व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘समुद्रातले विपुल धन’

‘समुद्रातले विपुल धन’

यहोवाच्या निर्मितीतील शोभा

‘समुद्रातले विपुल धन’

क्षितिजावर सूर्य विसावतोय. मंद वाऱ्‍याची झुळूक शांत समुद्रातील पाण्याला शिवून जातेय. लाटा संथपणे किनाऱ्‍यावर येऊन विरतायत. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्‍य आणि फेसाळ लाटांचा हा अखंड खळखळाट अनेकांना विश्राम व मनःशांतीच्या शोधात, समुद्रकिनाऱ्‍याकडे ओढून आणतो. *

पृथ्वीच्या पाठीवर हजारो किलोमीटरपर्यंत विस्तारलेल्या समुद्रतटावर असे अनेक समुद्रकिनारे आढळतात. वाळू व पाण्यामधली ही सतत बदलणारी रेषा, समुद्राच्या साम्राज्याची सरहद्द ठरते. निर्माणकर्त्यानेच ही सरहद्द आखली आहे. देव असे घोषित करतो, “मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमिली आहे.” तो असेही म्हणतो, “लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करितात तरी त्यांना ती [सीमा] उल्लंघवत नाही.”—यिर्मया ५:२२; ईयोब ३८:८; स्तोत्र ३३:७.

इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत आपल्या पृथ्वी ग्रहावर सर्वाधिक प्रमाणात पाणी आहे. किंबहुना, पृथ्वीगोलावरील ७० टक्के भाग पाण्याने झाकलेला आहे. यहोवाने मानवी वस्तीकरता या पृथ्वीची तयारी केली तेव्हा त्याने असा हुकूम केला: “आकाशाखालच्या जलाचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो.” आणि ‘तसेच झाले.’ या अहवालात पुढे म्हटले आहे, “देवाने कोरड्या जमिनीस भूमि म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.” (उत्पत्ति १:९, १०) समुद्रांमुळे पृथ्वीला कोणते फायदे आहेत?

समुद्रांची निर्मिती अनेकप्रकारे सजीव सृष्टीला आधार देण्याकरता करण्यात आली होती. उदाहरणार्थ, पाण्यात उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे समुद्रे प्रचंड मोठी उष्णतेची भांडारे ठरतात, ज्यांमुळे हिवाळ्याची थंडी थोडी सुसह्‍य होते.

पाण्याचा आणखी एक जीवनदायक स्वभावगुण आहे. इतर कोणत्याही द्रव पदार्थाच्या तुलनेत पाण्यात इतर पदार्थ अधिक सहजतेने विरघळतात. बहुतेक जैविक प्रक्रिया रासायनिक प्रतिक्रियांमुळे घडून येत असल्यामुळे, या प्रतिक्रियांमध्ये भाग घेणारी रसायने विरघळवून त्यांचे अणू एकमेकांच्या संपर्कात आणण्याकरता पाणी अत्यंत आवश्‍यक आहे. सजीव ऊतकांत सापडणाऱ्‍या बहुतेक रासायनिक संयुगांत पाण्याचा अंश असतो. द सी या पुस्तकात असे म्हटले आहे: “सर्व प्रकारच्या जिवांना पाण्याची गरज आहे—आणि शेवटी, जमिनीवर राहणाऱ्‍या वनस्पती व प्राण्यांनाही लागणारे हे सर्व पाणी समुद्रातूनच येते.”

पृथ्वीच्या पाठीवरील महासागर, वातावरणाच्या शुद्धीकरणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. महासागरांतील प्लवकजीव कार्बन डायॉक्साईड शोषून प्राणवायू सोडतात. एका संशोधकानुसार, “वातावरणात दर वर्षी भर पडणाऱ्‍या प्राणवायूतील ७० टक्के प्राणवायू महासागरांतील प्लवकांपासून मिळतो.”

सागरातून निरनिराळ्या रोगांवर गुणकारी ठरणारी नैसर्गिक औषधेही उपलब्ध होतात. कित्येक शतकांपासून माशांच्या शरीरातले विविध घटक औषधीच्या रूपात वापरण्यात आले आहेत. कॉड-लिव्हर ऑईल हे बऱ्‍याच काळपासून वापरात आहे. अलीकडे, मासे व इतर सागरी प्राण्यांच्या शरीरातील रसायने दमा या रोगाच्या उपचारात तसेच विषाणू व कर्करोगावरील उपचारात वापरण्यात आली आहेत.

