व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माणसाला भाकर मिळवून देणाऱ्‍या गिरण्या

माणसाला भाकर मिळवून देणाऱ्‍या गिरण्या

माणसाला भाकर मिळवून देणाऱ्‍या गिरण्या

भाकर. “मनुष्याचे मुख्य खाद्य,” “पुरातन काळापासून मनुष्याचा चरितार्थ” अशा विविध उपमा भाकरीला देण्यात आल्या आहेत. खरोखरच इतिहासाच्या सुरवातीपासूनच, या ना त्या रूपात भाकर हे मनुष्याचे मुख्य खाद्य राहिले आहे. किंबहुना, दररोजची भाजीभाकरी मिळवण्यासाठीच माणसाची सगळी धडपड आहे.

भाकर असो, पाव किंवा पोळी असो, तिचा मुख्य घटक म्हणजे पीठ किंवा कणीक. त्याअर्थी, दळण्याची कला ही तशी फार पुरातन म्हणावी लागेल. आधुनिक काळातील सोयीस्कर यंत्रे नव्हती तेव्हा धान्यापासून पीठ तयार करण्याची प्रक्रिया खरोखर किती मेहनतीची असावी! बायबल लिहिण्यात आले त्या काळात घरोघरी जात्याचा आवाज ऐकू येणे हे सामान्य, शांतीपूर्ण परिस्थितीचे चिन्ह होते; याउलट, हा आवाज ऐकू न येणे हे ओसाडीचे लक्षण समजले जात.—यिर्मया २५:१०, ११.

काळाच्या ओघात दळण्याच्या प्रक्रियेत कोणकोणते बदल झाले आहेत? त्यासाठी कोणकोणत्या पद्धती व उपकरणे वापरण्यात आली आहेत? आणि आज कशाप्रकारच्या गिरण्या वापरल्या जातात?

गरज का उद्‌भवली?

पहिल्या मानवी जोडप्याला, म्हणजेच आदाम व हव्वेला यहोवाने म्हटले: “अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पति व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो; ही तुमचे अन्‍न होतील.” (उत्पत्ति १:२९) यहोवा देवाने मानवांना दिलेल्या खाद्यांत तृणधान्याच्या कणसांतून प्राप्त होणारे बी होते. हे खाद्य मानवाच्या अस्तित्वाकरता अत्यावश्‍यक होते कारण गहू, जव, राय, ओट्‌स, तांदूळ, ज्वारी, नाचणी आणि मका या सर्व धान्यांत पिष्ठसत्व असलेली कर्बुदके असतात; शरीरात या कर्बुदकांचे रूपांतर ग्लूकोजमध्ये केले जाते जे शरीराचे प्रमुख इंधन आहे.

पण मानव, कच्च्या धान्याचे आख्खे दाणे पचवू शकत नाही. धान्याचे पीठ करून शिजवल्यास, त्याला ते पचवणे सोपे जाते. धान्यापासून पीठ तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे उखळीत घालून मुसळाने ते कुटणे, दोन दगड्यांच्या मध्ये धान्य भरडणे किंवा एकाच वेळी या दोन्ही पद्धतींचा वापर करणे.

मानवी शक्‍तीवर अवलंबून असणारी दळणयंत्रे

प्राचीन ईजिप्शियन थडग्यांत सापडलेल्या मूर्तींवरून, त्याकाळी वापरात असलेल्या एका खोगीराच्या आकाराच्या उपकरणाची कल्पना येते. या उपकरणात दोन दगड असत. एक साधारण खोलगट असलेला उतरता पाटा आणि त्यापेक्षा लहान आकाराचा वरवंटा. हा पाटा वरवंटा वापरणारी व्यक्‍ती, जी सहसा एक स्त्रीच असे, या पाट्यासमोर गुडघ्यांवर बसून दोन्ही हातांनी वरवंटा धरत असे. मग शरीराच्या वरच्या भागाचा पूर्ण भार देऊन ती हा वरवंटा पाट्यावर पुढे मागे सरकवून दोन्ही दगडांच्यामध्ये धान्य दळत असे. साधेसेच पण किती उपयोगी साधन!

