला हे निश्‍चित करण्यास मदत मिळेल की आपल्या आध्यात्मिक लढाईकरता आपण कितपत सज्ज आहोत? तसेच, येशू ख्रिस्ताचा अद्‌भुत आदर्श कशाप्रकारे दियाबल सैतानाविरुद्ध यशस्वी होण्यास आपल्याला मदत करतो हे देखील आपण विचारात घेऊ.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• सर्व ख्रिस्ती कोणत्या लढाईत सामील आहेत?

• सैतानाच्या काही कुयुक्‍तींचे वर्णन करा.

• सहविश्‍वासू बांधवांचा आधार कशाप्रकारे आपल्याला बळ देऊ शकतो?

• आपण कोणाच्या सामर्थ्यावर विसंबून राहावे आणि का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्रे]

ख्रिश्‍चनांचे “झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे”

[१२ पानांवरील चित्र]

संसाराच्या चिंता राज्याच्या वचनाची वाढ खुंटवितात

[१३ पानांवरील चित्र]

सहख्रिस्ती बांधव आपल्याकरता “आधार” ठरू शकतात

[१४ पानांवरील चित्र]

तुम्ही शक्‍तीसाठी देवाकडे प्रार्थना करता का?