समुद्रातून मिळणाऱ्‍या उत्पादनांच्या व सेवांच्या आर्थिक मूल्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थात अगदी अचूक निष्कर्षावर येणे तसे अशक्यच आहे, पण तरीसुद्धा संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की जागतिक परिस्थितीकीपासून मानवाला मिळणाऱ्‍या आर्थिक फायद्यांपैकी जवळजवळ दोन तृत्यांश समुद्रांपासून मिळतात. यावरून हेच दिसून येते की जीवनावश्‍यक गरजा तृप्त करण्यासाठी व जीवनाला आधार देण्यासाठीच समुद्रांची निर्मिती करण्यात आली होती. बायबलमध्ये ‘समुद्रातील विपुल धनाचा’ जो उल्लेख करण्यात आला आहे तो अगदी योग्यच आहे.—अनुवाद ३३:१९.

या धनाचा महान रचनाकार व निर्माणकर्ता या नात्याने यहोवाचा गौरव होतो. त्याची स्तुती या शब्दांत करण्यास नहेम्या प्रेरित झाला: “तूच एक परमेश्‍वर आहेस; आकाश . . . जलाशय त्यात असलेले सर्व काही यांचा तू उत्पन्‍नकर्ता व पालनकर्ता आहेस.”—नहेम्या ९:६.

[तळटीप]

^ परि. 3 २००४ यहोवाच्या साक्षीदारांचे कॅलेंडर (इंग्रजी) सप्टेंबर/ऑक्टोबर पाहावे.

[९ पानांवरील चौकट/चित्रे]

पाणी, वारा व लाटा

समुद्रातील पाणी व वारा यांमुळे महाकाय समुद्रलाटा निर्माण होतात, व चित्रात दाखवलेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारख्या खडकाळ डोंगरांवर त्या गर्जना करीत आदळतात. समुद्राच्या अद्‌भुत सामर्थ्याचे प्रदर्शन करणाऱ्‍या या लाटा मानवांना नेहमीच आश्‍चर्यजनक वाटल्या आहेत. तसेच, या लाटा निर्माणकर्त्याच्या वैभवी सामर्थ्याची अतिशय अद्‌भुतरित्या आठवण करून देतात. यहोवा, “समुद्राच्या पर्वतप्राय लहरीवरून चालतो.” “तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवितो; तो आपल्या बुद्धिबलाने राहाब [अर्थात, जलश्‍वापद] छिन्‍नभिन्‍न करितो.” (ईयोब ९:८; २६:१२) खरोखर, “विपुल जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्‍वर प्रतापशाली आहे.”—स्तोत्र ९३:४.

वाळूशिल्प

कधीकधी समुद्रकिनारा एखाद्या कलादालनाचे रूप घेतो; सोबतच्या चित्रातील दक्षिण आफ्रिकेच्या नामिबिया समुद्रतटावरील ही विलक्षण शिल्पकारी पाहा. खासकरून जोरदार वाऱ्‍यामुळे वाळूच्या ढिगाऱ्‍यांना असे निरनिराळे आकार येतात. काही वाळूच्या टेकड्या अगदी लहानशा ढिगाऱ्‍यांसारख्या दिसतात, तर काही ४०० मीटर उंचीचे असतात. वाळूचा हा प्रचंड मोठा भांडार आपल्याला ‘समुद्रतीरीची वाळू’ या बायबलमधील शब्दप्रयोगाचा अर्थ समजून घेण्यास मदत करतो. हा शब्दप्रयोग मोजता न येणाऱ्‍या, किंवा मापता न येणाऱ्‍या एखाद्या गोष्टीला सूचित करण्यासाठी वापरला जातो. (उत्पत्ति २२:१७) वादळी समुद्राच्या रोषापासून वाळूच्या शिल्पांच्या रूपात अतिशय कल्पकतेने नैसर्गिक संरक्षण पुरवणाऱ्‍या निर्माणकर्त्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.

[९ पानांवरील चित्र]

सनसेट कोस्ट, बायाफ्रा उपसागर, कॅमरून