पण, तासन्‌तास वाकून हे काम करण्याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय राहिले नाहीत. पाट्याच्या शेवटल्या टोकापर्यंत वरवंटा सरकवून तो पुन्हा ओढताना पाठ, हात, मांड्या, गुडघे आणि पायाच्या बोटांवर सतत ताण पडे. पुरातत्त्ववेत्त्यांना प्राचीन सिरियातून सापडलेल्या सांपळ्यांत हाडांच्या विकृती दिसून आल्या आहेत. त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की अशाच प्रकारच्या उपकरणांचा वापर केल्यामुळे तरुण स्त्रियांना वारंवार तेचतेच काम केल्याने विकार झाले असावेत. उदाहरणार्थ, गुडघ्याच्या वाट्यांना खाच पडणे, मणक्याच्या शेवटल्या हाडांना इजा आणि पायांच्या अंगठ्याला तीव्र स्वरूपाचा ऑस्टिओ-आर्थरायटिस नावाचा अस्थिरोग. प्राचीन ईजिप्तमध्ये, बऱ्‍याच दासींना अशाप्रकारचे पाटे वापरावे लागले असावेत असे भासते. (निर्गम ११:५) * काही अभ्यासकांच्या मते इस्राएल लोक ईजिप्त सोडून निघाले तेव्हा त्यांनी हे खोगीराच्या आकाराचे दळणाचे साधन आपल्यासोबत नेले असावे.

कालांतराने दळणाच्या साधनात प्रगतीशील फेरबदल करण्यात आले. अधिक चांगल्या परिणामांकरता, वरच्या व खालच्या दगडांना खाचा करण्यात आल्या. तसेच वरच्या दगडात नरसाळ्यासारखे पात्र बनवण्यात आले ज्यातून धान्य आत टाकले जायचे व ते आपोआप दोन दगडांच्या मध्ये जात असे. सा.यु.पू. चवथ्या किंवा पाचव्या शतकादरम्यान, ग्रीसमध्ये प्राथमिक स्वरूपाची चक्की निर्माण करण्यात आली. यात दोन तळ्या असत. वरच्या तळीला एक खुंटा असून धान्य आत टाकण्यासाठी एक पात्र असे. लहानशा परिघात हा खुंटा पुढे मागे फिरवल्यामुळे वरची तळी खालच्या तळीवर फिरे व दोन्ही तळ्यांच्या मध्ये धान्य भरडले जाई.

आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व दळण यंत्रांत एक मोठी समस्या होती. ती म्हणजे पुढे मागे सरकवण्याची क्रिया माणसांनीच करणे आवश्‍यक होते. जनावरांना शिकवून या कामाला लावणे शक्य नव्हते. मग, काही काळाने एक नवे तंत्रज्ञान जन्माला आले—चक्की. ही चक्की फिरवण्यासाठी जनावरांचा वापर करण्यात येऊ लागला.

चक्कीमुळे काम बरेच सोपे झाले

कदाचित चक्कीचा शोध, सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकात भूमध्य सागराच्या आसपासच्या प्रदेशांत लागला असावा. सा.यु. पहिल्या शतकापर्यंत, अशाप्रकारची चक्की पॅलेस्टाईनमधील यहूदी लोकांच्या परिचयाची होती, कारण येशूने ‘खेचराच्या साहाय्याने फिरवल्या जाणाऱ्‍या जात्याचा’ उल्लेख केला होता.—मार्क ९:४२, NW.

जनावरांच्या साहाय्याने फिरवल्या जाणाऱ्‍या चक्क्या रोम व रोमन साम्राज्याच्या अनेक प्रदेशांत प्रचलित होत्या. अशा अनेक चक्क्या अजूनही पॉम्पेई येथे आढळतात. यांत वाळूच्या घड्याळाच्या आकाराचा वरचा जडजूड दगड असे व खालचा दगड शंख्वाकार असे. वरचा दगड खालच्या दगडावर फिरताना दोन्ही दगड्यांच्या मध्ये घातलेले धान्य भरडले जाई. याप्रकारचे वरचे दगड जवळजवळ ४५ ते ९० सेंटीमीटर व्यासाचे आहेत. अशाप्रकारच्या चक्क्या कधीकधी सहा फूट उंचीच्या असत.

हलक्या जात्यांचा आधी शोध लागला की जनावरांच्या साहाय्याने फिरवल्या जाणाऱ्‍या चक्क्यांचा आधी शोध लागला हे स्पष्ट नाही. पण हाताने फिरवायच्या जात्याचा फायदा असा होता की ते कोठेही नेता येत होते आणि वापरायला सोपे होते. यात ३० ते ४० सेंटीमीटर व्यासाच्या दोन सपाट तळ्या असत. खालच्या तळीचा पृष्ठभाग बहिर्गोल असे; वरच्या तळीचा खालचा भाग खोलगट असून, तो खालच्या तळीवर बरोबर बसे. खालची तळी स्थिर असे आणि वरील तळी तिच्यावर फिरेल अशाप्रकारे मधोमध एका दांड्याने बसवलेली असे. वरील तळी फिरवण्याकरता एक लाकडी खुंटा असे. सहसा दोन स्त्रिया अमोरासमोर बसून एक हात वरील तळीच्या लाकडी खुंट्यावर ठेवत. (लूक १७:३५) दुसऱ्‍या मोकळ्या हाताने त्यांच्यापैकी एक स्त्री वरच्या तळीवर असलेल्या भोकातून थोडे थोडे धान्य भरीत आणि दुसरी स्त्री जात्यातून खाली सांडणारे पीठ खाली अंथरलेल्या कापडावर गोळा करत असे. ज्या ठिकाणी गिरण्यांची सोय नव्हती अशा दूरस्थ ठिकाणी राहणाऱ्‍या सैनिकांसाठी, नाविकांसाठी किंवा एकाकी ठिकाणी राहणाऱ्‍या लोकांसाठी अशाप्रकारचे जाते उपयोगी पडे.

पाण्याच्या किंवा वाऱ्‍याच्या प्रवाहावर चालणाऱ्‍या चक्क्या

सा.यु.पू. २७ सालच्या सुमारास, रोमी अभियंते व्हिट्रूव्हिअस यांनी आपल्या काळातल्या पाण्याच्या प्रवाहावर चालणाऱ्‍या चक्कीचे वर्णन केलेले आढळते. एक आडव्या दांड्यावर बसवलेल्या मोठ्या चक्राच्या पातींच्या विरुद्ध दिशेने पाण्याचा प्रवाह गेल्याने हे चक्र फिरायचे. या चक्राला जोडलेल्या दंतचक्राच्या साहाय्याने एका उभ्या दांड्याला गती दिली जाई. आणि हा दांडा एका मोठ्या जात्याला फिरवी.

इतर चक्क्यांच्या तुलनेत पाण्याच्या प्रवाहावर चालणाऱ्‍या चक्कीमुळे कमी वेळात जास्त पीठ तयार व्हायचे का? हाताने फिरवल्या जाणाऱ्‍या चक्कीतून ताशी १० किलोग्राम धान्य दळले जायचे; जनावरांच्या साहाय्याने फिरवल्या जाणाऱ्‍या सर्वात प्रभावी चक्कीतून जवळजवळ ५० किलोग्राम धान्य दळले जायचे. पण व्हिट्रुव्हिअसच्या पाण्याच्या चक्कीमुळे ताशी सुमारे १५० ते २०० किलोग्राम धान्य दळणे शक्य होते. व्हिट्रुव्हिअसने वर्णन केलेल्या मूलभूत प्रक्रियेत बरेच फेरबदल व सुधारणा करून कार्यकुशल गिरणीदारांनी हे तंत्र अनेक शतकांपर्यंत वापरले.

चक्क्या चालवण्याकरता नैसर्गिक शक्‍तीचा, वाहते पाणी हा एकमेव स्रोत नव्हता. पाण्याच्या प्रवाहावर फिरणाऱ्‍या चाकाच्या ऐवजी पवनचक्कीचे शीड वापरल्यास हेच उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते. साधारणतः सा.यु. १२ व्या शतकात युरोपमध्ये पवनचक्क्या वापरण्यात येऊ लागल्या आणि बेल्जियम, जर्मनी, हॉलंड व इतरत्रही यांचा सर्रास वापर केला गेला. वाफेच्या व इतर प्रकारच्या ऊर्जेवर अवलंबून असलेल्या चक्क्यांमुळे इतर सर्व प्रकारचे शक्‍ती स्रोत कालबाह्‍य होईपर्यंत या चक्क्या प्रचारात होत्या.

“आमची रोजची भाकर”

बरीच प्रगती झाली तरीसुद्धा, गतकाळातील अनेक दळण्याच्या पद्धती पृथ्वीच्या विविध भागांत अजूनही अस्तित्वात आहेत. आफ्रिका व ओशिनिया येथे अनेक ठिकाणी उखळ व मुसळ वापरले जाते. मेक्सिको व मध्य अमेरिकेत खोगीराच्या आकाराचा पाटा वरवंटा तोर्तियास या मक्यापासून बनवल्या जाणाऱ्‍या पोळीसारख्या पदार्थासाठी वापरला जातो. आणि पाण्याच्या व वाऱ्‍याच्या साहाय्याने फिरणाऱ्‍या चक्क्या देखील जगाच्या अनेक भागांत पाहायला मिळतात.

सुविकसित देशांत ब्रेड तयार करण्याकरता वापरले जाणारे पीठ हे पूर्णतया यांत्रिक व स्वयंचलित पद्धतीने रुळांच्या साहाय्याने दळणाऱ्‍या गिरण्यांत तयार केले जाते. या यंत्रात खाचा असलेले स्टील सिलिंडर्स वेगवेगळ्या वेगाने फिरत असतात. धान्याचे दाणे या सिलिंडर्सच्या मधून जातात तेव्हा ते हळूहळू दळले जातात व शेवटी पीठ तयार होते. या तंत्रामुळे कमी खर्चात, आवश्‍यकतेप्रमाणे कमी जास्त दळलेले पीठ मिळवता येते.

पीठ तयार करणे अर्थातच आता पूर्वीसारखे कष्टाचे काम राहिलेले नाही. तरीसुद्धा आपण निर्माणकर्त्याचे उपकार मानले पाहिजे की त्याने आपल्याला धान्य तर पुरवलेच पण, त्यासोबत या धान्यापासून “रोजची भाकर” मिळवण्यासाठी लागणारी कल्पकता व कुशलताही दिली.—मत्तय ६:११.

[तळटीप]

^ परि. 10 बायबल काळांत, बंदिवान बनवलेल्या शत्रूंना, उदाहरणार्थ शमशोन व इतर इस्राएलांना दळणाचे काम करायला लावले जायचे. (शास्ते १६:२१; विलापगीत ५:१३) स्वतंत्र स्त्रिया स्वतःच्या घराण्यासाठी धान्य दळायच्या.—ईयोब ३१:१०.

[२३ पानांवरील चित्र]

ईजिप्तमधील खोगिराच्या आकाराचे जाते

[चित्राचे श्रेय]

Soprintendenza Archeologica per la Toscana, Firenze

[२३ पानांवरील चित्र]

जनावरांच्या साहाय्याने फिरवल्या जाणाऱ्‍या चक्कीत तेल काढण्याकरता ऑलिव्हची फळे दाबली जात असत

[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]

From the Self-Pronouncing Edition of the Holy Bible, containing the King James and the Revised versions